आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. G. B. Deglurkar Write On Ancient Indian Dancer Sculptures

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाच नाचुनी अति मी दमले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या एकापरीस एक अशा शिल्पाकृती आढळतात. कोठे त्या एकल नृत्य सादर करत असतात, तर कोठे समूह नृत्य, तर आणखी कोठे वाद्यवृंदासह. ते सादर करणाऱ्या नर्तिका सुडौल देहाच्या, देखण्या, अभिनयकुशल आणि चेतोहारी असतात, असाव्या लागतात, असे त्यांच्या शिल्पाकृती सांगतात...

 

भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या शिल्पांनी फार मनोहारी भर घातली आहे, तिला समृद्ध केले आहे. एवढेच नव्हे, तर कालिदास, भवभूती, बाण यांसारख्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेच्या कवींना, साहित्यिकांना भुरळही पाडली आहे. कालिदासाने तर मेघदूत, कुमार संभव, मालविकाग्निमित्र, या आपल्या साहित्यकृतीतून नृत्यातील वेगवेगळ्या भावांचा रसास्वाद घेण्यास रसिकांना उद्युक्त केले आहे. भरताच्या नाट्यशास्त्रात आणि सोमेश्वराच्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथांत नृत्यासंबंधीच्या परिभाषेचा परिचय घडतो. नृत्य म्हणजे संगीत आणि आंगिक (देहाच्या हालचाली) यांची सुरेल आणि सुरेख गुंफण. नृत्यातील अभिनय म्हणजे, देहाच्या आकर्षक हालचाली. तर डौल व अंगिक अभिनय म्हणजे स्थान, भंग, आसन यांच्याद्वारे विविध भावभावनांचे देवाण, अर्थात त्यासाठी हस्तमुद्रा आणि पायांची गतिशीलता यांची जोड मिळायला हवी. थोडक्यात, असे की हात, देह आणि इंद्रिये यांची सुसंवादी भावपूर्ण हालचाल म्हणजे नृत्य.

 

नाट्यशास्त्रात याला ‘करण’ अशी संज्ञा आहे. हे सारं प्रत्ययास येतं, ते नृत्यांगनांच्या अनेक शिल्पातून. यातच थोडं अधिक गुंतागुंतीचं दर्शन म्हणजे अंगहार या प्रकारचे करण. या प्रकारच्या नृत्याविष्कारात धंुदी, आश्चर्यचकितता, शंृगार, ध्यानमग्नता यांचा प्रत्यय प्रसंगानुरूप यायचा असतो.


प्राचीन भारतीय शिल्पसृष्टीत नृत्यांगनांच्या अनेक एकापरीस एक अशा शिल्पाकृती आढळतात. कोठे त्या एकल नृत्य सादर करीत असतात, तर कोठे समूह नृत्य, तर आणखी कोठे वाद्यवृंदासह. मंदिरातील सात्त्विक, समर्पण भाव व्यक्त करणारे भरतनाट्य असेल किंवा दरबारातील शंृगारिक कथ्थक असेल. नृत्य कोणतेही आणि कोठेही असो, ते सादर करणाऱ्या नर्तिका सुडौल देहाच्या, देखण्या, अभिनयकुशल आणि चेतोहारी असतात, असाव्या लागतात, असे त्यांच्या शिल्पाकृती सांगतात.


