आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तटस्थ भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही किती तटस्थ राहता हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीवरही अवलंबून असतं. तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या जगात तुमचं स्थान काय असावं याची तुमची समज, सशक्तीकरण आणि अधिकार याबद्दलच्या  भावना आणि विशिष्ट गोष्टींना सामोरं जाया बाबतीत तुम्ही काय विचार करता, कशी कृती करता यावर तटस्थ व्यक्तिमत्त्वाचं प्रमाण दिसून येतं.
 
निर्मलाबाई अरूपाला म्हणाल्या की, उरलेलं अन्न काढून ठेवलंस, पण भांड्याला किती भाजी लागलीय. भाताचं भांडं बघ. अर्धं अन्न तसंच आहे. हेच शिकवलं तुझ्या आईनं? 
त्यांचं बोलणं ऐकून अरूपाला अपमानानं रडू आलं. ते पाहून निर्मलाबाईंना आणखी चेव आला. रडायचं नाटक करू नकोस. माफी माग आणि म्हण, पुन्हा अशी चूक होणार नाही. त्याचं ते बोलणं ऐकून अरूपा हबकलीच. नुकतंच लग्न झालेल्या अरूपानं मदतीसाठी संकेतकडे बघितलं. तिथेच पेपर वाचत बसलेला संकेत सगळं ऐकत होता. मात्र, कुठलीही प्रतिक्रिया न देता तो बाहेर निघून गेला. अरूपाला त्याचं हे त्रयस्थ वागणं खूपच खटकलं. रात्री जेव्हा विषय निघाला तेव्हा तो अरूपाला म्हणाला, कदाचित मी म्हणतो ते चुकीचं असेल, पण तू एेकून घे. आईचंही बरोबर आहे आणि तुझंही. पण काय करणार, आपलं नशीबच असं आहे हे मानायचं आणि सहन करायचं.
 
संकेत हा तटस्थ व्यक्तिमत्त्वाचा नमुना आहे. आपल्या अवतीभवती जे घडतंय, बोललं जातंय, ते त्यांना ऐकू येतं, कळतं पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया ही तटस्थ माणसं देत नाहीत. निष्काम व्यक्तिमत्त्वाची माणसे एकांगी विचार करणारी आणि तसंच वागणारी असतात. एक प्रकारे ती यांत्रिकपणे, भावना गोठल्यासारखीच वागतात. काही करावं, काही भूमिका घ्यावी, यासाठीचा उत्साह ना त्यांच्या मनात असतो ना त्यांच्या कृतीत दिसतो. जसं वरच्या प्रसंगात संकेत वागला तसं त्यांचं वागणं इतरांना गोंधळात टाकणारं असतं. कधी कधी तर समोरच्याला राग आणणारंही असतं. कितीही टोकाची परिस्थिती आली, कठीण प्रसंग आला तरी ते तटस्थ राहतात. निर्णय देत नाहीत.
 
तुम्ही किती तटस्थ राहता हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीवरही अवलंबून असतं. तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्या जगात तुमचं स्थान काय असावं याची तुमची समज, सशक्तीकरण आणि अधिकार याबद्दलच्या तुमच्या भावना आणि अर्थातच येणाऱ्या परिस्थितीतल्या विशिष्ट गोष्टींना सामोरं जाणं या बाबतीत तुम्ही काय विचार करता, कशी कृती करता यावर तटस्थ व्यक्तिमत्त्वाचं प्रमाण दिसून येतं. मात्र काही लोक केवळ सुरक्षित राहायचं म्हणून तटस्थ राहतात. काही प्रसंगांत तटस्थ भूमिका उपयोगी ठरतेही, वातावरणही निरोगी राहतं पण तटस्थ व्यक्तिमत्त्व तयार होण्याची प्रक्रिया अशा तटस्थ राहण्याच्या सवयीमधून घडत जाते. घरी, कार्यालयात, उद्योगधंद्याच्या ठिकाणी, कधी नातेवाइकांत, मित्रमंडळींत अशी तटस्थ व्यक्तिमत्त्वाची माणसे आढळतात. आपण मनाशी म्हणतोसुद्धा, काय माणूस आहे हा, काहीही होवो याला फरकच पडत नाही.
 
तटस्थ वागणारी माणसं असतात तरी कशी? तर ती आपल्या आयुष्याला, भविष्याला नशिबावर सोडून मोकळी होतात. ‘वाईट गोष्टी नेहमी माझ्याच बाबतीत घडतात,’ ‘झालंय खरं असं,’ एवढंच ते म्हणतात. माझं नशीबच फुटकं हे त्यांचं ठरलेलं वाक्य. कारण त्यांना स्वत:ला काहीच प्रयत्न करायचे नसतात. अतिनम्रता, परवानग्या घेणं, मी काही एक्सपर्ट नाही अशी बोलण्याची सुरुवात यामुळे अशा व्यक्तींचं बोलणं फारसं कोणी मान्य करायला तयार होत नाही. त्यांच्यासमोर मत मांडलं गेलं तर, दोन्हीही मतं योग्यच आहेत, असं ते म्हणतात. मग त्यांच्या अशा बोलण्यातून त्यांच्या मनातली भीती, निर्णय घेण्याची अक्षमता, स्पष्ट बोलण्यातली असमर्थता लक्षात येते. त्यांच्या बाबतीत असंही आढळून येतं की, ते शक्यतो स्वत:चं असं स्पष्ट मत मांडत नाहीत. हंऽऽ, अच्छा, इतकंच ते म्हणतात. कोणाला विरोध करणं त्यांना जमत नाही. दुसऱ्यांना नाही म्हणणं त्यांना पटत नाही.
 
