आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'काटा नी टक्‍कर\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नजर हटी, दुर्घटना घटी...’ गुजरातच्या संदर्भात असाच अनुभव गेल्या तीन-साडेतीन वर्षांत भाजपने घेतला.गुजरात आनंदीबेन पटेलांकडे सोपवून मोदी पंतप्रधानपदी काय विराजमान झाले, पाटीदार आंदोलन, मग शेतकरी आंदोलन, दलित अत्याचारविरोधी आंदोलन, व्यापाऱ्यांचा संताप अशा घटना घडत गेल्या. जाणकार म्हणतात, नाराजी होतीच, मोदींमुळे ती दबून राहिली होती. पण तेच मोदी पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या निवडणुकीत उतरले. काँग्रेसच्या मुसंडीने निकालांचे अंदाज हेलकावे खात असताना, भाजप सन्मानपूर्वक निवडणूक जिंकणार की जिंकूनही हरणार हाच चर्चेचा मुद्दा आहे... 
 

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा काल पूर्ण झाला. सौराष्ट्र-कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील ८९ मतदारसंघांमधे मतदान झाले. सीएसडीएस-एबीपी (भाजप ९५, काँग्रेस ८२) आणि टाइम्स नाऊ-व्हीएमआर (भाजप १०६ ते ११६, काँग्रेस ६३ ते ७३) आदींचे पाहणीचे निष्कर्ष निकालाची उत्कंठा वाढविणारे ठरले. यात सीएसडीएसच्या पाहणीनुसार काँग्रेस व भाजप यांना सारखीच मते मिळण्याची शक्यता(४३%) वर्तविण्यात आली आहे. मागच्या तिन्ही विधानसभा निवडणुकांत (२००२, २००७, २०१२) भाजपला जवळपास ४९% मते प्राप्त झालेली होती, तर काँग्रेसला प्राप्त मते ४०%च्याआसपास राहिली. या पाहणीत भाजपला ९५ जागांसह निसटतेबहुमत मिळेल असे भाकित केले गेले आहे. परंतु काल (आणि १४ डिसेंबरला) मतदान करताना एक-दोन टक्केही मतदान वर खाली झाले, तर भाजपला स्पष्ट आणि स्थिर बहुमत किंवा काँग्रेस सत्तेत असा टोकाचा बदल संभवतो.   


लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, या पूर्वीच्या तिन्ही निवडणुका विकास, हिंदुत्व आणि गुजराती अस्मिता या मुद्द्यांभोवती फिरत होत्या. तसेच तिन्हीही वेळेस नरेंद्र मोदी मुख्यमंत्री पदाचे दावेदार या भूमिकेतून निवडणूक लढवत होते. यावेळी परिस्थिति भिन्न आहे. विकासाचा मुद्दा, अजूनही चर्चेत आहे. पण त्याला राहुल गांधींनी प्रभावी आव्हान दिले आहे. राहुल यांनी आपल्या प्रत्येक भाषणात गुजरातचा विकास म्हणजे १० उद्योगपतींचा विकास’ अशी मांडणी करताना टाटा, अदानी, अंबानी यांना दिलेल्या सवलती किंवा दिलेले प्राधान्य अधोरेखित केले आहे. राजकोटसारख्या शहरात भाजपने-सर्जिकल स्ट्राइक, अमृत योजना, विद्यार्थांना लॅपटॉप आदी गोष्टींचा उल्लेख करत, ‘आहे ना सॉलिड काम’ असे फलक जागोजागी लावले आहेत. याला उत्तर म्हणून त्या फलकांच्या शेजारी किंवा बरोबर समोर-तीन सीएम राजकोटने दिले पण अजूनही वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी येत नाही, ‘आहे ना सॉलिड काम’ असे  उपरोधिक फलक काँग्रेसने लावले आहेत. 


