आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टरांना रुग्णाची कितीही काळजी वाटत असली तरी काही वेळा रुग्णांमुळेच डॉक्टरांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळही येते. हसावं की रडावं हे कळत नाही, असे प्रसंग अनेकदा डॉक्टरांवर ओढावतात.


प्रसंग घडला तेव्हा थर्टी फर्स्ट जवळ आलेला होता. ओली पार्टी, सुकी पार्टी, पार्टी झालीच पाहिजे अशी ग्रुप लीडरला येणारी धमकीवजा विनंती. या अशा अनेक मेसेजेसने व्हॉट्सअॅप, फेसबुक तुडुंब भरलं होतं. त्यात एक गोष्ट कॉमन होती (सालाबादप्रमाणे) ती म्हणजे ड्रिंक्स. फक्त  नुकसानच  करणाऱ्या गोष्टीचं उदात्तीकरण बघितलं आणि मला अक्षरशः उबग आला (तोही सालाबादप्रमाणे).बऱ्याचशा पेशंट्सची दारूमुळे झालेली दारुण अवस्था आठवली आणि वैतागून मग बरेचसे मेसेजेस न वाचताच डिलीट केले. तर मी काय सांगत होते की, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातलाच तो कुठला तरी दिवस होता. मी क्लिनिकमध्ये बसले होते.
‘दारूमुळं कुनाचं भलं झालंय का कदी?’
पेशंटच्या वेटिंग रूममधून येणाऱ्या आवाजाकडे माझं लक्ष वेधलं गेलं. आवाज चांगलाच टिपेला पोहोचला होता.
‘दारू पिल्यामुळं मानसातला सैतान जागा हुतोय. किती लोक नशेमदी बायकोपोरांना मारझोड कर्त्यात, पैसा उदळीत्यात. अक्शिड्ंट कर्त्यात. काय उपेग त्याचा?’
ग्रामीण बोलीतून कुणाची तरी हजेरी घेत होते एक आजोबा. पटकन बरंच वाटलं मला ऐकून. अगदी कंठ दाटून आला म्हणालात तरी चालेल. मी मनातल्या मनात मोठमोठ्यानं ‘अनुमोदन, अनुमोदन’ म्हणत होते.
दारूच्या दुष्परिणामांचं भाषण उरकून आजोबा कन्सल्टिंगमध्ये प्रवेशले.
‘काय होतंय आजोबा?’ माझा प्रश्न (विशेष आदरयुक्त आवाजात, अगदी आत्मीयतेने)
‘काय नाय बाई, घरचं बांदकाम काढलंय. भिंतीवर पानी मारीत हुतो आन च्या मारी कसा काय पडलो देवाला माहीत?’
‘अरेरे! आजोबा या वयात कशाला इतकं काम करता?’
आजोबांनी पटकन कपाळावर हात मारला आणि अदबयुक्त गुरगुरत म्हणाले,
‘आता मला काय सपान पडलं हुतं का मी पडंन आसं?’
मी पटकन सावरत म्हणाले,
‘बरं ते जाऊ द्या आजोबा. तुम्ही नीट आठवा बरं! चक्कर वगैरे आली होती का? म्हणून पडायला झालं का? डायबिटीस, ब्लड प्रेशरचा काही त्रास आहे का?’
‘काय नाय तसं काय नाय! बिलेड प्रेसर नाय, डायबेटी नाय. कोंबडा आरवायच्या टायमाला उलीसा गांजा वडला होता. बास बाकी का ऽऽ य ना ऽऽ य!’
इति!
(आता कपाळावर हात मारून घ्यायची वेळ माझी होती, हे सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे.)

 

shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...