आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांजळ अनुभवांना चिंतनाची जोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय क्षेत्र हे मुळातच आव्हानांचा डोंगर असलेले, म्हणूनच त्यातल्या अनुभवांचे म्हणून एक वेगळेपण असते, परंतु केवळ अनुभव वेगळे असून भागत नाही, त्याला चिंतनाची जोड असेल तर शब्दरूपात उतरणारा ऐवज कायमस्वरूपी लक्षात राहणारा ठरतो, हीच अनुभूती प्रस्तुत पुस्तक आपणास देते... 
 
आव्हानांची पार्श्वभूमी असलेल्या अनुभवकथनाला चिंतनाची डूब दिल्याने पुस्तकरूपात उतरलेले लेखन किती उंची गाठू शकते, याचा प्रत्यय डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘डॉक्टर म्हणून जगताना, जगवताना’ हे ताजे पुस्तक देते. लेखिका जरी बालरोगतज्ज्ञ असल्या तरी त्यांचे अनुभव वैद्यकीय विश्वातील सर्वांनाच लागू पडतात. विशेष म्हणजे, अगदी एमबीबीएस झाल्यापासून ते पदव्युत्तर शिक्षणाचा त्यांनी काढलेला आलेख नव्या डॉक्टरांना आणि जुन्यांनाही भावणारा ठरतो. पण केवळ आवडण्या न आवडण्यापेक्षा या लिखाणाचे महत्त्व वेगळे आहे. कारण यात जागोजागी चिंतनाच्या जागा आहेत. विलक्षण प्रांजळपणा आहे,आणि प्रयत्नशीलतेचे विपुल दाखलेही आहेत. अभ्यासासाठी लहान मुलांचे क्षेत्र निवडल्यानंतर त्यांना शिकवणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे लेखिकेने केलेले वर्णन हे वैद्यकीय शाखांमध्ये सार्वत्रिक ठिकाणी कसे एकच असते, हे वाचकांना कळते. शिकण्याची धडपड, हातून होणाऱ्या चुका, विविध स्वभावाची मुले, त्यांचे पालक, यशस्वी इलाजानंतर वाटणारे समाधान आणि वाढणारा आत्मविश्वास, हातून झालेल्या चुकांची मनातच दिलेली कबुली आणि हे सगळं ‘मनोभावे’ लिहिण्यासाठी गरज असलेली वाचकाला भिडणारी शब्दकळा लेखिकेला अवगत असल्याचा प्रत्ययही  हे पुस्तक देते. 

रोग्यांची तपासणी करतेवेळी त्यांच्या आजाराचा पूर्ण इतिहास जाणून घेणे, हे कोणत्याही वैद्यकीय शाखेच्या अभ्यासासाठी किती आवश्यक असते, त्यासाठी आपण कशी शिस्त लावून घ्यावी लागते, हे लेखिकेने स्वानुभवातून सांगितले आहे. पूर्वग्रहदूषित होऊन रोगी तपासण्याचे चुकीचे निदान करण्याचे, प्रकार सहज घडू शकतात. स्वत:चा ‘इगो’ बाजूला ठेवून सहकाऱ्यांची वेळोवेळी मदत घेऊन वाटचाल करावी लागते. ही लेखिकेची भूमिका सद्य:स्थितीत डॉक्टरांनी लक्षात ठेवण्याजोगी आहे.
 
रोग निदान आणि रुग्णोपचार करताना ‘कट’ न देणे किंवा ‘पेशंट पाठवा’ असले फोन न करणे आणि ते आवर्जून पाहणे, ही खऱ्या प्रॅक्टिसमध्ये आनंद देणारी बाब असते, हा आनंद न मिळवता आयुष्यभर केवळ व्यावहारिकतेने व्यवसाय करणाऱ्यांना केवढ्या आनंदास मुकावे लागते, ते हे पुस्तक वाचताना जाणवते. गमतीदार प्रसंग, गंभीर प्रसंग, असहाय वाटण्याचे क्षण, या सगळ्यांचीच माळ डॉक्टरच्या गळ्यात पडत असते, या दिशेने हे प्रतिपादन केलेले आहे.
 
याशिवाय ‘ग्रुप प्रॅक्टिसचे’ सद्य:स्थितीत असलेले स्थान यावर उद््बोधक विवेचन पुस्तकात आहे. डॉक्टरांना तोंड द्यावे लागणाऱ्या पुष्कळ आर्थिक अडचणींची मांडणी यात आहे. डॉक्टरांनी स्वत:च्या कुटुंबासंबंधी मुलासंबंधी अत्यंत खरेपणाने जे लिहिले, त्यावरून डॉक्टर केवळ उपदेशाचे ‘डोस देणारी नसून’ बोले तैसा चाले या उक्तीनुसार जगणारी आहे हे पटते.  पुस्तकात उत्तमोत्तम व समर्पक अशी अवतरणे आहेत. त्यामुळे लेखिकेचे हे लिखाण सर्वसमावेशक वाटते.
 
या सर्व लिखाणाला ‘वैद्यकीय गोष्टी’त परावर्तित करण्याची हातोटी सगळीकडे दिसते. आत्मप्रौढी कुठेही जाणवत नाही. ‘निरोपामध्ये आलेली मनाची ओढाताण’ व्यक्त होत असताना आपण नेहमी वापरत तो स्टेथॉस्कोप, बसायची खुर्ची, समोरचे टेबल यासारख्या वस्तूसुद्धा आपल्या मनात किती खोलवर बसलेल्या असतात, हे जाणवते. एकूण एक सर्वांगसुंदर आणि वैद्यकीयदृष्ट्या सर्वस्पर्शी असे पुस्तक वाचल्याचे वाचकास समाधान मिळते. 
 
- पुस्तकाचे नाव : डॉक्टर म्हणून जगताना, जगवताना 
- लेखक : डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर 
-  प्रकाशक : राजहंस प्रकाशन 
- किंमत : रु. ३०० 
 
-  डॉ. भवान महाजन
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, एका धनगराच विलक्षण आत्‍मकथन आणि वेदनेची गाथा ... 
बातम्या आणखी आहेत...