Home | Magazine | Madhurima | Hiral Gawande writes about cane houses by Nirmala and Sunil Deshpande

बांबूच्‍या घरात राहायला हवे

हिरल गावंडे, अकोला | Update - Jun 05, 2018, 12:45 AM IST

मेळघाटातल्या लवादा येथे १९९६मध्ये पहिलं बांबूचं घर सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी बांधलं.

 • Hiral Gawande writes about cane houses by Nirmala and Sunil Deshpande
  मेळघाटातल्या लवादा येथे १९९६मध्ये पहिलं बांबूचं घर सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी बांधलं. गेल्या २२ वर्षांत देशभरात बांबूची पर्यावरणपूरक १७०० घरं उभी करणाऱ्या या दांपत्याच्या कार्याची ओळख आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं.


  छोटंसं टुमदार कौलारू घर हे जणू परीकथेसारखं वाटू लागलं आहे. शहरात तर सोडाच, पण गावातदेखील जिकडेतिकडे सिमेंटची घरं बांधली गेली. दगड, मातीची घरं आता बांधणं शक्य तरी आहे का, त्यापेक्षा सिमेंटची घर आम्हाला सुटसुटीत, सोयीस्कर वाटू लागली. पण या सिमेंटच्या जंगलातून बाहेर येऊन आज पुन्हा पर्यावरणाशी, निसर्गाशी नाळ जोडण्याची गरज आहे. आणि त्याला एक सुंदर पर्याय म्हणजे बाबूंची घरं. आपल्या निसर्गाने दिलेली मोठी देणगी म्हणजे बांबू आणि त्यापासून तयार केलेली ही बांबूची घरं म्हणजे प्राकृतिक ठेवाच आहे. मेळघाटातील लवादा या छोट्याशा आदिवासी गावातील सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून उभारलेली ही बांबूची घरं म्हणजे जणू समाजाला दिलेली एक उत्तम प्राकृतिक भेटच अाहे. शहरं म्हटली की मोठ्ठाल्या इमारती, काँक्रीटचे रस्ते, सर्व भौतिक सुखसुविधा, तंत्रज्ञानांनी युक्त अशी जागा असे चित्र पटकन डोळ्यासमोर येते. हे काँक्रीटचं जंगल उभारताना आपण नैसर्गिक जगलं नष्ट केली आणि आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली.


  हे सध्या प्रकर्षानं जाणवत असलं तरी आता काय करता येऊ शकते हा विचार करायला हवा. काँक्रिटीकरणामुळे शहरं तापू लागली. एकीकडे स्मार्ट सिटी तयार करताना आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याचा विसर मात्र आपल्याला पडला. आधुनिक समाजाच्या कच्च्या आणि पक्क्या घरांबद्दलच्या संकल्पना अजब आहेत. ५० ते ६० वर्षांत नूतनीकरण कराव्या लागणाऱ्या इमारतींना आम्ही पक्की घरं म्हणतो. तर कित्येक शतकं ऊन- वारा- पाऊस अंगावर घेत भक्कम उभी असलेली बांबूची घरं आपल्या पक्क्या घराच्या व्याख्येत बसत नाहीत. बांबूच्या आधारे उत्तम घरं उभारली जाऊ शकते. पण दुर्दैवाने आपले समाज ते मान्य करत नाही, असा खेद सुनील देशपांडे नेहमीच व्यक्त करतात. पण या पूर्वग्रहावर मात करत गेल्या २० वर्षांमध्ये संपूर्ण बांबू केंद्राने १७०० बांबू घरांची निर्मिती केली.

  बांबूची घरं म्हणजे जुन्या झोपड्या होत्या तशा की काय, असा विचार सहज मनात येतो. पण बांबूपासून पक्की घरं बांधता येतात आणि ही घरं थोडीथोडकी नाही, तर १०० वर्षांपेक्षा अधिक काळ चांगली राहतात. बांबू हे अभियांत्रिकी संसाधन आहे. सौर ऊर्जेने तयार केलेला पाइप म्हणजे बांबू. जमिनीखालची संपत्ती ही संपणारी आहे आणि सध्या आपण जे घर बांधतो ते याच जमिनीखालच्या संपत्तीचा वापर करून. पण बांबू हे नैसर्गिक उत्पादन आहे. शिवाय बांबूची लागवड आपण आपल्या परिसरात करू शकतो. बांबू, बांबू कारागीर आणि बांबू कारागिरी या तिघांना न्याय देणारे असे हे बांबू घर सर्वच बाजूंनी उपयुक्त असेच आहे. बांबूचे घर बांधण्याचे तंत्र तसे सोपे आहे. शिवाय एकदा हे घर बांधल्यानंतर फार काही देखभालही लागत नाही. घरच्या घरी स्मोक ट्रीटमेंट करून यांचे आयुष्य वाढवता येते.

