Home | Magazine | Madhurima | Dr Swati Ganoo writes about human nature

स्‍वभावाला औषध असतं...

डॉ. स्वाती गानू, पुणे | Update - Jun 05, 2018, 01:19 AM IST

किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या, त्यांना पूरक ठरणाऱ्या जीवनकौशल्यांची माहिती लेखिकेनं या आधीच्या सदरातून आपल्याला दि

 • Dr Swati Ganoo writes about human nature

  किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या, त्यांना पूरक ठरणाऱ्या जीवनकौशल्यांची माहिती लेखिकेनं या आधीच्या सदरातून आपल्याला दिली. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारं त्याच लेखिकेचं हे नवं सदर या अंकापासून...

  माणसाचे आयुष्य खरेच मजेदार आहे. घरात, समारंभात, ऑफिसमध्ये समाजिक जागी आपला सतत विविध प्रकारच्या माणसांशी संबंध येत असतो. कधीकधी असे काही विचित्र प्रसंग घडतात की अगदी नकळत आपल्या तोंडून शब्द निघून जातात की, ‘काय नमुना भेटला आज मला.’ एक माणूस दुसऱ्या माणसासारखा थोडीच असतो? प्रत्येक जण वेगळाच. आपणही अशा माणसांना भेटल्यानंतर त्यांचं वेगवेगळ्या स्वभाव प्रकारात वर्गीकरण करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भिडस्त, संकोची, आक्रमक, ढोंगी, तटस्थ, अगदी किती अजब, विक्षिप्त आहे हा माणूस असा शिक्का मारतो. अशा विविधरंगी स्वभावांना माहीत करून घेणं आणि त्यांच्याबरोबरच अशा स्वभावाच्या माणसांशी कसं वागावं हे जाणून घेणं खूप आवश्यक आणि मनोरंजक ठरतं.

  घरात कधीकधी अशी पंचाईत होऊन बसते की आपण अशा माणसांच्या रोज समोरासमोर येतो. त्यांच्याशी बोलावं लागतं आणि ते मात्र वयानं मोठे असून प्रगल्भपणे न वागता हट्टीपणानं वागतात. आता या माणसांच्या अशा स्वभावाचं करायचं तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो. काहीजण पुढेपुढे करून प्रत्येक गोष्ट मीच कशी केली असं मोठेपण मिरवणारे असतात. काही जण दुसऱ्यांना जबरदस्तीनं हे कबूल करायला लावतात की त्यांच्याशिवाय काम होऊच शकत नाही. माणसं अशीही असतात की काहीही घडो शांत बसून राहतात. वाद-विवाद होवो की संवाद तटस्थपणे, ठेविले अनंते तैसेचि रहावे, असा त्यांचा स्वभाव असतो. तर काहीजण चटकन अस्वस्थ, बेचैन होतात. कधी एकदा सांगितलेली गोष्ट पूर्ण होते असा उतावळा स्वभावसुद्धा दिसून येतो.

  काही माणसे अशी असतात की जे साऱ्या गोष्टी इतक्या मोकळेपणाने बोलतात की कधीकधी यांना कसं आवरावं तेच कळत नाही. इतके बहिर्मुख स्वभावाचे ते असतात. तर काहींच्या मनात काय चाललंय यांचा पत्ताच लागत नाही असे अंतर्मुख स्वभावाचे लोकही आपल्या संपर्कात येतात. पटकन काहीही विचार न करता प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींनाही कधीकधी सांभाळावे लागते. याउलट प्रत्येक गोष्टीचा शांतपणे आणि तर्कसंगत विचार करणारे लोक असले तर काम करणं सोप जातं. काही अतिकडक तर काही असंतुष्ट मग अर्थातच परिस्थितीवर नाही, तर दुसऱ्यावर खापर फोडलं की अपयशाला आपण जबाबदार नाही असं म्हणायला अशा व्यक्ती तयार असतात. असंही काही असतात जे सतत सावध असतात. अतिविचार करतात. विश्लेषण करत बसतात. कधी सतत गंभीर भुमिका घेणारे तर कधी विनोदाने, हलकंफुलकं वागणाऱ्या स्वभावाची माणसंही असतात जी लोकांना हवीहवीशी वाटतात.

  अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आयुष्यात भेटतात. पण शेवटी ज्या व्यक्तिमत्त्वामुळे हे स्वभाव बनतात ते प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे माणूस बाहेरून दिसतो ते बाह्य रूपच फक्त नसतं. तर आपली वागण्याची पद्धत, विचारांमधला वेगळेपणा, आपली भावनिक परिपक्वता हे सारं एकत्र आलं की आपलं व्यक्तिमत्त्व तयार होतं. नेचर आणि नर्चर म्हणजेच आनुवंशिकता आणि संगोपन या दोन्ही गोष्टीतून माणसाचं व्यक्तिमत्त्व आणि त्यातूनच तयार होणारा स्वभाव आपल्यासमोर येत असतो. आपल्या सहवासात येणारी माणसं तऱ्हेतऱ्हेची असतात आणि त्यांना निभावणं, त्यांच्याशी डील करणं टाळता येत नाही अशा मजेदार, त्रासदायक, आश्चर्यकारक, वाटणाऱ्या स्वभाव नमुन्यांची ओळख करून त्यांच्याशी कसं वागावं हे माहित करून घेतलं तर जगणं सोपं होऊ शकतं. सगळ्यांशी अगदी गोड बोलणाऱ्या पण मनात द्वेषभाव असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह अर्थात तटस्थ आक्रमक स्वभावाच्या माणसांचा नमुना असतो. आपण अगदी योग्य वागतो असं ते दाखवतात. प्रत्यक्षात तटस्थ राहून, शांत बसल्याचा आविर्भाव करतात. मनात मात्र दुसऱ्याची प्रगती पाहून जळफळाट होत असतो अशा माणसाचा. मुद्दामच एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची ते सारखी गळ घालतात. आपल्याला वाटतं किती छान गोड स्वभाव, पण ती असते मीठी छुरी. मग अशा माणसांशी वागावं तरी कसं तर त्यांच्याशी वागतांना अति प्रतिक्रिया देऊ नये. वैयक्तिक मत न मांडता, गैरसमज न करून घेता वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा म्हणजे लगेच त्या व्यक्तीबाबत शिक्के मारायचे नाहीत. आक्रमक व्यक्ती काय करतील काय बोलतील याचा थोडा अंदाज असतो. पण तटस्थ, आक्रमक व्यक्तीच्या मनातलं ओळखणं सोपं नसतं. म्हणून वेळ काळ पाहून युक्तीनं वागायचं. मुख्य म्हणजे त्यांच्या वागण्याबद्दल लेक्चर देऊन प्रश्न सुटत नाहीत. ते प्रगल्भ किंवा स्वजाणिवेत आल्याशिवाय नुसतं वाद घालून ते बदलतील अशी अपेक्षा चुकीचीच असते. त्यांना बदलण्यापेक्षा त्यांच्याशी वागताना स्वत:ला सांभाळायच.

  समोरचा जसा वागतो तसं मी वागायचं नाही उलट हसून विनोदी बोलून, मार्मिकपणे असं प्रसंग, व्यक्ती हाताळायच्या हीच खरी तटस्थ आक्रमक माणसांशी वागण्याची युक्ती आहे. कारण विनोदी, हसून बोलण्याने प्रसंगातला तणाव बराच कमी होतो. जेव्हा खूपच गंभीर परिस्थिती येते तेव्हा मात्र त्या प्रसंगाला सक्रियपणे सामोरं जाण्यासाठी तुम्हाला ताबडतोब आपल्या उत्तम संभाषणाचा उपयोग करायचा असतो. याहीपेक्षा लेखी बोलणं किंवा तुम्ही दोघं बोलतांना तिसरा माणूस साक्षीदार असलेला चांगला. अशा स्वभावाच्या व्यक्तींची हो ओरड असते की आमचं कुणी ऐकून घेत नाही. मग अशा माणसांना प्रॉब्लेम, प्रोजेक्टमध्ये मत मांडू द्यावं. ऐकून घ्यावं. बव्हंशी ते अडचणी, कुरकुरच सांगतात. कमी प्रतीकार आणि जास्त सहकार्य मिळे अशी योजना केली तरच हुशारीने आपण या माणसाबरोबर राहू शकतो किंवा काम करू शकतो. म्हणतात ना, स्वभाव नसतो कधीच सरळ, उभे असते बाजूला शांत वादळ’, अशी वादळं पेलणं जमायलाच हवं कारण त्यामुळेच मानवी स्वभावाची गुंतागुंत सोडवता येईल.

  ganooswati@gmail.com

Trending