आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगण्याचा मूलभूत विषय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाखालची जमीन आणि डोईवरची हिरवीगार फांदी हा खरा जगण्याचा मूलभूत विषय आहे. निद्रानाशाची रोजीनिशी हा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांचा नवा कोरा कवितासंग्रह. मराठी कवितेच्या दालनात या कविता पाऊल टाकत असताना त्यांचं स्वतःचं असं दमदार वजन आहे हे या कविता वाचताच लक्षात येतं. पुस्तकाची बांधणी, त्याची निर्मिती आणि मुखपष्ठापासून अंतरंगातील रेखाटनांपर्यंत शब्दविरहित फक्त रेषांचं ते उत्तम काव्यच कागदावर उतरवलेलं आहे.ही सर्व रेखाटने कवी महेश लोंढे यांचीच आहेत.


स्वतः कवी असणं आणि चित्रकारही असणं या दोन कला कागदाला भिनत गेल्या की, त्याचं सुंदर शिल्प तयार होतं. असाच हा काव्यसंग्रह आहे. भर दिवसाचे साक्षात्कार आणि निद्रानाशाची रोजीनिशी अशा दोन भागांत विभागलेला हा कवितासंग्रह वेगळं काय सांगतो आहे हे कविता वाचतानाच लक्षात येतं. प्रत्येक कवीची त्याची त्याच्या मनाच्या भूमीनुसार आणि भूमिकेनुसार बांधीव अशी शैली ठरलेली असते. असं व्यक्त होणं खरं तर कवीच्या स्वानंदाचा भाग असतो. स्वतःला व्यक्त करण्याचा. या जगाविषयी मांडण्याचा आणि भांडण्याचा. हे भांडण प्रथमतः स्वतःशी असतं आणि नंतर इतरांशी सुरू होतं. अशा कवीच्या कल्पना म्हणण्यापेक्षा आकलनाचं सार या शब्दांतून उतरलेलं आहे.


इतके जवळ असावे एकमेकांच्या आपण की
गळ्यात हात टाकून बोलता यावे एकमेकांच्या
श्वास निःश्वासांचे आवाज ऐकू यावेत स्पष्ट
एकाच्या डोळ्यातील पाण्याची चाहूल लागावी
दुसऱ्याच्या डोळ्यांना
तिसऱ्याला अश्रू झेलता यावेत
कवी जगण्याचा हिरवा ताल जोपासताना त्याला त्याच्या माणूसपणाची आणि भोवतालच्या माणुसकीचीही खूप काळजी असते. त्यातूनच तो म्हणतो ते खूप महत्त्वाचेच असते. गळ्यात हात टाकून बोलता यावे इतके आपण एकमेकांच्या जवळ असावे. नुसतेच जवळ असू नये तर श्वास निःश्वासांचे आवाज ऐकू यावेत अशा माणसा-माणसातील संबंधाची आशा आपण कोणत्या भरवशावर करू शकतो. पण कवी ते करतो.
डर के आगे डर है
डर के पीछे डर है
दर के आगे डर
दर के पीछे डर है
भय जिंदाबाद या कवितेत त्यांनी या ओळी मांडलेल्या आहेत. ही नुसती यमकांची जुळवा जुळव नाही तर कवी कोणत्या धाडसानं या जगाकडं पाहतो त्याचे हे शब्द आहेत. डर के आगे जीत है या खोट्या कल्पनेवर आपण नाही जगू शकत. आपल्याला जे जिंकायचं आहे त्याचीच जास्त भीती वाटते म्हणून सर्वांगी भीती व्यापून राहिलेली आहे याच निदर्शन या शब्दातून किती सूचकतेनं उभं राहतं. दर के आगे डर, दर के पीछे डर है... ही भीती माणसाच्या आत इतकी का विकसित झाली याचा विचार या कवितून मांडताना भीतीला नागडी भिती म्हणतो. आपण आजच्या कालखंडात इतके समृद्ध भितीवान झालो आहोत याची वाचण्यासारखी ही कविता आहे. वेदनांची अनावर वस्त्रे अशा शब्दांतून येणारी दुःखाची जाणीव ठासीवपणे उभी राहते.
हौतात्म्यांची कैक आमंत्रणे येउनही जगण्याचा मोसम ठेवला भरात
हे माणसाचं स्वार्थलोलुप दर्शनही विराट विचित्र आहे. त्यातूनच ते लिहितात...
जन्मापासून चिकटून राहतं अस्तित्वाला
हे बेसुमार जडत्व
परंपरेनं चालत आलेलं नाकर्तेपणाचं विणकाम
आपण अव्याहत चालू ठेवतो
आपल्या डोळ्यांच्या उजेडात या कवितेत लोंढे म्हणतात
राहो पायाखाली जमीन फूटभर
डोईवर फांदी हिरवीगार
पोटभर अन्न अंगावर कपडे
ओठांवर ओलावा मिळो 
पायाखालची जमीन आणि डोईवरची हिरवीगार फांदी हा खरा जगण्याचा मूलभूत विषय आहे. याची अधोरेखीत जाणीव या कवितांना अधिक संपन्न करतात. याच कवितेत एके ठिकाणी ते प्रार्थनेच्या सूरात म्हणतात ओला राहो गाभा हृदयाचा. ही कविची प्रार्थना निद्रानाशाच्या रोजनिशीतूनही आशादायी वाटते हाच आनंद आहे.

 

इंद्रजित घुले, मंगळवेढा
indrajitghule81@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...