आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीभत्‍स जगण्‍याचा उभा-आडवा छेद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसातली सत्तेची, संपत्तीची आणि शरीराची भूक अनिवार आहे. या भुकेला नीतिमत्तेची, तत्त्वांची चाड नाही, नात्यांचे बंधन नाही. यातून निर्माण होणाऱ्या बेबंद, बेलगाम आणि बीभत्स जगण्याचे दर्शन ‘दंशकाल’ ही हृषीकेश गुप्ते लिखित कादंबरी घडवते...
 
 
 
मानवजातीची भूक अमर्याद आहे. खरंतर या भुकेमुळेच माणसाची अफाट प्रगती झाली आहे. दुसरीकडे या भुकेमुळेच माणसाची अधोगतीही झालेली आहे. आपण भूक म्हणतो तेव्हा केवळ पोटाची भूक अपेक्षित नाही, ही पोटाखालचीही भूक आहे. लैंगिक भुकेचं व्यवस्थापन अजूनही माणसाला नीटसं साधलेलं नाही. तसेच मूलभूत गरजेपलीकडे जाऊन माणसाची ऐहिक सुरक्षितता, सत्ता आणि पैशाची भूकही संपत नाही. वखवखीने माणूस पछाडलेला आहे. माणूस मुळात प्राणी आहे. संस्कृतीकरणाच्या उपायांनी माणसाला कितीही ठाकूनठोकून बसवलं तरी ही भूक अमर्याद आहे. हृषीकेश गुप्तेंची ‘दंशकाल’ ही कादंबरी त्या कधीही न संपणाऱ्या भुकेचं तांडव आहे. 
 
‘दंशकाल’ कादंबरीचा घटनाक्रम काही प्राचीन नाही. साधारणतः एकोणीसशे ऐशी ते नव्वदच्या दशकात या कादंबरीचा घटनाक्रम सुरू होतो तरी लिखाणाचा एक मूळ धागा मात्र पार पेशवाई बुडल्यानंतरच्या काळापर्यंत घेऊन जातो. ही कादंबरी भूगाव या कोकणातील एका कायस्थ जातीच्या कुटुंबात घडते. देशमुख हे या भूगावातील एक बडं प्रस्थ आहे. अण्णा देशमुख, त्यांची पत्नी, एकुलता एक मुलगा अनिरुद्ध, अण्णांचे दोन धाकटे बंधू महानंद आणि भानुदास आणि भानुदासची पत्नी रेवा ही या कादंबरीची मुख्य पात्रं आहेत. तसेच अण्णांची आई, बहीण, बहिणीचे पती आणि अनिरुद्धची पत्नी अजूनही इतर पात्रं आहेत. याखेरीज या कादंबरीत एक विशेष पात्र आहे तो म्हणजे मानवी जीवनातील बीभत्स रस. माणसाने निर्मिलेल्या कलांमध्ये या बीभत्स रसाला बहुतांशी दुय्यम स्थान दिले आहे. इथेच हृषीकेशची ‘दंशकाल’ वेगळी कादंबरी ठरते. माणसाच्या मूळ प्रेरणा असतात : भय, आहार आणि मैथुन. या तिन्ही मूळ प्रेरणांचे सखोल वर्णन आणि विश्लेषण या कादंबरीत येतं. ते वरवर न वाटता घटनाक्रमाची गरज म्हणूनच येतं. खेरीज विवाहबाह्य संबंध, निषिद्ध शरीरसंबंध, समलैंगिक संबंध, मानसिक आजार : मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर यावर ही कादंबरी अनेकवेळा वर्णन आणि भाष्य करते.
 
 
‘दंशकाल’ कादंबरी सुरू होते अनिरुद्धच्या काकाला, भानुदासला वेड लागण्यापासून. भानुदास हा इंजिनिअर झालेला भला गृहस्थ आहे. उत्तम पदावर नोकरीत आहे. रेवासारख्या अतिशय देखण्या स्त्रीचा पती आहे. तो तिला शरीरसुख देण्यास अपुरा पडतोय. अचानक एक दिवस भानुदास वेडा होतो. भानुदासच्या या वेड लागण्यापासून देशमुखांच्या घराण्याची वाताहत सुरू होते. भानुदासची आई, बहीण आणि तिचे पती भानुदासच्या या अवस्थेचा गैरफायदा घेतात. भानुदासचा मठ स्थापन करतात. इकडे अण्णा आणि रेवा यांचे संबंध येतात आणि रेवा गर्भार होते. अण्णांच्या पत्नीला याचा अतोनात धक्का बसतो आणि ती वेडी होते. पौगंडावस्थेतील अनिरुद्धच्या मनावर या सगळ्या घटनांचा परिणाम होतो. दुसरीकडे आई-वडिलांच्या नात्याला सुरुंग लागल्याने तो पोरका होतो.
 
