Home | Magazine | Madhurima | Kavita Mahajan writes about history of women

यादवकाळाचा अस्त ते पेशवाईचा अस्त

कविता महाजन, वसई | Update - Jun 19, 2018, 03:00 AM IST

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल

 • Kavita Mahajan writes about history of women

  भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

  महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती ही यादवकाळाच्या अस्तापासून पेशवाईच्या अस्तापर्यंत, म्हणजे सुमारे पाचशे वर्षांपर्यंत सर्वसाधारणपणे एकसारखी होती. (मराठ्यांचा इतिहास, खंड १; ग.ह. खरे) त्यामुळे राजवटी बदलत गेल्या तरीही सर्वसामान्य माणसांच्या जीवनात, अर्थातच सर्वसामान्य स्त्रियांच्या जीवनातही, या काळात विशेष बदल झालेले आढळत नाहीत. ऐतिहासिक नोंदी आणि उपलब्ध प्रकाशित साहित्य व संकलित केले गेलेले लोकसाहित्य यांतून याचा शोध घेता येऊ शकेल.

  मुळात स्त्रियांबाबतचे उल्लेख इतिहासात अगदीच कमी सापडतात. त्यातही मुगलांच्या आगमनानंतरच्या काळातच लिखित नोंदी ठेवण्याचा प्रघात सुरू झाला. अगदीच मोजक्या लोकांना लिहितावाचता येई. पत्रे लिहिणे किंवा नोंदी ठेवणे, हे क्वचित होई. त्यातही राजकीय, सरकारी कामकाजाबाबतच्याच (आदेश आणि निवाडे) नोंदी असत. लढाया, चकमकी, सत्तांतरे या गोंधळात तीही कागदपत्रे व्यवस्थित राखली गेली नसावीत.


  चौदाव्या शतकाचा मध्य ते सतराव्या शतकाचा मध्य हा तीनेकशे वर्षांचा काळ महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा होता. त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलाढाली झाल्या. सतराव्या व अठराव्या शतकाबाबत इतिहासाचा धांडोळा घेतला, तर एकुणातच स्त्रियांविषयीचे, त्यांच्या कर्तृत्वाविषयीचे, त्यांच्या प्रश्नांविषयीचे, त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी उल्लेख अत्यल्प आढळतात. त्याविषयीचे काही अभ्यास अलीकडच्या काळात मराठीत झाले आहेत. सतरावे शतक शिवकाल व अठरावे शतक पेशवाई म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ओळखले जाते.


  बहुसंख्य समाज खेड्यांमधून राहणारा व शेती कसणारा होता. गावचा अधिकारी असलेला पाटील, लिखापढीची कामे करणारा कुलकर्णी आणि चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव कोळी हे बारा कारू किंवा बलुतेदार; व तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डौऱ्या, भाट, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाना, वाजंत्री, घडसी, कलावंत, तराल किंवा कोरबु, भोई हे अठरा नारू किंवा आलुतेदार अशी समाजाची व्यवस्था असे. जातीनुसार निश्चित केलेले कार्यक्षेत्र, मर्यादित संधी आणि शेतीशिवाय दुसरा मोठा उद्योग नसणं यांमुळे राजकारण आणि रणांगण ही दोन क्षेत्रे वगळता इतर कोणत्याही कामात गुणवत्ता मोजली जात नसे. त्यामुळे राजकारणात व रणांगणावर तळपलेल्या मोजक्याच स्त्रियांचे उल्लेख ऐतिहासिक नोंदीमध्ये सापडतात. कौटुंबिक प्रश्न, जमिनींचे तंटे व इतर समस्यांचा निवाडा करण्यासाठी या सर्व जातींच्या जातपंचायती असत आणि या कोणत्याही जातीच्या जातपंचायतीत स्त्रियांचा समावेश नसे. शिवकालातील काही नोंदींमध्ये स्त्रियांच्या साक्षी महत्त्वाच्या मानून निवाडे केल्याचे उल्लेख सापडतात. त्यानुसार विशिष्ट गटातील काही स्त्रियांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान होते, असे म्हणता येऊ शकेल.


