आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीची निवड समज व गैरसमज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्तच्या या लेखांमधून    मराठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची    मानसिकता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न.


जूनचा दुसरा आठवडा उजाडला की, महाविद्यालयातल्या बंद खोल्यांचे दरवाजे उघडतात. तृतीय वर्ष कला शाखेच्या वर्गांकडे शिक्षकांची पावलं विशेष ृआस्थेने वळतात. आपल्या विषयाला या वर्षी कोणकोण विद्यार्थी दाखल झालेत, हे कुतूहल घेऊन मीही वर्गात शिरते. प्रथम व द्वितीय वर्षाला आपल्या हाताखालून गेलेल्यातले कोण विद्यार्थी वर्गात आहेत याचा आढावा घेत नवं वर्ष सुरू होतं. मुलांचं स्वागत करतानाच एक प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जातो, ‘मराठी या विषयाची निवड का केलीत?’ गेल्या २२ वर्षांत या उत्तरात बदल होत गेलेले मी पाहिलेत. मी महाविद्यालयात शिकवायला लागले तेव्हा या प्रश्नाला - मराठी विषय आवडतो म्हणून, मराठी शिकवणारे शिक्षक आवडतात म्हणून, वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम आवडतात म्हणून आणि क्वचित भाषा शिकून संपन्न व्हायला होतं म्हणून – अशी उत्तरं मिळायची. ती आजही काही प्रमाणात तशीच आहेत. अर्थात या सगळ्या वरवर छान वाटणाऱ्या उत्तरांमागे एक वास्तव दडलेलं असायचं, जे आताही आहे. ते म्हणजे ‘इंग्रजीची भीती वाटते,’ (इतर विषयांचं माध्यम इंग्रजी असल्यामुळे.) इंग्रजी येत नाही म्हणून मराठी विषय सोपा वाटतो. गेल्या २२ वर्षांत मराठीविषयीचा हा गैरसमज जसाच्या तसा राहिल्याची खंत वाटत राहाते. विषयाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या समज गैरसमजांचा मी गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक आढावा घेत आले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नावली देऊन किंवा मराठी विषय का घेतला याविषयी मनोगत लिहायला सांगून विद्यार्थ्यांच्या समज गैरसमजांचा मी अभ्यास करतेय. भाषादिनाच्या निमित्ताने त्यातली ही काही निरीक्षणं.


इंग्रजीच्या तुलनेत मराठी समजायला सोपी वाटते, कारण ती मातृभाषा असते. त्यामुळे निदान शिक्षक काय बोलतायत ते समजतं. बोललेलं समजतं म्हणून विषय सोपा वाटतो. जे समजलंय ते लिहायला (इंग्रजीत येते तशी) मराठी भाषेची अडचण येत नाही. त्यामुळे पेपर लिहितानाही मराठी सोपा विषय वाटतो. ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांना केवळ या अभिव्यक्ती सौकर्यामुळे मराठी भाषा सोपी वाटते. 


भाषा सोपी वाटणे आणि ती आवडणे - विषयाची वा साहित्याची आवड असणे - या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे विद्यार्थ्यांच्या लक्षातच येत नाही. परिणामी भाषा समजणे म्हणजे मराठी विषय आवडणे, या गैरसमजातच विद्यार्थी वावरत असतात. 


भाषिक क्षमता आणि साहित्यिक क्षमता या दोन भिन्न गोष्टी आहेत, याचं भानच विद्यार्थ्यांना नसतं. बऱ्याच वेळा इतर विषयात मिळालेल्या गुणांपेक्षा मराठीत केवळ भाषा येत असल्याने मिळालेले गुण अधिक असल्याने हा आपल्या आवडीचा विषय आहे, असा अपसमज विद्यार्थ्यांमध्ये रूढ असतो. प्रथम/द्वितीय वर्षाला असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आवडला नाही तरी तृतीय वर्षासाठी मराठी घेण्याकडे त्यांचा कल झुकतो. बऱ्याचदा मराठी शिकवणारे शिक्षक समाजवास्तवाशी विषय जोडून शिकवतात किंवा विषय रुचकर बनवून शिकवतात. मग शिक्षकांच्या प्रेमापोटी विषय निवडला जातो. 


गंमत म्हणजे शिक्षकांचं चांगलं दिसणं, व्यवस्थितपणा, काळजी घेण्याचा स्वभाव हे अभ्यासबाह्य घटकही विषयनिवडीला कारणीभूत ठरतात. (अर्थात, हा मुद्दा इतर विषयांच्या निवडीलाही लागू होतो.) याव्यतिरिक्त कोणत्या विषयाचे शिक्षक सगळ्या नोट्स देतात, यावरही विषयनिवड ठरत असते.


