आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. G. B. Deglurkar Write About Female Sculptures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरातील स्‍त्रीरूपे: यत्र तत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला ही निव्वळ कला नसते, तिच्यामध्ये इतिहास दडलेला असतो, समाज-संस्कृतीचा, रूढी-परंपरांचा... भारतातली विशेषत: मंदिरांवर कोरलेली स्त्री शिल्पे नेमके हेच सांगतात. पण पुरातन इतिहास हा केवळ राजकीय अस्त्र नसतो, तर ते ज्ञान आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यमही असते. प्रबोधनाचे हे अंग प्रकाशात आणणारे हे पाक्षिक सदर... 


प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंतची भारतीय कला म्हणजे, एका परीने मोहक हालचालीतून आणि विलोभनीय विभ्रमातून भावना आणि जाणिवांसह गोचर होणारी सौष्ठवपूर्ण देहाची स्त्री. तिचे आज्ञाधारक कन्या, समर्पित पत्नी आणि मायाळू माता अशा स्वरूपाचे, धार्मिक वाङ््मयात आढळणारे वर्णन मनावर न घेता भारतीय कलाकाराने तिला देवता, राणी, नृत्यांगना किंवा दासी म्हणजे सौंदर्याची, भावात्मकेची आणि मोहक विभ्रमाची प्रतिमा म्हणून तिच्याकडे पाहिले आहे, तिची गांभीर्याने दखल घेतली आहे. तिचा भावपूर्ण चेहरा, लक्षवेधी हालचाली, यांची उफाड्याच्या देहसौष्ठवाशी मनोरम सांगड घालूनच, कलात्मकतेने तिला घडविले आहे. हाडामांसाच्या स्त्रीला आपण भारतीय शिल्पातून वा चित्रातून पाहू शकतो, ते कलाकाराच्या कौशल्यामुळेच. 


भारतीय साहित्यातून, रसभरीत काव्यातून आणि नाटकातून ती प्रगट झाली, ते तिच्या उत्तमोत्तम प्रतिमा कलाकाराने घडविल्या तेव्हापासूनच. अर्थात, हा काही केवळ योगायोग नव्हता. यौवनसंपन्न, सौंदर्यवती आणि शंृगारिक ‘नवी स्त्री’ निर्माण करण्याची जणू काही स्पर्धाच प्राचीन संस्कृत आणि प्राकृत कवि आणि नाटककार यांच्यात लागलेली होती. तत्कालीन व्यापार उदीम आणि व्यवसाय यांच्यामुळे निर्माण झालेले नागर आणि सुखवस्तु-जीवन आणि कलाकारांना मिळालेल्या आश्रयामुळे ही ‘नवी स्त्री’ अस्तित्वात आली. सुरक्षितता, संपन्नता आणि भौतिक समृद्धीची लयलूट यांचे उमटलेले प्रतिबिंब म्हणजे, प्रत्येक गोष्ट चित्ताकर्षक, सुंदर आणि भव्य मग ते देहसौष्ठव असो की आंतरिक भावभावना असोत - अशी इच्छा होण्यात झाले. आश्रयदात्यांचे आणि रसिकांचे स्वप्न पुरे करण्यासाठी कलाकारांनी हरप्रकारे जिवाचा आटापिटा केलेला आहे. येथील बहुतेक सगळ्या राजकुलातील राजांनी आपापल्या परीने भौतिक सुखासिनतेचे प्रतिबिंब कलेतून सौंदर्य पूर्णपणे, कसे गोचर होईल ते पाहिले. 


रूपासी आलेला स्त्रीचा जीवनेतिहास, हा येथील प्राचीन कलाकारांनी पुढील पिढ्यांसाठी दिलेला अमूल्य ठेवा आहे. खरे तर, स्त्री जीवनातील विविध अवस्थांमधील अंतर ही शिल्पकला भरून काढते. एखाद्या संवेदनशील भूकंपलेखन यंत्राप्रमाणे कला नाजूक भावना, तृप्त इच्छा, सौम्य भीती, पुरुष आणि स्त्री यांच्या वृत्ती, भावरम्य आकार यांचे दृश्य निर्माण करते. 