  सर्वसाधारणपणे घर बांधताना पाया केला जातो, तसाच पाया यासाठी देखील करावा लागतो. नंतर भिंती मात्र बांबूच्या केल्या जातात. छतासाठी कवेलु, इंग्लिश कवेलुचा वापर केला जातो. बांबूला पावसाचे पाणी लागू नये म्हणून व्हरांडा तयार करून व्यवस्था केली जाते. प्लिंथसाठी दगड व मातीचा वापर होतो. यात सिमेंटचा वापर फक्त ५ टक्केच केला जातो. घर बांधण्यासाठी लागणारे सर्व बांबू हे नटबोल्टनी बसवले जातात. ३०० रुपये प्रति चौरस फुटापासून १२०० रुपये प्रति चौरस फुटापर्यंत विविध प्रकारची घरं बांधता येतात. घर बांधण्यापूर्वी बांबूला वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिलेली असते. बांबू १०० वर्षं टिकतो त्यात त्याला स्मोक चेंबरमध्ये स्मोक ट्रीटमेंट केली जाते. घर बांधताना निंबोण्याचं तेल त्यात घातलं जातं आणि काजूच्या सालाचं तेल लावल्याने बुरशी येत नाही. अशा या नैसर्गिक उपचारांमुळे या घरांचे आयुष्य वाढते. याशिवाय घर बांधल्यानंतर नियमित वेगळी देखभाल करावी लागत नाही. २-५ वर्षांनी काजूच्या सालाचं तेल, स्मोक हे घरच्या घरीच देता येते.

  सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी सामान्य पद्धतीने बांधलेलं घर अशा साध्या सूत्रानुसार बांधलेले हे घर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य अशा सर्व बाजूंनी फायद्याचे आहे. या बांबू घराची काही वैशिष्ट्य सांगता येतात. या घरात पाय गरम, पोट नरम आणि डोकं थंड राहते, थोडक्यात हे घर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मातीच्या भिंतींना शेणाचं सारवण केल्याने हे घर उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब मिळते. दुसरं म्हणजे हे घर तुमच्या खिशाची काळजी घेतं. काँक्रीटची घरं उंची फर्निचर, इतर साजेशा सुखसोयींची मागणी करतात. मात्र बांबूच्या घराची अशी कसलीही मागणी कधीच नसते. घरातील जमीन शेणाने सुंदर सारवलेली असल्याने आत वेगळ्या इंटेरियरची गरज भासत नाही. साधी खाट, बासाच्या खुर्च्या अशा साध्या वस्तूंनीदेखील घर छान दिसते. महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे,बांबूची घरं दीर्घकाळ टिकण्यासोबत आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी असतात.

  मेळघाटातील धारणीपासून १५ ते २० किलोमीटरवर असलेल्या लवादा येथे १९९६ मध्ये पहिले बांबूचे घर सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी उभारले. त्यापूर्वी त्यांनी १९८१मध्ये झारखंडमधील रांची येथेे बांबूचे घर बांधले होते. गेल्या २२ वर्षांत देशभरात १७०० घरे त्यांनी बांधली आहेत. २००१मध्ये गुजरातेत आलेल्या भूकंपामुळे भुज शहर उद्ध्वस्त झाले. तिथे त्यांनी ४७५ घरे बांधली. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड अशा विविध राज्यांमध्ये हे काम निरंतर सुरू आहे. हे बांबू घर शहरांमध्येही बांधता येतं. संपूर्ण घर बांधणं शक्य नसलं तर आतील भाग बांबूचा करता येतो.
  बदलत्या वातावरणाचा विचार करता आज पुन्हा निसर्गाशी नाळ जोडण्याची वेळ आली आहे. सिमेंटच्या जंगलातून काही प्रमाणात का होईना पण बाहेर येण्यासाठी निसर्गाशी गट्टी जमवावीच लागेल. आता बांबूशिवाय पर्याय नाही, ही बाब समजून घेऊन आत्मसातदेखील केली पाहिजे. इंटरनेटचे जाळे विणून, आधुनिक भौितक सुखसुविधा, तंत्र देऊन स्मार्ट सिटी झाली असे नाही. तर वातावरणानुसार पर्यायवरणाचा समतोल राखणारी, निसर्गाच्या सान्निध्यात, जवळ नेणारे गाव, शहर म्हणजे खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी आहे.

  hiral.gawande@dbcorp.in

 • Hiral Gawande writes about cane houses by Nirmala and Sunil Deshpande

  सामान्य माणसाने सामान्य माणसासाठी सामान्य पद्धतीने बांधलेलं घर अशा साध्या सूत्रानुसार बांधलेले हे घर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य अशा सर्व बाजूंनी फायद्याचे आहे. या बांबू घराची काही  वैशिष्ट्य सांगता येतात. या घरात पाय गरम, पोट नरम आणि डोकं थंड राहते, थोडक्यात हे घर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. मातीच्या भिंतींना शेणाचं सारवण केल्याने हे घर उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात ऊब मिळते. दुसरं म्हणजे हे घर तुमच्या खिशाची काळजी घेतं. काँक्रीटची घरं उंची फर्निचर, इतर साजेश्ा सुखसोयींची मागणी करतात.  मात्र, बांबूच्या घराची अशी कसलीही मागणी कधीच नसते. घरातील जमीन शेणाने सुंदर सारवलेली असल्याने आत वेगळ्या इंटेरियरची गरज भासत नाही. साधी खाट, बासाच्या खुर्च्या अशा साध्या वस्तूंनीदेखील घर छान दिसते. महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे, बांबूची घरं दीर्घकाळ टिकण्यासोबत आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी असतात. 

Trending