आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तमैथून साक्षी सोनीचे आणि मरिनाचेही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"वीरे दी वेडिंग' सिनेमात स्वरा भास्करने साकारलेल्या व्यक्तिरेखेने हस्तमैथून केले, त्याला वैवाहिक संबंधात आलेल्या नैराश्याची किनार होती. सार्वजनिक ठिकाणी कुणी पुरुष स्त्रीच्या शरीरावरचा आपला जन्मजात हक्क सांगण्यासाठी हस्तमैथून करतो, त्यात हिंसक वृत्तीचेही सूचन असते. मात्र, मरिना अब्रामोविचसारखी एखादी मनस्वी कलावंत हस्तमैथूनाचा जाहीर प्रयोग साकारते, तेव्हा त्यात शून्य तत्वापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रयत्न असतो...

 

 

वंशवृद्धी ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा. या प्रेरणेची पूर्ती होते, शरीरसंबंधांतून. ही  प्रक्रिया  निषिद्ध नाही. मात्र, शरीरसुख आणि शरीरसुखाच्या उद्देशाने घडून येणारा शरीरसंबंध निषिद्ध, घोर पापसुद्धा. प्लेझर अर्थात कोणतंही सूख वाईटच ही बहुतेक सगळ्या धर्मांची सनातन शिकवण. ती कशातून आली,धर्माच्या निकडीतून. ही निकड कशाची? प्रामुख्याने पुरुषप्रधान असलेल्या धर्माचं अस्तित्व आणि वर्चस्व कायम राखण्याची! ते वर्चस्व तसंच टिकून राहावं, यासाठी आधी स्त्री ही पवित्र ठरवली गेली. त्यामागे अर्थात उदारता नव्हे, तर स्त्रीवर कायमस्वरूपी ताबा राहावा ही ग्रॅण्ड योजना. एकदा ती पवित्र ठरवली  म्हटल्यावर स्त्री शरीराकडे  उपभोगाच्या नजरेतून पाहणारे पापी ठरले. ज्या क्षणी तिच्याकडे अशा नजरेने पाहिले गेले, तिचा उपभोग घेतला गेला, तेव्हा पुरुष नव्हे, ती अपवित्र झाली. मग अशा "अपवित्र शरीरा'पासून दूर राहणारे, स्त्री सुखाकडे पाठ फिरवणारे किंवा ते नाकारणारे असे सगळे आपोआपचं पवित्र ठरले. त्याग,श्रद्धा आणि भक्तीचं सर्वोच्च प्रतीकही बनले. त्यांच्याभोवती वलय निर्माण झालं. यात स्वत:च्या सुखाची मागणी करणारी स्त्री बदफैली ठरत गेली.  


म्हणजे, आधी धर्मव्यवस्थेने पवित्र कोण, अपवित्र कोणाला म्हणायचं याचा निवाडा केला. ब्रम्हचर्याचं पालन करणाऱ्यांना त्यामुळे प्रतिष्ठा आली. ऐहिक सुखात अडकलेला माणूस धर्मपालनाची शिस्त पाळणार नाही. त्याचा धर्म प्रचार-प्रसारासाठी उपयोग होणार नाही, हे उघडच होतं. म्हणूनही त्या-त्या काळात ब्रम्हचर्याचा संस्कार जाणीवपूर्वक रुजवला गेला. ज्यांनी स्वखुशीने वा परमेश्वरी आदेश मानून त्याचं पालन केलं, त्यांना  धर्माचं दूत बनवलं गेलं. धर्मांने त्या-त्या काळात या ब्रम्हचारी स्त्री-पुरुषांचा आधी प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि मग आपलं वर्चस्व असलेल्या शासनसंस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला. हा प्रभाव इतका खोलवर राहिला की, काळानुरुप जगण्याचे संदर्भ बदलत गेले, तरीही समाजाच्या मनातल्या स्त्री पावित्र्याच्या कल्पना बदलल्या नाहीत. किंबहुना, धर्मव्यवस्थेने त्या बदलू दिल्या नाहीत. स्त्री ही समाजासाठी ताबा असावी, अशी एक वस्तूच राहिली. जो कुणी तिच्याकडे शरीरसुखाच्या नजरेतून पाहील तो भ्रष्ट, पापीच राहिला. अशा "संस्कारी' वातावणात स्त्री स्वत:च शरीरसुखाचा उच्चार करतेय, उघडपणे अभिव्यक्त होतेय  म्हटल्यावर धर्माच्या ताब्यात असलेला समाज चवताळून उठणंंही नियमाला धरुनच. याक्षणी हा चवताळलेला समाज उलटलाय तो, विचारी अभिनेत्री अशी ओळख निर्माण झालेल्या स्वरा भास्करवर.


