आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नवरा अनेक नवरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


बहुभर्तृकत्व हा शब्द आपल्यातील बहुतांश लोकांना माहीत नसणार. बहुभार्या किंवा बहुपत्नी मात्र नक्कीच माहीत असणार. पुरुषाने एकाहून अधिक लग्नं करणं समाजमान्य होतं, तसं स्त्रीने एकाहून अधिक लग्नं करणं मान्य तर नव्हतंच, पण अशी कल्पनाही लोकांनी कधी केलेली नव्हती, असंच प्राचीन संदर्भ शोधताना जाणवतं. ज्यात बहुभर्तृकत्वाच्या रूढीचा स्पष्ट निर्देश केला आहे, असे एकही वेदवचन दाखविता येणार नाही. संस्कृत वाङ्मयातील बहुभर्तृकत्वाचे ठळक उदाहरण पाच पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीचे आहे. त्या विवाहाच्या वेळीही ती गोष्ट अपूर्व वाटली आणि ती टाळण्याविषयी धृष्टद्युम्नाने जोराचा प्रयत्न केला होता, असे महाभारतात (आदि. १९५.२७। २९) वर्णन केले आहे. त्या वेळी आपली, आपल्या भावांची, आईच्या निर्णयाची आणि द्रौपदीची बाजू मांडताना युधिष्ठिराला आपल्या निश्चयाच्या समर्थनार्थ जवळजवळ दंतकथेच्या स्वरूपाचे असे फक्त दोनच पूर्वीचे दाखले सांगता आले, असा उल्लेख धर्मशास्त्राच्या इतिहासात केलेला आहे. ( पूर्वार्ध; पृ. २२६)


पत्नी नसेल, तर पुरुषाच्या जेवणखाणापासून यज्ञयागापर्यंत अनेक गोष्टींचा खोळंबा होतो; पण पती नसल्याने पत्नीचे असे काही अडत नाही, कारण तिला मुळी स्त्री जन्माला आल्याने अनेक अधिकारच नसतात. उदाहरणार्थ तैतरीय ब्राह्मणात (३.७.१) असे सांगितले आहे की, ज्या यज्ञकर्त्याची पत्नी ऋतुमती असल्यामुळे यज्ञाच्या दिवशी उपस्थित नसते, त्या दिवशी केलेल्या त्या यज्ञाचा अर्धा भाग नष्ट होतो. परंतु पत्नीला पतीविरहित एकटीने अथवा त्याच्या अनुमतीशिवाय स्वतंत्रपणे धार्मिक कृत्ये करण्याचा अधिकार नसतो. (मनु. ५.१५५).


म्हणजे पत्नी ऋतुमती असल्याने धार्मिक कृत्य अडते, या एका कारणास्तवदेखील पुरुष दुसरं, तिसरं वगैरे लग्न करू शकतो. पण स्त्री ऋतुमती होते, याच कारणाने तिला धर्माने ‘अपवित्र’ ठरवून अनेक धर्मकृत्यांचे अधिकार नाकारले असल्याने तिनं दुसरं लग्न करण्याची निदान धार्मिक कारणास्तव तरी गरज उरत नाही.


जर एखाद्या पुरुषाने अनेक स्त्रिया केल्या असल्या तर त्या स्त्रियांपैकी कोणाला अग्रमान द्यावयाचा याविषयी अनेक नियम धर्मशास्त्रात दिले आहेत. (विष्णु ध. सू. २६.१। ४). उदाहरणार्थ, जर सर्व स्त्रिया एकाच जातीच्या असतील तर जिचा विवाह प्रथम झाला असेल तिने सर्व धर्मकृत्यात पतीबरोबर भाग घ्यावा. भिन्न भिन्न वर्णांच्या स्त्रिया असल्यास पतीच्या समान वर्णाची स्त्री जरी तिचा विवाह मागून झालेला असला तरी पतीच्या बरोबर सहकार्य करते. द्विजातीयांपैकी कोणीही आपल्या शूद्र स्त्रीसह धार्मिक विधी करू नये. जरी ज्येष्ठ पत्नीलाच फक्त धर्मकार्यात भाग घेण्याचा अधिकार असला तरी (शूद्र स्त्रीखेरीज) सर्व स्त्रियांचे दहन श्रौत अग्नीमध्ये करावे. (याज्ञ. १.८८ वरील विश्वरूपटीका). समान जातीच्या पत्नीला आवश्यक अशा धार्मिक विधीतच नव्हे तर पतीच्या शारीरिक शुश्रूषेतदेखील अग्रमान द्यावा आणि समान वर्णाची स्त्री समीप असूनही जो ब्राह्मणजातीचा पती अशी कृत्ये अन्य वर्णाच्या स्त्रीकडून करवून घेईल तर तो चांडालासमान होतो (मनु. ९.८६। ८७).