मंदिरांच्या बाह्यभिंतीवरील नृत्यांगनांचे प्रयोजन लक्षात घेण्यासारखे आहे. मंडपाच्या मध्यभागी असलेल्या रंगशिलेवरून, देवतेसमोर भक्तियुक्त अंत:करणाने ते नाचायचे असते. देवतेला गायन, वादन, नर्तन याद्वारे प्रसन्न करून घ्यायचे असते आणि म्हणून मंदिराच्या बाह्यभिंतीवर अनेक स्त्रिया मृदंग, वेणू, एकतंत्री वाजवण्यात मग्न झालेल्या अवस्थेत शिल्पांकित केलेल्या आढळतात, तर नृत्यांगना अनेक करणांच्या पदक्षेपाच्या नृत्याद्वारे मन वेधून घेत असतात. विशेष म्हणजे, एखादी पायाला घुंगरं (नूपुर) बांधून नृत्यासाठी सिद्ध होताना दिसते, तर दुसरी ‘नाच नाचुनी दमल्यामुळे थकले पाऊल, थकले पैंजण, पुरे पुरे ते झाले नर्तन’ अशा भावनेने, घुंगरू उतरवायला लागते. अशी एक नृत्यांगना निलंगे (जि. लातूर) येथील नीलकंठेश्वर मंदिरावर विराजमान आहे.

 

‘मालविकाग्निमित्रम्’मध्ये म्हटलेय, ‘विस्तीर्ण डोळ्यांच्या, उन्नत वक्षाच्या, कमनीय कटिभागाच्या त्या असाव्यात (१.४), ही अगदी तशीच आहे. असे वाटावे की, कालिदासाने केव्हा तरी हिला पाहिले, असावे. ती सालंकृत आहे. पायातले पैंजण (नूपुरे) उतरवून ठेवते आहे.


नृत्यासाठीचा साज चढवायला लागलेली सुरसुंदरी, खजुराहो येथील मंदिरावर आढळते. ती सालंकृत आहे. एक तिपेडी मुक्ताहार तिच्या वक्षभागावर रुळतो आहे. कालिदासाने वर्णन केल्याप्रमाणे, ते मृणाल सूत्रान्तरमप्यलभ्यम् (कुमार, संभवम् १.४०) म्हणजे पुष्टस्तनद्वय एकमेकाला असे भिडले आहेत की कमलकेसरालाही त्यात शिरकाव करण्यास वाव नाही. डावी पोटरी वर उचलून घेऊन नूपुरपट्टी घोट्याभोवती व्यवस्थितपणे गुंडाळण्यात ती मग्न असल्याचे दिसते. तिची नजर तेथेच केंद्रित झाली आहे. शुभांगना नर्तकीला शोभेल, अशीच केशभूषा तिची आहे. औरंगाबाद येथील सातव्या शतकातील क्र.७च्या लेणीत वाद्यवृंद समूहात नृत्यरत यौवना शिल्पांकित केलेली आहे. हे नृत्य अनेक परीने नावाजले गेले आहे. शिल्पपट, रचना (composition) आणि वास्तवता (naturalness) या दृष्टीने हे मनात भरणारे आहे. 

 

अर्धवर्तुळ करून बसलेल्या सहा स्त्री वादकांच्या मध्यात कमनीय बांध्याची ही नर्तिका आहे. ती आकर्षक असून, जीवनरसाने ओतप्रोत आहे, सचेतन भासते आहे. कट्यावलंबित स्थितीत भरतनाट्यातील एक करण विलंबित लयीत ती नाचते आहे. तिने अत्यंत तलमवरूच परिधान केल्यामुळे, तिची खोल नाभी, तिच्या आवर्तशोभेसह गोचर झाली आहे. ओटीपोट व त्या खालचा उतरता भाग आणि तिच्या पुष्ट मांड्या, त्या वस्त्रातून डोकावताना दिसतात. ती अधोवदना असल्यामुळे नृत्यातील गती व एकूणच तोल संभाळण्यात ती व्यग्र असल्याचे जाणवते. कलेच्या, नृत्यरचनेच्या, वास्तवतेच्या दृष्टीने हा अत्यंत चित्ताकर्षक प्रसंग पाषाणबद्ध करणाऱ्या तत्कालीन कलाकारांचे कौशल्य पणाला लागले असणार! नृत्यातील एका ‘करणा’चा त्यांनी ‘Statue’ केलाय जणू.

 

डॉ. जी. बी. देगलूरकर
udeglurkar@hotmail.com