आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टीआरपी’ मालिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजच्या वापरातील अंगाचा साबण वापरून वापरून अगदी बुळबुळीत होऊन जातो. त्याचा सुगंध लोप पावतो आणि फेसही कमी होतो. थोडक्यात काय तर तो विरतो. या कारणामुळेच विविध वाहिन्यांवरून दाखवण्यात येणाऱ्या दीर्घकालीन मालिकांना ‘डेली सोप’ ही संज्ञा दिली असावी. कारण पाहून पाहून त्यांचा वीट यायला लागतो.


सुरुवातीला दाखवलेली हुशार, धाडसी, तडफदार ‘कुमारिका नायिका’ ‘सौभाग्यवती’ झाली की एकदम फुग्यातून हवा काढून घेतल्यासारखी पिचलेली आणि डेली सोपसारखी बुळबुळीत करून टाकतात. ‘टीआरपी’ जसजसा कमी-जास्त होतो तसतसा नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख बदलत जातो. कधी खूपच जिगरबाज तर कधी खूप गरीब. विशिष्ट असे व्यक्तिमत्त्व तिला नसतेच. आणि कथानकही तिच्या व्यक्तिमत्त्वाला फारसे महत्त्व देत नाही.
कधीकधी तर तिची अति सहनशीलता पाहून प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा मात्र अंत होतो. कारण प्रेक्षकांना चीड येईल इतकी भोळी आणि बावळट तिला दाखवतात. साधेसाधे डावपेचही तिला समजत नाहीत. ती कधी कोणावर शंकाही घेत नाही. विशेष म्हणजे अशी नायिका उच्चशिक्षित आणि समजूतदार असते. लौकिक अर्थाने हुशार असते. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू उलगडले जातात की मानसशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर इतकं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एखादा मानसिक आजार असू शकतो. प्रेक्षकांना हेच आवडतं, ही सबब नेहमी पुढे केली जाते.
माझ्या लहानपणी पाहिलेल्या रजनी, दामिनी, रथचक्र यांसारख्या स्त्रीप्रधान मालिका अजूनही मनात घर करून आहेत. त्यांनाही याच प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं ना?


कुठलीही स्त्री, अगदी उच्चपदस्थ ते घरेलू कामगार, ती एक सक्षम आणि धीरोदात्त व्यक्ती असते. जीवनाचा सखोल अभ्यास तिला आहे. अनुभवाचं शहाणपण आहे. अचाट सहनशक्तीचे ती रूप आहे. इतक्या गुणांनी ती नटली आहे. तिच्या या एका सद््गुणावर जरी एखादी मालिका काढली तरी ती खूप परिणामकारक होईल. घराणे, घराणेशाही, घरातील भांडणे, एकमेकांवरील कुरघोड्या, डावपेच, वर्चस्वाची लढाई, कावेबाज, धूर्त, दुष्ट किंवा मग अति सहनशील, अशी जी मालिकांनी तिची प्रतिमा निर्माण केली आहे. ती खरीच अशी आहे का?


नक्कीच नाही. बहुंताश स्त्रिया तर अशा नाहीतच. अगदीच इतिहासकाळात जायला पाहिजे असे काही नाही. पण आजही अशा स्त्रिया आहेत ज्या जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करतात. एखादे सुंदरसे कथानक त्यांच्याभोवती गुंफलेले असते. ते नक्कीच सादर होऊ शकते.

-   डॉ. शुभांगीनी महाजन, उमरगा     

बातम्या आणखी आहेत...