Home | Magazine | Rasik | Dr. G. B. Deglurkar article in Rasik

रतिरहस्‍य

डॉ. जी. बी. देगलूरकर | Update - Jul 01, 2018, 07:36 AM IST

कलाकार हिच्या दर्शत देहाच्या सौष्ठवावर इतके लुब्ध झाले की, त्या मोहापायी त्यांनी तिचे ठायी ठायी शिल्पांकन केले आहे. खरे

 • Dr. G. B. Deglurkar article in Rasik
  कलाकार हिच्या दर्शत देहाच्या सौष्ठवावर इतके लुब्ध झाले की, त्या मोहापायी त्यांनी तिचे ठायी ठायी शिल्पांकन केले आहे. खरे तर ती भारतभरातील किती तरी प्राचीन मंदिरांच्या बाह्यभिंतींवर आढळते. असे असण्याचे कारण, तिने यच्चयावत् प्राणिमात्रांना ‘दंश’ केलेला आहे, हे असावे. त्यामुळे जेथे जेथे माणसाचा वावर आहे तेथे तेथे तिने आपली उपस्थिती दाखवली आहे...


  मदनाची ही सखी वा सहचरी. प्रेम आणि काम हे हिच्याद्वारे समूर्त झालेले आहेत. रूपासी आलेले आहेत. ही स्वर्गलोकीची अप्सरा सौंदर्य आणि मोहकता यासाठी सर्वपरिचित आहे. कलाकार हिच्या दर्शत देहाच्या सौष्ठवावर इतके लुब्ध झाले की, त्या मोहापायी त्यांनी तिचे ठायी ठायी शिल्पांकन केले. तिची एकटीची प्रतिमा वा मदनासमवेतचे तिचे शिल्प धर्मपुरी, होट्टल, खिद्रापूर, मार्कंडी, वरंगल, पालमपेठ, पानगाव, खजुराहो येथील मंदिरांच्या बाह्यभिंतींवर आढळते. खरे तर ती भारतभरातील कितीतरी प्राचीन मंदिरांच्या बाह्यभिंतीवर आढळते. असे असण्याचे कारण, तिने यच्चयावत् प्राणिमात्रांना ‘दंश’ केलेला आहे, हे असावे. त्यामुळे जेथे जेथे माणसाचा वावर आहे तेथे तेथे तिने आपली उपस्थिती दाखवली आहे. मात्र ती शिल्प वा चित्ररूपात आढळते, ते स्थानपरत्वे वेगळाल्या अवस्थेत. कधी ती रतिगृहात श्रृंगाराला उद्युक्त करणाऱ्या अवस्थेत असते, तर कधी मंदिरावर आढळते ते त्याला विमुक्त करण्यासाठी.
  हिची शिल्पे साधारणत: इसवीच्या सातव्या ते तेराव्या शतकातील होत. या पूर्वीची तिची शिल्पांकने बदामी व वेरूळ येथील लेणीत आहेत. असे असले तरी या दोन्ही ठिकाणच्या शिल्पांकनातील फरक असा, की लेणीत ती मदनासवे दिसते. मंदिरात एकाच रकान्यात मदन आणि रती सामान्यत: दाखवले जात नाहीत. तिथे मदन आणि रती वेगवेगळ्या रकान्यांत (पटात) असतात. मात्र हे रकाने एकमेकाला जोडूनच असतात. म्हणजेच, एरवी एकमेकांच्या सहवासात, सान्निध्यात असणारे हे दोघे येथे दूर दूर असतात. मंदिरात कामभावनेविरहित भक्ताने असायला हवे, या हेतूचे फार सुरेख शिल्पांकन खिद्रापूर (जि. कोल्हापूर) येथील कोप्पेश्वर मंदिराच्या अधिष्ठानावर आढळते.