भारतीय कलेने स्त्री-प्रतिमेला प्रारंभापासूनच महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. विविध स्थितीत आणि प्रकारात तिचे शिल्पांकन करून भारतीय कलाकार जणू तिची पूजाच करीत असतो. स्त्रिची कोणतीही भूमिका असो कलाकाराने तिचे अत्यंत रम्य आणि आकर्षक असेच शिल्पांकन केले आहे. तिचे लावण्य प्रत्ययकारी व्हावे, म्हणून त्याने रेखाद्वारे तिची आकृती आणि आंगलट यांचा नेटका उपयोग केला आहे. ती चालत असेल किंवा स्तब्ध असेल, आसनस्थ असेल वा पहुडलेली असेल, नृत्यरत किंवा वाद्य वादनात मग्न असेल, तिच्या सौंदर्याची कलाकाराला सतत जाणीव आणि भान असल्याचे दिसते.  
शिल्पपटातल्या वा चित्रचौकटीतल्या मानवसमूहामध्ये तिच्या उपस्थितीचे प्रमाण अधिक आढळते. एवढेच नव्हे, तर तिची प्रतिमा काळजीपूर्वक हळुवारपणे आणि सहृदयतेने घडवलेली दिसते. केवळ कलात्मकता आणि निर्दोषकता, यापेक्षा या कलाकृती भक्ती आणि नीतीने भारलेल्या असतात. याचे भान सतत ठेवले पाहिजे, हे कुमारस्वामींचे प्रतिपादन ध्यानात ठेवले पाहिजे. मात्र, भारतीय कलेतील तंत्र, आकार व रंग यांच्यामागे नीती आणि आध्यात्मिक-प्रकटन असते. तिच्या आरेखनाच्या पद्धतीतील सूक्ष्म व मार्मिक बदलासह, ती प्रतीत होते. 


कलेतून प्रगटलेली स्त्री सौंदर्यशास्त्रानुसार सुंदर, भावनिक आणि मोहक दर्शविण्याचे कौशल्य असते, ते कलाकाराचे. शिवाय ती चपळ, कार्यतत्पर, उद्योगी, उत्साही असते तेही संपूर्ण  जोम आणि चैतन्यासह. तिला वयस्क आणि आळशी सहसा दाखविलेले नसते. मंदिराच्या बाह्यभिंतीवर स्त्रियांची शिल्पे आढळतात. यांना ‘सुरसुंदरी’ असे संबोधिले जाते. त्या अनेक प्रकारच्या हालचाली करत असलेल्या चपलचरण अशा आहेत. त्यांचे प्रयोजन, संकल्पना याबरोबरच विभ्रम, सौंदर्य आणि भावोत्कटता पाहत राहण्यासारख्या आहेत. विलोभनीय चित्रातून आणि सुंदर शिल्पातून आपल्या मोहवून टाकणाऱ्या आकर्षक हालचालीने भुरळ पाडणारी स्त्री मंदिराच्या आत आणि बाहेर दृष्टोत्पत्तीस येते. विविध भूमिकांतून आपल्या समोर ती येते. सहज तिची हालचाल मंत्रवत मोहित करत असते. 


स्त्रियांच्या काही विवक्षित प्रतिमांचा विचार फार सावधपणे आणि सतर्कपणे करावा लागतो, कारण त्या वेगवेगळ्या संदर्भात शिल्पीत केलेल्या असतात. उदाहरणार्थ, हातात आरसा घेऊन उभी असलेली रूढी-शिल्पे सर्रास एका गटातली मानता येत नाहीत. ती सौंदर्यप्रसाधनात मग्न असू शकते वा वासकसज्जिका नायिका असू शकते किंवा दर्पणा नामक सुरसुंदरी असते. म्हणजे, हाती आरसा असला तरी. या तिघींच्याही भूमिका वेगळ्या प्रकारच्या असतात; त्यांचा विस्ताराने विचार यथाकाल पुढे होणारच आहे. 


