Home | Magazine | Madhurima | Kavita Mahajan writes about the history of women

परमुलखात बायकोपोर न धरावी।

कविता महाजन, वसई | Update - Jun 05, 2018, 07:39 AM IST

भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिल

 • Kavita Mahajan writes about the history of women

  भारतीय स्त्रीजीवनाचा इतिहास, विज्ञानाने सुसह्य केलेला स्त्रीचा वर्तमान आणि आशादायी भविष्यकाळ यांच्याकडे नीट निरखून पाहिलं तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात आणि सुखं वाट्याला येऊ शकतात. त्रिकालातील स्त्रीजीवनाचा वेध घेणाऱ्या सदरातला हा लेख.

  स्मृतिकाळापासून स्त्रियांना शूद्र लेखले जाऊ लागले. परकीय आक्रमणांमुळे स्त्रियांबाबतचा अनुदार दृष्टिकोन वाढत गेला. यादवकाळापर्यंत स्त्री जीवन पूर्णतः परावलंबी बनले. लीळाचरित्रामध्ये तत्कालीन स्त्रीजीवनाचे जे चित्र तुकड्यातुकड्याने दिसते, ते पुष्कळ काही सांगून जाणारे आहे. बालविवाहाचा प्रश्न, परित्यक्तांचे प्रश्न, विधवा स्त्रियांना मिळणारी वाईट वागणूक असे अनेक प्रश्न या काळात टिपेला जाऊन पोहोचले होते. खुद्द करणाधिप हेमाडपंताची राणी देमती उपेक्षित परित्यक्तेचे जीवन जगत होती. स्त्रियांचे कष्ट, सासुरवास, हालअपेष्टा यांची अनेक वर्णनं लीळाचरित्रामध्ये आढळतात.

  सतीची चाल वेदकालीन नव्हती. ती शक लोकांनी भारतामध्ये रूढ केली असे काही संशोधकांचे मत आहे. यादवपूर्व काळात ती अस्तित्वात होतीच आणि प्रतिष्ठाही पावली होती. रामदेवराव यादवाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी कामाईसा हिला स्वतःच्या इच्छेविरुद्ध सती जावे लागले होते.
  विधवांचे आयुष्य बिकट होते. त्यांचे केशवपन केले जाई. त्यांनी कुटुंबीयांची सेवा आणि परमार्थसाधना करण्यातच आपला वेळ व्यतीत करणे बंधनकारक होते. प्राचीनकाळापासून सुरू असलेला वेश्याव्यवसाय यादवकाळातही महाराष्ट्रात होता.
  सोळाव्या - सतराव्या शतकात राजकीय विवाहांची संख्या या काळात बऱ्यापैकी वाढली. हिंदू स्त्रिया मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पत्नी बनवल्या गेल्या. अर्थात यात त्या स्त्रियांच्या इच्छाअनिच्छेचा प्रश्नच नसे.
  हिंदू-मुस्लिमांवर एकमेकांच्या राहण्यावागण्याचे प्रभाव पडले. त्यातून मुस्लिम स्त्रियांनी साड्या नेसणे सुरू केले आणि हिंदूंनीही गोषा पद्धतीचा स्वीकार केला.
  मुस्लिम आक्रमणानंतर बालविवाह महाराष्ट्राच्या भूमीत पक्का रुजला. त्यातूनच विषमविवाहदेखील होऊ लागले. बहुपत्नीकत्वाची चाल तर आधीच अस्तित्वात होती. प्रौढ, वृद्ध पुरुष आणि ७ ते ९ वर्ष वयाच्या मुलींचे विवाह सर्रास होत असत. लग्नांमधले देणेघेणे, मानपान आणि थाटमाटही खूप वाढला. या काळात सती प्रथेनेही महाराष्ट्रात चांगलेच मूळ धरले होते.

  शिवकालामध्ये बालविवाह, बहुपत्नीकत्व, सती या प्रथा सुरूच राहिल्या. जिजाबाईही सती जाणार होत्या, पण शिवरायांच्या हट्टामुळे या विचारापासून परावृत्त झाल्या. विधवांची स्थितीही जैसे थे होती. या काळात स्त्रियांच्या स्थितीत फरक पडला तो एकच... त्यांचे जीवन मुस्लिम राजवटीच्या तुलनेने निश्चितच सुरक्षित झाले होते. स्त्रियांवरील अत्याचार जवळजवळ तीन शतकांनंतर शिवकालात थांबले. स्त्रीवर्गाला स्वराज्यामुळे फार मोठा आधार व दिलासा मिळाला. ‘परमुलखात बायकापोर न धरावी’ असा शिवाजी महाराजांचा आपल्या सैन्याला सक्त आदेश होता. स्त्रियांविषयी ते आदरभाव दर्शवत असल्याने बाकी समाजावरही त्या विचाराचा प्रभाव राहिला.
  सभासद बखरीत असे म्हटले आहे की, लष्करात बायको व बटीक व कलावंतीण नसावी. जो बाळगील त्याची गर्दन मारावी. परमुलखात पोर बायका न धरावी. मर्दाना सापडला तरी धरावा. गाई न धरावी. खंडणी केल्या जागा बोलीप्रमाणे पैका घ्यावा. कोणी बदअमल न करावा. (सभासद बखर, पृ. २३)
  शेखमहंमदाच्या योगसंग्राम या ग्रंथात नोंदवल्याप्रमाणे शिवकालात मुरळ्यांची संख्या बरीच वाढली आणि वेश्याव्यवसायही प्रचलित होता. व्यभिचारी स्त्रियांना कठोर शासन केले जात असे. (योगसंग्राम, सं. वा. सी. बेंद्रे, पृ. १८४) १७०७मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम संपला.

