Home | Magazine | Madhurima | Heramb Kulkarni writes about his books

काही प्रश्‍न, खूपशी उत्‍तरं

हेरंब कुलकर्णी | Update - Jun 05, 2018, 01:45 AM IST

‘माझी शिक्षण परिक्रमा’ (राजहंस प्रकाशन) आणि ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ (मनोविकास प्रकाशन) ही दोन्ही पुस्तके नुकतीच प्रसि

 • Heramb Kulkarni writes about his books
  ‘माझी शिक्षण परिक्रमा’ (राजहंस प्रकाशन) आणि ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ (मनोविकास प्रकाशन) ही दोन्ही पुस्तके नुकतीच प्रसिद्ध झाली. यात लेखकाने शिक्षणक्षेत्रात १२ वर्षे घेतलेले विविध अनुभव ललित शैलीत मांडले आहेत. ते मांडताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, सोबत त्या प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही केला आहे. या दोन्ही पुस्तकांमागील भूमिका स्पष्ट करणारा हा लेख...


  शिक्षणातील विविधरंगी अनुभवांना आणि ते घेण्यासाठी केलेल्या भटकंतीला मी ‘परिक्रमा’ म्हटले आहे. मला ही भटकंती नर्मदा परिक्रमेसारखी वाटते. नर्मदेची परिक्रमा करताना भाविक नर्मदेला काही देत नाही, तर नर्मदाच भाविकाला समृद्ध करते. १२ वर्षाच्या या भटकंतीत शिक्षणक्षेत्रात मी काहीच योगदान दिले नाही, तर शिक्षणानेच मला समृद्ध केले आहे. नर्मदेसारखाच शिक्षणाचा प्रवाह शतकानुशतके वाहतो आहे. त्या अर्थाने दोन्हीत खूप साम्य आहे. नर्मदेच्या काठाने फिरताना महानगरे लागतात. आणि अगदी छोटा आदिवासी पाडाही लागतो. सुंदर वाटा लागतात, आणि डोंगर-दऱ्याही लागतात. शिक्षण परिक्रमा करतानाही मला शिक्षणाचे वेगवेगळे स्तर बघता आले. दिल्लीच्या केंद्रीय नियोजन आयोगापासून आदिवासी पाड्यापर्यंत, मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत, शिक्षणमंत्र्यापासून गावच्या सरपंचापर्यंत, इंटरनॅशनल स्कूलपासून आश्रमशाळेपर्यंत शिक्षणाची विविध रूपे पाहता आली. शिक्षणातला ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अनुभवता आला.

  जेव्हा पहिल्यांदा गडचिरोली, मेळघाट, यवतमाळ, नंदुरबार, चंद्रपूर अशा जिल्ह्यांतील अतिदुर्गम २०० शाळा बघण्याची संधी मिळाली, तेव्हा शिक्षणातल्या गुणवत्तेच्या आणि विदारक वास्तवाच्या दर्शनाने मी हादरून गेलो. चौथीतल्या मुलांना साधे साधे शब्द लिहिता येत नाहीत. त्यांना साध्या साध्या वजाबाकी येत नाहीत. हे सुरुवातीला अविश्वसनीय वाटत होते, पण सत्य होते. ५११ वजा ४९९ ही वजाबाकी पूर्ण, बरोबर सोडविणारा एकही वर्ग आढळला नाही. त्यावर मी एक अहवाल ‘शाळा आहे शिक्षण नाही’ या नावाने प्रसिद्ध केला, तर शिक्षक संघटनांनी त्याची होळी केली. प्रचंड विरोध झाला. पण त्यातून मी गुणवत्तेच्या प्रश्नाशी जोडला गेलो. ग्रामीण शिक्षणाविषयी आस्था नसलेले सर्वपक्षीय राजकारणी, हवेत विचार करणारे मंत्रालय, भ्रष्ट अधिकारी, प्रेरणा न देणारी पर्यवेक्षीय यंत्रणा, निद्रिस्त असणारे पालक आणि हे काहीच न समजणारी शिक्षणव्यवस्थेची लाभार्थी असणारी निष्पाप मुले, हे बघता शिक्षण सुधारणा ही एक पराभवाची लढाई आहे, असेच मला वाटू लागले. या हरलेल्या वा हरत चाललेल्या लढाईची ही बखर आहे.