"वीरे दी वेडिंग' नावाच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या सिनेमात स्वरा भास्करने साकारलेली साक्षी सोनी नावाची व्यक्तिरेखा हस्तमैथून करतेय, असं एक दृश्य आहे.  यात लग्नसंबंधांत अपयश आलेली,पतीपासून शारीरीक दुरावा अनुभवणारी साक्षी नैराश्यातून  हस्तमैथूनातून शरीरसूख मिळवण्याचा प्रयत्न करते. पण, हस्तमैथून करताना नेमका तिचा नवरा तिला पाहतो. तुझा हा "शेमफुल' उद्योग जगाला सांगेन असं म्हणून तिला ब्लॅकमेल करतो.  या प्रकाराने ती हडबडते.  धास्तावते. शरमते. अखेर धाडस करून घडला प्रकार मैत्रिणींना सांगून अपराधगंडातून मोकळं होण्याचा प्रयत्न करते. पटकथेच्या अनुषंगाने हे दृश्य किती महत्वाचं, किती उपरं, किती प्रेक्षकांना लैंगिक भावना चेतवण्यासाठी घुसडलेलं, कथानकाचा या दृश्याशी काय संबंध, सिनेमा किती दर्जेदार, किती सामान्य हा भाग इथे दुय्यम. महत्वाचा मुद्दा, जग कोळून प्यायलेल्या  मैत्रिणी  साक्षीचं हस्तमैथून करणं हसण्यावारी नेतात.

 

ते योग्यच.पण जे काही घडलं ते चुकीचं घडलेलं नाही, तू काही चुकीचं केलेलं नाही, तुझ्या सेक्शुअॅलिटीवर अर्थात लैंगिकतेवर इतर कुणाचा नव्हे तुझाच पहिला हक्क आहे, असं  काही ठणकावून सांगत नाहीत. कुणी म्हणेल मैत्रिणींच्या हसण्यावारी नेण्यात हाच तर अर्थ दडलाय. पण अनेकदा व्यवस्थेला सांकेतिक नव्हे थेट भाषेत सांगावं लागतं, तेव्हा कुठे ते पोहोचतं. पण जी सांकेतिक प्रतिक्रिया आली, तो पुन्हा धर्माच्या धाकातून  स्त्री पावित्र्याच्या रुजलेल्या कल्पनांचा उलट परिणामच. या घटनेत स्त्री जातीकडून अनुभवास आलेला. यात बळी कोण तर पुन्हा स्त्रीच आणि न्यायदानाचा अधिकार कोणाला, तर पुरुषांना. याच तत्वाला जागून सोशल मीडियावर तमाम संस्कारी  पुरुषांनी सामाजिक-राजकीय प्रस्थापितांविरोधात ठोस भूमिका घेणाऱ्या स्वरा भास्करवर शाब्दिक हल्ले केले. यात एखाद्याच पुरुषाने वा स्त्रीने तिची बाजू लावून धरली. बाकी, स्वरा भास्कर ही एक कॅरेक्टरलेस बाई आहे, यावर शिक्कामोर्तब करताना धर्मव्यवस्थेच्या निष्ठावंत अनुयायांनी इथेसुद्धा प्रचंड आदळआपट करून पाहिली. पण म्हणून स्वरा भास्कर ट्रोल करणाऱ्या खऱ्या-खोट्या कावेबाजांपुढे नमली नाही. 


वस्तुत: हस्तमैथूनाच्या क्रियेत शास्त्रीयदृष्ट्या वावगं काही नाही. इथे ती शरीरसुखाच्या परिघात बघितली गेली. पण, व्हिटो अॅकॉन्सी, मरिना अब्रामोविच (संदर्भ:व्हेन मरिना अब्रामोविच डाइज, लेक जेम्स वेस्कॉट, प्रकाशक-दी एमआयटी प्रेस, मॅसेच्युसेट्स) आदी युरो-अमेरिकन परफॉर्मन्स आर्टिस्टांनी कधी काळी या क्रियेकडे वासनांचा निचरा करून शून्यत्वाकडे (नथिंगनेस) पर्यायाने आत्मशोधाकडे घेऊन जाणारी नेणारी प्रक्रिया म्हणूनही पाहिले. अॅकॉन्सीने १९७२ मध्ये न्यूयॉर्कमध्ये ‘सीड बेड' नावाने हा प्रयोग केला. यात आर्ट गॅलरीत उभारलेल्या एका रॅम्पखाली तो कितीतरी तास हस्तमैथून करत स्वत:ला रिता करत राहिला. आपल्या भावना रॅम्पवर उपस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहिला. मरिना अब्रामोविचने हाच प्रयोग २००५ मध्ये न्यू यॉर्कच्या गुगेनहॅम म्युझियम गॅलरीत (आपल्या आजी-आजोबांसह "वीरे दी वेडिंग' सिनेमा पाहायला गेलेल्या आणि हस्तमैथुनाचे दृश्य पाहून शरमलेल्या तमाम प्रेक्षकांच्या माहितीसाठी हेही इथे नमूद करायला हवं की, हा प्रयोग केला, तेव्हा मरिना वयाच्या साठीत पोहोचली होती.) केला.


