आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केल्याने होत आहे रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वय वाढल्यावर हसलं, खोकलं की, कपड्यात थोडीशी लघवी निसटण्याचा त्रास बऱ्याच बायकांना असतो. पण सहसा याबद्दल फारशी वाच्यता कोणी करत नाही. ‘आईला होत होतं, ताईलाही होतंय, म्हणजे हे असंच चालायचं’, अशी काही तरी मनाची समजूत घातली जाते. याला म्हणतात स्ट्रेस युरिनरी इन्काँटिनन्स (SUI). शुद्ध मराठीत सांगायचे तर दाबजन्य मूत्र विसर्जन.

 

 

‘लघवीवर नियंत्रण नसणे’ यात अनेक प्रकार आहेत, त्यांची प्रकारपरत्वे अनेक कारणे आहेत. आपण सध्या स्ट्रेस युरिनरी इन्काँटिनन्स (SUI) या प्रकाराबद्दलच बोलू. इथे थोडेसे हसले, खोकले, काही वजन उचलले (उदा ः पाण्याने भरलेली बदली उचलली किंवा नातवंडाला कडेवर घेतले) की पोटातला दाब वाढतो आणि थोडीशी लघवी निसटते. एरवी काही त्रास होत नाही. 


या त्रासासाठी वयच वाढायला पाहिजे असे काही नाही. प्रसूतीनंतर बऱ्याच जणींना हा अनुभव आलेला असतो. बऱ्याचदा हा तात्कालिक असतो. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी कटीभागाचे स्नायू, खूप आणि खूप वेळ ताणले जातात. त्यांच्यातला नैसर्गिक ताण (Tone) मार खातो. इतक्या प्रमाणात आणि इतक्या वेळ ताणले गेल्यामुळे, तिथल्या नसा निकामी होतात. याचा स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो. त्यांची लवचिकता जाते, ते काहीसे लुळे पडतात. ‘कटीकाठावर स्नायू आता पहिले उरले नाहीत,’ असे काहीसे होते. दीडदोन महिन्यात पुन्हा सारे स्थिरस्थावर होते. अर्थातच वारंवार आणि पाठोपाठ बाळंतपणे झाली तर हा त्रास आणखी वाढतो. आता आयुर्मान वाढल्यामुळे बऱ्याच मदर इंडिया चांगल्या ग्रँडमदर इंडिया होईपर्यंत जगतात. भारतात म्हाताऱ्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे असे प्रश्न आता वाढत आहेत.


वयही वाढले आहे आणि त्रासही होतो आहे, म्हणजे तो वय वाढल्याचाच परिणाम आहे असे समजणे अगदीच बाळबोध ठरेल. जंतूबाधा, मधुमेह, बद्धकोष्ठता, काही औषधे, अशीही कारणे असू शकतात. इतकेच काय, सांधेदुखी वा पक्षाघाताने, हालचाली संथावल्यामुळे बाथरूमपर्यंत पोहोचायलाच खूप वेळ लागतो हेही कारण असू शकते. अशी सारी नीट चिकित्सा करूनच आजाराला लेबल लावलेले बरे. 


या साऱ्यावर केगेलचे व्यायाम हा उत्तम उपाय आहे. अगदी प्राथमिक पण बराचसा प्रभावी असा हा उपाय. डॉ. आर्नोल्ड केगेल याचे जनक. व्यायामाने स्नायू पूर्ववत काम करू लागतात हा याचा पाया. आता या आजारासाठी काही औषधेही निघाली आहेत, पण तो दुसरा पर्याय. व्यायाम अजूनही उत्तम. शस्त्रक्रिया हा तिसरा पर्याय. आदर्श शस्त्रक्रिया अजूनही सापडलेली नाही. तऱ्हेतऱ्हेच्या शंभरावर शस्त्रक्रिया आहेत, म्हणजे बघा. शस्त्रक्रिया करूनही कायमस्वरूपी फरक पडेल असे नाही. 


योनीमार्गाभोवतीच्या स्नायूंसाठी हा खास व्यायाम आहे. कटीतळाचे हे स्नायू अशक्त असतील तर ओटीपोटात कसतरीच वाटणे, अंग बाहेर आल्यासारखं वाटणे, कंबरदुखी अशा बारीकसारीक अनेक तक्रारी उद्भवतात. प्रसुतीनंतर योनीमार्ग सैल पडलेला असतो. यात हवा साठते आणि ती काही वेळा बाहेर पडताना आवाजही येतो. चार लोकांत असे झाले तर खूप ओशाळवाणे वाटते. या व्यायामामुळे अशा तक्रारीही नियंत्रणात येतात. निव्वळ अनियंत्रित मूत्र विसर्जनावरच नाही तर मल विसर्जनावरही ताबा प्राप्त होतो. 


