आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विंचू चावला-विंचू चावला'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरसुंदरीची अनेक शिल्पे महाराष्ट्रातील काही मंदिरांवर आहेत. धर्मापुरी, पानगाव, मार्कंडी, निलंगा येथील मंदिरांवरही ती आढळतात. अशीच एक देखणी स्वरूपसुंदरी पानगाव येथील श्रीविष्णूच्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिल्पांकित केलेली आहे. त्याबद्दल...  


हीएक सुभगा रूपवती सुरसुंदरी कलाकारांचा अत्यंत आवडीचा विषय ठरली आहे. अनेक मंदिरांच्या बाह्य भिंतीवर ती उपस्थित असते. सुरसुंदरी अधिकात अधिक बत्तीस प्रकारच्या आहेत. मंदिरावर त्या विशेष हेतूने आणि प्रयोजनानुसार दिसतात. मंदिरात जाणाऱ्याने कोणती खबरदारी घेतली पाहिजे, त्याची मन:स्थिती कशी असली पाहिजे, तशा प्रसंगी काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि अहंकार यापासून कसे अलिप्त राहायला पाहिजे, याकडे त्या सुरसंुदरी संकेत करीत असतात. यांच्यापैकीच ही एक लक्षवेधी सुरसुंदरी आहे. 


नेसूचे वस्त्र झटकून टाकताना ती दिसते, कारण विंचू त्या वस्त्रावर तिला आढळतो. विंचू म्हणजे, विकार असे मानलेले आहे. विंचवाच्या विषासारखा तो विकार वाढत/चढत जात असतो. कामभावनेने मनुष्य बाधीत झाला, की तिचे शमन करण्यास तो असमर्थ ठरतो. 


अशा सुरसुंदरीची अनेक शिल्पे महाराष्ट्रातील काही मंदिरांवर आहेत. धर्मापुरी, पानगाव, मार्कंडी, निलंगा येथील मंदिरांवरही ती आढळतात. अशीच एक देखणी स्वरूपसुंदरी पानगाव येथील श्रीविष्णूच्या मंदिराच्या बाह्यभिंतीवर शिल्पांकित केलेली आहे. त्यात ‘देहुडा पाऊली’ म्हणजे कृष्ण बासरी वाजवताना उभा दाखवतात, असे उभे राहाणे - ती उभी आहे. देहाला उठाव देणाऱ्या अहंकाराने ती सुशोभित झाली आहे. इतके की ‘कवण कवणा’ अलंकारिले, असे वाटावे. तिचे माथी मुक्ताजाल आहे, कानात टंक(गोल रिंग्ज) आहेत. गळ्यात फलकहार आणि पुष्ट स्तनावर रुळणारा, स्तनाकाराप्रमाणे वळण घेणारा एक अलंकार आहे. दंडावर अंगद (बाजूबंद) आहे. कटिभागावर छानशी वर्तुळांची माला असलेली रसना (कटिसूत्र) आहे. घोट्यावर पादांगद आणि पायात नूपुर आहेत. जणू नखशिखांत ती अलंकृत आहे. नेसूला अर्धोरूक (गुडघ्यापर्यंतचे वस्त्र), असून उत्तरीय (दुपट्टा) दोन्ही अंगाने खाली उतरले आहे. भरगच्च देहाची ही सुरसुंदरी आहे हे उतरलेल्या स्तनद्वयावरून कळते. नाजूक कटिभाग आणि श्रोणीभार चटकन् डोळ्यात भरणारा आहे. निमुळत्या होत जाणाऱ्या मांड्यांचे वर्णन संस्कृत साहित्यिकाने ‘करभोपमोरू’ असे केले असते. एकूण काय, तर ही सुरसुंदरी सुदृढ आहे; पुष्ट देहाची आहे. 


