आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहले खरेच धन्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रॅज्युएट झाल्यावर जेव्हा म्हटलं की मला मराठी साहित्य घेऊन एमए करायचं आहे तेव्हा फार उत्साहाचा आनंदाचा सूर घरातून निघाला नव्हता. तो दहावीनंतर आर्ट्सला जायच्या विचारानेही निघाला नव्हताच. मग मनाविरुद्ध दोन वर्षे सायन्सचा अभ्यास करून शेवटी कर आपल्या मनासारखं अशी ‘सगळी इस्टेट नावावर करून उधळ आता’ म्हणावं त्याप्रमाणे बीए करायची परवानगी मिळाली होती. मुळातच, जे लोक काहीच करू शकत नाहीत ते आर्ट्स घेतात आणि त्यातही जे अतिशयच ‘ढ’ वर्गातले असतात, ते मराठी घेतात हा ‘आधीच मर्कट’वाला न्याय आपल्याकडे अजूनही सर्रास लावला जातो. मराठीतून एमए करून शिक्षक व्हायला बीएडचे प्रशिक्षण घ्याय्ला गेल्यावर तिथेही मराठी विषय म्हटल्यावर फार काही उत्साह कोणी दाखवला नाहीच. त्यांच्या मते, काय असतं मराठीत शिकवण्यासारखं? या समजुतीविरुद्ध भांडण्याचे धारिष्ट्य माझ्याजवळ तेव्हा नव्हतेच. सहाध्यायी मित्रमैत्रिणींच्या मते विज्ञान, गणित हे विषय महत्त्वाचे, बाकी मराठीला कोण विचारतं? ‘पुढे काही स्कोपही नाही.’ असं आपण आपल्याच मैत्रिणीपुढे बोलतोय याचीही बिचाऱ्यांना खबर नसे, भान नसे! मात्र त्या सगळ्यामुळे का कुणास ठाऊक सुरुवातीपासूनच मनात न्यूनगंड निर्माण झाला होता. मनात यायचं, आपली भाषा आपल्याला आली की तिच्यासोबत इतरही भाषा प्रसन्न होतील. बंगाली, उर्दू, इंग्रजी सहजच शिकता येईल. माझ्या भाषेतल्या माझ्या संकल्पना तर आधी मला कळू देत! पण जग त्याहून निराळं आहे, विचित्र आहे, याची तीव्र जाणीव झाली. त्यातूनही खिंड लढवत निघालेच.


नोकरीतही काही वेगळा आलम नव्हता. माझ्या सहकारी मंडळींच्या मते तर (आजही) ‘मराठी नाही शिकवलं तरी चालतं, दहावीपर्यंत शिकतातच ना मुलं. पुढे त्यांना नसते गरज. नाही घेतले पिरेड्स तरी पास होतात मुलं!’ आता मात्र थक्क व्हायची पाळी माझी होती. कॉलेजचा निकाल लागल्या लागल्या अजिबात वेळ न दवडता नोकरी लागल्याचा माझा आनंद कुठच्या कुठे हरवून गेला. त्यातून बाहेर काढलं ते माझ्या मुलांनीच आणि इतकंच नव्हे तर आजही तीच मुलं मला बळ देतात. माझी मुलं ज्या दुर्गम भागातून येतात त्याची कल्पना केली तर लक्षात येतं यांना सर्वात आधी गरज आहे ती अभिव्यक्तीची.


लहान लहान गावांतून, दूरदूरच्या आश्रमशाळांतून आलेली आणि येणारी माझी मुलं गोंडी, माडिया, तेलुगू मातृभाषा असलेली अधिक आहेत. ही मुलं स्वभावाने अतिशय शांत, हुशार, कष्टाळू असतात पण अतिशय न्यूनगंड बाळगून असतात. अचानक शहरात आल्यावर, हॉस्टेलवर राहाताना, नव्याने कॉलेजात येताना, साध्या चौकशीसाठीदेखील ती बोलायला घाबरत असतात. कारण त्यांना बोलायची भीती वाटते. 


