आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतभिन्नतेचा स्वीकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांना घरातच अशी सवय लावायला हवी की, आपण आधी दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यावं. आपलंही मत योग्य भाषेत मांडावं. आईवडील परस्परात बोलताना विचारांचा, मताचा आदर करत असतील, शिक्षक मुलांची मतं ऐकून घेत असतील, तर मतं ऐकणं, मतं मांडणं, ते मान्य करणं, याचं महत्त्व मुलांच्या लक्षात येतं. 

 

महाविद्यालयाच्या उपाहारगृहामध्ये आज प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त ट्रीट होती. तिचे सगळे मित्रमैत्रिणी खाण्यापिण्यात,चेष्टामस्करीत गुंग होते. प्रियांकानं त्याच वेळी एक घोषणा केली, तिच्या मोठी बहिणीची, स्वरूपाची, लष्करामधे निवड झाल्याची. काहीजणांनी टेबल वाजवून स्वरूपाचं अभिनंदन केलं. पण त्या मोठ्या ग्रूपमधले ७-८ जण मात्र काहीच बोलले नाहीत. गप्प राहण्याचं कारण विचारलं तर ते म्हणाले, ‘मुली लष्करामधे जाऊन काय करणार?’ एकजण म्हणाला, ‘मुलांच्या जागा अडवण्यापलिकडे त्या काय करतात?’ सायली म्हणाली, ‘प्रियांका, आम्हाला तुला दुखवायचं नाहीये, पण मुली निसर्गत: नाजूक असतात. शारीरिकदृष्ट्या फार कणखर नसतात. त्यामुळे त्यांना अशा नोकऱ्या करून काय मिळणार?’ ज्या मुलामुलींनी स्वरूपाचं कौतुक केलं होतं ते सगळे हे ऐकून खवळून उठले. ‘तुम्ही असं बोलूच कसं शकता,’ असं म्हणून वादविवाद सुरू झाला. विचारांचे मतभेद मारामारीपर्यंत आले. तेव्हा प्रियांका म्हणाली, ‘तुम्ही एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आपल्याला पटलं नाही तरी ऐकून घ्यायला हरकत नाही. आणि चुकीचं वाटलं तर ते शब्दांनी खोडून काढता येतं. मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं बरोबर नाही.’ तिचं बोलणं ऐकून सगळेच विचार करायला लागले.


परीक्षा सुरू व्हायला दोन आठवडे होते. बारावीची परीक्षा झाली की, काही दिवसांनी प्रवेशपरीक्षा होती. मुलामुलींचे गट रात्ररात्र जागून अभ्यास करत होते. निहार अचानक वैतागून म्हणाला, ‘काय लाइफ आहे यार? आपण दिवसरात्र अभ्यास करायचा आणि मेरिट असूनही प्रवेशासाठी आपल्याला झुंजायला लागतं. बाकीच्यांना मात्र आरक्षण. मग आम्हाला का नाही?’ ‘तुमच्या लोकांनी पूर्वी आमच्या लोकांना खूप त्रास दिलाय, आता तुम्ही थोडं सहन करा की!’ हा वादविवाद इतका वाढला की मुलामुलांमध्ये मारामारी सुरू झाली. दोघंतिघं तर एकमेकांच्या जिवावरच उठली. त्यांना सोडवता सोडवता इतरांच्या नाकी नऊ आले. विचार समजून घेण्याऐवजी मुलांनी वैयक्तिक घेतलं आणि त्यातून प्रकरण वाढलं.


जीवनात वेगवेगळ्या विचारांचे, मनोवृत्तीचे, मतांचे, लोक आपल्याला भेटतात. विविध प्रकारच्या विषयावर चर्चा होतात. वादविवाद झडतात. कधीकधी त्याचं रूपांतर दुखापत करण्यापर्यंत पोहोचतं. तरुण वयात क्रिकेट, राजकारण, समाजकारण, सिनेमा, मैत्रिणी, यांसारख्या कुठल्याही विषयावर वादविवाद होतात. अशा वेळी मतामतात फरक असू शकतो आणि विचारांमधलं, मतांमधलं हे अंतर मान्य करायचं असतं, हे जीवनकौशल्य शिकायचं असतं. अंगी बाणवायचं असतं. मनामध्ये रुजवायचं असतं ही जाणीव मुलांना द्यायला हवी. कारण एखाद्याचं रंगरूप, दिसणं, राहणं, बोलणं, वागणं, याबाबत मतांमध्ये भिन्नता असू शकते. घरातसुद्धा खाण्याच्या आवडीनिवडी असतात. घराचा रंग, पडदे, कपड्यांचे, इतर वस्तूंचे ब्रँड, बारावीनंतर कोणती शाखा निवडावी, मुलांना कुठल्या माध्यमातून शिकवावं, नातेवाईकांमध्ये कोण चांगलं कोण वाईट असे खूप वैचारिक मतभेद असतात. घरातच अशी सवय लावायला हवी की, आपण आधी दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यावं. आपलंही मत योग्य भाषेत मांडावं. आईवडील परस्परात बोलताना विचारांचा, मताचा आदर करत असतील, शिक्षक मुलांची मतं ऐकून घेत असतील, तर मतं ऐकणं, मतं मांडणं, ते मान्य करणं, याचं महत्त्व मुलांच्या लक्षात येतं. आणि केवळ घरी, शाळेत, कॉलेजातच नव्हे तर समाजातही वेगवेगळ्या विचारांना एकत्र घेऊन एकत्र काम करणाऱ्या गटांतही तरुण मुलं ‘मतभिन्नतेचा स्वीकार’ हे जीवनकौशल्य सहजपणे वापरू शकतात.