पण ही आकर्षक ठरते, ते तिच्या उजव्या मांडीवर असलेल्या विंचवामुळे. इंगळीवत् तो मोठा आहे. त्याची नांगी पायाकडच्या बाजूस आहे, म्हणजे तो तिच्या कटिभागाकडे चढत असलेला आहे. त्यावरून लक्षात घ्यायला हवे की, कामभावना तीव्र झाली, की अभिलाषा निर्माण होते, यौवनाने मुसमुसलेल्या, आकर्षक देहाच्या तरुणीकडे कामभावनेचा विंचू झेप घेतो आणि ती भावना उद्दिपित होत राहाते, हे येथे आढळते. विंचू मांडीवरील वस्त्रावर चढतो आहे, हे पाहून ही सुरसुंदरी घाबरी-घुबरी झाल्याचे भाव, तिच्या चेहऱ्यावर उमटल्याचे दिसते आहे. भुवयांच्या कमानी खालच्या नेत्रद्वयाने ती त्या विंचवाकडे पाहते आहे, त्यामुळे हा प्रसंग प्रत्ययकारी झाला आहे. शिवाय तिच्या डावीकडे उभी असलेली तिची सखी अंगुलिनिर्देश करून, तिचे लक्ष विंचवाकडे वेधून, तिला सावध करीत आहे. या घटनेमुळे खरेपणात अधिक भर पडते आहे असे दिसते. 


आपले आंतरअंग उघडे पडेल, याची तमा न बाळगता ती नेसूला इतक्या त्वरेने झटकते की, ती निर्वस्त्रच होते आहे. अशा काही शिल्पात, तर ‘मदनाचे घर’ ही उघडे पडेल इतकी ती विवस्त्र झाली आहे. काही कलासमीक्षकांनी तिचे वर्णन करताना स्त्रीचा, कामभावना उद्दिपित करणारा आंतरबाह्य मोहमयी देह, तर कल्पकाराला दाखवायचा असतो, पण तो मंदिरावर दाखविणे अप्रस्तुत वाटल्यामुळे, त्याने विंचवाच्या मिषाने तिला नग्न दाखवले असावे, असे म्हटले आहे. खरे तर तिला अशी दाखविण्यात कलाकाराला अभिप्रेत आहे, ते असे की मंदिरात जायचे तर विकाररहित मनाने जावे. पंधराव्या शतकातील महाराष्ट्रीय संत श्री एकनाथ महाराज यांनी आपल्या एका भारुडात या प्रकारच्या प्रसंगाचे फार नेटके वर्णन केले आहे. ते भारूड असे आहे. 


विंचू चावला, विंचू चावला । काम क्रोध विंचू चावला 
तम घाम अंगाशी आला । पंचप्राण व्याकूळ झाला 
त्याने माझा प्राण चालला । सर्वांगाचा दाह झाला 


हे वर्णन या सुरसुंदरीसाठी किती चपखल आहे, पाहा. प्रत्येकाने कामविकाराचा विंचू मनातून झटकून टाकला पाहिजे, नसता तो विकार कामक्रीडेमध्ये बुडवून टाकू शकतो. 


सामान्यत: अशा सुरसुंदरी अधिकच इंद्रियोद्दीपक घडविल्या जातात. ज्या मांडीवर विंचू असतो, ती दणकट असून निसरडी, मुलायम असते. विंचू तीवर रोवल्यासारखा बिलगलेला असतो. तिच्या ओटीपोटाकडे जाण्याची त्याची धडपड असते. ती त्याच्याकडे घाबरटपणे टक लावून पाहत असते, तिला वस्त्राचे भान नसल्यामुळे, कटीखालचा भाग उघडा असतो. तिच्या यौवनमस्त शरिराचा प्रत्येक अवयव आणि प्रत्येक अवयवाचा इंच न् इंच कामोद्दिपक असतो. तिचे बहरात आलेले पुष्ट स्तन, खोलगट नाभी, तिचे खालील बाजूची त्रिबली, उघडे ओटीपोट हे सर्व पाहता काममोहित नरामधील जनावर खवळून उठल्यास, नवल नाही. ही अप्सरा (सुरसुंदरी) जिच्या मांडीवर विंचू चढत असतो, ती बजावत असते, की मंदिरात जाताना शेवट नसलेल्या आणि सदैव जागृत असलेल्या या अनिवार कामेच्छेपासून दूर राहावे, अंतर राखून असावे. 


- डॉ. जी. बी. देगलूरकर 
udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...