आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलमाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागणं आणि कधी माणूसपणाची परीक्षा घेणारे प्रसंग...वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांना अशा अनेक प्रसंगांतून जावे लागते. या वेळचा अनुभवही असाच काहीसा...

 

निर्भया प्रकरण झाल्यानंतर काही दिवसांत माझ्याकडे आलेली एक केस १४-१५ वर्षांची एक मुलगी आणि तिची आजी क्लिनिकमध्ये आल्या.


“काय झालं आजी?”
“अगं काय नाय बाय. तू माझ्या लेकीसारखी. तुला काय सांगू? तीनचार महिने झाले, माज्या नातीची पाळी नाइ आली. आता पिशवीत (गर्भाशयात) लै मळ झाला असल. तेवडी पिशवी साफ करून दिली अस्ती तर बरं झालं अस्तं. तिचं अजून लगीन व्हायचंय, नंतर प्राब्लीम नको.”
आजी माझ्याकडे निरमा पावडर उपलब्ध असल्याइतक्या सहजतेने म्हणाल्या आणि मिश्री तोंडात टाकत्या झाल्या. स्वत:च्या हतबुद्धनेसला अंमळ सावरत मी म्हणाले, “अहो आजी असा मळ वगैरे काही होत नसतं. काय नेमकं कारण आहे ते मला तिला तपासल्यावर कळेल.”
आजीच्या नातीला, सुनीताला मी पुढे बोलावले. (नाव बदलले आहे.) सुनीताची तपासणी करताना मला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे ती अविवाहित असूनही मी तिची प्रेग्नन्सी टेस्ट करायची ठरवली. लघवी चेक करायची म्हटल्यावर आजींचा विरोध सुरू झाला.


“ पैसे नैत. आमी गरीब हायेत.”
मी थोडा ठाम पवित्रा घेऊन सांगितले.


“आजी पैसे नसू द्या पण मला माझ्या पद्धतीनेच तपासावी लागेल ही केस. माझ्या अंदाजानुसार टेस्ट पाॅजिटिव्ह आली. आजीबाईंना बाहेर पाठवून मी तिलाच विचारलं, “काय झालं नेमकं?”
तर ती रडायलाच लागली. तिचा काकाच या अवस्थेला जबाबदार होता. आईवडील गरीब. काका कारभारी. एकीकडे नात आणि एकीकडे मुलगा अशा कात्रीत आजी सापडलेली. आपलेच दात आणि आपलेच ओठ. 
“आजी, मला असं काही करता येणार नाही. या गोष्टींना कायद्याने बंदी आहे.” 
बिथरलेल्या आजीबाईंनी तिथेच सुनीताला मारायला सुरुवात केली.
“काळतोंडी कुडंतरी शेन खाल्लं असंल आन माझ्या लेकावर आळ घेती.”


महत्प्रयासाने त्यांना आवरलं. एका स्त्रीरोगतज्ज्ञाचा पत्ता दिला आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिकडे पाठवलं. मला मात्र थोडंसं अपराधी वाटत राहिलं की, अरे आपण डाॅक्टर म्हणून कर्तव्य केलं पण माणूस म्हणून तिला ठोस अशी काहीच मदत करू शकलो नाही. दोन दिवस माझंच मन मला खात राहिलं. तिसऱ्या दिवशी आजींचे पतीही किरकोळ तक्रारीसाठी क्लिनिकला आले. माझ्या मनात, ‘या आजोबांनी कसा सांभाळला असेल हा प्रसंग? आपण किमान यांना मानसिक आधार द्यावा,’ या हेतूने मी हळूच त्यांना विचारलं, “बाबा, घरी सगळं ठीक आहे ना? सुनीताची तब्येत कशी आहे आता?” 
दोन क्षण शांतता...
“हात्तिच्या.. xx ला! 
आमची म्हातारी काय बी उद्योग करत राहाती. xxx
अवो म्याडम ती आमची नात नव्हतीच.”
...
...सन्नाटा...


-  डाॅ. क्षमा शेलार, बेल्हा
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...