आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पीप्रिय शुकसारिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन भारतीय शिल्पकारांना आपल्या सौंदर्याने, देहसौष्ठवाने, कमनीयतेने वेड लावणाऱ्या काही अप्सरा, काही नायिका आहेत, असे दिसते. त्यामुळे अशा काही यौवनांची शिल्पे अनेक ठिकाणी तेही पुन:पुन्हा शिल्पीत झाल्याचे आढळते. अशापैकी एक आहे, शुकसारिका. ही पुनवल्लभा, पत्रलेखिका आणि दर्पणा या सुरसुंदरी प्रमाणेच ठायी ठायी मंदिरावर आपणास आढळते...

 

क्षिणी विविधा: कार्या: करे च शुकसारिका:।
एषा कन्या सविख्याता विहिता शुकसारिका।।
एका हाती वा हातावर पोपट असलेली सुंदरी म्हणजे, शुकसारिका! भारतदेशातील अनेक मंदिरांच्या बाह्यभिंतीवर ती आढळते. ती कलाकारांच्या अति आवडीची असावी, कारण तिच्या द्वारे काही रूपकेही साधता येतील आणि त्याआधारे कलेला विलक्षण उठाव देता येईल आणि अधिक आकर्षक करता येईल याची खात्री कलाकालांना वाटते. 


मथुराशैलीच्या कलावंतांनी या रूपकाला पहिल्यांदा शिल्परूप दिले. कलेच्या प्रांतात संपूर्ण प्राचीन कालखंडात हिने आपली लोकप्रियता टिकवली. विविध विभ्रमांत, वेगळाल्या प्रकारात, अनेक ढंगात हिला आणि पोपटाला (खरे तर पोपटिणीला) शिल्पांकित करण्यात शिल्पींचे आपले कौशल्य पणाला लावल्याचे दिसते. ज्या मंदिरांच्या बाह्य भिंतीवर वा स्तंभावर शिल्पे आहेत, बहुधा त्या सर्व मंदिरावर, शुकसारिका आढळते. कर्नाटकातील काही मंदिरांच्या मुखमंडपातील स्तंभावर ती शालमंजिकेच्या रूपात दिसते. पैकी मोजक्या शिल्पांचा येथे विचार केला आहे. होट्टल (जि. नांदेड) येथील मंदिराच्या मंडोवरावर (बाह्यभिंतीवर) एका आसिदतिशयप्रेक्ष्य: अशा सुरसुंदरीचे मनोरम शिल्प आहे. तिच्या डाव्या हातावर पोपट बसला असून, तिच्यावर उचललेल्या उजव्या हातात आंब्यानी लगडलेली डहाळी आहे.

 

निर्व्याज पोपटाने तिच्या गळ्यातील मोत्यांच्या हारावरच चोंच मारली आहे, ती फळेच आहेत अशा समजुतीने! पण निलंगे येथील चावट पोपटाचे शिल्पांकन तेथील नीळकंठेश्वर मंदिरावर आढळते आणि ते दृश्य पाहून ‘मिठ्ठू मिठ्ठू पोपट, आहे मोठा चावट! खातो दाळ कच्ची अन् मलाच म्हणतो लुच्ची? या लहानपणीच्या कवितेच्या ओळीची आठवण करून दिली जाते. येथील सूरसुंदरी उजव्या हातात आंब्यांनी लगडलेली फांदी घेऊन उभी आहे, आणि तिच्या मुडपलेल्या डाव्या हाताच्या पंजावर पोपट बसलेला आहे. हा हात तिने खांद्यापर्यंत वर उचललेला आहे. सहज खेळकरपणे तिने आंब्यांची फांदी त्याचे पासून दूर धरलेली, तेव्हा या खोडकर पोपटाने आलेल्या संधीचा चावटपणे फायदा घेऊन तिच्या ‘पक्वबिंबाधरोष्ट’ वरच चोंच मारली.

 

कदाचित तिचे ओठ म्हणजे पिकलेले रसाळ फळच जणू असे रूपकात्मतेने कलाकाराला दाखवायचे असणार! मधाळ देहयष्टीची ही सुरसुंदरी शुकसारिका मोठ्या आकर्षकपणे उभी आहे. मोठ्या आकाराचे शिरोभूषण, चटुलातिलक(बिंदी), फलकहार, कंठी, स्तनहार, केयूर, कंकण इत्यादी आभूषणामुळे तिचे मूळचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. तिच्या कमनीय देहाचा प्रत्येक अवयव तारुण्याचे उधाण ल्यालेला दाखवण्यात, कलाकाराला विलक्षण यश लाभले आहे.  हिच्या पेक्षा अधिक दर्शन आहे, ती धर्मपुरी येथील केदारेश्वर मंदिरावरील शुकसारिका.

 

ती दिमाखदारपणे देहुडा पाऊली म्हणजे मुरलीधरकृष्ण उभा राहातो. तशी उभी आहे. आंब्याची डहाळी तिने  उजव्या हाती डोक्यावर तिरपी धरलेली आहे. तिच्या उन्नत गोलाकार वक्षाला पिकलेला आंबा समजून पोपटाने तिचे स्तनाग्र चोचीत धरले आहे. कलाकाराने हे वास्तव करण्यासाठी त्याची चोंच किंचित् उघडलेली दाखविली आहे. असे दिसते की, या सुंदरीचे स्तन टोकदार आणि आम्रफलवत् भासवण्यास कलाकाराने अर्थातच कौशल्य पणाला लावलेले आहे. कलेच्या दृष्टीने पाहाता अखिल दक्षिण देशातील उत्कृष्ट स्त्री-शिल्पापैकी हे एक आहे आणि सामान्यत: हे अजोड आहे, असे मानणे भाग आहे.

 

ही यौवना अत्यंत रेखीव अवयवांची आहे. ती चंद्रमुखी आहे. ितच्या नाजूक कटिभागामुळे आणि पृथुल नितंबामुळे तिचे ‘डमरूमध्या’ असे वर्णन सार्थ ठरावे. - गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी येथील शुकसारिकेच्या चार शिल्पापैकी एक फार मनोरम आहे. या पुरन्ध्रीच्या डाव्या हातातील वाडग्यातील खाद्य खाण्यात, तिच्या उजव्या हातावरील पोपट, गुंतलेला आहे. जगप्रसिद्ध कलासमीक्षक शिवराममूर्ती यांनी या संदर्भात अमरूशतकातील(१५) एक कडवे उद््धृत केले आहे. त्याचा अर्थ असा-‘झोपेतून सकाळी जागे होताच, रात्रीच्या एकांतात झालेले प्रेमकूजन पोपटाकडून पुनरुच्चारित होत असलेले पाहून, लाजेने चूर झालेली चतुर सुमगा तत्परतेने माणकाचे कर्णकुंडल त्याच्या चोचीत भरवते, तेव्हा डाळिंबाचे दाणे समजून ते खाताना, तो विचलित चित्त होतो.


दम्पत्योर्निशि जल्पतोर्गृहशुकेनाकर्णितं यद्वच:
तत्प्रागरु:सन्निधौ निगदतस्तस्यातिमात्रं वधू:।
कर्णालम्बितपद्मरागशकलं विन्यस्य चञ्चूपुटे
व्रीडार्ता विद््धाति दाडिमफलव्याजेन वाग्बन्धनम्।।

 

डॉ. जी. बी. देगलूरकर

udeglurkar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...