आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळासोबत चालणं गरजेचं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा मुलगा किंवा मुलगी यांना एखादी गोष्ट मान्य असते, त्यांना तसं वागायचं असतं पण पालकांच्या दबावाखाली किंवा आदरयुक्त धाकामुळे त्यांना तसं करता येत नाही. मुलींच्या जोडीदाराकडून अपेक्षा अवास्तव आहेत असा आरोप सर्रास मुलींवर केला जातो. पण त्यासोबत पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा किती अवाजवी होत आहेत,   कोणत्या काळाला धरून आहेत, हासुद्धा विचार व्हायला हवा.


काय लग्नाचा काही विचार आहे की नाही? पुढे पण नोकरी करणार का? अशा किती मुली पाहणार आहे? अशा कोणत्या अपेक्षा आहेत? घर सांभाळणारी पोरगी मिळेल का आजच्या काळात? अशा एक ना हजार प्रश्नांना लग्नाळू मुलंमुली रोज तोंड देत असतात. कोणत्याही लग्न समारंभात जा, सगळ्यांच्या नजरा यांच्यावरच अन् एक ठरलेला प्रश्न, काय मग तुझा नंबर कधी? अशा प्रश्नांचा भडिमार व्हायच्या आधीच लग्नाळू पोरंपोरी तेथून कलटी कशी मारता येईल, हे पाहतात. आपल्याला जोडीदार कसा हवा हे त्यांनी ठरवण्यापेक्षा इतरांनाच त्यात जास्त रस असतो. ‘तुझी अपेक्षा सांग’ हे तर नुसतं म्हणण्यापुरतंच असतं. हल्ली मुली अशाच असतात, त्या सासरी तशाच वागतात, नोकरीला प्राधान्य देतात, घरकाम तर मुळीच करत नाही, सासूसासरे तर नकोच यांना, मुलांपेक्षा ना मुलींच्याच अपेक्षा जास्त वाढल्या, कुठून शोधणार असा मुलगा यांच्यासाठी...बापरे! एका ना हजार चिंता आणि शेवटी काय तर बाई तडजोड मुलींनीच करायची असते, सगळं चांगलं मिळेलच असं कुठे असतं, आपणच सांभाळून घ्यायचं, असा सल्ला देऊन हे मात्र एखाद्या विजयी खेळाडू सारखे मिरवत, निघून जातात.


आजची पिढी कुठे काही ऐकून घेते अशी ओरड आधीच्या पिढीकडून होत असली तरी मधल्या काळातील म्हणजे आज पंचवीस ते पस्तीस या वयोगटातल्या युवकयुवतींचं सँडविच झालंय असं वाटतं.  प्रेमविवाह असेल तर इतर भानगडींचा प्रश्न उरत नाही. पण जर ठरवून लग्न करायचं असेल तर मात्र या लग्नाळू तरुणाईला दिव्यातूनच जावे लागत आहे. ही मुलंमुलीं ना धड जुन्या पिढीची ना धड नव्या. म्हणजे कसे तर आपल्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितले तसे आपली संस्कृती, परंपरा यांचा आदर करणारे, जपणारे असेसुद्धा यांचे मत आहे आणि काही पारंपरिक पद्धती बदलण्याची इच्छादेखील आहे. पण काय होते, या सर्व भानगडीत अनेक वेळा त्यांचं मत समजून घेतलं जात नाही, त्यांना काय हवं हे विचारलं जात नाही.  दर वेळी मुलामुलींच्याच अपेक्षा वाढल्या, त्यांनाच लग्नापेक्षा नोकरी प्रिय असे म्हणून त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यापेक्षा जरा दुसरी बाजू समजून घेणंसुद्धा आवश्यक आहे. पालकांचंदेखील नकळत का होईना पण चुकू शकतं किंवा काही अपेक्षा चुकीच्या ठरू शकतात, ही बाबदेखील विचारात घेतली पाहिजे.

 

