आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घडणं’ सुरू राहावं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षीच्या तुलनेत हे शैक्षणिक वर्ष थोडं अधिक समाधान देणारं ठरलं. अर्थातच त्याला कारणीभूत आहेत आमचे विद्यार्थी. पहिलं सत्र तर अगदी सुखात गेलं. ऐच्छिक मराठीच्या वर्गात २५ ते ३० विद्यार्थी नियमित उपस्थित राहतात. साहित्याबद्दल आपण भरभरून बोललेलं अगदी मन लावून ऐकतात. यासारखं प्राध्यापकाला दुसरं सुख ते कोणतं? मराठी कवितांची पार्श्वभूमी, साहित्याचा इतिहास आणि प्रत्यक्ष कवितेचं विवेचन यामध्ये मुलं रमून जातात. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर शिकवण्यासाठी केला तर विद्यार्थ्यांना तो अधिक भावतो. संबंधित गद्य-पद्याच्या अनुषंगाने दाखवलेल्या व्हिडिओमुळे आपण काही वेगळ्या पद्धतीने शिकतो आहोत याचा त्यांना आनंद मिळतो. ज्या विद्यार्थ्यांचं वाचन चांगलं असतं ते चर्चेतही व्यवस्थित सहभागी होतात. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा तर एक छान गट तयार झाला आहे. हे विद्यार्थी शहरातल्या व्याख्यानांनाही आवर्जून हजेरी लावतात. मराठवाडा साहित्य परिषदेतल्या कार्यक्रमांना जातात. शिवाय काही विद्यार्थ्यांच्या आकाशवाणीवरून मुलाखतीही प्रसारित झाल्या आहेत त्यामुळे त्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहामुळेच सरस्वती भुवन कला-वाणिज्य महाविद्यालयानं त्यांना बडोद्यात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाठवले होते. या संमेलनाबाबतच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. त्यांचा उत्साह पाहिला. त्यांची वाचनाबाबतची ओढही या निमित्तानं अनुभवता आली. त्यांच्या या संदर्भातल्या चर्चा ऐकून साहित्याच्या अभ्यासाला पुन्हा एकदा बरे दिवस येतील असा विश्वास वाटतो आहे. भालचंद्र नेमाडे यांचा एक पाठ नुकताच वर्गात विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या शिकवून त्याची झलक दिली आहे. असे विद्यार्थी मिळाले की शिक्षक आणि विद्यार्थी यांंचं ‘घडणं’ सुरू राहतं, ते घडत राहावं.


-   डॉ. वृंदा देशपांडे, औरंगाबाद
vrundavdeshpande@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...