Home | Magazine | Madhurima | Bhakti Athavle Bhave writes about Dr Vidyadhar Oke

श्रुतींचे डॉक्‍टर

भक्ती आठवले-भावे, मुंबई | Update - Jun 05, 2018, 01:16 AM IST

एखादा मनुष्य किती विषयांवर प्रभुत्व मिळवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विद्याधर ओक. कलाक्षेत्राला ते ज्येष्ठ हार्म

 • Bhakti Athavle Bhave writes about Dr Vidyadhar Oke
  एखादा मनुष्य किती विषयांवर प्रभुत्व मिळवू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. विद्याधर ओक. कलाक्षेत्राला ते ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि २२ श्रुतींचं अस्तित्व दाखवणारे संशोधक म्हणून परिचित आहेत. वैद्यकीय क्षेत्राला ते उत्तम फार्माकाॅलॉजिस्ट म्हणून माहीत आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. तर भारतीय, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य ज्योतिषतज्ज्ञ म्हणून चाळीसहून अधिक वर्षांचा त्यांचा व्यासंग आहे. याशिवाय विविध विषयांवर संशोधन आणि लेखन ते करत असतात.

  घरी संगीताची उत्तम परंपरा असल्याने बालवयातच त्यांनी आईकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक गोविंदराव पटवर्धन यांचं शिष्यत्व घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ डॉ. ओक हार्मोनियम वादनात रममाण आहेत. बॅडमिंटनच्या अनेक आंतरशालेय ज्युनियर चॅम्पियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत. १९६९-७० दरम्यान रुईया कॉलेजमधून विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर जी.एस. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेताना अनेक चषकांवर त्यांच्या नावाची मोहोर आहे. बुद्धिबळामध्येही ते प्रवीण आहेत.

  डॉ. विद्याधर ओक आणि ‘२२ श्रुतींची हार्मोनियम’ हे समीकरण रसिकांच्या मनात घट्ट रुजलेलं आहे. त्यांनी केलेल्या संशोधनासाठी विविध ठिकाणी त्यांना गौरवण्यात आलं आहे. २२ श्रुतींच्या विश्लेषणाबरोबरच सतार, सरोद, सारंगी, वीणा, रुद्रवीणा, एकतारी, तंबोरा या वाद्यांवर २२ श्रुतींच्या अचूक जागा कुठे वाजतील याचं तारेचं ‘पर्सेंटेज प्रमाण’ डॉ. ओक यांनी त्यांच्या संशोधनात दिलेलं आहे. ज्येष्ठ मोहनवीणा वादक विश्वमोहन भट्ट यांनी ‘या संशोधनासाठी तुला नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे’, असे गौरवोद्गार काढले आहेत. एकदा ‘२२ श्रुती आणि श्रुती वीणा’ यांबाबतचं संशोधन दाखवायला डॉ. विद्याधर ओक गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे गेले होते. एक महिना व्यवस्थितपणे सगळं वाचल्यावर ‘This outstanding research work needs to be duly rewarded’ असं त्यांनी लिहून दिलं,’ असं सांगताना डॉ. ओक यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. या भेटीमध्येच किशोरीताईंना डॉ. ओक यांनी विचारलं, “कर्नाटक संगीतात स्वर ‘स री ग म पा’ असे म्हटले जातात तर उत्तर भारतीय संगीतात ते ‘सा रे ग म प’ असे म्हटले जातात. हे असं का? आपली ‘सा रे ग म प’ ही नावं कशावरून आली?”
  त्या म्हणाल्या, “तुला काय वाटतं?”
  “मी म्हटलं, मला तर माहितीच नाहीये. पण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वरून डाउनलोड झालेलं उत्तर सांगतो. मला वाटतं की, ‘स री ग म पा’ बरोबर आहे. स आणि पा म्हणजेच आपले सा आणि प एकमेकांमध्ये इतके मिसळलेले आहेत की, तानपुऱ्यावर दोन्ही स्वर एका वेळी वाजत असतील तर नेमके किती स्वर वाजताहेत हे कळत नाही. हे एकमेकांमध्ये मिसळून जाणं म्हणजे नटराजाच्या तांडव आणि लास्य अंगाच्या शिव आणि पार्वतीचं लक्षण आहे. संगीताचा उगम शिवापासून झाला आहे. म्हणून ‘स’ हा सदाशिव आणि ‘पा’ म्हणजे पार्वती. गणितीय दृष्टीनेसुद्धा ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. ‘री’ म्हणजे रिषभ म्हणजेच नंदी. शंकराला तो आपल्या मुलांपेक्षाही जास्त प्रिय आहे. म्हणून तो त्यांच्या शेजारीच आहे. ‘पा’ म्हणजे पार्वतीच्या शेजारी ‘मयुरेश’ अर्थात कार्तिक आहे आणि ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्यात छोट्या मुलाचं संरक्षण करण्यासाठी आपण त्याला नेहमी सगळ्यांच्या मध्यभागी ठेवतो तसा या कुटुंबातला ‘ग’ म्हणजे गणेश आहे.” हे ऐकून त्या प्रचंड खुश झाल्या आणि म्हणाल्या, “बाळा, आज तू मला स्वरब्रह्माचा साक्षात्कार दिलास.” एखाद्या कलाकाराला इतकी मोठी पावती मिळाल्यानंतर परमानंद झाल्याशिवाय कसा राहील?
  इतका कलेमध्ये रमलेला माणूस वैद्यकशास्त्राकडे कसा वळला हे विचारताच ते म्हणाले, “मला वैद्यकशास्त्राची विशेष आवड वगैरे काही नव्हती. त्या वेळेला इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोनच मार्ग उपलब्ध होते. तेव्हा मला कोणी तरी सांगितलं म्हणून मी मेडिकलचं शिक्षण घेतलं. पण एमबीबीएस झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आपण पूर्णवेळ डॉक्टर म्हणून काम केलं तर कलेला आणि ज्योतिषविद्येला वेळ देता येणार नाही आणि रोजचा रियाज नसेल तर पेटीवर हात सराईतपणे फिरणार नाही. त्यामुळे डॉक्टरकीबरोबरच संगीतासाठीही वेळ राखून ठेवण्याच्या दृष्टीने मी पुढच्या शिक्षणासाठी ‘फार्माकाॅलॉजी’ हा विषय निवडला. फार्माकाॅलॉजी म्हणजे औषधांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम तपासण्याचे शास्त्र.”

