आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीसाठी मी काय करते?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेशी निगडित दोन गोष्टी या महिन्यात घडत आहेत. एक म्हणजे बडोदा येथील ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ आणि २७ फेब्रुवारीला येणारा ‘जागतिक मराठी भाषा दिन.’ हे दोन्ही उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होतील आणि पुन्हा वर्षभर जैसे थे परिस्थिती राहणार यात शंकाच नाही. मुळात आजच्या समाजाला भाषा विषयाचे गांभीर्यच कळत नाही तेव्हा भाषेची चळवळ चालविताना खूप काही करावे लागणार आहे हे गेल्या दोन वर्षांपासून अनेकांशी चर्चा करताना लक्षात येत गेले.


मला माझे नातलग व मैत्रिणी हमखास दोन प्रश्न विचारतात. तू नाशिक, पुणे व वर्धा अशा तिन्ही ठिकाणी राहतेस, तुला करमतं का? आणि दिवसभर काय करतेस? 


माझी या दोन प्रश्नांची उत्तरे वरील दोन्ही उत्सवांशी निगडित आहेत. मराठी भाषेसाठी हे दोन उत्सव साजरे करणारे जे करतात ते सोडून मी माझे काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्ध्याला महिन्यातले जे काही दहाबारा दिवस राहत असते तेव्हा मी माझ्या घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांकडे, गल्लीतल्या व त्या परिसरातील बायकांना भेटून वाचनाचे व मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते. जवळजवळ सत्तर टक्के घरातील मुलंमुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत आहेत. मी जेव्हा घरोघरी जाऊन घरातील सदस्यांना काही प्रश्न विचारते, तेव्हा सगळ्याच प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ या एकाच शब्दात आलीत. जवळजवळ सगळ्यांचे मत होते की टीव्हीवर सगळे काही कळत असते तेव्हा पुस्तक वाचण्याची काही आवश्यकता वाटत नाही. टीव्हीच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढणे किती आवश्यक आहे व वाचनाकडे वळवणे हे खरेच एक मोठे आव्हान आहे. प्रियांका, रेखा, सपना या मुली मराठी व अर्थशास्त्र विषय घेऊन एमए करत आहेत. परंतु या मुलींनी आजपर्यंत एकही कादंबरी, कथासंग्रह, नाटक, असे कुठलेही साहित्य वाचले नाही हे कळले, तेव्हा आश्चर्य वाटले. याउलट इयत्ता सहावी शिकलेल्या वयाची साठी पार केलेल्या मंगला देवकर व इयत्ता दहावी शिकलेल्या रेखा वानखेडे या दोघी आजही पुस्तके वाचतात. किशोरवयीन मुलांना व महाविद्यालयीन युवकांना वाचनाकडे वळवण्याचे काम शाळा, महाविद्यालयातून व कुटुंबातून होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयातून ग्रंथालये विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडी असावीत. कारण अनेक ठिकाणी  ग्रंथपालांना पुस्तके आरामात कपाटात पडून राहण्यातच स्वारस्य असते. तसेच अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या शाखेतील पुस्तके विद्यार्थ्यांना न देणे हा एक अफलातून नियम. शाळा, महाविद्यालयात मान्यवर साहित्यिकांना व्याख्यानासाठी आमंत्रित न करता एखाद्या ओळखीतल्या व्यक्तीलाच आमंत्रित करून रटाळ भाषण ठोकायला सांगून विद्यार्थ्यांना व्याख्यान ऐकणे म्हणजे बोअर काम वाटून एक प्रकारची शिक्षा देण्यासारखे होय. अवांतर वाचनाचे महत्त्व भाषा विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले पाहिजे. तसेच कोणती पुस्तके वाचावीत यांचा वेळोवेळी उल्लेख केला तर मोठेपणी हेच विद्यार्थी पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर हमखास एखादे तरी पुस्तक विकत घेऊन वाचतात नि मग हळूहळू वाचनाची आवड मूळ धरू लागते. 


वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील प्राध्यापिका स्नेहल कावळे यांच्याशी वरील मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनीही वाचन चळवळीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला याचा विशेष आनंद झाला. जयश्री वानखेडे, धैर्यशालिनी जळीत, वीणा चंद्रकांत कावळे, प्रियांका कोल्हे, लक्ष्मणराव देवकर, पल्लवी मेस्त्री, श्रीमती ठाकरे या सर्वांनी आपल्या मुलं व नातवंडांसाठी गोष्टींची पुस्तके विकत घेऊन त्यांना वाचून दाखविण्याविषयी उत्सुकता दाखविली. अशा प्रकारे वर्ध्यात वाचन चळवळ रुजवण्याचा छोटासा उपक्रम चालू आहे. पुढच्या टप्प्यात प्रश्नावली भरून या उपक्रमाला शिस्तबद्ध स्वरूप देण्याचा विचार आहे . 


पुण्यात असते तेव्हा अामच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सोनाली पवार कापसे या महिलेला लिहायला व वाचायला शिकविण्याचे काम चालू आहे. तिला साक्षर करणे हा एक आनंददायी अनुभव आहे. तसेच आमच्या नात्यातील सर्व नातलगांना व मैत्रिणींना मी दोनतीन हजारांची साडी किंवा ड्रेस खरेदी केल्यानंतर एखादे तरी दोनतीनशे रुपयांचे पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन करीत असते आणि जवळजवळ सर्वचजण सहकार्य करीत असतात, दोनतीन अपवाद सोडता.


छोटंसं काहीतरी करायचं, फोटो काढून वृत्तपत्रात छापून आणायचा आणि प्रसिद्धी मिळवायची, अशा या आजच्या युगात शांतपणे आपापल्या पद्धतीने जमेल तसे व जेथे जाऊ तेथे काम करीत राहणारे माझ्यासारखे अनेकजण असतील. शेवटी आपण करीत असलेल्या कामातून समाधान मिळणे महत्त्वाचे.

 

- ज्योत्स्ना पाटील, नाशिक
jdpatil25@gmail.com

बातम्या आणखी आहेत...