आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरावरील पत्रलेखिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही सुरसुंदरी मंदिराच्या बाह्यभिंतीवर शिल्पांकित केलेली आढळते. अकराव्या शतकापासून आढळणाऱ्या पत्रलेखिकेने तर कला रसिकांना आणि कला समीक्षकांना चांगलेच चक्रावून टाकले आहे. हिने त्यांना स्वत:ची खरी ओळखच होऊ दिली नाही, असेही म्हणता येते...


णत्याही कलाकृतीचे, तिचा विषय, तिचे प्रयोजन, तिचे स्थान आणि काल यांची यथोचित माहिती असल्याशिवाय तिचे रसग्रहण व्यवस्थित होत नसते. एखादी स्त्री काही तरी लिहिते आहे, असे दिसले की तिला प्रेमपत्र लिहिणारी असे संबोधिले जाते. एरवी, ती दुसरे काय लिहिणार, असा अपसमज तिच्या बाबतीत सामान्यजनांचा होऊ शकतो, हे मान्य. पण समीक्षकाकडून असे होणे अपेक्षित नसते.


प्रेमपत्र लेखिका अशी हिची ओळख व्हायची सुरुवात झाली, ती ओडिशातील भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिरावरील पत्रलेखिकेबद्दलचे असे अनुमान एका प्रसिद्ध कला समीक्षकाने केल्यापासून. तिथे एक प्रौढा, पत्र लिहिताना दाखविली आहे, हे खरे. ती देखणी आहे; आकर्षक देहसौष्ठवाची आहे. तिच्या बाजूला तिचा आठ-दहा वर्षांचा मुलगा उभा आहे,हे कला समीक्षकाने लक्षात घ्यायला हवे होते, असे वाटते.


या पार्श्वभूमीवर मंदिरावरील या सुरसुंदरीचा विचार करणे उद््बोधक ठरेल असे वाटते. धर्मपुरी (जि. बीड), होट्टल (जि. नांदेड), कोप्पेश्वर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, इत्यादी अनेक मंदिरांवर ही लेखिका शिल्पांकित केलेली आहे. आतापर्यंत आढळत आलेल्या सगळ्या पत्रलेखिकेमध्ये अत्यंत देखणी सुरसुंदरी धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिरावर आहे. ‘तुज पाहाता सामोरी दृष्टी न फिरे माघारी’ अशी ती आहे. विशेष म्हणजे, ती पाठमोरी असली तरी तिचे असे वर्णन अनाठायी ठरत नाही की अवास्तव आहे,असेही मानता येत नाही. अर्धपाठमोरी असलेली ही पत्रलेखिका त्रिभंगात उभी आहे. त्यामुळे तिच्या अवयवांना उठाव आलेला आहे. मान उंचावून ती ज्या पाटीवर लेखन करते आहे. तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधले जाते. कलाकाराची कल्पना हीच असावी. म्हणजे असे की, आपण या यौवनेकडे पाहण्यापेक्षा तिचे तिथे असण्याचे प्रयोजन काय आहे हे कळावे, असा त्याचा मानस असणार. डाव्या हाताच्या नाजूक करांगुलीनी तिने त्या पाटीला आधार दिला आहे आणि उजव्या हाताच्या बोटात मोठ्या नजाकतीने तिने कलम धरली आहे. अंगठा आणि तर्जनीत धरलेल्या लेखणीने ती लिहिण्यात व्यग्र आहे. तिच्या हाताची उरलेली तीन बोटे एखादी कलाकुसरीची रांगोळी काढताना असावीत अशी हळुवारपणे पसरलेली आहेत. साहजिकच ती आपल्या भावना तीत ओतते आहे, असे वाटते. 


त्या लेखनाकडे डोळाभरून पाहण्यात ती दंग झाली आहे, तसे करताना वर उचललेला तिचा चेहरा नासिकेची सरळ असलेली बाजू, उचललेली हनुवटी आणि तिच्याकडे पाहण्याची दृष्टी, गुंतून टाकणारा सजवलेला केशपाश, तिचा स्वत:च्या देखणेपणावरचा आत्मविश्वास प्रत्यक्षात येतो. तिच्या कंबुग्रीवा म्हणजे शंखासारख्या निमुळत्या होत जाणाऱ्या मानेभोवती ग्रैवेयक, म्हणजे मोत्यांच्या माळा आहेत. त्यांचे नक्षीदार गोंडे पाठीवर रुळताना दिसत आहेत. त्रिभंगात उभी पण हे तिचे "एकडोळा शिल्प’ असल्यामुळे, पुढे झेप घेणारा डौलदार स्तन, पाठीची पन्हाळ‌, कटिभाग आणि पृथुलनितंब यांचे फार जिवंत शिल्पांकन झाले आहे. कवी म्हणतात,तसे सिंहकटीवर स्वैर, खेळूचा रत्नमेखला सैल जरा, अशी मेखला असली तरी हिचे वर्णन ‘डमरू मध्या’ असेच करावे लागते. सौंदर्यशास्त्राप्रमाणे सिंहकटी पुरुषांची असते, स्त्रीची नव्हे, अलंकार कोणते आणि त्यांचा उपयोग देह सजवण्यासाठी आणि सालस, सोज्वळ दिसण्यासाठी कसा करायचा असतो हे तर तिच्याकडूनच शिकावे.


