आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोकांतिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलगाच हवा या रोगट मानसिकतेची मुळं अजूनही घट्ट रुतलेलीच आहेत. शहर किंवा खेडेगाव असा कुठलाच अपवाद त्याला नाही. एक स्त्री आणि एक डॉक्टर अशा दुहेरी भूमिकांची मनं हेलावून टाकणारा एक अनुभव...


‘मी काय करू? कुठं जाऊ?’
सुरेखा ढसढसा रडत होती.
ही काय अठराव्या शतकातली गोष्ट नाही. आज आताच्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्सच्या युगातलीच. सुरेखा तिसऱ्या वेळी गरोदर होती. आधीच्या दोन मुली. तिसऱ्यांदा तरी मुलगा व्हावा म्हणून देव पाण्यात ठेवले होते. गंडेदोरे बाबाबुवा सगळं झालं होतं.


पण...
आताही मुलगीच झाली.
शेतकरी अडाणी कुटुंब. सुरेखाचा नवरा अकाली विधवा झालेल्या सासूचा एकुलता एक मुलगा. आता खरी सुरेखाच्या साडेसातीला सुरुवात झाली. बाळंतपण कसेबसे माहेरी झाले खरे, पण नंतरची काळजी घेण्याचा उत्साह कोणीच दाखवला नाही. दिल्या दावणीला सुखी आणि मुकी राहा, असं म्हणतच तिची पाठवणी झाली.


तेव्हापासून सुरेखा मुकाट्यानं काम करत राहिली. तिन्ही पोरी तिच्या आगेमागे खेळत रांगत रडत धडपडत वाढत होत्या. सासूने मुलींना हात लावणं सोडून दिलं होतं. वर सुरेखा तीन मुलींना जन्म देणारी अपशकुनी बाई म्हणून तिच्या हातचं खाणही सोडलं होतं.


नवराही आईने वडलांच्या मागे आपल्याला मोठं केलं, या उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेलेला. शिवाय बायकोची बाजू घेणारा पुरुष बैलच असतो, अशा वातावरणात वाढलेला. दर दोन दिवसाआड बायकोला मारणं म्हणजेच पुरुषार्थ असतो असं मानणारा.


त्यामुळे सासूचं अजूनच फावलं होतं. त्यातच तिच्या लेकीने एकामागे एक अशा चार मुलांना जन्म दिला होता. तेव्हा माझी लेक किती थोर आणि सून कशी टाकाऊ, अशा आशयाचे टोमणे सुरेखाला उठताबसता खावे लागत. पण काही का असेना आपलं हक्काचं घर आहे, या समाधानातच गुराढोरासारखं काम करायचं. दर दिवशी कधी मारासाठी, तर कधी अत्याचारासाठी नवऱ्याला शरीर सुपूर्द करायचं असेच तिचे दिवस चालले होते. 


पण आता वेगळीच समस्या तिच्यापुढे ठाकली होती. सासूने मुलासाठी दुसरी बायको करायचा घाट घातला होता हे तिच्या कानावर आलं होतं. आता मात्र सुरेखाचा धीर सुटला. कारण चौथ्या वेळी काही केल्या तिला दिवस जात नव्हते. खरं तर तिला आता शस्त्रक्रिया करण्याची गरज होती, पण वंशाला दिवा पाहिजे, या रोगट मानसिकतेची ती बळी होती. आणि आता तर सवत डोक्यावर बसेल या भीतीपायी ती जिवावर उदार झाली होती.
‘म्याडम, कायबी करा पन मला दिवस जान्यासाठी गोल्या द्या. तरच माझा संसार व्हैल. नायतर मला इष खाऊन मरायला लागल.’


माहेरून तिच्या आईने कसेबसे गुपचूप ३०० रुपये पाठवले होते.
अशा परिस्थितीत तिच्याकडून फी घेणं पाप ठरलं असतं. औषधे घेऊन सुरेखा लगबगीनं गेली. कारण झोळीत झोपलेल्या अडीच वर्षांच्या मुलीच्या तोंडाला रडून रडून फेस आला असता तरी सासूने किंवा नवऱ्याने घेतलं नसतं याची तिला खात्री होती.
खूप दिवस तिची खबरबात कळली नाही. एक दिवस तिची शेजारीण दवाखान्यात आली. 
‘अवो म्याडम, तुमी दिल्याली औशदं घेऊन सुरेखा रस्त्यानं चालली व्हती तवा मोटरसायकलचा तिला धक्का लागला. औशदं गटारीत पडून वाया गेली. सुरेखाचा पाय मुरगाळला आन् कुट गेली व्हती आसं म्हनून नवऱ्यानी लाथानं तुडवली त्ये वेगळंच. दुसरी कोंती गरिबाची पोर त्यानं बायको करून आनलीय.’


हळहळण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाही मी.
काही दिवसांनी सुरेखाची सासू व नवरा त्याच्या नवीन बायकोला घेऊन दवाखान्यात आले. मूल राहण्यासाठी ट्रीटमेंट द्या म्हणाले.
‘त्या कुत्रीला (सुरेखाला) निस्ती पोरींचीच पिलावळ. तिचं चालचलन बी चांग्लं नवतं म्हनून दिली हाकून. आता या नव्या सूनबाईला एक पोरगा झाला म्हंजे मी डोळे मिटाया मोकळी.’


तिला आवश्यक ट्रीटमेंट मी दिलीच, पण अगदी सुन्न मनाने.
कारण सुरेखाची नंतरची हकिगत मला कळली होती.
नवीन बायको केल्यावर साहजिकच सुरेखाचा जाच वाढला. आणि त्यावर कडी म्हणजे सासूने ‘तू बदफैली आहेस’ असा तिच्यावर आळ घेतला. सुरेखा ते सहन करू शकली नाही.
दुसऱ्या दिवशी पाटाच्या कडेला तिची जोडवी आणि मंगळसूत्र सापडलं.


-  डॉ. क्षमा शेलार, बेल्हा
shelarkshama88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...