  डॉ. ओक १९७६ ते १९८२ या काळात सायन हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ‘ग्लॅक्सो’, ‘वोक्हार्ट’ आणि ‘निकोलस पिरामल’ यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये १९८२ ते २००३ या काळात वैद्यकीय अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. तसेच भारतात आणि परदेशात १०० स्वतंत्र शोधनिबंध आणि शास्त्रीय व्याख्यानं सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या औषधशास्त्र या विषयावरील अभ्यास मंडळावर १९९० ते १९९६ दरम्यान तज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. ‘संशोधन’ हा ‘फार्माकाॅलॉजी’ या विषयाचा पाया असल्याने संशोधन कसं करावं, संशोधनाचं ध्येय कसं ठरवलं पाहिजे, त्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी संशोधनाचा मार्ग कसा असला पाहिजे याविषयी डॉ. ओक यांचा अभ्यास वैद्यकीय शिक्षण घेतानाच झाला होता. ‘लंडन बिझनेस स्कूल’ आणि ‘ड्यूक युनिव्हर्सिटी, अमेरिका’ येथून त्यांनी मॅनेजमेंट विषयाचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचा उपयोग पुढे २२ श्रुतींच्या संशोधनासाठीही झाला, असं डॉ. ओक सांगतात. “२००७पासून आजपर्यंत कोणीही माझ्या संशोधनावर प्रश्नचिन्ह उभे करू शकलेले नाही आणि करू शकणारही नाही,” असं ते आत्मविश्वासाने म्हणतात. आपल्या बुद्धिमत्तेवरचा असा आत्मविश्वास पाहून डॉक्टरांच्या ‘विद्याधर’ या नावाची सार्थता पटते. (पूर्वार्ध)

  bhaktiathavalebhave@gmail.com

Trending