येथपर्यंत तिच्या बाह्यांकाचे वर्णन झाले. आता तिने पाहणाऱ्याच्या मनात पक्के घर केले असणार. तिच्या मनाचा वेध, तिचे अंतरंग जाणून घ्यायला हवे. सुरसंुदरी मंदिरावर असण्यामागे तिचे प्रयोजन काय, याचा विचार महत्त्वाचा आहे. वर पाहिलेय की चित्र काय की शिल्प काय याचे रसग्रहण करताना, त्या संबंधी भाष्य करताना एकूण वातावरणाचा विचार होणे आवश्यक असते.


सामान्यत: अशा पत्रलेखिकेचा उल्लेख शंृगारशतक आणि नाट्यशास्त्र यात आल्याप्रमाणे अष्टनायिकेपैकी एक म्हणजेच विरहोत्कंठिता असा केला जातो. मंदिरावरच्या पत्रलेखिकेचाही उल्लेख नायिका म्हणूनच काही जणांनी केला आहे. ही विरहोत्कंठिता आहे हे खरेच पण नायिका नाही. ती मंदिरावर आहे हे लक्षात घेता आम्हास संतचरित ‘विरहिणी’ आठवायला हव्यात. संत ज्ञानेश्वरांची विरहिणी तर प्रख्यात आहे.


चंदनाचे चोळी माजे अंगांग जाळी
सरेना की ग बाई रजनी काळी काळी।


शेवटी पत्रलेखिका - विरहिणीला देवाचा विरह झालेला आहे. तिला पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. या जिवाला शिवाची ओढ लागलेली असते. विरह सहन होत नसतो.
बरे झाले, ‘शंृगार नायिका’चे लेखक, स. आ. जोगळेकर यांना मंदिरावरील ही नायिका दिसली नाही, नसता त्यांनी हिलाही नाट्यशास्त्रातली किंवा रसमंजरीतली प्रियकर संकेतस्थळी पोहोचू शकला नाही म्हणून दु:खार्त झालेली विरहोत्कंठिताच ठरवली असती! मी मंदिरावरील विरहोत्कंठिता ही वेगळ्या प्रकृतीची असते हे जाणून तिचा समावेश त्यांनी सर्वसामान्य विरहोत्कंठितेच्या श्रेणीत केला नाही? असे झाले असेल तर ते योग्यच ठरते. 
अशीच एक पत्रलेखिका मार्कंडा (जि. गडचिरोली) येथील मंदिरावरही आहे. मात्र वेगळ्या ढंगात ती उभी आहे. सुरसुंदरीच्या संबंधी विस्ताराने माहिती देणाऱ्या "क्षीरार्णव' या ग्रंथात ती आलेली आहे. या ग्रंथातील सुरसुंदरीचे वर्णन जणू काही हिच्यावरूनच केले असावे असे वाटते.


दक्षिण हस्तकमले ताडपत्रं च धरित्री
ललाटे चंद्ररेखाच सनाम विस्तरे सदा ।। १२१ ।।


देहुडा पाऊली म्हणजे श्री मुरलीधर कृष्ण उभा राहतो, त्या अवस्थेत ही उभी आहे. तिच्या उजव्या हातातील बोरूने ती भूर्जपत्रावर लिहिते आहे. डाव्या हाताने ते भूर्जपत्र धरले आहे.
ही अलंकाराने नखशिखांत सजलेली आहे. विपुल केशसंभाराचा अंबाडा तिच्या उजव्या खांद्यावर रुळतो आहे. कर्णकुंडले, कंठा, साखळी, फलकहार, स्तनहार, केयूर (बाजूबंद), अनेक कंकणे, पाटल्या, मेखला, पादांगद, नुपूरे इत्यादी ठळक अलंकारामुळे तिच्या देहाचे वैभव अधिकच खुलले आहे असे असूनही ती आनंदी नाही. तिच्या चेहऱ्यावर गांभीर्य पसरले आहे, चिंता आहे कारण ती विरहोत्कंठिता आहे. ज्या मंदिरावर ती आहे त्यातल्या देवाचा विरह तिला असह्य झाला आहे. 


नाट्यशास्त्राशी, साहित्यशास्त्राशी वा कामशास्त्राशी संबंधित नसलेली, मात्र मंदिरस्थापत्याशी संबंध असलेली अशी ही अनोखी विरहोत्कंठिता पत्रलेखिका, सुरसुंदरी आहे. 

 

- डॉ. जी. बी. देगलूरकर
udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...