त्यांच्या बोलण्याचे शब्द आणि हेल ऐकून कोणी हसणार तर नाही ना, याची त्यांना भीती वाटते. ही वस्तुस्थिती आहे. माझ्यापुढे दरवर्षी हे मोठं आव्हान असतं की, त्या मुलांना लवकरात लवकर संवाद साधता यावा. आणि त्यासाठी त्यांना भाषेची सोबत द्यावी! दहावीपर्यंत शिकली असतातच ती, त्यांना सगळं माहीत असतं, मात्र तरीही क्रियापदं, ळ आणि न ण चे उच्चार, काही विशिष्ट शब्द, इंग्रजीचा कमी वापर आणि बोलण्याचा आत्मविश्वास या गोष्टींमुळे फक्त ती मागे पडतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर मग मला सावकाश वाटू लागतं की नाही, बाकी कोणी काहीही म्हटलं तरी या मुलांना गरज आहे. खूप गरज आहे.


इथे झाडीबोली, कोष्टी, कुणबाऊ बोली, पोवारी या बोली चालतात. शिवाय हिंदीचा प्रभावही खूप. मराठी घरांतूनही सर्रास आणि पिढ्यान पिढ्या हिंदी बोलले जाते. त्यामुळे त्यांच्याशी बोलीभाषेचा आनंद वाढवत प्रमाणभाषेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना मजा येते. लोकसाहित्य, ओव्या, पाठ्यपुस्तकातून शिकवताना अधिकच्या गाण्यांची उजळणी, महादेवाची गाणी, भुलाबाईची गाणी यांच्या साहाय्याने प्रमाणभाषेचे पर्यायी शब्द शोधण्याचे काम मुलं उत्साहाने करतात तेव्हा आनंद होतो. आणि त्यातूनच खूप बारक्या बारक्या तर कधी मोठ्या गमती घडतात. सगळ्याच इथे सांगता येणार नाहीत. ळचा उच्चर प्रामुख्याने इथे ड असाच केला जातो. त्यामुळे ‘फडे खा,’, ‘ घोडीची भाजी’ हे उच्चार होतात.
मात्र बोलतांना बोलीच्या ड म्हटला तरी लिहिताना ळ लिहायचा याचा सराव करून घेणे फार महत्त्वाचे ठरते. तसेच अर्ज लेखन आणि कार्यालयीन मराठीच्या लेखनात तर फार थकवा येऊ लागतो. कारण मुलांना नामाप्रमाणे क्रियापद चालवताना अडचणी येतात. हे सत्य आहे!


त्यांच्याकडून त्यांच्या बोलीत निबंध लिहून घेतला तर ती खूप छान व्यक्त होतात. बोलतांनाही त्याच्या बोलीशी जवळीक साधणारं बोललं तर खुलतात. त्यामुळे नकळतच आपली त्यांच्यातली गुंतवणूक वाढू लागते. स्नेहसंमेलनात आमच्याकडे गोंडी, माडिया नृत्ये फार होतात. त्या गीतांचे अर्थ सांगा म्हटल्यावर मुलं इतकी उत्साहाने बोलू लागतात. त्यातून होणारा भाषाविकास मला शिक्षिका म्हणून महत्त्वाचा वाटतो. त्यांना दरवेळी हे मात्र आवर्जून सांगते की, ‘घरात आल्यावर आपल्या बोलीतच बोला. कारण तीव्रता त्यातच असेल. मात्र बाहेर चार लोकांत बोलायचं असेल, व्यवहार करायचा असेल तर प्रमाणभाषा वापरता आली  पाहिजे. ही खरी तयारी. बाकी धडे आणि कविता तर दरवर्षी अभ्यासक्रमात पूर्ण होतातच आणि मार्क्सही मिळतातच. आपल्याला शिकायचं हे आहे!’