दुसरीकडे जीएसटी व नोटाबंदीमुळे नाराजी स्पष्ट दिसते आहे. भाजपला पाठिंबा देत आलेला व्यापारी वर्ग नाखुश आहे. परंतु त्यामुळे सर्व व्यापारी वर्ग भाजपच्या विरोधात जाईल, असे मात्र नाही. याउलट छोटे दुकानदार, पानपट्टीवाले वगैरे मात्र राहुल गांधींच्या ‘गब्बर सिंग टॅक्स’ या मताशी सहमत दिसले. एका शेतकऱ्याने मालाला मिळणाऱ्या भावातून जीएसटी कापला जातो, अशी तक्रार केली. टॅक्सविषयीची कोणतीही अडचण जीएसटीला जोडली जात आहे,असे निदर्शनास आले. त्यामुळे जीएसटी व नोटबंदी विरोधी जनमत  कमी जास्त प्रमाणात भाजपविरोधात जाण्याची शक्यता आहे. जीएसटी आणि नोटबंदी समोर नर्मदेचे पाणी, बुलेट ट्रेन, सर्जिकल स्ट्राइक इत्यादी नरेंद्र मोदी यांच्याकडूनउपस्थित केले गेलेले विकासाचे मुद्दे झाकोळले गेले आहेत. याच बरोबर ग्रामीण भागात शेतमालाला मिळणारा अपुरा भाव हा गुजरातमध्ये असंतोषाचा मुद्दा झाला आहे. ‘युपीए सत्तेत असताना २०१४ला कपाशीला भाव १४०० रुपये मिळत होता, आता तो भाव ७००-९०० रुपये पर्यंत कमी झाला आहे.’ अशी तक्रार गोंडल तालुक्यातील एका शेतकऱ्याने केली. भुईमुगाबाबतहीअशीच स्थिति आहे. याउलट रासायनिक खतांची किंमत दुपटीने वाढली आहे. मजुरीचा दर ही वाढला आहे. यामुळे भाजप सरकार शेतकऱ्यांचे हीत पाहत नाही, अशी भावना दिसून आली. हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार आंदोलनामुळे  पाटीदार शेतकऱ्यांचा रोष अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे शहरात तसेच ग्रामीण भागात विकास या मुद्यावर भाजपची कोंडी झालेली दिसून येते. 


हिंदुत्व किंवा धार्मिक ध्रुविकरणाचा घटक यावेळी क्षीण आहे. यामागे मुख्य दोन कारणे आहेत. एक म्हणजे, पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे जातीय अस्मिता निवडणुकीय राजकारणाच्या संदर्भात तीव्र झाली आहे. त्यामुळे धार्मिक अस्मिता बाजूला पडली आहे.आणि दुसरे कारण म्हणजे, धर्माबाबत काँग्रेसने अवलंबिलेले नवीन धोरण. राहुल गांधींनी सर्व महत्वाच्या मंदिरांना प्रचारादरम्यान भेटी दिल्या. आपण शिवभक्त असल्याचे प्रतिपादन केले तसेच बऱ्याचदा ते कपाळाला टिळा लावून बोलताना दिसले. भाजपने त्याची खिल्ली उडवलेली असली, तरी किमान प्रतिकात्मक पातळीवर भाजपच्या हिंदुत्वाचा प्रभाव बोथट झाला. याचबरोबर आपल्यावर मुस्लिमांचे लांगुल चालन करतो, असा आरोप होईल, अशी कृती-वक्तव्ये राहुल गांधींनी टाळली आहेत. नरेंद्र मोदींच्या राजकोटमधील सभास्थानाच्या प्रवेशद्वारापाशी ‘माझ्यासाठी धर्म म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम’असे वाक्य असणारे बरेच फलक लावलेले होते. भाजपला अशाप्रकारे धर्माच्याबाबत आपले नरेटिव्ह बदलावे लागले, हे हिंदुत्वाचा मुद्दा या निवडणुकीत बऱ्याचअंशी निकामी झाल्याचे लक्षण आहे. 


केंद्रात काँग्रेस आणि राज्यात भाजप असताना नरेंद्र मोदी  केंद्र सरकार गुजरातवर अन्याय करते, अशी भूमिका घेत गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत. पण २०१४ मध्ये केंद्रात भाजप आल्यापासून गुजराती अस्मितेच्या मुद्याचे अपील तितकेसे न राहिल्याचे दिसून येते. तसेच २०१४ मधे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यांच्या मागे प्रभावी म्हणावी, अशी नेत्यांची दुसरी फळी नसल्यामुळे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून विजय रुपानी यांना मुख्यमंत्री करावे लागले, हा त्याचाच परिणाम. प्रशासनावरची पकड ही त्यामुळे ढिली झाली. परिणामी, ऊनामधील गोरक्षकांकडून दलितांवर झालेला हल्ला तसेच पाटीदार आंदोलनसंवेदनशीलपणे हाताळले गेले नाही. त्यातून निर्माण झालेला रोष भाजपसमोरील मोठे आव्हान ठरले आहे. 