अशा अभ्यासबाह्य तसेच गैरसमजयुक्त घटकांमुळे मराठी या विषयाकडे आलेल्या मुलांना तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम शिकवताना भ्रमनिरास होतो. आणि मराठी विषयासंबंधी अनेकानेक गैरसमजांचे जाळे विणले जायला ही परिस्थिती पोषक ठरते.


मराठी विषयासंदर्भात सर्वस्तरीय अज्ञानातून जशी विषयाची निवड केली जाते, तसेच अशा गैरसमजांमुळे मराठी विषयाची निवड नाकारलीही जाते. तृतीय वर्षासाठी मराठी हा विषय का घेतला नाही, या विषयीही मुलांकडून मनोगतं मागवली. तेव्हा या गैरसमजाचा आवाका किती सर्वदूर पसरला आहे, याची जाणीव झाली.


मराठी विषयासंदर्भातील सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की, मराठीचा पेपर कधीच लिहून पूर्ण होत नाही. म्हणून तृतीय वर्षासाठी हा विषय न घेण्याकडे कल दिसतो. खरं तर मातृभाषा असल्याने जे समजलं ते लिहिता येतं, (त्यात अनावश्यक गोष्टींची खोगीरभरती असतेच,) त्यामुळे (मुद्दे सोडून) जास्त/अतिरिक्त लेखनामुळे मराठी विषयाचा पेपर लिहायला वेळ पुरत नाही. सगळं येत होतं, पण वेळच पुरला नाही, ही एक दंतकथा होऊन बसते.


दुसरा गैरसमज म्हणजे गणितासारखे वा संस्कृतसारखे मराठी विषयाला भरपूर गुण मिळत नाहीत. पण विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की, िवद्यापीठातील सर्वाधिक गुणप्राप्तीचा मान ‘मराठी’ या विषयाकडे अाहे. 


याच जोडीने मराठी विषयात प्रथम वर्ग वा ‘अ’ श्रेणी मिळत नाही, असंही सोयिस्कररीत्या पसरवलं गेलेलं दिसतं. प्रत्यक्षात शिस्तबद्ध अभ्यास आणि लिखाणाचा सराव यांनी मराठीचा पेपर पूर्ण लिहून उत्तम गुण प्राप्त करता येऊ शकतात.


मराठी विषय निवडताना मुलं बिचकण्याचं आणखी एक गैरकारण म्हणजे मराठी विषय घेतला की, खूप वाचावं लागतं, ही भीती. अभ्यासाला असलेल्या मूळ कलाकृती वाचणं अलिकडे मुलांच्या जिवावर येतं. झटपट गुणप्राप्तीच्या जमान्यात अभ्यासक्रमाला लावलेल्या पुस्तकापेक्षा यशाची गुरुकिल्ली देणारी मार्गदर्शक पुस्तकं (गाइड्स - जी खऱ्या अर्थानं दिशाभूल करणारी असतात) अधिक लोकप्रिय आहेत. मराठीतही अलिकडे नव्या श्रेयांकन पद्धतीचा विपरित परिणाम म्हणून अशा पुस्तकांचं पेव फुटलंय. विद्यार्थ्यांना हीच पुस्तकं मोलाची वाटतात. आणि मूळ पुस्तकापासून ते वंचित राहतात. कोणत्याही विषयाचं पदवी पातळीवरचं ज्ञान मिळवण्यासाठी मूळ पुस्तकाबरोबरच संदर्भग्रंथांचं वाचन अनिवार्य असतं. पण रेडिमेड नोट्सच्या जमान्यात इतर विषय बाजी मारून जातात आणि मराठीकडे मुलं पाठ फिरवताना दिसतात. 