इतकेच काय कटीतळाचे स्नायू आवळ आणि बलवान झाल्यामुळे कामसौख्यात भर पडते. संभोगाच्या वेळी योनीचा बाह्य भाग, लघु आणि गुरूओष्ठ मिळून एक काम-मंचक (Orgasmic Platform) तयार होतो. कामतृप्तीसाठी या मंचकाचे मर्दन होणे अतिशय आवश्यक असते. कामरंगी रंगले असता कटीतळाचे हे स्नायू विविध प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावतात. हे कामसौख्यासाठी आवश्यक आहे. ही किमया या व्यायामांनी पुन्हा साध्य होते. पण जर कटीतळाचे स्नायू ढिले असतील तर कुठला काम-मंचक,  कुठले मर्दन आणि  कुठली तृप्ती!


यशाची पहिली पायरी म्हणजे व्यायाम नीट समजून उमजून करणे आणि काही विशिष्ट वेळ त्यासाठी खास राखून ठेवणे. या व्यायामात कटीतळाचे स्नायू आवळून धरणे शिकवले जाते. या ऐवजी पोटाचे, मांडीचे व कुल्ल्यांचे स्नायू आवळण्याची चूक बरेचदा घडते. हे टाळणे अतिशय महत्त्वाचे. यासाठी मुळात व्यायाम नीट शिकून घेणे आणि जे केले जात आहे ते बरोबर आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे. हे करायला अंगी चिकाटी हवी. हे न केल्यास बिघाड हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाणार हे ठरलेले.


या स्नायूंच्या पेशीपेशीतही फरक असतो. काही पेशी संथगतीने काम करतात. कटीभागातील अवयवांना आधार देणे हे यांचे मुख्य काम. काही पेशी तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या असतात. हसले, खोकले की पोटातला दाब अचानक वाढतो. अशा वेळी या पेशी झटकन मूत्रमार्ग आवळून टाकतात. लघवी निसटू देत नाहीत. या दोन्ही पेशीसमूहांसाठी वेगवेगळे व्यायाम करावे लागतात. संथ पेशींसाठी कटीतळाचे स्नायू आवळून मनातल्या मनात दहा अंक मोजेपर्यंत तसेच धरून ठेवायचे. चपलगती स्नायूंसाठी आवळणे-सोडणे अशी कृती जलद गतीने करायची. बसणे, उठणे, चालणे, झोपणे वगैरे अवस्थांत स्नायूचे वेगवेगळे अंश कार्यरत असतात. त्यामुळे व्यायामही वेगवेगळ्या स्थितींमध्ये करावा लागतो.

काही आठवड्यातच सुमारे ७०% पेशंटना लक्षणीय फरक पडतो. सुरुवातीला तर नेमके काय करायचे याबाबत बराच गोंधळ होतो. यावर युक्ती म्हणून सुरुवातीला लघवीला होताना लघवीची धार थांबवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले जाते. हे ज्या स्नायूसमुच्चयाने साध्य होते, ‘त्या’ स्नायूंची हालचाल करायची आहे हे मग कळायला लागते. काही वेळा हे शिकवण्यासाठी योनीमार्गात विशिष्ट आकाराची वजने धरायला देतात. ही वजने सांभाळत चालायला, बसायला वगैरे सांगितले जाते. यामुळेही कोणते स्नायू आकुंचित करायचे हे सहज समजते. ही वजने आठ हजार रुपयांना मिळतात असे कळले. मी हबकलोच. हे असले काही आमच्या ग्रामीण रुग्णांना परवडत नाही. त्या म्हणतात, ‘ह्याच्यापरीस एखादा डाग केला तर गळ्यात मिरवता तरी येईल. हा आपला फुकाचा खर्च!’ हे उत्तर ऐकून मी भंगारातून चक्क ट्रॅक्टरची बॉलबेअरिंग आणून वजन म्हणून वापरायला दिली. झकास उपयोग झाला! गरजवंताला अक्कल असते तर!

 

-डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

shantanusabhyankar@hotmail.com

 

बातम्या आणखी आहेत...