आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळदी कुंकवाचा कपाळी पडला डाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.


विधवा स्त्रीच्या पुनर्विवाहास मान्यता नसणे ही अनेक जातींमधली सामाईक बाब होती. पूर्वी ‘पुनर्भू’ ही संज्ञा त्यासाठी वापरली जात असे. प्रामुख्याने पुनर्विवाह करणाऱ्या विधवांना पुनर्भू म्हटले जाई. 


अशा स्त्रियांचे तीन प्रकार नारदाने सांगितले आहेत  - 

प्रकार १. जिचे पाणिग्रहण झालेले असते, परंतु विवाहविधी (पतिसंयोगाने) पुरा झालेला नसतो अशी कुमारिका; हिच्याबाबत विवाह विधी पुन्हा एकदा करावा लागतो.


प्रकार २. आपल्या पूर्ववयातील पतीचा त्याग करून जी स्त्री दुसऱ्या एखाद्या पुरुषाचा स्वीकार करते आणि नंतर पुन्हा आपल्या पहिल्या पतीच्या घरी राहण्यास येते ती स्त्रीदेखील पुनर्भू म्हणवते.


प्रकार ३. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीचे अनेकदा दिराशी लग्न लावले जाते. मात्र, तिला दीर नसेल तर तिचे नातलग एखादा सपिंड वा सजातीय पुरुष शोधून तिला त्याच्या स्वाधीन करतात. यात लग्न लावले जात नाही, केवळ अपत्यप्राप्तीसाठी वापरली जाणारी ही नियोग पद्धती आहे. त्यासाठी कुठल्याही धार्मिक विधीची आवश्यकता नसते. 


बौधायन धर्मसूत्रात (२.२.३१) म्हटले आहे की, क्लीव अथवा बहिष्कृत अशा पतीचा त्याग करून जी स्त्री दुसरा पती वरते, अशा स्त्रीचा पुत्र तो पौनर्भव होय. १. पती हरवला, बेपत्ता वा नष्ट झाला, २. मरण पावला,  ३. संन्यासी झाला, ४. क्लीब निघाला किंवा ५. पापकृत्य केल्याने जातीने वाळीत टाकला, तर अशा या पाच संकटांमध्ये स्त्रियांना दुसरा पती करण्यास शास्त्राची संमती आहे, अशा अर्थाचा एकच श्लोक सापडतो, तो पुढीलप्रमाणे आहे - 
नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ।
पंचस्वापत्सु नारीणा पतिरन्यो विधीयते।।  
हा श्लोक निरनिराळ्या ग्रंथांमध्ये दिला असून त्याचे विविध अर्थ लावण्यात आले, त्यातले बहुतांश अर्थ पुरुषांच्या सोयीचे होते. तरीही त्यावरून बरेच वादविवाद झाले. पैकी काही युक्तिवाद फार मजेशीर होते.

 
“हा श्लोक अन्य युगातील समाजाला अनुलक्षून सांगितला असून तो कलियुगाला लागू पडत नाही,” असं प्रतिपादन काहींनी केलं. (परा. माध. २.१ पा. ५३) 
पती या शब्दाचा अर्थ पालनपोषण करणारा, पालक असाही होतो, असा अर्थांचा खेळ करत मनूने (५.१६२) प्रतिपादित केलं की, साध्वी स्त्रियांना दुसरा पती असल्याचा उल्लेख शास्त्रात कुठेही केलेला नसून अनेक प्रकारच्या विवाह विधींमध्येदेखील विधवांच्या पुनर्विवाहाविषयी अजिबात उल्लेख नाहीये. (मनु. ९.६५). 
पाणिग्रहणाच्या वेळचे वैदिक मंत्र फक्त कुमारिकांनाच लागू पडतात, असं मनुस्मृतीत नोंदवलेलं आहे. (८.२२६). मनूला पुनर्विवाह मान्य नव्हता. एखाद्या विधवेचा विवाह वैदिक मंत्रांचे  उच्चारण करून लावला, तरीही तो विवाह धर्मसंमत ठरत नाही, असं त्याचं मत होतं. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगात मनूनेदेखील पुनर्विवाहास संमती दर्शवली आहे. 


ब्रह्म पुराणात म्हटलं आहे की, विधवांचा पुनर्विवाह कलियुगात वर्ज्य राहील. मात्र, अपरार्काने उद्धृत केलेल्या ब्रह्मपुराणामधल्या एका वचनात असे म्हटले आहे की, एखादी मुलगी बालविधवा झाली तर तिचा विवाह संस्कार पुन्हा करावा आणि ज्या मुलीचा कोणी बलात्काराने त्याग केला असेल अथवा तिला पळवून नेली असेल, तरीही तिचा विवाह संस्कार पुन्हा करता येतो.