अकरावी, बारावीच्या मुलांना कविता चालीत शिकवत नाही. मात्र कविता त्यांना आवडते हे कळते. ‘या जन्माला फुटे न भाषा’ ही करंदीकरांची कविता शिकवतांना मुलं इतकी उत्सुकतेने ऐकतात. डोळे चमकतात. मुली अगदी मंद हसतात, काही लाजतातही. एकदा तर एका मुलाने (गेल्याच वर्षीची बॅच) विचारलं होतं, ‘मॅडम, इतका वेळ घेऊनही त्याने सांगितलं नाही? कमालच आहे.’


प्रेमातली अव्यक्तता आजकालच्या मुलांना चकित करते. मला आठवतं, मी शाळेत असताना ‘मी जालन्याच्या शाळेत जातो’ हा पाठ शिकवताना आमच्या बाई आणि आम्ही सगळेच अगदी गहिवरून गेलो होतो. मला तेव्हा वाटायचं, आपणही शिक्षिकाच व्हायचं!


पुस्तक नवीन आले होते बारावीचे, त्या वर्षी शांता शेळके यांची ‘खांब’ कविता शिकवताना एक मुलगी अचानक रडू लागली. तिला रडू दिलं. शांत झाल्यावर म्हणाली, ‘नववीत असताना आई गेली. कविता ऐकताना वाटलं आपल्या घराला खांबच नाही.’  त्या वेळी वाटलं, नवीन मुलांना संवेदना देणारी आणि इतकेच नव्हे तर आपल्या भावना व्यक्त करायला अवकाश देणारी माझी भाषा, माझा विषय तो बिनकामाचा कसा बरं असेल?  दोन वर्षांपूर्वी माझा एक मुलगा आला भेटायला. नोकरी आणि लग्न ठरलं दोन्हीचे पेढे द्यायला. तो खूप होतकरू मुलगा होता, बारा वर्षांपूर्वीच्या माझ्या अगदी पहिल्या बॅचचा मुलगा. खूप उत्साही, खूप हसरा आणि दंगेखोर. तितकाच हळवा, हुशार. त्याचं नाव अविनाश जाधव! मला आठवतं, त्या वर्षी अकरावीला अरविंद गोखल्यांची कातरवेळ कथा अभ्यासाला होती. त्यात अाक्काचं वर्णन आलं की मुली खूप शांत बसत. ती कथाच मुलं खूप जिव्ह्याळ्याने ऐकत. कथेच्या शेवटी आक्का म्हणते, ‘अशा या कातरवेळी तू कुठे असशील रे अविनाश?’  असं म्हटल्याबरोबर हा पठ्ठा उभा झाला, ‘मी इथे आहे मॅडम,’ म्हणाला. आम्ही सगळे स्तब्ध त्याच्याकडे पाहात राहिलो. कारण सगळेच वेगळ्या विश्वात गेले होते. त्याच्या आचरटपणामुळे तोही खजील होत बसला आणि मग काही वेळाने वर्ग हसला!तो अविनाश जाधव म्हणाला, ‘बहिणीचं लग्न करीन एक वर्षाने. पण आधी तिला विचारतो, मनात काही असेल तर सांग. नाहीतर कातरवेळच्या आक्कासारखी हुरहुरत राहशील.’ मी त्याच्याकडे थक्क होत पाहात राहिले. त्याला आठवत होतं. त्याच्या मनात होती अाक्का!  आणि म्हणूनच मला जेव्हा मराठीवरून कोणी काही बोलतं तेव्हा मनात मी हे आनंद आठवते. त्याचं मोल मला आणि फक्त मलाच माहीत आहे. मराठी न शिकवता मुलं पास होतात म्हणणारे जेव्हा मराठीच्या निकालात झालेली गुणात्मक वाढ सपशेल टाळतात तेव्हा मला त्यांची खूप कीव येऊ लागते. आणि दर वर्षी या टीकाटोमण्यांनी दमलेल्या मला आपल्या उत्साहाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि सहकार्याने बाहेर काढणाऱ्या माझ्या मुलांकडे पाहून मला वाटतं, ‘जाहले खरेच धन्य, शिकवते मराठी.’


- माधवी भट, चंद्रपूर
madhavpriya.bhat86@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...