आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाका रुते कुणाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किती टाके पडले यावरून त्या रुग्णाच्या दुखण्याचा मोठेपणा ठरवण्याचे दिवस आता गेले. विरघळणारे, आतल्या आत घातले जाणारे, लेन्सच्या वापराने केले जाणारे असे टाक्यांचे बरेच आधुनिक प्रकार आता पाहायला मिळतात. सोयीचे. आणि सुटसुटीतही.


ऑ परेशनबद्दल चर्चा चालू असते. मधूनच बाणासारखा प्रश्न येतो, ‘किती टाके पडतील डॉक्टर?’ विचारते बहुधा ती पेशंट स्वतःच.
जितके टाके जास्त तितकं ऑपरेशन मोठं हा घट्ट समज. एके काळी हे सार्वत्रिक सत्य होतं. मोठ्ठं ऑपरेशन करायला, मोठ्ठं पोट फाडावंच लागायचं. जेवढी मोठी जखम तेवढी ऑपरेशनची किंमत वाढायची. सर्व अर्थांनी.
कॉलेजमध्येही हेच शिकवलं जायचं. पुरेसं लांब इन्सिजन (छेद) ही पहिली पायरी. यालाच अडखळला तर मग तो सर्जन कसला? सर्जनला सिंहाची छाती हवी (हे असं इन्सिजन घ्यायला), हत्तीचे पाय हवे (बराच वेळ उभं राहायला), गरुडासारखी नजर हवी आणि स्त्रीचे कोमल हात हवेत; असं वैद्यकीय सुभाषित आहे एक. त्या वेळची परिस्थिती होती खरंच तशी. आता जग बदललं. भुलीचं तंत्र बदललं. नवी नवी औषधं आली. प्रकाश वळवता येतो असा शोध लागला. मग तो वळवून कुठेही नेता यायला लागला. पोटात, गर्भपिशवीत, कानात, नाकात, गुडघ्यात, कवटीत, पाठीच्या मणक्यात... कुठेही. छोटे कॅमेरे, छोटी छोटी उपकरणं निघाली. पोट फाडून जे करावं लागायचं ते आता छोट्याशा भोकातून शक्य झालं. पोटात काय दडलंय; आत भानगड काय आहे, हे बघायला आता ‘दार उघडण्याची’ गरज नाही. जणू ‘किल्लीच्या भोकातून’ आतली सगळी मज्जा दिसायला लागली.

 

पण या भानगडीत ते टाक्यांचं कौतुक लोपलं. टाक्यांची असोशी असलेल्या बायका अगदी मनात हिरमुसून जातात. टाके नाहीत म्हणजे भलतंच. टाके नाहीत? मग काय मज्जा?  सीझरसुद्धा बिनटाक्याचं करता येतं. म्हणजे पोट पूर्वीइतकंच उघडावं लागतं. त्याशिवाय बाळ कसं काढणार? पण शिवताना टाके आतल्या आत राहातील असे घातले जातात. वरून म्हणाल तर दिसायला टाके शून्य! खरंतर ही शिंप्यांची पिढ्यानपिढ्यांची ट्रिक आहे. डॉक्टरांनी ती त्यांच्याकडूनच उचलेली आहे. धावदोरा, कशिदा असे टाके ऑपरेशनमधेही वापरले जातातच. असं काय काय, कुठून कुठून उचललंय डॉक्टरांनी. न्हाव्याची कात्री धरायची पद्धत,  गुरख्यांच्या गाठी, लोहाराचं रिबीट, चांभाराची आरी, सुताराची करवत ही आमचीही शस्त्रं आहेत. कोणत्याही ऑपरेशनमध्ये पेशंट मोजते ते वरून दिसणारे टाके. आत बरेच टाके असतात. सीझर झालं तर आत निदान पन्नास टाके तरी असतात, विविध स्तरांना सांधण्यासाठी. वर मात्र दहापंधरापासून शून्यपर्यंत टाके घालून त्वचा शिवता येते.