 
अनिरुद्ध भानूकाकाला बरं करायचं म्हणून मानसोपचारतज्ज्ञ होतो. या शिक्षणाच्या निमित्ताने तो स्वतःचे गाव, घरात घडलेला हिडीसपणा झटकून टाकू बघतो. परंतु हे गाव आणि कुटुंबाचे दुष्कृत्य काही त्याची पाठ सोडत नाही. अनिरुद्ध पुढच्या पिढीतला एकुलता एक वारस आहे. पुढे कुटुंबाची सगळी दुष्कर्मे निस्तरण्याची सगळी जबाबदारी त्याच्यावरच पडते. अनिरुद्धची पत्नी अनू माणसांचा सोस असणारी असते हे विशेष. मधला काही काळ सोडला तर परत काकूही अनिरुद्धच्याच घरात राहायला येते. भानूकाकाच्या दुसऱ्या रूपदर्शनाचा अनिरुद्धच्या मनावर खोल भयकारी परिणाम झाला आहे. अनिरुद्ध त्याच्या वडिलांसारखा आक्रमक पुरुषी स्वभावाचा पुरुष नाही. तो सतत कुठल्या तरी स्त्रीच्या पदराआड लपतो. कुटुंबातील दुष्कर्मे रोखायला कठोर निर्णय घ्यायचे टाळतो. एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्याचे कर्तृत्व ठीकठाक आहे. अनिरुद्ध त्याच्या वडिलांच्या मानाने तोकडा आहे. अनिरुद्धला पैशाची अनिवार लालसा आहे. त्या लालसेपोटी तो नकोशी माणसेही घरात ठेवू शकतो. त्याच्या शरीरात एखाद्या पशूसारखं काकूविषयीसुद्धा आकर्षण आहे. अगदी बालपणापासून त्याच्या मनातली ही इच्छा तेवती आहे आणि नंतर अपघाताने एकदा ती इच्छा पूर्ण होऊनही तो ती वासना जागवत ठेवतो. वय वाढल्याने, अनूसारखी जोडीदार मिळण्यानेही अनिरुद्धच्या आतील हे जनावर शमत नाही. अनिरुद्धच्या माध्यमातून लेखक मानवी जीवनातील अनिवार, निरंतर लालसेचाच प्रतिनिधी उभा करतो.
 
 
काकू म्हणजेच रेवा ही व्यक्तिरेखा लेखक विशेष प्रेमाने रेखाटतो असे वाटते. एकतर संपूर्ण कादंबरीत मुख्य पात्रांमध्ये हेच एक पात्र असे आहे, जे विकृतीपासून मुक्त आहे. रेवा विलक्षण देखणी आहे. ती ओतप्रोत भरलेले स्त्री आहे. रेवा शरीरसुखाबाबत आग्रही आहे. तिचं मादी असणं तिच्या अवतीभोवती भटकत असणाऱ्या वखवखणाऱ्या पुरुषतत्त्वाला आकर्षून घेतं. पण तिच्या मादी या स्वरूपापलीकडे तिचं माणूस म्हणून व्यक्तिमत्त्व आहे. रेवा व्यवहारात हुशार आहे. ती गावभरच्या  वखवखलेल्या पुरुषांपुढे नमत नाही. पण घरातल्या मुख्य पुरुषांपुढे ती नमते. रेवा पती असूनही नसल्यासारखी आहे. तिचं दुर्दैवी आयुष्य निराधार असल्याने देशमुखांच्या घरात नासवलं जातं. याला परिस्थिती जबाबदार असते आणि काही प्रमाणात रेवाही जबाबदार असते.
 
सामिष भोजनाची, माणसं आणि प्राण्यांच्या जुगण्याची वर्णनं वारंवार कादंबरीत येतात. ‘भूक’ ही गोष्ट किती विकृत दिसू शकते हे यातून दिसतं. मग ही भूक जिभेची असो वा लैंगिक, इथे महानंदच्या पात्रामधून समलैंगिक प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण या शोधाला लेखक फक्त बाहेरून स्पर्श करू शकला आहे. काहीशा हिडीस स्वरूपात ती भूक समोर येते. स्त्री-पुरुष संबंधांसारखे त्यातील सौंदर्य लिखाणात दिसत नाही. रेवा पतीच्या अपुरेपणाबद्दल मोठ्या दिराशी संवाद साधते, पण जावेशी बोलायला तिला लाज वाटते ही बाब काहीशी विचित्र वाटते. कादंबरीत मूत्रविसर्जनासारख्या बाबीचे वर्णन तपशीलवार आले आहे. ते वर्णन टाळले असते तरी आशयाला धक्का लागला नसता. तसेच संपादन करताना लक्षात यायला हवी, अशी एका महत्त्वाच्या प्रसंगी नावाची गफलत झाली आहे. चारशेवर पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी संपादनात थोडी कमी करता आली असती तर चालले असते. पण या किरकोळ वाटणाऱ्या उणिवा सोडल्यास ‘दंशकाल’ ही वाचनीय कादंबरी आहे. हृषीकेश गुप्तेंची प्रवाही भाषा वाचकाला बांधून ठेवणारी आहे. राजहंस प्रकाशनातर्फे उत्तम निर्मिती मूल्यासहित प्रकाशित या कादंबरीचे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी साकारलेले मुखपृष्ठ त्यांनी साकारलेल्या आजवरच्या  उत्कृष्ट मुखपृष्ठांपैकी एक आहे. आजकाल वाचकांचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होतो आहे असे म्हणतात. अशा काळात चारशे पानांची विस्तृत कादंबरी लिहिणे हे एक धाडसच म्हणायला पाहिजे. सरतेशेवटी, माणूस कितीही प्रगत झाला तरी त्यातला पशू फारसा नष्ट झालेला नाही. ‘दंशकाल’च्या निमित्ताने वाचक माणसाचा हा बीभत्स  चेहरा निरखू शकतो, वासनेच्या विहिरीत डोकावून बघू शकतो.
 
पुस्तकाचे नाव : दंशकाल
लेखक : हृषीकेश गुप्ते
प्रकाशन : राजहंस प्रकाशन
मूल्य :  ५०० रू./-
 
- जुई कुलकर्णी, पुणे 
juijoglekar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...