उच्च शिक्षण घेऊन स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या मुली, स्वत:च्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय, करिअर अन मग संसार अशा कारणांमुळे लग्नाचं वय वाढलं. पूर्वी लग्नासाठी जे वय योग्य असं म्हणायचे त्या वयात करिअर सेट करण्याची धडपड सुरू असते. लग्नाचं वय वाढल्याने साहजिकच विचार अधिक प्रगल्भ होतात, स्त्रीपुरुष समानता म्हणजे नक्की काय हे समाजात वावरताना नुसतं पाहिलं जात नाही तर अनुभवलंदेखील जातं. मुलांचं वय वाढलं तसेच मुलींचंदेखील वय वाढल्याने त्यांची स्वतंत्र स्वप्नं, स्वतंत्र विचार तयार झाले. यातून मी आयुष्यात काय करायचं आहे, काय बरोबर, काय वाईट याचा निर्णय त्या स्वतंत्रपणे घेऊ लागल्या. जसा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो, तसाच लग्नाच्या बाबतीतही मुलांप्रमाणेच मुलींनादेखील स्वतंत्र निर्णय घेता यावा, लग्नानंतर बायको म्हणून माझ्या जशा जबाबदाऱ्या तशाच नवरा म्हणून मुलाच्या काय जबाबदाऱ्या असाव्या हे ठामपणे सांगता यावे. समानता ही नुसती बोलण्यापुरती नाही तर कृतीतून दाखवण्याची सुरुवात आपल्यापासून व्हावी, असा विचार मुली करू लागल्या.

 

पण आजही मुलाचं लग्न करताना उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, घर सांभाळू शकणारी, देखणी, तरतरीत अशी सर्वगुणसंपन्न मुलगीच पाहिली जाते. खरं तर लग्न ठरवताना मुलामुलीला काय हवं, त्यांच्या अपेक्षा, कोणत्या बाबींना ते प्राधान्य देणार आणि गौण ठरवणार, कुठल्या गोष्टीसाठी तडजोड होऊ शकते या गोष्टी चर्चा करून ठरवता येऊ शकतात. त्यांच्या मतांचा, काळानुसार होणाऱ्या बदलांचा स्वीकार करणे खूप महत्त्वाचे आहे.


पूर्वी विवाह मंडळं, मध्यस्थ व्यक्ती, नातेवाईक स्थळं सुचवायचे. काळाच्या ओघात हे स्वरूप बदललं. विवाह मंडळ म्हणजे एक उत्तम व्यवसाय झाला अाणि मध्यस्थ तर जणू पडद्याआडच गेले. अशा वेळी ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइट हा पर्याय पुढे आला व बऱ्यापैकी रुळलाही. शादी डॉट कॉमच्या मालकीची कंपनी मराठी शादी डॉट कॉम या मॅचमेकिंग सर्व्हिसने जोडीदाराची निवड करताना सुरक्षितता बाळगण्याची गरज समजून घेण्यासाठी नुकतीच राज्यात एक पाहणी केली. मॅचमेकिंग किंवा डेटिंग सर्व्हिसवर पोस्ट करण्यात आलेल्या प्रोफाइलमध्ये सगळ्यात पहिले काय पाहिले जाते, असा प्रश्न मुलांना केला, तर ५२ टक्के म्हणाले फोटो, ३८ टक्के म्हणाले प्रमाणित केलेले प्रोफाइल्स, ७ टक्के मुलं नाव, वय, ठिकाण अशी सामान्य माहिती तर ३ टक्के म्हणाले छंद. ९३ टक्के मुली जोडीदाराची निवड करताना प्रमाणित किंवा तपासून घेतलेल्या प्रोफाइलला अधिक महत्त्व देतात. यावरून पुरुषांच्या तुलनेत महिला या निवड प्रक्रियेदरम्यान अधिक सावधगिरी बाळगतात, हे स्पष्ट होते. शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित म्हणाले की, यूजरच्या बदलेल्या वर्तणूक व ट्रेण्डसह सुरक्षा व्यवस्थादेखील सातत्याने बदलत असते.

 

अशा ऑनलाइन मॅट्रीमोनिअल साइटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातील प्रोफाइलदेखील आकर्षक झाले आहेत. ही माहिती आवश्यक असली तरी त्यासोबतच ज्यांना लग्न करायचे आहे त्या मुलामुलींनी बोलणे, एकमेकांच्या अावडीनिवडी, भविष्यात काय करायचे आहे, दोघांचे स्वप्न, करिअर, घर, जबाबदाऱ्या या बाबींवर चर्चा करणे, बोलणेसुद्धा महत्त्वाचे आहे. आणि यात मोठी भूमिका अाहे पालकांची. त्यांनी ही गोष्ट अधिक समजून घ्यावी. आमच्या काळात आम्ही नाही असं केलं कधी, असं ऐकवण्यापेक्षा त्यांची बाजू समजून घ्या. काळानुसार बदल स्वीकारून, समजून घेऊन पुढे गेलो तर कोणतेही नाते तुटणार नाही. मुलाला जसे मत आहे, तसेच मुलीलादेखील आहे, त्यांच्या अपेक्षा, विचार समजून घेणे आवश्यक आहे. काळानुसार झालेले चांगले बदल बोलण्यापेक्षा ते समजून घ्या, स्वीकारा आणि कृतीत आणा.


hiral.gawande@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...