पाटीदार वोट बँक महत्वाची आहे. कारण एकूण मतदारांपैकी १२% पेक्षा अधिक मतदार पाटीदार आहेत. जवळपास ८०-८२ मतदारसंघात या वोटबँकेचा प्रभाव आहे. या समाजात उद्योगांमुळे भरभराट झालेले जसे आहेत तसेच शेतीची परवड झाल्यामुळे आर्थिक दारिद्र्यात असणारे ‘खेडूत’ ही आहेत. हार्दिक पटेलच्या ‘अनामत आंदोलना’ला या खेडूत आणि शहरातील निम्न व मध्यमवर्गीय पाटीदारांनी बळ दिले आहे. भाजपने हे आंदोलन अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळले. एका पाटीदार तरुणाने ‘सरकारने आमचे १४ युवक मारले. घरात घुसून आमच्या आयाबहिणींना मारहाण केली’ हे काही व्हिडिओ दाखवत सांगितले. ‘त्यामुळे यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’ अशी भावना व्यक्त केली. ही अस्मिता दुखावल्याची भावना विशेषः तरुणांमधे टोकदार आहे. हार्दिक पटेलच्या सभेला त्यामुळे मोठा प्रतिसाद मिळत आहे. हार्दिकने सौराष्ट्रचा ग्रामीण भाग पिंजून काढला. हार्दिकच्या कथित सीडीचा भाजपला फारसा लाभदायक परिणाम झाला नाही. एकाला सीडी विषयी विचारले असता म्हणाला ‘मला ५० लाख द्या मी हार्दिकच्या जागेवर रूपानींना (मुख्यमंत्री) दाखवतो.’ परंतु मतदान करताना बहुसंख्य पाटीदार काँग्रेसला मतदान करतील,का यावर दुमत आढळले. एका दाव्यानुसार बहुसंख्य पाटीदार काँग्रेसला मत देतील. तर दुसऱ्या दाव्यानुसार कडवा पाटीदार (हार्दिक कडवा आहे) काँग्रेसला मत देतील पण ती खात्री लेवा पाटीदारांची देता येत नाही. ग्रामीण भागातील एका पाटीदाराने’ ग्रामीण भागात पाटीदार एकजूट होईल, पण शहरात भाजपच्या धोरणांचा लाभ झालेले काही, भाजप लाच मत देऊ शकतात.’ असे मत व्यक्त केले. त्यामुळे उघड तर्क आहे की जर पाटीदार वोटबँकेत फूट पडली तर सीएसडीएस-एबीपीचे भाकित खरे ठरेल. आणि बहुसंख्य पाटीदारांनी एकदिलाने मतदान केले तर काँग्रेस १८ डिसेंबरला गुलाल उधळेल. कारण परंपरागत मुस्लिम, क्षत्रिय, दलित, आदिवासी वोटबँक काँग्रेसला ४०%मतांपर्यंत घेऊन जाते. विजयासाठी उर्वरित मते काँग्रेसला पाटीदार वोटबँकेकडून अपेक्षित आहेत. 


काँग्रेसची व्यूहनीती 
राहुल गांधींना या निवडणुकीच्या निमित्ताने नवा सुर सापडला, असे दिसते. ट्विटरचा कधी नव्हे तो कल्पक वापर राहुल गांधी करताना दिसतात. भाजप वैयक्तिक शेरेबाजी करत असताना त्यांनी आपले सभांमधील भाषण विकासाच्या मुद्यांभोवतीच केंद्रित ठेवले आहे. उद्योगपतींना प्राधान्य, जय शहा प्रकरण, मोदींनी दिलेली आश्वासने आणि त्यात आलेले अपयश यासारखे मुद्दे ते वारंवार अधोरेखित करताना दिसतात. याचबरोबर शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी, आरोग्यकर्मचारी अशा वेगवेगळ्या गटांशीही त्यांनी प्रश्नोत्तरे स्वरुपात संवाद साधला. याचबरोबर त्यांनी मंदिरांना वारंवार भेटी दिल्या आहेत. आपली धार्मिक ओळख व जाणीव सार्वजनिक रित्या प्रकट करण्याचे नवे वळण या निमित्ताने काँग्रेस घेतले असे म्हणता येईल. राहुल गांधींच्या या कार्यपद्धतीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमधे चैतन्य निर्माण झाले तसेच समाजमाध्यमांमधे त्यांची प्रतिमा उजळली, समर्थक वाढले. 


या शिवाय हार्दिक, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर यांच्याबरोबर परस्पर पूरक समीकरण बसवण्यातही त्यांना यश मिळाल्याचे दिसले. दरम्यान, त्यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. गुजरात निवडणूक त्यांच्या निवडणुका जिंकून देण्याच्या क्षमतेची लिटमस टेस्ट आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढल्या, तरी ती राहुल गांधींसाठी व काँग्रेससाठी उत्साहवर्धक सुरुवात असेल. आणि समजा विजय मिळालाच, तर आगामी लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आत्मविश्वासाने सामोरे जाईल. 


एकूण जीएटी, नोटबंदीविषयी नाराजी; हार्दिक, जिग्नेश, अल्पेश हे तरुण त्रिकूट; राहुल गांधींची नवी कार्यपद्धत्ती यामुळे  गेल्या पंधरा वर्षांत प्रथामच भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.  याचमुळे कदाचित भाजपच्या जागा कमी होतील हे मोदी-शहा वगळता गुजरात मधील भाजप समर्थकही मान्य करू लागले आहेत. प्रश्न एवढाच आहे ,की भाजपला निसटत्या बहुमताने पुन्हा सत्ता मिळेल की भाजप सत्तेतून हद्दपार होईल. 

 

- भाऊसाहेब आजबे ( लेखक राजकीय विश्लेषक आहेत लेखकाचा संपर्क 9960611870 )

bhausaheb.ajabe@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...