आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पसंत नसणा-या मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन पिढीत लग्न उशिरा होणार, भीडभाड न बाळगता लग्नं मोडली जाणार, परत लग्नं केली जाणार. लग्न नाकारून जगणारे बरेच असणार. लग्न करून निवडीने अपत्य नाकारणारी जोडपी अधिक दिसणार. मित्रमंडळी कुटुंबाचा भाग अधिक होणार.

 

नुकतीच जवळच्या नात्यात लागोपाठ तीन लग्नं झाली. नुकताच जवळच्या नात्यात एका मुलाचा डिव्होर्सही झाला   आणि नुकतंच मुलीला लग्नापेक्षा खरेदीत रस आहे, असं म्हणून लग्नाच्या दहा दिवस आधीच मोडलेलं एक लग्नही पाहिलं.
पूर्वीच्या काळी वरपक्षाकडून ‘पसंत आहे मुलगी’ असा निरोप आला की वधुपिता खुशालून जात असे. एकदा लग्न करून दिलं की, त्याचा जीव भांड्यात पडत असे. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. लग्न झाल्यानंतर ते किती काळ आणि कसं चालेल याची गॅरंटी राहिलेली नाही. याचं कारण असं सांगितलं जातं की, आजकाल मुली शेफारल्या आहेत. मुलींमधलं मुलींमधलं ‘मॅरेज मटेरियल' कमी होतं आहे. इतकी वरवरची कमेंट करून सोडून द्यावा, असा हा विषय नाही. या सगळ्या बदलांमागे अनेक कारणं आहेत.  
पुरुषसत्ताक समाजरचनेचा काळ ‘य’ वर्षांचा आहे. या पुरुषसत्तेच्या वरवंट्याखाली ‘य’ वर्षे स्त्री तर भरडून निघालीच पण संवेदनशील पुरुषदेखील भरडून निघाले आहेत. अनेक वर्षे भारतीय कुटुंब पद्धती सुरळीत चालू राहिली ती बाईने स्वीकारलेल्या या खालच्या स्थानाच्या आधारावर.

 

स्त्री शिकून स्वतंत्र होऊ लागली तशी समाजाच्या विवाहसंस्थेची जमीन हलू लागली आहे. मुलींना आजकाल एकत्र कुटुंबात राहायचे नसते हे कुटुंबव्यवस्था खिळखिळी होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण समजले जाते. मुळात विवाहाची पद्धत स्त्रीसाठी अन्यायकारक होती आणि आहे. एका घरातील मुलगी अचानक एक दिवस दुसऱ्या घरात येते. वयाच्या पंचविशी-तिशीपर्यंत तिने जगलेलं, शिकलेलं सगळं विसरून तिला नव्याने एक नवीनच जीवनपद्धती स्वीकारावी लागते.
अनेक जोडपी लग्नाआधीच काउन्सिलिंग करून घेत नाहीत. पुण्यात असणारी साथ-साथसारखी संस्था या क्षेत्रात काम करते. पण या संस्थेत जाणारे लग्नाळू फार मोजके आहेत. ठरवून करण्याच्या पद्धतीच्या लग्नात लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी काही विशेष प्रयत्न होत नाहीत. मग लग्न झाल्यावर एकदम वास्तवाचे धक्के बसतात. आधी छान वाटणारे "अहो आई’ आणि "अहो बाबा’ एकदमच खत्रूड सासू आणि खवट सासरे वाटू लागतात. अचानक ही परकी माणसं ‘अहो’ आईबाबा म्हणून आयुष्यात येतात. आता त्यांचं मन सांभाळायचं असतं, काळजी घ्यायची असते, नव्याने आयुष्यात सुरू झालेल्या सेक्स-पर्वाशी जुळवून घ्यायचं असतं. करिअर पण करायचं असतं कारण भरपूर शिक्षण घेतलेलं असतं, खेरीज आर्थिक स्वातंत्र्याची सवय लागलेली असते.