  बाळाजी विश्वनाथ या कर्तबगार पेशव्याने शाहूची बाजू बळकट केली, मराठे सरदारांमध्ये ऐक्य निर्माण केले, शाहू-ताराबाई संघर्षातील तीव्रता कमी केली आणि मराठा मंडळ किंवा संयुक्त राज्यव्यवस्था निर्माण करून कर्तृत्ववान मराठे सरदारांना विस्तार करण्यास भारतामध्ये मोठे क्षेत्र उपलब्ध करून दिले. (महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास; पृ. २८९ - २९॰) मात्र त्यानंतरच्या काळात इ. स. १८१८ मध्ये मराठ्यांचा संपूर्ण पराभव होऊन मराठ्यांना राज्य गमवावे लागले.
  पेशवेकाळात ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले आणि ब्राह्मण-मराठा संघर्षाची सुरुवातही याच काळात झाली. ब्राह्मणांच्या पोटजातींमधले वादही वाढले. या काळात व्रते, दाने, अनुष्ठाने व तुला, मंत्रतंत्र फोफावले. पेशव्यांच्या कुटुंबातील आनंदीबाईसारखी महत्त्वाकांक्षी स्त्रीसुद्धा कैदेत असताना मुक्तता मिळवण्यासाठी मंत्रतंत्र करीत होती.
  बालविवाह, विषमविवाह याचसोबत या काळात अंगवस्त्र ठेवण्याचे प्रमाण वाढले आणि कसबिणींची / बटकींची संख्याही भरपूर वाढली. गरीब लोक मुलींची सर्रास विक्री करत.
  बहुतेक सर्व जातींच्या कुणबिणी आढळतात. कोकणामध्ये सिद्दी जातीच्या कुणबिणी असल्याचा उल्लेखही सापडतो. इंग्रज, फ्रेंच इत्यादी युरोपियन लोकही हिंदुस्थानात बटकी विकत घेत असत. त्यावरून तत्कालीन समाजात कुणबिणी विकत घेणे कमीपणाचे मानले जात नसे हे स्पष्ट होते. कुणबिणी ज्या प्रकारे विकत घेता येत त्याप्रमाणे अडचणीच्या प्रसंगी गहाणही टाकता येत. गाडेकर नावाच्या एका सद्गृहस्थाने आपली गंगा नावाची कुणबीण चिपळूणकरांकडे गहाण टाकून चाळीस रुपये कर्ज काढल्याचा दाखला मिळतो. (पेशवाईच्या सावलीत, पृ. ६४)

  कुणबिणींना गुलाम समजण्यात येत असे, त्यांना चांगली वागणूक व पैसे, कपडे, वहाणा मिळत; तथापि भावाभावांत वाटण्या होण्याचा प्रसंग आला म्हणजे इतर वस्तूंप्रमाणे कुणबिणींचीही वाटणी होई. थोडक्यात आवडत्या वस्तूसारखी त्यांची स्थिती होती. कुणबिणींना मुलांचे संगोपन, दळणकांडण, घरातली लहानमोठी कामे, शेतीतली कामे, राखणदारी कामे करावी लागत.
  पेशवाईत नृत्यगायन करणाऱ्या नायकिणीही अनेक होत्या. या स्त्रिया स्वतंत्र वृत्तीच्या असत आणि पेशव्यांच्या व इतर सरदारांच्या दरबारात नृत्यगायन करून उपजीविका चालवत. पुण्यात भारतभरातून नायकिणी येत असत.
  सती प्रथेची प्रतिष्ठा पेशवाईत अधिकच वाढली होती. विधवांची भीषण, अमानुष आणि केविलवाणी अवस्था पाहून अनेक स्त्रिया स्वतःहूनही सती जाणे पत्करत. धर्मावर गाढ श्रद्धा, पतिनिष्ठा, मोक्षप्राप्ती आणि रूढी या देखील त्यांना खुशी वा नाखुशीने सती जाण्यामागील प्रेरणा होत्या. माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई सती गेल्या होत्या.
  व्यभिचारी स्त्रियांना जातीबाहेर टाकणे, नाक कापून चेहरा विद्रुप करणे, बटकी होण्याची शिक्षा देणे, जबरदस्त दंड ठोठावणे असे कठोर शासन केले जाई. वा. कृ. भावे यांनी ‘पेशवेकालीन महाराष्ट्र’ या ग्रंथात (पृ. ४॰२ ते ४॰४) स्त्रियांचा जो आचारधर्म नमूद केला आहे त्यातील
  विवाहित व विधवा स्त्रियांवरील जाचक निर्बंध म्हणजे स्त्रियांच्या दुःखाचा आरसा म्हणता येईल.

  kavita.mahajan2008@gmail.com

Trending