  शिक्षणावर लेखन करणेे मला महत्त्वाचे वाटायला लागले कारण आदिवासी, ग्रामीण शिक्षणाचे प्रश्नच आज निर्णय घेणाऱ्या यंत्रणेपर्यंत पोहोचत नाहीत. शहरी भागातील साहित्यिक, पत्रकार, विचारी वर्ग यांना हे वास्तव अपरिचित असते. त्यामुळे हे वास्तव सतत लिहिले जायला हवे, या भूमिकेतून या वास्तवावर मी लिहित राहिलो. शिक्षण परिक्रमा लिहिण्यातून हे प्रश्न पुढे यायला नक्कीच मदत होईल. एखाद्या प्रश्नावर साहित्य निर्माण होणे ही त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक महत्त्वाची पूर्वअट असते. ते साहित्य निर्माण होण्यासाठी सतत लिहित राहावे, ही लेखनामागची मोठी प्रेरणा असते.
  त्यामुळे ‘माझी शिक्षण परिक्रमा’ या पुस्तकात मी शिक्षणातल्या तळातले वास्तव खूप तपशिलाने मांडले आहेत. प्रत्यक्ष ग्रामीण, आदिवासी भागातले अनेक अविश्वसनीय अनुभव दिले आहेत. मुलांची लेखन वाचन क्षमता, शिक्षक कसे शिकवतात, त्यांचे विषयज्ञान, आदिवासी भागातील प्रश्न, लोकप्रतिनिधी, या संदर्भातील अनुभव तपशिलात मांडले आहेत. शिक्षणाच्या प्रवाहातून दूर राहिलेल्या मुलांचे प्रश्न, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर यांच्या मुलांच्या शिक्षणाची वेदना, बालकामगार हा सारा तपशील विचारी वाचकांसमोर आणला आहे. या मुलांचे प्रश्न परिचित होत नाहीत, उत्तरे तर खूप दूर आहेत.

  या १२ वर्षांत काम करताना अनेक शिक्षणमंत्री पाहिले, मंत्रालय आणि अगदी जिल्हा, तालुक्याचे शिक्षण अधिकारी पाहिले. प्रशासन नावाचा डोलारा कसे काम करतो आणि त्यात भ्रष्टाचार किती हुशारीने केला जातो. याचे अनेक प्रसंग या पुस्तकात लिहिलेत. हेतू हा की, शिक्षण हे अत्यंत पवित्र क्षेत्र असल्याचा गैरसमज दूर व्हावा! हे निराशाजनक वास्तव मांडताना जी आशेची बेटं बघितली, त्याचीही परिक्रमा केली. त्यात दुर्गम भागात काम करणाऱ्या अनेक शिक्षकांच्या कामावर लिहिलंय. महाराष्ट्रातील आणि बाहेरच्या संस्था आणि शाळा यांच्या कामाविषयी लिहिले आहे. काळ्या ढगाची ‘रुपेरी किनार’ हेतुपूर्वक या पुस्तकात नोंदवली आहे, कारण शेवटी प्रश्न सोडवायला, या बेटांचाच गुणाकार करावा लागणार आहे. आजच्या समकालीन शिक्षणाचा काढलेला हा फोटो म्हणजे ‘माझी शिक्षण परिक्रमा’ आहे.