  इतिहासाने अठराव्या शतकात ज्यांची नोंद घेतली, त्या स्त्रिया मुख्यत्वे मराठा व ब्राह्मण या दोन जातींमधल्या होत्या. यांपैकी मराठा स्त्रियांच्या स्वभावात व वर्तनात आक्रमक वृत्ती भरपूर प्रमाणात आढळली, तर ब्राह्मण स्त्रिया मागे राहून दुय्यम स्थान स्वीकारून वागत असलेल्या आढळल्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर जेव्हा राज्यकारभारात ब्राह्मण पेशवे हे मराठा छत्रपतींहून वरचढ झाले तेव्हा मराठा वतनदार स्त्रियांचे महत्त्व पेशव्यांनी पद्धतशीरपणे कमी केले. ब्राह्मणी संस्कृतीचे वर्चस्व समाजावर निर्माण झाले, परंतु तरीही ब्राह्मण स्त्रिया दुय्यम स्थानावरच राहिल्या. (शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा; नीलिमा भावे; प्रास्ताविक, पृ. सात व आठ)


  संस्कृतिकोशात एक नोंद अशी मिळाली की, ‘क्षत्रिय हे आपले जमात-रूप ध्यानात ठेवून ब्राह्मण जमातीशी वागत होते व ब्राह्मणांचा अनेक प्रकारचा छळ त्यांच्या हातून होत होता, असे अथर्ववेदावरून चांगले ध्यानात येते. ब्राह्मण स्त्रीचे अपहरण केल्यामुळे त्याचे काय विपरित परिणाम झाले, ते अथर्ववेदात (५.१७) सांगितले आहे, त्याचा सारांश असा - ‘ब्राह्मण स्त्री ही राज्य दग्ध करून टाकते. तिचे अपहरण केल्याने ती भयंकर बनते. सर्वत्र दुःख उत्पन्न करून ती अनेक आपत्तींना जन्म देते. सत्य जाणणारे राजे अशा अपहृत स्त्रीला परत परत करतात. सोमराजाने ब्राह्मणाची स्त्री प्रथम परत केली. नंतर इतर अनेकांनी तसेच केले. ज्यांनी तसे केले, ते उर्जित झाले. ज्यांनी ते केले नाही, त्यांचे घर सुखी राहिले नाही. त्यांचे गोठे, पाकगृहे, बागा, रथ, शेती इ. सर्वांचाच नाश झाला.’ (भारतीय संस्कृतिकोश, खंड पाचवा. पृ. ४२९) हे स्त्रियांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून रचलेले आहे, हे स्पष्ट आहे. ब्राह्मणाची हत्या करू नये या बाबत जशी धाक दाखवणारी विधाने प्राचीन साहित्यात दिसतात, त्याचीच ही ब्राह्मण स्त्रीबाबतची आवृत्ती आहे.


  एकुणात ब्राह्मण स्त्रियांमध्ये हा फरक दरम्यानच्या शतकांमध्ये पडत गेला, असे म्हणता येईल. त्याची कारणेही काही फार निराळी नाहीत. ‘व्यावहारिकदृष्ट्या वेदशास्त्र धारण करणारे ब्राह्मण दुर्बळ; कारण ते अल्पसंख्य, एकाकी व धनाने कमजोर. शस्त्रधारी क्षत्रिय प्रबळ; कारण ते बहुसंख्य, संघटित व संपन्न. शास्त्र व शस्त्र यांच्या योजनापूर्वक सहकार्याने आणि समतोल संगोपनाने संस्कृतीचे संवर्धन होते,’ असा समाजशास्त्राचा सिद्धांत आहे. या दोन शक्तींचा तोल बिघडला व तो आजही, जाती-धर्मांचे संदर्भ वगळून पाहिले, तरीही बिघडलेलाच आहे, असे म्हणता येईल. उलट प्राचीन साहित्यात जातींच्या अभिमानाची मुळे शोधत अनेक नवे वादंग सुरू करण्यात आले.

  - कविता महाजन, वसई
  kavita.mahajan2008@gmail.com

 • Kavita Mahajan writes about history of women

Trending