शिक्षणामुळे मुलांना आपलं मत योग्य शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचवता यावं अशी अपेक्षा असते. शिकावं कसं, आपलं मत मांडावं कसं याबरोबरच शहाणपण आणि विश्लेषण करण्याची समज यावी यासाठी शिकायचं असतं. संवाद करणं, संभाषणकौशल्य अंगी बाणवणं, चांगलं काय, वाईट काय, त्याज्य काय ही निरक्षीरविवेकबुद्धी शिक्षणामुळे यायला हवी. मतांमधील भिन्नता मान्य करण्यासाठी शिक्षण असतं. शिकता शिकता एक व्यापक दृष्टीकोन येत असतो. ज्या कारणासाठी समाजाशी मुलांचे संबंध येतात, त्यामध्ये ती व्यक्ती कोणत्या जातीधर्माची आहे, त्याची विचारसरणी काय आहे, विचारशैली, संस्कृती कशी आहे या सर्वांचा प्रभाव त्यांच्यावर पडता कामा नये. या सर्वांचा समान वृत्तीनं आदर करण्याची वृत्ती तुमच्या अंगी बाणली पाहिजे, हे मुलांच्या मनावर बिंबवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कारण त्यातूनच हे जीवनकौशल्य मुलं शिकत असतात.


‘अॅक्सेप्टिंग द डिफरन्सेस’ अर्थात मतभिन्नतेचा आदर हे जीवनकौशल्य म्हणजे आपल्या मतांची समानता एकमेकांबरोबर वाटता येणं, आणि वेगळेपण साजरं करता येणं असतं. नात्यातील जिवंतपणा, त्यातील चैतन्य फुलवण्यासाठी दुसऱ्याची मतं किंवा आपल्या आणि समोरच्याच्या मतांमधील फरक सहन करता येणं आवश्यक आहे. ते त्याचं वैयक्तिक मत आहे हे मान्य करता यायला हवं. मोठ्यांच्या वर्तनातून हे अनुकरण मुलं अगदी लहानपणापासून करत असतात. मतामधील विरोधाला आदर देणं, आणि मान्य करणं, या दोन पायऱ्या जीवनकौशल्याच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. मुलांना हे सांगायला हवं की, तुझंमाझं मत वेगळं असू शकतं. पण या वेगळेपणात एक जादू आहे. आपण एकत्र आलो तर निश्चितच काही चांगला बदल घडवू शकतो. कारण एकाच गोष्टीकडे जेव्हा चारपाच व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहतात तेव्हा त्याचे विविध कंगोरे लक्षात येतात. वेगवेगळ्या मत आणि विचारांमधून काही नवे घडवता येते हे किती चांगलं आहे.


मतमतांतरं होती म्हणूनच आपण एकमेकांपासून दूर होतो, विभागलं जातो असं नाही. उलट दुसऱ्याचं मत, त्याचे विचार ओळखणं, ही क्षमता जेव्हा मुलांकडे नसते तेव्हा मतातील फरक ओळखणं त्यांना जमत नाही आणि आपलंच खरं हे पटवून देण्यासाठी ही मुलं आक्रमक होतात. शब्द तापतात. शब्दांना शारीरिक बळाची जोड दिली जाते. माणूस म्हणून आपलं मत मांडण्याची, दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची अपेक्षा लोक आपल्याकडून करतात हे भान मुलांना द्यायला हवं. व्यक्ती असो, मतं, विचार, दृष्टिकोन असो, त्यात असलेल्या विविधतेतच एकता असते. अगदी साध्यासोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण स्वत:ला स्वत:च्या रंग, रूप, उंची, गुणअवगुणांसह स्वीकारतो, अगदी तसाच दुसऱ्याचाही स्वीकार आपल्याला करता यायला हवा. त्यासाठी हे जीवनकौशल्य वापरता यायला हवं.


चांगला बदल घडवून आणण्यासाठीची पहिली पायरी असते ती म्हणजे सावध होणं. दुसरी पायरी असते स्वीकार करणं. अशा पद्धतीनं पुढं जात राहिलो तर आपण आपलं शाळेचं, घराचं आणि मैत्रीचं आणि पुढे समाजाचं जग या साऱ्यांना शांततेनं अनुभवू शकतो. निसर्गात, पानाफुलांत, पशुपक्ष्यांत,आकाशताऱ्यात, रंगगंधांत असणारं वेगळेपण आपण रसिकतेनं मान्य करतो. सप्तसुरांमधल्या वैविध्यांची आपण स्तुती करतो. तर मग परस्परांच्या वेगळ्या मतांना मान्य करणं, स्वीकार करणं हे सुशिक्षित होण्याचं प्रतीक आहे, हे मुलांमध्ये ठसवायला हवं. शेवटी काळ्या रंगामुळे गोऱ्या रंगाला, गरिबीमुळे श्रीमंतीला, ठेंगणेपणामुळे उंचपुऱ्या व्यक्तिमत्त्वाला महत्त्व प्राप्त होत असतं. आपल्यापेक्षा निराळ्या मताचा आदर, त्याचा स्वीकार हे जीवनकौशल्य आनंद देणारं आहे. विचारातील मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत.


-  डॉ. स्वाती गानू,  पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...