यदि सा बालविधवा बलात्त्यक्ताथवा क्वचित्।
तदा भूयस्तु संस्कायर गृहिता येन केनचित्।। 
अथर्ववेदाच्या काळात मात्र स्त्रियांच्या पुनर्विवाहाला प्रतिबंध नव्हता. गृह्यसूत्रांत पुनर्विवाहाबद्दल काहीही सांगितलेले नाहीये. या काळात तुरळक का होईना, पण पुनर्विवाह होत होते, तथापि अशा विवाहांना तुच्छ, कमी लेखण्याचा आणि पुनर्विवाह करणाऱ्या स्त्रियांकडे तिरस्काराने बघण्याचा, त्यांना टोचून बोलण्याचा आणि प्रथमविवाहित स्त्रियांपेक्षा त्यांना दुय्यम स्थान देण्याचा पायंडा मात्र याच काळात पडण्यास सुरुवात झाली असावी. हे अर्थातच प्रामुख्याने ब्राह्मण व तत्सम जातींमध्ये घडत होते; त्या काळात जे इतर तीन वर्ण व त्यातील जाती होत्या, त्यांच्यात मात्र पुनर्विवाह सर्रास होत असत. तरीही कुमारिकेच्या विवाहाचा दर्जा या विवाहांना या बाकी जातींमध्ये देखील मिळत नसेच, तो हलक्या दर्जाचाच मानला जाई आणि त्यामुळे अधिक लोकांना आमंत्रण देता, घरच्या घरी, रात्रीच्या वेळी असे ‘पाट लावण्या’चे प्राथमिक विधी उरकले जात. विधवा आणि घटस्फोटिता दोन्ही प्रकारच्या स्त्रियांना पाट लावता येत असे. ‘पाटकर आणि हटकर’ अशी त्याबाबत तुच्छता दाखवणारी म्हणदेखील प्रचलित आहेच. पण सतीची प्रथा मात्र या जातींमध्ये नव्हती. 


धर्मशास्त्रात असे सांगितले आहे की, “ऋग्वेदातील (१॰.१८.७। ८) आणि अथर्ववेदातील काही वचनांचे भिन्न (अथर्व. १२.२.३१; १८.३.५७; १८.३.२) भिन्न अर्थ करण्यात आले आहेत आणि त्यामुळे ती वचने नियोगाविषयी आहेत अथवा विधवांच्या पुनर्विवाहाविषयी आहेत अथवा त्यात विधवांचे बलिदान करण्याच्या (म्हणजे सतीच्या) रूढीचा उल्लेख आहे याविषयी मतवैचित्र्य उत्पन्न झाले आहे. प्राचीन काळी मृताची पत्नी स्मशानात पतीच्या प्रेताच्या शेजारी निजे आणि नंतर तिला उठण्यास सांगत आणि तिला म्हणत की, “मृत्यूच्या द्वारापर्यंत पतीच्या मागोमाग जाऊन अपेक्षित असे तुझे कर्तव्य तू पुरे केलेस, आता परत फिर.” अतिशय प्राचीन काळी पत्नी आपणास पतीबरोबर जाळून घेत असे. तो प्रघात ऋग्वेदाच्या काळी पूर्णपणे नामशेष झाला होता, परंतु त्याचे वर सांगितल्याप्रमाणे प्रतीकात्मक अनुकरण करण्याची त्या वेळी चालत असे.” 


इमा नारीरविधवा: सुपत्नीराजनेन सर्पिषा संविशन्तु।
अनश्रवोऽनमीवाः सुरत्ना आरोहन्तु जनयो योनिमग्ने।।
उदीष्र्व नायराभिजीवलोकं गतासुमेतमुप शेष एहि।
हस्तग्राभस्य दिधिषोस्तवेदं पत्युर्जनित्वमभि सं बभूथ।।
(ऋ. १॰-१८-७।८.) हीच ऋचा थोड्या भेदाने – अथर्ववेदामध्येही आलेली आहे. 
आज तिचा थोडक्यात अर्थ लावायचा, तर असं म्हणता येईल की, विधवेला एक तर आपल्या दिरासोबत लग्न करावं लागे किंवा दुसरं म्हणजे मूल होण्याआधीच पती मरण पावला असेल तर तिला अपत्यप्राप्तीसाठी नियोगाचे अवलंबन करावे लागेल. सतीचा संदर्भ या काळात कुठेही दिसत नाही, तो असा. 
भ्रतार देतो शिव्या, त्याच्या शिवीचा नाही राग 
त्याच्या हळदी-कुंकवाचा माझ्या कपाळी पडला डाग    
अशा अनेक जात्यावरच्या ओव्या सापडतात. सधवा असण्याचं महत्त्व हे केवळ विधवा असण्याचा भयानक जाच नको म्हणून आहे, हे या स्त्रीमानस व्यक्त करणाऱ्या ओव्यांमधून उलगडतं.

 

कविता महाजन, वसई

kavita.mahajan2008@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...