 

पूर्वी सीझर म्हटलं की, हे भलं थोरलं इन्सिजन, बेंबीपासून ओटीपोटापर्यंत. मोठ्ठा उभा व्रण. मग त्यावर आडव्या रेघांची नक्षी. आता इन्सिजन असतं ते आडवं, अगदी खाली, अगदी ओटीपोटावर. बिकिनी घातली तरी दिसणार नाय! याला म्हणतातच ‘बिकिनी इन्सिजन’. हे अधिक चांगलं. अनेक अर्थांनी. दुखतं कमी. भरून येतं झटपट. नंतर हर्नियाची शक्यता कमी. टाकेही आतल्या आत असतात, आपले आपण विरघळणारे असतात. काढायची भानगड नाही. व्रण अगदी दिसेल न दिसेलसा उमटतो. शिवाय शरीराच्या (सहसा) न दिसणाऱ्या भागावर असतो. त्यामुळे जास्त टाके म्हणजे जास्त मोठं ऑपरेशन असं आता राहिलेलं नाही. बरीच मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची ऑपरेशन आता दुर्बिणीतून (टाक्याविना) करता येतात. शक्य असेल तर कोणतही ऑपरेशन बिनटाक्याचंच करणं योग्य. अर्थात त्यासाठी डॉक्टर तशा तयारीचा हवा आणि इतर साधनसामुग्रीही उत्तम प्रतीची हवी. ‘परंतु तेथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे!’ ऑपरेशन टाक्याचं की बिनटाक्याचं हा निर्णय बराचसा डॉक्टरवर सोडायला हवा. सगळ्यात कॉमनली केलं जाणारं बिनटाक्याचं ऑपरेशन म्हणजे स्त्री-नसबंदी.  हे ‘फेल जातं’ अशी वदंता आहे. पण अभ्यासात असं दिसून आलेलं नाही. तुलना करता, टाक्याच्या आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘फेल जाण्याचं’ प्रमाण सारखंच आहे.

 

टाके न भिजवणं, हेही एक कर्मकांड आहे. अंघोळीचं पाणी टाक्यात जाऊन त्यात पाणी होत नाही. टाके नीट जुळले नाहीत, इन्फेक्शन झाले, आतल्या आत चरबीचं पाणी होत राहिलं, तर जखमेत ‘पाणी’ होतं. अंघोळीचं पाणी जखमेत ‘शिरून’ साठूनबिठून राहात नाही. जखम शिवल्यावर काही तासात तिथे एक सीलबंद पापुद्रा तयार होतो. मग फारसं काही आतबाहेर जाऊ शकत नाही. ड्रेसिंग हे रोगजंतूंचा जखमेशी सहज संपर्क येऊ नये म्हणून असतं. ड्रेसिंगमुळे जखमेला कमालीची सुरक्षा वगैरे मिळत नाही. अशी सुरक्षा आपल्या प्रतिकारशक्तीमुळे मिळते. भात, बटाटा, पावटा आणि वांगं हे नाहक बदनाम पदार्थ आहेत. यांच्यामुळे म्हणे टाके बिघडतात. असं काही होत नाही. भात आणि बटाटा हे रोजच्या आहारात असणारे जगात कित्येक देश आहेत. आख्खी कोकणपट्टी भातावर जगते. आणि तिथली ऑपरेशने निर्विघ्न पार पडत असतात. भात, बटाटा, पावटा, आणि वांगं एकत्र करून खाल्लं तरी टाक्यांना का ऽऽ ऽऽ ही फरक पडत नाही. (इथे या व्यक्तीला डायबेटीस वगैरे नाही हे गृहीत आहे हं.)
थोडक्यात टाक्यावरून ऑपरेशनची परीक्षा करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.

 

shantanusabhyankar@hotmail.com

बातम्या आणखी आहेत...