आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक 'निर्लेप' कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्लेपमधुन नेदरलँड येथे निघालेल्या पहिल्या विदेशी ऑर्डरचा प्रसंग. - Divya Marathi
निर्लेपमधुन नेदरलँड येथे निघालेल्या पहिल्या विदेशी ऑर्डरचा प्रसंग.

मराठी माणसाने कधी नव्हे तो इतका मोठा ‘निर्लेप' ब्रॅण्ड तयार केला होता. किती अभिमान होता मराठी माणसांना या ब्रॅण्डचा! आणि भोगले परिवाराने तो अचानक थेट अमराठी माणसाच्या हवाली करून टाकावा? तोही अवघ्या ८० कोटी रुपयांत? हेच प्रश्न घेऊन मग थेट राम भोगले यांनाच गाठले. त्यांनी त्यांची बाजू समजवून सांगता सांगता ‘निर्लेप'चा संपूर्ण प्रवासच उलगडला.


नस्टिक किचन वेअर्स म्हणजे निर्लेप' असं सुत्र भारतीय बाजारात बनायला किती मेहनत घ्यावी लागली असेल भोगले कुटुंबियांना? औरंगाबादसारख्या ठिकाणी अशा वस्तूंचे उत्पादन करून इतका चांगला ब्रॅण्ड इश्टॅब्लिश करणे सोपे काम थोडीच असेल? आजही निर्लेप म्हटले की लोकांना नाॅनस्टीक भांडीच आठवतात देशभर. असे असताना भोगले कुटुंबियांनी हा ब्रॅण्ड विकून टाकावा? मराठी माणसाने कधी नव्हे तो इतका मोठा ब्रॅण्ड तयार केला होता. किती अभिमान होता मराठी आणि मराठवाडी माणसांना या ब्रॅण्डचा! आणि भोगले परिवाराने तो अचानक थेट अमराठी माणसाच्या हवाली करून टाकावा? तोही अवघ्या ८० कोटी रुपयांत? अशाच काहीशा प्रतिक्रिया होत्या 'निर्लेप'ची विक्री झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा. केवळ माध्यमांकडे नाही, थेट राम भोगले आणि मुकुंद भोगले यांच्याकडेही त्यांचे स्नेही, शुभचिंतक फोन करून या प्रतिक्रिया नोंदवत होते. हेच प्रश्न घेऊन मग थेट राम भोगले यांनाच गाठले. त्यांनी त्यांची बाजू समजवून सांगता सांगता 'निर्लेप'चा संपूर्ण प्रवासच उलगडला. बराच रंजक आणि उद्बोधकही आहे हा प्रवास. त्याचे असे झाले...

 

मूळ कोकणात असलेला आणि शिक्षण आणि रहिवास विदर्भातल्या खामगावला झालेला नीळकंठ गोपाळराव भोगले नावाचा एक तरूण मुंबईत जाऊन सहाय्यक मोटरमन म्हणून रेल्वेत नोकरीला लागला. ही नोकरी म्हणजे कशी, तर त्याकाळी असलेल्या वाफेवरच्या इंजिनाच्या भट्टीत वारंवार कोळसा टाकत राहाणे, गाडी मध्येच कुठे थांबली तर शेवटच्या डब्यापर्यंत जाऊन लाल झेंडा लावून येणे, इंजिन शेंटींग करून आणणे अशी कामे असलेली. नोकरीची गरज होती पण जिद्द होती उच्च शिक्षण घेऊन इंजिनिअर होण्याची. नोकरी करून त्यावेळी रात्रीच्या काॅलेजमध्ये शिकण्याची सोय झाली. त्यातून त्याने मॅकेनिकल आणि इलेक्ट्रीकल या दोन क्षेत्रात अभियांत्रिकीची पदविका मिळवली.  रेल्वेतली नोकरी सोडली. मुंबईतच एका टायरच्या कंपनीत नोकरी मिळवली. ती करीत असताना बहिणीच्या लग्नासाठी खामगावला यायचे हाेते. त्यासाठी बॉस रजा द्यायला तयार नव्हता. नीळकंठने थेट राजीनामा दिला आणि लग्नघर गाठले. आता नोकरी करायची नाही, असा निर्णय घेऊनच तो मुंबईत परतला.