स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्पे आणि तिच्या भूमिका यांचा आढावा शिल्पातून आणि चित्रातून सहज घेता यावा, अशा प्रकाराने कलाकाराने तिला गोचर केले आहे. ती बालिका आहे, कुमारी आहे, यौवना आहे, प्रौढा आहे, म्हातारी आहे. तिच्या आयुष्यातले हे जसे वेगळे टप्पे आहेत, तद्वतच तिला वेगवेगळ्या भूमिकाही पार पाडाव्या लागल्या आहेत. ती वधू असते, पत्नी असते, प्रेयसी असते, विधवा वा सती असते. कधी भिकारीण असते, तर कधी राजकन्या असते, राणीही असते. कधी विरहिणी तर कधी तपस्विनी असते. कधी ती वारांगना म्हणून समोर येते. तर कधी ती मोहिनी म्हणून शिकार करते, कधी तिचीही शिकार होत असल्याचे दिसते. तिला शंृगारिकाही व्हावे लागते, पतीच्या सान्निध्यात वा प्रियकरासमवेत. मिथुन वा दम्पतीच्या भूमिकेत तिचा अर्धा वाटा असतो. अशा प्रसंगात कधी ती लज्जिता असते, तर कधी तिचा पुढाकार असतो, अशा वेळी, ती आक्रमक होऊन प्रियकराला कवेत घेते. अशा रतिसम खेळीत, ती मागे हटत नाही, की कमी पडत नाही. हा विषय विस्तानाने एखाद्या लेखात येणारच आहे. 


या शिवाय शंृगार नायिका म्हणून, ती मुख्य अशा आठ प्रकारात दिसते. साहित्य दर्पण आणि भानुदत्ताच्या रसमंजिरी’त तिचे साक्षेपाने वर्णन आले आहे. शंृगार साहित्यात नायिकेचाच विचार अधिक प्रमाणात (अर्थात नाट्यशास्त्रातही) झालेला आढळतो. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केले गेल्याचे, कामसूत्रात व रतिरहस्यात आढळते. नायिकांची मन:स्थिती आणि भावनोत्कटता यावर, आधारित त्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत. स्वाधीन पतिका, खंडिता, कलहांतरिता, विप्रलब्धा, वासक सज्जा, प्रोषितभर्तिका, विरहोत्कंठिता, आणि अभिसािरका, असे ते आहेत. त्यांचा स्वतंत्रपणे विचार केला जाणारच आहे. 


या शिवाय व्यावहारिक जगात स्त्रियांच्या अन्य काही भूमिका आहेतच. नर्तिका म्हणून, वादक म्हणून ती मंदिराच्या भिंतीवर आढळते, तर गोपिका, गवळण, हत्तीवरील माहूत... ती कधी भिल्लीणीच्या रूपात, तर कधी शिकार करण्याच्या आवेशात दिसते. एवढेच नव्हे तर चेटकीण म्हणूनही कलाकाराने तिचे अंकन केलेले आढळते. वेगळ्या संदर्भात ती नागीण, किन्नरी आणि अप्सरा म्हणूनही शिल्पात अवतरते.

 
आता प्रत्येक पंधरवड्यात वरीलपैकी एकेक स्त्री आपल्याला दिसणार आहेच. तिची थक्क करणारी रूपे, विभ्रम, चपलचरणगती, श्रोणीभाराद्अलसगमना वा पृथुलनितंबिनी गमन विलंबना अशा रूपातही आपण तिला पाहाणार आहोत. एका परीने, ती सदेह आपल्या भेटीला येणार आहे. 
एवढेच नव्हे, तर  तिचा आंतरिक हेतू, हेवा, मत्सर, अहंकार, मायाळूपणा, कृतककोपही तिच्या शिल्पातून आपणास आढळणार आहे. 


- डॉ. जी. बी. देगलूरकर 
udeglurkar@hotmail.com 
लेखक ज्येष्ठ पुरस्कारप्राप्त पुरातत्त्वशास्त्र तज्ज्ञ, 
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे निवृत्त कुलपती आहेत. आजवर त्यांची प्राचीन शिल्पकलेवरील १४ पुस्तके व शंभरहून अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.