आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसं जगायचं?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माताबालमृत्यूच्या बातम्या राेजच्या रोज कानावर येतात, वाचायला मिळतात. यावर कागदोपत्री उपाययोजनाही केली जाते. परंतु, प्रत्यक्षातलं चित्र वेगळं नि विदारक आहे...


सकाळी सकाळी माताबालमृत्यूच्या बातम्या वाचनात आल्या. भारतातल्या लोकांना कधी अक्कल येणार हे पांढरपेशे उद्गार मी काढले आणि नेहमीप्रमाणे लेकाचा नाष्टा, डबा, शाळेची तयारी यात गुंतले. शाळेत जाण्यापूर्वी लेकाला सुकामेवा भरवायचा राहिला, हे क्लिनिकला आल्यावर लक्षात आलं. अरे संसार संसार... चालायचंच.


क्लिनिकला आले. त्या बातमीचा विचार डोक्यात सापासारखा वळवळतच होता. मी झरझर समोरचा कागद ओढला आणि मला सुचणारे काही उपाय मी लिहायला घेतले. यात मुख्य मुद्दे होते - योग्य वयात लग्न आणि गर्भारपणात घ्यायची काळजी. मग त्यात पौष्टिक अन्न, फळं खाणं, नंतर गर्भवतीच्या आजूबाजूला आनंदी वातावरण असणं वगैरे वगैरे.


मी लिहीतच होते तेवढ्यात ऊसतोडणी कामगार असलेली एक पेशंट आली.
तिची केस हिस्ट्री थोडक्यात अशी. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न झालेलं. आता वय जेमतेम विशीच्या आतबाहेर. आधीच्या दोन मुली. तिसऱ्यांदा दिवस असण्याची शक्यता. रक्तातलं हिमोग्लोबिन धोकादायक पातळीवर. हे सगळं ऐकून अर्थातच तिला मी उपदेश करायला सुरुवात केली.


"अगं, तू वेडी आहेस का? तुला जिवंत राहायचंय की नाही? थोडी तरी स्वतःच्या तब्येतीची काळजी कर.’माझ्यापेक्षा बरीच लहान असणारी ती मला मोठ्या पोक्त स्त्रीसारखं समजावून सांगू लागली,"म्याडम, आता काय काय सांगू तुमाला. तुमच्यासारक्या शिकलेल्या लोकांना काय कळायचंय? मालकाला पोरगा पायजेल नाय तर तो दुसरं लगीन करंल. आता नशिबानं दिस गेलेत तर तो म्हंतो पाडून टाक. हे पोर माजं नाय. आता दोन पोरी घेऊन मी कुनाच्या मागं जानारे का?


काय सांगु म्याडम एवडं मरनाचं काम असतंय. माज्या पोरी सांबाळायला सुधा कोनी नाय. मालक पिऊन येतो. मला मारतूय. कुटंबी पिउन पडतोय. मला माज्या दोन पोरींसाठी काम करायलाच लागतंय. पोरी झाडाच्या सावलीला बांधून ठिवायच्या आन आपन उन्हातान्हात काम करायचं.’
"अगं, सगळं कळतंय मला. पण तुझा जीव गेला तर त्या पोरींकडे कोण बघणार?’
"नाय तसा नवरा चांग्लाय माजा. तो म्हंतो पोरगा झाला का दारू सोडून देईल. तुलाबी जीव लावीन. पोरींना बी जीव लावीन. पन फकस्त माजा वंस पुडं चाल्ला पायजील. नाय तर मी दुसरी बायको करील.’


काही क्षण माझ्या क्लिनिकमध्ये शांतता नांदली. नंतर तिचा हताश आवाज आला."म्याडम, कसं ना आमचं जिनं? कुत्रीसुद्दा बरी जगत अस्तील आमच्यापेक्षा.’समोरच्या कागदावर मगाशी मीच लिहिलेले उपाय माझ्याकडे पाहून छद्मी हसत होते.

 

 

डॉ क्षमा शेलार, बेल्हा
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...