 

मुंबईतून केमिकल होलसेलने विकत घ्यायचे आणि उर्वरित महाराष्ट्र, मध्यप्रदेश या भागात विकायचे हा व्यवसाय त्याने सुरू केला. त्यासाठी त्याला शाळांच्या प्रयोगशाळा आणि हाॅस्पिटल्सच्या प्रमुखांना सातत्याने भेटावे लागे. त्या वेळी अनेक हाॅस्पिटल्समध्ये इम्पाॅर्टेड इक्वीपमेंट पडून असलेली त्याने पाहिली. ही इक्वीपमेंटस् मी दुरुस्त करून देऊ शकतो, असे निळकंठने तिथल्या स्टोअर किपरला सांगितले. त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्यातले एक दुरुस्तीला दिले. निळकंठने ते दुरूस्त करून परत दिले. देताना हे मी तयारही करू शकतो, असेही सांगितले. ते ऐकून सिमेन्स एजी या जर्मन कंपनीचे लायडन या तरुणाला भेटायला आले. अशी इक्वीपमेंटस् तयार करून दिली तर आम्ही ती विकत घेऊ, असे त्यांनी सांगितले. नमूना म्हणून दोन तयार करून दिली. त्यामुळे आॅर्डर मिळाली. रे रोड परिसरात एका १० बाय १० च्या माळ्यावर कारखाना सुरू झाला. १९६२-६३ चा हा काळ असावा. नीळकंठ भोगलेंचे आजोळ औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीवर म्हणजे कायगावला होते. त्यांचे वृद्ध आई वडीलही तिथे राहायला आले होते. त्यामुळे त्यांनी औरंगाबादला कारखाना हालविण्याचा निर्णय घेतला आणि ते औरंगाबादला आले.

 

नीळकंठ गोपाळराव उपाख्य नानासाहेब भोगले यांचा पहिला कारखाना औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत सुरू झाला. स्टेनलेस स्टीलचा वापर करून मेडिकल इक्वीपमेंटस् बनू लागली आणि सिमेन्सचे लायडन ती उपकरणे आपल्या कंपनीचा शिक्का मारून जगभर पोहोचवू लागले. त्यातून उद्योगवृद्धी होत असतानाच एप्रिल १९६५ ला भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. त्यामुळे स्टेनलेस स्टीलच्या वापरावर बंधने आली. त्यासाठी दिलेले परवाने रद्द करण्यात आले. इक्वीपमेंटची निर्मिती थांबल्यामुळे सिमेन्सलाही अडचण होऊ लागली. त्यावेळी पाॅलिटेट्रा फ्लोरो इथिलीन नामक रसायनाचा लेप लोखंडावर लावून त्यापासून ही उपकरणे बनविण्याचा सल्ला नानासाहेब भोगलेंना देण्यात आला. त्यानुसार काम सुरू करायचा निर्णय त्यांनी घेतला आणि हे रसायन इम्पेरियल केमिकल इंडस्ट्रीकडून आयात करण्यात आले. त्यानुसार प्रयोगही सुरू झाले. पण त्याच काळात हरितक्रांतीचा जोर वाढला होता. त्यासाठी खते आणि किटकनाशके तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीची आवश्यकता निर्माण झाली होती. त्या उद्योगांना स्टेनलेस स्टील लागणार होते. त्यामुळे सरकारने स्टेनलेस स्टील वापरावरील निर्बंध उठवले आणि परवाने पुन्हा देण्यात आले. स्टेनलेस स्टील उपलब्ध झाले म्हटल्यावर कोण लोखंडावर केमिकलचा लेप लावून प्रयोग करीत बसणार? पण मग आयात केलेल्या या रसायनाचे करायचे काय, असाही प्रश्न उभा राहिला. ते कोणी विकत घेते काय, हे शोधण्यात आले. पण कोणी ग्राहक मिळत नव्हता. त्याच सुमारास म्हणजे १९६७ सालच्या प्रारंभी एक छोटी पण कलाटणी देणारी घटना घडली. ती सांगण्याआधी या रसायनाविषयी थोडे सांगितले पाहिजे.