  येथे एका अर्धस्तंभावर साक्षात मदन उभा आहे. त्याच्या उभं राहाण्याची ढब विरोचित आहे. उजव्या हाती त्याच्या आहेत, पंचबाण आणि डाव्या हाताने त्याने धरला आहे. इक्षुदंड(ऊस). तो धरलाय तो योद्ध्याने धनुष्य धरावे तशा ऐटीत. यामध्ये उसाची कांडे आणि टोकाची पाने स्पष्ट दिसतात. मदन सालंकृत आहे, नखशिखांत आणि याच्या बाजूला उभी आहे, ती रती. ही सालंकृत आहे, देखणी आहे, सौष्ठवपूर्ण देहाची नि चारुगात्री. तिचे वर्णन ‘श्रोणीभारदिलसगमना स्तोकनम्रास्तनाभ्यां’ असेही करता येईल. शेजारीच उभा असलेल्या मदनापासून दूर सरकणाऱ्या रतीचे विलक्षण बोलके असे हे शिल्पांकन आहे. मदनाला दूर सारणाऱ्या भूमिकेत असायला हवेत, अशा रीतीने तिने दोन्ही हात त्याच्याकडे फेकले आहेत. ‘तुझ्या वाऱ्यालाही उभं राहायचं नाही’ असा ईविर्भाव त्यातून जाणवतो आहे. अशा प्रसंगाला उठाव देणारी अशी साजेशी ढब येथे पूरक ठरणारीच आहे. तिने डावी पोटरी मुडपलेली आहे, उजवा पाय बाजूला सरकण्याच्या तयारीत आहे, बाजूला होताना ती वळून मदनाकडे तिर्यक दृष्टिक्षेप करते आहे. मदनाचा-मन्मथाचा पराक्रम शिवमहादेवाला जसा माहीत होता तसाच किंबहुना अधिकच ठाऊक आहे स्वानुभवाने, तो रतीलाच. शिवाने तर तृतीय नेत्र उघडून त्याला भस्मीभूत करण्याचा प्रयत्न केला, तरी तो चिवटपणे कार्यरत म्हणजेच रतिरत राहिला होता हे तिच्या ध्यानात असणारच. म्हणजेच तरीही तिने त्याचे सान्निध्य सोडले नव्हते. पण येथे मात्र मंदिराच्या पवित्र परिसरात रतीसुद्धा विषय टाळते आहे. तेव्हा मंदिरात असताना (तरी) भक्तांनी विषयापासून, मनानेसुद्धा दूर असावे हे किती प्रत्ययकारकपणे दाखवलेले आहे.

  रतिरहस्य जाणणे म्हणजे, तिचा बेबंध प्रभाव लक्षात यावा, म्हणून पुराणांतर्गत अनेक कथा आपल्यापुढे आहेत. कामभावनेने प्रेरित होऊन इंद्रही परस्त्रीशी रत होण्याचे पाप करतो (अर्थात त्याची शिक्षा त्यालाही भोगावीच लागली) तर विश्वामित्रासारखा तप:पूत मेनकेच्या सौंदर्याला भाळला तो कामभावनेच्या आहारी जाऊनच. रतीची अशी आणखी काही शिल्पे पाहाता येतील. होट्टल(जि. नांदेड) येथील सिद्धेश्वर मंदिरातील रती तर शिकारीच्या पवित्र्यात उभी आहे, खरे तर जो पर्यंत प्राणीमात्र आहेत तो पर्यंत तिची भूमिका अशीच असणार असते. येथे तिने इक्षुदंडाच्या धनुष्याला पुष्पबाण जोडण्याच्या भूमिकेत आहे. पुष्पबाण म्हणजे हळूवारपणे कामविद्ध करण्याचा संकेत असतो. जखम तर होतेच, पण कळत नाही. सरळ उभी असलेली ही रती सालंकृत आहे. तिचे उन्नत उरोज चेतावणी देण्यास तत्पर आहेत. तिच्या भरीव, कदली कदली करम: करम: करिराजकर: करिराजकर: अशा कशाही तुलना करता येणार नाहीत, अशा तिच्या पुन:स्थितीस्थापक (resilient) मांड्या असल्यातरी दर्शनेच्छूने या भूलभुलैयात गुरफटून जायचे नसते, हा मोह, ही कामभावना बाहेर ठेऊनच देवदर्शनास जायचे असते, विचलीत चित्त न होऊ देता.

  ताहाकरी येथील (जि. नगर) रती देहुडा पाऊली अगदी आरामात उभी असून इक्षुदंडाचे धनुष्य तिने मांड्यात सहजगत्या धरल्याचे दिसते. त्रिभंगात ती उभी असल्यामुळे तिच्या प्रमाणबद्ध देहाची लवचिकता आणि कमनीयता आकर्षक झाली आहे. मदनभऱ्या यौवनाचा हिचे ठायी प्रत्यय येतो. उजव्या हातात बाण धरून कमकुवत मनाच्या सावजाकडे ‘चालून जाण्याच्या’ तयारीत ती आहे, असे दिसते. मदन-रतीची वाहनं म्हणून मगर, पोपट आणि मयूर शिल्पांत आढळतात. पण मदुराई येथील मीनाक्षी मंदिरावर ती हंसारूढ दाखवलेली आहे, हंसगामिनी म्हणून की काय? मंदिराव्यतिरिक्त तिचे चित्रांकन वा शिल्पांकन श्रीमंत रंगेल मंडळींच्या शयनागारात आढळते तेव्हा ती रतिक्रीडेला उद्युक्त करण्याच्या भूमिकेत असते. दहाव्या शतकातील कंधार येथील शिलालेखात कामदेवाचे मंदिर वारांगनांच्या वस्तीत असावे, असे म्हटले आहे, तर पाँपी (इटली) येथील इसवीच्या पहिल्या शतकातल्या एका शयनगृहात कामोत्तेजन अवस्थांतून तिचे चित्रांकन केलेले आहे. सिंहासने पालथी घालण्याचे तिचे सामर्थ्य आहे, तेव्हा सावध व्हा रे, सावध व्हा...

  udeglurkar@hotmail.com

Trending