पुत्रहीन स्त्रीला दुर्दैवाने पछाडलेले असते असे शतपथ ब्राह्मणामध्ये (५.३.२.२)  म्हटले आहे. स्त्रियांची उत्पत्ती प्रजोत्पादनाकरिता झालेली आहे आणि पुरुषांना वंशवृद्धी करावयाची असते. याकरिता स्त्री धार्मिक कृत्ये करण्यात आपल्या पतीच्या बरोबरीने भाग घेत असते. (मनु. ९.९६). स्त्रियांच्या आयुष्याच्या ध्येयाविषयी अशी कल्पना असल्या कारणाने आणि पुत्राचे अत्यंत महत्त्व मानले असल्याकारणाने स्मृतींनी आणि धर्मसूत्रकारांनी पहिली स्त्री जिवंत असताही पुरुषाने दुसरा विवाह करावा अशी शिफारस केलेली असते अथवा तसे करण्यास पुरुषाला परवानगी दिलेली असते. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २२८)


लैंगिक सुख हा विवाहातील मुख्य भाग. पण तो विषयदेखील पुरुषांसाठी राखीव. आपल्या लैंगिक गरजांविषयी, आवडीनिवडींविषयी स्त्रीने बोलणं म्हणजे आजही लोकांना पाप वाटतं. हा मोठा दुटप्पीपणा समाजात स्त्रीबाबत प्रत्येक क्षेत्रात आहेच; लैंगिकता हे तर त्यातलं सर्वोच्च टोक. पती नपुंसक असला, जातिबहिष्कृत असला, अवयवहीन, विषयलंपट अथवा सद्गुणहीन इत्यादी असला तरीदेखील सदाचारसंपन्न पत्नीने त्याला देवासमान मानून त्याची सेवा करावी; (स्मृतिचंद्रिका व्यव. पा. २५१). पती हाच पत्नीचा देव आणि स्वामी असतो आणि पतीची सेवा केल्याने तिला सर्वश्रेष्ठ अशा स्वर्गाची प्राप्ती होते; (रामायण - अयोध्या. २४.२६। २७)


असे उद्गार निरनिराळ्या ग्रंथांत आले आहेत. 
पत्नीच्या इतर अनेक कर्तव्यांसोबत लैंगिक इच्छा दडपून ठेवणे हाही तिचा एक ‘गुण’ मानलेला आहे. उदाहरणार्थ, पत्नीने नेहमी सच्छील वर्तन करावे आणि आपल्या इंद्रियांचे नियमन करावे (स्मृतिचंद्रिका व्यव. पा. २५७). पद्मपुराणात (सृष्टिखंड ३७-५५) म्हटले आहे की, जी पत्नी काम करण्याच्या बाबतीत एखाद्या गुलामाप्रमाणे वागते, रतिसुखाच्या बाबतीत एखाद्या योषितेप्रमाणे पतीला सुख देते, पतीला भोजन घालण्यात त्याच्या मातेप्रमाणे त्याची काळजी घेते, आणि संकटकाळी पतीच्या सल्लागाराप्रमाणे वागते तिलाच पतिव्रता अशी संज्ञा असते. स्त्रियांनी चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून स्त्रियांचे नियंत्रण करणे अवश्य असते; ह्यास्तव पतीने पत्नीवर प्रेम करावे (याज्ञ १.८१). 


पतीने तिच्या चरितार्थाची सोय करून ठेवली नसली तर पत्नीने ज्या व्यवसायात काही दोष नसतो असा (सूत काढण्यासारखा) व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करावा (मनु. ९.७४।७५). तसेच पती परदेशी असताना स्त्रीने शरीर सुशोभित करू नये, पोटभर भोजन करू नये, शरीर कृश करावे, पतीवर निष्ठा ठेवून असावे (वेदव्यासस्मृती २.५२) अशासारखे नियम सांगितलेले आहेत. (धर्मशास्त्राचा इतिहास; पूर्वार्ध; पृ. २२९)

 

पुरुषाने केलेला पुरुषार्थ आणि स्त्रीने केलेला व्यभिचार... हे म्हणण्याचा दुटप्पीपणा समाज सोडेल, तेव्हा कुठे स्त्रियांना थोडे बरे दिवस दिसू लागतील.

 

- कविता महाजन, वसई 
kavita.mahajan2008@gmail.com

बातम्या आणखी आहेत...