 

१९५३ साली अपघातानेच या रसायनाचा शोध लागला होता. त्यानंतर सहा वर्षांनी या रसायनाचा लेप लावून नाॅनस्टीक भांडी बनवता येतात, हे समोर आले आणि १९६१-६२ पासून अशा भांड्यांचे फ्रान्समध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. इंग्लंडमध्ये ही भांडी वापरली जाऊ लागली होती त्यावेळी डाॅ. कुद्रीमोती हे हृदयरोगतज्ञ इंग्लंडमध्ये राहात होते. १९६६ मध्ये ते औरंगाबादला राहायला आले. जानेवारी ६७ मध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन रोटरी क्लबने केले होते. त्याला नानासाहेब भोगलेही उपस्थित होते. या व्याख्यानात डाॅक्टरांनी तेल, तुपाचा वापर कमी करणे हृदयासाठी कसे फायद्याचे आहे हे सांगताना इंग्लंडहून आणलेले नाॅनस्टिक भांडे दाखवले. अशी भांडी भारतात बनत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. नानासाहेबांनी ते भांडे हातात घेऊन पाहिले. त्याला आतून लेप लावलेला होता आणि त्या भांड्यावर आयसीआयचा म्हणजे इम्पेरियल केमिकल इंडस्ट्रीजचा शिक्का होता. हा कसला लेप आहे, याची माहिती घेतली तर तर ते पाॅलिटेट्रा फ्लोराे इथिलीन असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे तर आपल्याकडे पडून आहे, या जाणीवेने ते रोमांचित झाले. मग सुरू झाली भांड्यांना हा लेप कसा लावायचा हे शोधण्याची मोहीम. हे तंत्र सांगायला कोणी तयार होई ना. आयसीआयने एक लेख तेवढा पाठवला. त्यात या रसायनाचा लेप कसा लावायचा हे सांगितले होते. लेप लावण्यासाठी पृष्ठभाग खरबडीत हवा, त्यावर हे रसायन स्प्रे करावे आणि नंतर ते ३८० सेंट्रीग्रेड तापमानात भाजावे हे ते तंत्र होते. झाले. तातडीने अॅल्युमिनियमच्या तबकड्या मागवण्यात आल्या. त्यावर रसायन स्प्रे करून त्या भाजण्यात आल्या. पण त्यामुळे आधी दुधासारखे पांढरे दिसणारे हे रसायन पारदर्शी झाले. त्यामुळे तबकडीवर ते लावले आहे की नाही, हे दिसतही नव्हते. अर्थातच, ते रंगीत असायला हवे होते. मग त्याला आरोग्याला घातक नसलेला रंग कसा आणता येईल यावर काम सुरू झाले. मोठ्या प्रयत्न आणि प्रयोगांनंतर त्यातही यश आले. पाॅलीटेट्रा फ्लोरा इथिलीनचा लेप लावून तयार झालेल्या या तबकड्या औरंगाबादहून मुंबईला नेण्यात आल्या. तिथे त्यांना भांड्यांचा आकार देण्यात आला. ती भांडी पुन्हा औरंगाबादला मागवण्यात आली. तेथे हॅण्डल्स लावून, पॅकींग करून विक्रीसाठी पुन्हा मुंबईला पाठवण्यात आली. काही महिने असा द्राविडी प्राणायाम केल्यावर या सर्व प्रक्रीया औरंगाबादमध्येच सुरू करण्यात आल्या. हे भांडे तयार झाल्यावर ते नानासाहेबांनी घरी दाखवले. त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि सर्व भावंड जमले होते. हे भांडेे पाहून नानासाहेबांच्या मोठ्या भगिनी म्हणाल्या, 'नाना, हे भांडे तुझ्यासारखेच निर्लेप आहे रे बाबा'.  नानासाहेबांना त्यांच्या आजी 'माझा निर्लेप नातू' असे म्हणायच्या. कारण त्यावेळी काहीही खावू दिला तर लहानगा नीळकंठ तो आधी भावंडांना वाटायचा आणि मगच स्वत: खायचा. त्यांचे हे वागणे 'निर्लेप' आहे, असे त्यांच्या आजीचे म्हणणे होते. तेच नाव या भांड्यांना देण्यात आले आणि 'निर्लेप' या ब्रॅण्डचा जन्म झाला. १९६८ च्या गुढीपाडव्याला रितसर निर्लेपच्या भांड्यांची विक्री सुरू करण्यात आली. युरोपनंतर केवळ भारतात, नव्हे औरंगाबादमध्येच नाॅनस्टीक भांडे तयार होऊ लागले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

