आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताला परवानगी दिली तर त्याचा स्त्री भ्रूणहत्येसाठी गैरवापर होईल हा एक बागुलबुवा उभा केला जातो. त्यावरही काही उपाययोजना करायला हव्यात.
ती मुंबईतली होती. तिच्यावर बलात्कार झाला होता. तिच्या गर्भातल्या बाळाला डोकं नव्हतं आणि पोट होतं सगळं उघडं. इतकं उघडं की, आतले अवयव बाहेर सांडत होते. हे निदान होईपर्यंत २० आठवडे उलटून गेलेले. डॉक्टर म्हणाले, ‘गर्भपात नॉट अलाऊड!’
ती गेली कोर्टात अगदी सुप्रीम कोर्टात. कोर्टाला फुटला पाझर. कोर्टानी हातोडा आपटला, डॉक्टरांना म्हणाले, ‘अहवाल द्या अहवाल. ताबडतोब.’
डॉक्टर म्हणाले, ‘हा घ्या अहवाल, ताबडतोब. हे असं, असं, असं, असं आहे.’
कोर्ट झालं चकित. मोठा कठीण प्रसंग हा.
बलात्काराने पीडित बाई, त्यातून मूल सव्यंग. जगूच शकणार नाही असं. पण कायदा सांगतो, अंहं, गर्भपात फक्त २० आठवड्यांपर्यंतच वैध. त्यापुढे अवैध. त्यापुढे तो चक्क खून. बिनडोक्याच्या, नक्की न जगणाऱ्या बाळाचा झाला, म्हणून काय झालं, खून तो खून. कोर्टाच्या बुद्धीला हे पटेना, कायद्यात काही बसेना. मग कोर्टाने लढवली शक्कल. तिला सांगितलं, ‘कर गं गर्भपात, पण अपवाद म्हणून हं. देव, घटना वगैरे वगैरे तुझं कल्याण करोत.’
हे झालं तिचं; पण हिचं काय?
ही आहे खेड्यात. बलात्कार बिलात्कार काही झालेला नाही. चांगलं देवाब्राह्मणाच्या साक्षीनं ज्या पुरुषाबरोबर लग्न लागलं त्याच्यापासूनच दिवस गेलेत हिला. पण बाळात आहे व्यंग, निदान झालं एकविसाव्या आठवड्यात. बाळाला आहे विकार, त्यामुळे ते नक्कीच नाही जगणार. हिने काय करायचं?
ही आणखी एक. बाळाभोवतीचं पाणी काढून तपासल्याशिवाय बाळाला व्यंग आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाहीये. पण हे सगळं करून रिपोर्ट यायला लागला वेळ. लागणारच. अहो ही इथे वाईत, तपासणीसाठी नमुना जाणार दिल्लीला! २० आठवड्यांच्या आत व्हावं कसं सगळं? पंचविसावा आठवडा उलटला. हिने काय करायचं?
आणखीही एक भेटली मला. बाळाला हृदयविकार, बाहेरच्या जगात हे हृदय बाळाला साथ देणार नव्हतं. पण आईच्या पोटात असेपर्यंत सगळं ठीकच चालणार होतं. आई(जी)च्या जिवावर बाळ(जी) उदार! हृदयाने साथ द्यायला हवी असेल तर ऑपरेशन लागणार. मोठ्ठं ऑपरेशन. ते काही हिला परवडण्यासारखं नाही. आता आहेत स्किमा, पण स्किमा काय कामाच्या? दरिद्री माणसाचं नाव कधी रेषेखाली राहतं का? पण कायदा सांगतो, गर्भपात बेकायदा. मग काय, चला, वाढवा गर्भ. नऊ महिने नऊ दिवस पोसा त्याला. जन्मल्यानंतर मरणारच आहे. पण हळूहळू. जन्मानंतरचा कणाकणाने होणारा गर्भपातच की हा. फक्त डोळ्यांदेखत होणारा. कुटुंबाच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा. पण कायदेशीर हां, कायदेशीर.
वरीलपैकी एकीने मुकाट आहे ती परिस्थिती स्वीकारली.
एकीचा नवरा मोठा जहांबाज. त्याने डॉक्टरना खळ्ळखट्याकची भीती दाखवली.
तिसरीने सरळ डोंगरावरची कदेवाडी गाठली. गर्भपातासाठी प्रसिद्ध अशा तिथल्या म्हातारीकडून काडी घालून घेतली आणि भारतात बाळंतपणात बायका मरतात ना, त्यांच्या पंक्तीत जाऊन बसली. गावठी गर्भपातात त्यातल्या १३% जीव गमावतात, त्यात ही एक. आधुनिक सतीच म्हणा ना ही. तेव्हा नवऱ्याबरोबर जाळलं आता बाळाबरोबर जाळलं, एवढाच फरक.
नवे नवे शोध लागतात ही कटकटच आहे शिंची. पूर्वी बरं होतं, बाळ बाहेर आलं की, मगच त्याचं बरंवाईट काय ते समजायचं. त्या काळी केलेला (१९७२) हा गर्भपाताचा कायदा. ज्ञान बदललं, तंत्रज्ञान बदललं, सोनोग्राफीनं आईच्या पोटात डोकावता येऊ लागलं, पण कायदा तोच, अगदी तसाच. महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कायद्याचा फायदा सोडाच, उलटा जाचच होतो अशा वेळी. कित्येक व्यंगं अशी आहेत की, ज्याचं वीस आठवड्यांच्या आत निदान शक्य नाही. कित्येक स्त्रिया अशा आहेत, अशा ठिकाणी आहेत की, त्याचं वेळेत निदान होऊ शकत नाही. काही तपासण्यांचे निकालच खूप उशिरा येतात. अशांनी काय करायचं? प्रत्येकीने काय सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढायची?
जर २४ आठवड्यांपर्यंत गर्भपाताला परवानगी दिली तर त्याचा स्त्री भ्रूणहत्येसाठी गैरवापर होईल हा एक बागुलबुवा उभा केला जातो. अगदी सरकारी वकिलांनीदेखील न्यायालयात हे बोलून दाखवलं. पण अनेक डॉक्टरकडून सोनोग्राफी तपासणी, त्यांच्या निदानाचं पद्धतशीर दस्तावेजीकरण, मोजक्याच केंद्रांना अशा गर्भपाताची परवानगी, अशा काही उपाययोजना करता येतील.
न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी, त्यामुळेच ही गोची झाली आहे. गाऱ्हाणी ऐकण्यासाठी फक्त कानच न्यायदेवतेने उपलब्ध ठेवला आहे. हे काही ठीक नाही. ती वकील मंडळी सांगणार आणि ही ऐकणार. या बायकांची वेदना ते काय शब्दांत मांडू शकणार आहेत? या बायकांची वेदना काय कानांना दिसणार आहे? या बायकांचे अश्रू काय कानांनी ऐकू जाणारेत? या बायका आहेत, त्यातून भारतीय बायका. अगा न्यायदेवते, त्यांचे हुंदकेसुद्धा अस्फुट असतात. आता तरी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढ. हिच्या आणि हिच्यासारख्यांच्या वेदना बघ आणि गर्भपाताची कालमर्यादा तत्काळ वाढव.
- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
shantanusabhyankar@hotmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.