  साने गुरुजींचा आदर्श : ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ हे पुस्तक मी का लिहिले? आज ज्या शिक्षकांचे नंबर मेडिकल इंजिनरिंगला लागू शकले असते, असे शिक्षक उमेदवार प्राथमिक शिक्षक ते प्राध्यापक बनले आहेत. पण तरीही लिहितावाचता न येणाऱ्या मुलामुलींची संख्या वाढते आहे. याउलट मागच्या पिढीत शिक्षक अतिशय कमी शिकलेले होते, पण कुटुंबासाठी गैरसोयी झेलत ते खेड्यांत राहात. मुलांना जीव ओतून शिकवत. ती तळमळ ही आजच्या या ‘हुशार शिक्षकां’मध्ये कशी संक्रमित करायची, याचे उत्तर शोधायला गुरुजींकडे जावे लागेल. शिक्षक जितका स्वप्नाळू आणि भावुक तितका तो अधिक चांगला शिक्षक होण्याची शक्यता जास्त हे लक्षात येत गेले. इथे बुद्धिमत्तेपेक्षाही मुलांविषयी कणव वाटणे, सर्वोच्च महत्त्वाचे आहे, हे समजल्यावर साने गुरुजी हीच लस पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला द्यावी लागेल, याची खात्री पटते.

  शेवटी व्यवस्थेचा आकार बदलायचा की, त्या व्यवस्थेतील माणसे बदलायची यावर चर्चा करायला हवी. व्यवस्था बदलण्यातल्या मर्यादा स्पष्ट आहेत. तेव्हा त्यासाठी लढाई करताना व्यक्ती बदलण्याची प्रक्रिया ही सुरू ठेवावी लागेल. त्यासाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारे साने गुरुजींसारखे जगणे शिक्षकांना परिचित करून द्यावे लागेल. साने गुरुजींचे वैशिष्ट्य आणि लोकप्रियतेचे लक्षण हे आहे की, ते आपल्यासारखे साधे माणूस वाटतात. त्यांचा साधेपणा खूप जवळचा वाटतो. त्यांनी जे काही शिक्षक म्हणून केले ते कुणीही शिक्षक अमलात आणू शकतो. यामुळेच गुरुजींवर एक लेखक म्हणून लिहिणे मला आवश्यक वाटले. असंवेदनशीलता वाढत चाललेल्या समाजात पुन्हा प्रेम हाच जगण्याचा आधार बनवावा लागेल.यासाठी मला साने गुरुजी हेच उत्तर वाटल्याने हा गुरुजींवर लिहावेसे वाटले.

  पुस्तकात सुरुवातीला पहिल्या भागात साने गुरुजींनी शिक्षक म्हणून कसे काम केले, गुरुजी कसे शिकवायचे, वसतिगृहातील मुलांवर त्यांनी कसे प्रेम केले, त्यांची विद्यार्थी म्हणून जडणघडण, वाचन, अमळनेरचे दिवस याची तपशीलवार माहिती आहे. त्याचबरोबर गुरुजी विद्यार्थी म्हणून कसे होते, साहित्यिक म्हणून त्यांचे योगदान काय होते, त्यांची आंतरभारतीची कल्पना काय होती, अशी मांडणी आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आज शिक्षक म्हणून मी गुरुजींच्या प्रेरणेने काय करू शकतो, असे शिक्षकांसाठी नेमकेपणाने मुद्दे दिले आहेत. त्यात शिक्षकांच्या रोजच्या कामात गुरुजींचा दृष्टिकोन कसा आणता येईल, शिक्षकांनी लेखन करणे, गोष्टी सांगणे, वंचित मुलांची जाणीव, शिक्षकांचा सामाजिक सहभाग असेही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. या दोन्ही पुस्तक लेखनामागचा उद्देश नव्या संवेदनशील समाजाची निर्मिती हाच आहे, आणि त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणे, काही प्रश्नांची उत्तरे देणे, अपरिहार्य आहे.

  पुस्तकांची नावे
  - ‘माझी शिक्षण परिक्रमा’ (राजहंस प्रकाशन) किंमत-२२५
  - ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ (मनोविकास प्रकाशन) किंमत-१६० रुपये.

  herambkulkarni1971@gmail.com

Trending