आपली गरज, आपली कामं बाजूला ठेवून ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात. इतकंच नाही, तर त्याला-तिला काय वाटेल हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यांची देहबोलीसुद्धा पराभूत असते. बोलणं तुटक असतं, काही जण आपली प्रतिमा चांगली राहावी, सर्व लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्याबद्दलचं मत छान राहावं म्हणूनही तटस्थ भूमिका स्वीकारतात. दुसऱ्या बाजूला असंही म्हणता येईल की, त्यांना स्वत:चं मूल्य, स्वत:तील गुणवत्ता ओळखता येत नाही. त्यामुळे ते एकट्यानं कुठलंही आव्हान स्वीकारायला तयार होत नाहीत. शांत राहतात. आवाज चढवून बोलत नाहीत. नजरेला नजर भिडवत नाहीत. आपलं काम फार लक्ष देऊन करतात जेणेकरून नंतर वादाला तोंड द्यावं लागू नये.
 
अशा माणसांचं तटस्थ वागणं किंवा सगळ्या गोष्टींना होय म्हणत राहणं हे खरंच खूप त्रासदायक असतं. त्यांना सांभाळणं, त्यांच्याबरोबर राहाणं, काम करणं म्हणजे सहन करणं असतं. बऱ्याच वेळा हा निरुपद्रवी प्राणी आहे किंवा त्याचा काही त्रास नाही असं म्हणून सोडून दिलं जातं. पण अशा व्यक्तींना गरज असते ती आत्मविश्वास आणि स्वप्रतिष्ठेची जाणीव करून देण्याची. तो वाढवण्याची. आपण त्यांच्या बरोबर असण्याची. कारण त्यांना नावं ठेवून किंवा दुर्लक्ष करून प्रश्न सुटत नाहीत. त्यांचं संवादकौशल्य सुधारण्याला त्यांना मदत करता येईल. छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देणं, माफक कौतुक करणं तसंच कोणी आपली प्रशंसा केली तर त्याला योग्य प्रतिसाद दिला तर आपली प्रतिमा उंचावते याची जाणीवही देता येईल. 
 
एक उदाहरण समीरचं. समीर आहे इंग्रजी माध्यमात शिकलेला तरुण. आपल्या कामात सर्वस्व ओतणारा. खूपच कष्टाळू. मात्र बॉससमोर, बायकोसमोर आपल्या भावना, आपली मतं, आवडीनिवडी, विचार मांडू शकत नाही. व्यक्त होणं त्याला जमत नाही. काही वेळेला कार्यालय आणि घरातही त्याचं शोषण होतं, मात्र तो शांत राहतो. मनातून त्रास होत असतो. ही तटस्थ व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू आहे. अशा व्यक्तीला त्याच्या स्वत्वाशी परिचय करून द्यायला हवा. त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांच्या बळावर ते उत्तम काम करतात पण ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याची त्यांना संधी द्यायला हवी. शिवाय तटस्थ राहून किंवा आपल्याला जे आवडतं, पटतं, वाटतं किंवा आवडत नाही ते बोलण्यासाठी त्यांना तयार करायला हवं. निष्क्रीय राहून, काही न करून फक्त तटथ राहणं म्हणजे प्रतिक्रिया देणं नाही तर स्वत:हून एखाद्या कामाची जबाबदारी घेणं महत्त्वाचं असतं, हे त्यांच्याकडून करवून घ्यायला हवं. ‘मी कदाचित चुकीचा असेन,’ असं स्वत:विषयी सतत म्हणत राहिल्यानं तटस्थ व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना बाकीचे कधीही बरोबर मानत नाहीत. ही फार महत्त्वाची बाब लक्षात आणून द्यायला हवी.
 
स्वभाव म्हणजे माणसाची प्रकृती. अर्थातच नैसर्गिक वृत्ती. तर विभाव म्हणजे मनात भाव प्रकट होण्यास ठरणारे कारण. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे व्यक्तिमत्त्व असतं. हे लक्षात घेऊन विविध व्यक्तिमत्त्वांचे प्रकार आढळतात. आणि अशा वेगवेगळ्या व्यक्तिविशेषांसाेबत राहताना स्पर्धा संपली की व्यक्तिमत्त्व बहरून येतं, हे लक्षात ठेवायला हवं. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजेच नैसर्गिकरीत्या असणारे स्वभाव असतात. अशा विविधरंगी व्यक्तिमत्त्वांमुळे जगण्यातही मौज आहे. अन्यथा जगणं एकसुरी झालं असतं. फक्त अशा व्यक्तींना हाताळताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील स्वभाववैशिष्ट्यांशी परिचय करून घेतला तर काम करणं सोपं जातं. कारण संकोची, अतिसंवेदनशील, पडती बाजू घेणाऱ्या, अतिविश्वास ठेवणाऱ्या, स्वजाणिवेची कमतरता असणाऱ्या या भिडस्त व्यक्तिमत्त्वाला विश्वासाची साथ खूप आवश्यक असते.
 
डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...