इतक्या सगळ्या आघाड्यांवर लढणं सोपं नसतं. बऱ्याच जणींना यात अपयश येतं. अशा वेळी फक्त राजाराणीचा संसार मांडून मोकळा श्वास घ्यावासा वाटला तर त्यात काही चूक नसते. फक्त ते निभावायची ताकद अनेकदा राजाराणीत नसते. वेगळ्या  संसारात  अंगावरची जबाबदारी वाढते. घरकामाची सवय नसल्यानं घर चालवणं ओझं वाटतं. आजही मुलं  पारंपरिक पद्धतीनेच वाढवली जातात. त्यांना घरकामाची, स्वयंपाकाची क्वचित सवय असते. ही परिस्थिती आजकाल कुठे थोडीफार बदलायला लागली आहे. पण आता मुलगा-मुलगी समानता म्हणून मुलासोबत मुलीलाही स्वयंपाक-घरकाम याची सवय लावली जात नाही. आईवडिलांच्या पंखाखाली असेपर्यंत हे चालून जातं. पण स्वतंत्र झालं की, फटके बसतात. नोकर कितीही ठेवले तरी शेवटी आपलं घर आपल्यालाच चालवायला लागतं. प्रेमविवाहाच्या वेगळ्या अडचणी असतात. ठरवून केलेल्या लग्नात एक वेळ सुरक्षितता असते. प्रेमविवाह म्हणजे बहुतेक वेळा अविचाराने धाडकन मारलेली उडी असते. समाजसुधारणेसाठी जातीबाहेर विवाह व्हायला हवेत असं आदर्श मानलं जात असलं तरी वास्तवात हे शक्य नाहीये. विवाहाने काही जातिअंत होत नाही. उलट जाती अधिक प्रखर होतात. प्रेम ही एक अव्यवहारी घटना आहे. लग्न मात्र बहुतांशी व्यवहार आहे. त्यामुळे अनेक प्रेमविवाह नंतर निभावता येत नाही म्हणून मोडतात. लग्न टिकून राहण्यात बाईची सहनशीलता पणाला लागायची ती आता कमी झाली आहे. कायदे बायकांच्या बाजूचे  आहेत. पूर्वी बायका लग्न रेटून न्यायच्या. ती भावना थोडीफार बदलली आहे.

 

लग्न लादणे हा भाग आता कमी झाला आहे. लग्नाचं वय आता तिशीजवळ आलंय. मुली सुशिक्षित असतात. मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. निदान लग्न तुटल्यावर स्वतः कमावून जगू शकतील इतपत कमवायची पात्रता बाळगून असतात. आई/वडील खंबीरपणे मुलीच्या मागे उभं असतात. अनैसर्गिक पद्धतीने समाजातली मुलींची संख्याच कमी झाल्याने मुली अटी ठेवू शकण्याच्या पोझिशन मध्ये आल्या आहेत. या सगळ्यामुळे विवाह संस्थेचा कणा हलला आहे आणि ते अटळ आहे.
पूर्वी कोवळ्या वयात लग्न करण्यामागे मुलगी सासरी रुळावी हा उद्देश होता. विवाह संस्थेला तितकाच मजबूत पर्याय सापडत नाही तोवर ती काही नष्ट होणार नाही. कारण बालसंगोपन आणि वृद्ध यांच्यासाठी ती फायदेशीर संस्था आहे. पण आता नवीन पिढीत लग्न उशिरा होणार, भीडभाड न बाळगता लग्नं मोडली जाणार, परत लग्नं केली जाणार. लग्न नाकारून जगणारे बरेच असणार. लग्न करून निवडीने अपत्य नाकारणारी जोडपी अधिक दिसणार. मित्रमंडळी कुटुंबाचा भाग अधिक होणार. सोशल नेटवर्किंगवरची नाती प्रत्यक्ष जगण्यात जास्तच ढवळाढवळ करणार. कुटुंबाची व्याख्या बदलणार. आईवडील आणि अपत्यासहित घटस्फोटिता अशी कुटुंबाची रचना दिसणार. स्त्री कितीही कणखर, स्वावलंबी झाली तरी मातृत्व हे अजून तरी स्त्रीसाठी एक हळवा कोपरा आहे. अर्थात काही जणी ही मातृत्वाची प्रवृत्ती नाकारून जगण्याचा पर्याय स्वीकारतात. पण ते दुर्मिळ आहे. कायद्याने बाळाला आईचं नाव लावलेलं चालत असलं तरी अजूनही ती अपवादात्मक परिस्थिती आहे.

 

घटस्फोट झालेला मुलगा सहजपणे महिन्याभरातच दुसऱ्यांदा लग्नाचा डाव मांडून बघतो. लग्न मोडलेली ती मुलगी तिची लठ्ठ पगाराची नोकरी करत, शॉपिंग करत आणि मित्रमैत्रिणींसोबत हँगआउट करत आनंदाने जगू शकते.  काही टिपिकल लोकांना हे असं जगणं अजब वाटू शकतं पण अशा चौकटीबाहेरच्या केसेस आता वाढणार आहेत. समाजात बदल मंद गतीने पण निश्चितपणे होत असतात. ते आकांडतांडव करून बळेच घडवता येत नाहीत आणि थांबवतादेखील येत नाहीत. पण समाजरचनेत कुठलीही वर्चस्व रचना कायमही राहत नाही. समाजरचनेचे ढाचे हलतात, ढासळतात, बदलतात.
कदाचित या ‘पसंत नसणाऱ्या मुली’ समाजसत्तेला मातृसत्तेकडे परत नेतील असं वाटतं.

 

juijoglekar@gmail. com

 

बातम्या आणखी आहेत...