१९७२ मध्ये मद्रासला आॅल इंडिया ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात अाले होते. त्यात नानासाहेबांनी या भांड्यांचे प्रदर्शन लावले. तिथे पोलंडचे काही उद्योजक आले होते. त्यांना हे नाॅनस्टीक भांडे आवडले. त्यांनी आम्हाला ही भांडी पाठवाल का, असा प्रश्न नानासाहेबांना विचारला. त्यांनी लगेच तयारीही दाखवली. तीन महिन्यानंतर २५००० भांडी पाठवण्याची आॅर्डर त्या पोलिश व्यापाऱ्यांनी दिली. पण ही भांडी पाठवताना त्यावर कोणताही ब्रॅण्ड टाकू नका आणि मेड इन इंडियाही लिहू नका, असे त्यांनी सांगितले. नानासाहेबांना हे मान्य झाले नाही. त्यांनी ब्रॅण्ड नेम न टाकायला तयारी दाखवली. पण मेड इन इंडिया लिहायचे नसेल तर निर्यात करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. अखेर ती मान्य करण्यात आली आणि 'निर्लेप'ची नाॅनस्टीक भांडी पोलंडमध्ये वापरली जायला लागली. पुढे आफ्रिका, अरबस्तान, न्यूझीलंड, मलेशिया अशी सर्वत्र ही भांडी लोकप्रिय झाली. मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली.

 

देशभर वितरकांचे जाळे उभे करण्यात आले. घराघरात निर्लेपची भांडी दिसायला लागली. हळूहळू ती प्रतिष्ठेचे प्रतिकही बनली. त्यांची लोकप्रियता पाहून अनेकांना या उद्योगात शिरण्याचा मोह व्हायला लागला. अर्थव्यवस्था खुली झाल्यावर तर जग हेच एक बाजारपेठ झाले. विदेशातले उद्योजक भारतात येऊन मोठी स्पर्धा करायला लागले. भारतातल्याच अनेकांनी चीनमधून भांडी बनवून आणायला आणि स्वत:चे ब्रॅण्डनेम लावून ती कमी किमतीत विकायला सुरूवात केली. तिथे ना दर्जाचा विचार राहिला, ना सेवेचा. हळूहळू त्यांच्याशी त्यांच्या दर्जाला जाऊन स्पर्धा करणे भोगले कुटुंबियांना अडचणीचे वाटायला लागले. दुसरीकडे या कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीने आॅटोमोटिव्हज् उत्पादकांना सुटेभाग बनवून देण्याच्या कामात मोठी प्रगती केली आहे. त्या उद्योगांची उलाढाल ५०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. आणखीही नव्या उद्योगात शिरण्याचे आणि मोठा विस्तार साधण्याचे अनेक मार्ग भोगले कुटुंबीयांना खुणावत आहेत. अशा वेळी १०० कोटी रुपयांच्या उलाढालीचे हे लोढणे गळ्यात का अडकवून ठेवायचे, असा विचार भोगले कुटुंबियांनी केला आणि 'निर्लेप'ची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१६ पासूनच प्रक्रिया सुरू झाली होती.

 

बजाज कुटुंबातील शेखर बजाज यांच्या अधिपत्याखालील बजाज इलेक्ट्रीकल्स कंपनीने निर्लेपचा ८० टक्के हिस्सा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बजाज इलेक्ट्रीकल्सच्या कोणत्याही ब्रॅण्डला बजाज या नावाशिवाय स्वत:ची अशी ओळख नाही. त्यामुळे शेखर बजाज यांनाही देशभर पसरलेला निर्लेपसारखा एखादा ब्रॅण्ड हवाच होता. भोगले यांनी त्यांच्याकडे हा ब्रॅण्ड सोपविण्याचा निर्णय घेतला. अनेक विदेशी कंपन्या जास्त पैसे देऊन हा ब्रॅण्ड विकत घ्यायला तयार होत्या. पण त्यांनी निर्लेप टिकवलेच असते असे नाही. किंबहुना, हा ब्रॅण्ड नष्ट करण्याचेच त्यांचे धाेरण दिसत होते. त्यामुळे थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण भारतीय कंपनीकडे आणि ब्रॅण्ड टिकवण्याकडे कल असलेल्या कंपनीकडेच तो सोपवायचा निर्धार भोगले कुटुंबीयांनी केला आणि तसा निर्णयही आता झाला आहे. पुढच्या सहा महिन्यात रितसर हिशेब आणि हस्तांतर करून घेतले जाईल.
एकूणच काय, मराठी माणसाच्या हातात राहाणार नसला तरी निर्लेप हा ब्रॅण्ड शिल्लक राहाणार आहे आणि तो घराघरात जात राहाणार आहे, असाच याचा अर्थ आहे.

 

deepak.patwe@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...