या प्रयोगासाठी रोमन रोस्ट्रम शैलीत गोलाकार स्टेज उभारले गेले. स्टेजच्या खाली मरिना, वर प्रयोग अनुभवायला आलेले प्रेक्षक आणि त्यांना ऐकू जाणार केवळ मरिनाचा आवाज, अशी रचना करण्यात आली. प्रयोग सुरु झाला. मरिनाने हस्तमैथून सुरु केले. कधी उन्मादक सुरात, कधी उसासे टाकत कधी अश्लील शब्दांचा वापर करत तर कधी मनातल्या फँटसींना उघड करत ती हस्तमैथून करत राहिली. हस्तमैथूनातून मिळणाऱ्या परमोच्च सुखापलीकडच्या प्रदेशात जाण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत राहिली. तिचं ते बोलणं, विकार-वासनेच्या प्रांतात झुलणं वर उपस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिलं. "वुई विल रॉक यू'म्हणत त्यातले काही तुरळक प्रेक्षक चेकाळले. काही कलेचे अभ्यासक अत्यंत गंभीरपणे घडल्या क्षणांची लिखितस्वरुपात नोंद घेत राहिले. तब्बल सात तासांनंतर ‘नाईन! दॅट्स इट. आय काण्ट मुव्ह एनी मोर. आय एम फिनिश...’ असं म्हणत मरिना थांबली. जेव्हा ती थांबली तेव्हा शरीर आणि मन रितं झालं होतं. तिच्या डोक्यातले सारे विकार-विचार पुसले गेले होते. ती ना भूतकाळात जगत होती, ना तिचं ओढाळ मन भविष्याकडे धाव घेत होतं. त्या क्षणी ती फक्त वर्तमानाचा तो एक क्षण जगत होती. त्या स्थितीत ती म्हणाली, या क्षणी मला गर्भाची अवस्था प्राप्त झाली अाहे. माझे पाय जवळज‌‌वळ आहेत. माझे हात छातीशी आहेत. आता मी हस्तमैथून करू शकत नाही. मला करायचंही नाही. एकप्रकारची ऊब मी अनुभवतेय. माझ्या शरीरात ती ऊब साठतेय. तुमच्यामुळे मला ही अवस्था प्राप्त झालीय. यापूर्वी कधीही न अनुभवलेला अवकाश आज मी जगतेय. मी तुम्हा प्रेक्षकांची कृतज्ञ आहे.'


मरिनाने अनुभवलेल्या क्षणात विचारांचा गुंता नाही, ज्ञानाचा प्रभाव नाही. अनुभव आणि आठवणींचं ओझं नाही. आहे तो सगळ्यापासून मुक्त वर्तमानाचा एक क्षण मन आणि मेंदू स्वच्छ नि रिता असलेला. याच एका क्षणात निसर्ग जगत असतो. प्राणी-पक्षी जगत असतात.  मरिनाच्या म्हणणं, याच क्षणात मानवी जगण्याचंही सार आहे. अर्थातच तिला इथे हेही स्पष्ट कराचंय की, शून्य तत्वाची अनुभूती देणारा हस्तमैथून हा केवळ एक मार्ग आहे.
मरिनाच्या नजरेत तिचं हे शरीरच मानवी वेदनांचा शोध घेण्यासाठीचा एक कॅनव्हास आहे. या शरीररुपी कॅनव्हासचा वापर करून तिला स्वत:च्या आणि इतरांच्याही विकार-वासनांचा निचरा घडवून आणायचा आहे. याचसाठी स्वत:चं शरीर प्रेक्षकांच्या हवाली करणे (रिदम झिरो), क्रोएशियासाठी दडपशाहीचे प्रतीक बनलेला कम्युनिस्ट राजवटीचा तारा शरीरावर धारदार सुरीने कोरून  वा भिंतींना उघड्या देहाने धडका मारून  यातनांची परिसीमा गाठणे (मार्क मेकिंग) आदी प्रयोग तिने कधी काळी केले आहेत. तिचं म्हणणंय, "देवाला शिक्षा देण्याचं शरीर हे एक साधन आहे. बाईचं शरीर हा तसाही विवादास्पद प्रांत आहे. ही निसर्गाची देणगी आहे आणि लादलेलं एक  मोठं ओझंही आहे. वेगवेगळे प्रयोग करून शरीराला शिक्षा देणं हेच देवालाही शिक्षा करणं आहे, कारण, मानवी शरीरातच देव वसतो आहे.'


म्हणजेच, जो मार्ग स्वरा भास्करने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठीचा आहे, त्याच मार्गाचा वापर करून मरिनाने जगण्यातले तत्व शोधण्याचा प्रयत्न केला आहे. धर्म संस्कारांची झापडच बहुदा आपल्याला दिसतंय त्या पलीकडच्या जगाचा शोध घेण्यावाचून रोखत आली आहे. म्हणूनच पडद्यावरची साक्षी सोनी आणि प्रत्यक्षात मरिना अशी दोन टोकं समजून घेणं महत्वाचंही आहे.

 

- दीपांकर

बातम्या आणखी आहेत...