व्याकरणाची भीती हाही मराठीच्या निवडीला लगाम घालणारा मुद्दा. शाळेपासून झिरपत आलेली ही भीती तसंच प्रत्येक अशुद्धलेखनाचा अर्धा गुण कापला जातो हा गैरसमज इतका रुजलेला आहे की, विद्यार्थी विषयाबद्दल भीती मनात घेऊन उदासीन होतात. आणखी एक विचित्र गैरसमज मराठीच्या विषयनिवडीला मारक ठरताना दिसतो तो म्हणजे पदवीपरीक्षेसाठी वाणिज्य शाखा किंवा कला शाखेच्या काही विषयांना बाजारात जसे क्लासेस उपलब्ध आहेत तसे मराठीचे शिकवणी वर्ग नसणे. हे वर्ग नाहीत मग अभ्यास कसा करणार, असा प्रश्न मुलांना पडतो. आणि मग हा विषय नको असा निर्णय विद्यार्थी घेतात. पदवीसाठी मराठी विषय न निवडण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ठरलेला गैरसमज म्हणजे इतर विषयांसारखी ‘मराठीला प्रतिष्ठा नाही.’ तृतीय वर्षाला इतर विषय घेतलेली मुलं (आणि त्यांचे शिक्षकसुद्धा) हिरिरीने स्वत:च्या प्रतिष्ठितपणाविषयी इतकी जाहिरात करतात की, मराठी विषय घेतलेल्याने जणू काही तुमची प्रतिष्ठा धुळीलाच मिळते, असा अपसमजच रूढ होत गेलेला दिसतो. बऱ्याचदा इंग्रजी येत नाही म्हणून मराठी विषयाकडे वळलेले विद्यार्थी या न्यूनगंडाने पछाडलेले दिसतात. विज्ञान किवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी ‘हुशार’ म्हणून ज्या आत्मविश्वासाने वावरतात आणि तथाकथित प्रतिष्ठित गटाचा अभिमान बाळगतात, तसे कला शाखेचे विद्यार्थी कमी गुणांमुळे इतर कुठे प्रवेश न मिळाल्यामुळे कला शाखेत प्रवेश घेतात. पर्यायाने बऱ्याचदा ते न्यूनगंडाने पछाडलेले राहतात. स्वाभाविकच आत्मविश्वासाचा आणि विषयाप्रतीच्या अभिमानाचा अभाव त्यांच्यात प्राधान्याने दिसून येतो. परिणामी अप्रतिष्ठित असा शिक्का मराठीच्या नावे मारला जातो.


सर्वसाधारणपणे पदवीसाठी निवडलेला विषय आणि पदवी प्राप्तीनंतर उपलब्ध अर्थार्जनाच्या शक्यता याचं गणित समाजात मांडलं जातं. जे विषय झटपट नोकरी देऊ शकतात त्या विषयांची निवड करण्याकडे विद्यार्थांचा कल असतो. मराठी विषय आवडणारी मुलंही बऱ्याचदा विषय आवडतो पण या विषयाला काही स्कोप नाही, म्हणून दुसरा विषय घेतला, अशी सरसकट विधानं करतात. मराठी विषयासंदर्भातला सद्य समाजातला हा सर्वात मोठा गैसरसमज म्हणता येईल. वास्तविक पाहता आजघडीला कोणत्याही विषयाची पदवी घ्या आणि नोकरीला लागा अशी स्थिती नाहीच. नोकरीव्यतिरिक्त अधिक प्रशिक्षण, विशेष योग्यता यांची गरज असतेच.


मराठीबाबत तर अज्ञानातून गैरसमजांचा डोंगरच उभा असलेला दिसतो. मराठी विषयाच्या पदवीधराला जगात कोणतीच नोकरी मिळत नाही असा गैरसमज दृढ आहे. हा विषय घेऊन फारतर शाळामास्तर होता येतं यापलिकडे लोकांच्या ज्ञानाची झेप जातच नाही. या संदर्भातल्या वास्तवाकडे डोळे उघडे ठेवून पाहायला मराठी विषय घेतलेले विद्यार्थीही मानसिकरीत्या तयार नाहीत असं दिसतं. हे मराठी भाषेचं दुर्देव. वास्तविक अगदी टायपिंग, डीटीपी, पेजमेकिंग यासारख्या कामाच्या इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत मिळणाऱ्या मोबदल्यातला फरक खूप बोलका आहे. इंग्रजीसाठी पैशाला पासरी टंकलेखक आज उपलब्ध आहेत. मराठी टंकलेखन वा संगणकावरील टंकलेखन करणारे टंकलेखक संख्येनं अतिशय कमी असल्यानं मराठी टंकलेखकासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. घरबसल्या करता येणारा हा उद्योग खूप पैसे कमावून देऊ शकतो, या सत्याकडे तरुणाईचं दुर्लक्ष झालेलं दिसतं. टायपिंगपासून सुरू झालेला हा प्रवास द्रष्टेपणानं केल्यास स्वत:च्या प्रकाशन संस्थेपर्यंत विस्तारता येतो. आधुनिक काळाच्या गरजा ओळखून भाषेच्या ज्ञानासोबत संगणकीय प्रशिक्षण घेतल्यास प्रसारमाध्यमांसाठी मराठीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. आकाशवाणी ते दूरदर्शनवरील विविध वाहिन्यांवर व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. निवेदक, वृत्तनिवेदक, कार्यक्रम सूत्रसंचालक, असे व्यवसाय अस्पर्श आहेत. त्यामुळे संधी लगेच उपलब्ध आहेत. प्रतिष्ठा आणि पैसा प्राप्त करून देणाऱ्या चाकोरीबाहेरच्या विविध संधींचा तरुणाईनं सकारात्मक विचार केल्यास मराठी भाषा पैसा आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टीं प्राप्त करून देऊन दिमाखात मिरवू लागेल हे सत्य आहे.


- डॉ. स्नेहा देऊसकर, मुंबई
sneha.deuskar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...