आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीविषयी जनजागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीत अभ्यासाचा, अॅडमिशनचा, मार्क मिळवण्याचा ताण बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांवर असतो. त्यावर मात करायचा मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा मार्ग असतो. वाशिममध्ये राहणाऱ्या स्नेहल चौधरीने तिच्यासाठी मार्ग शोधला होता तो गावातल्या अनाथाश्रमातल्या मुलामुलींशी गप्पा मारायचा. या गप्पांमधनं तिथल्या मुलींना हिच्याशी जवळीक वाटायला लागली अाणि त्या तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलू लागल्या. स्नेहलच्या एक दिवस लक्षात आलं की, या मुलींना मासिक पाळी आली की फार त्रास होतो. सॅनिटरी नॅपकिन सोडा, स्वच्छ कापडही मिळणं मुश्किल होतं. त्यांना याविषयी शास्त्रीय माहितीही फार नव्हती. मग तिने त्यांना पाळी म्हणजे काय ते समजावून सांगितलं. यासाठी एका डाॅक्टरांची मदत घेतली. यथावकाश ती यवतमाळमध्ये साॅफ्टवेअर इंजीनिअरिंग शिकू लागली, तेव्हाही तिने हे काम तिथे सुरू ठेवलं. आता ती मुंबईत नोकरी करते, पण जनजागृतीचं काम करतेच आहे.


यवतमाळमध्ये असताना तिला वाटायचं की, ही समस्या फक्त गावातल्या मुलींची आहे. परंतु वर्षभरापूर्वी मुंबईत आल्यावर तिला कळालं की, मोठ्या शहरांमध्येही पाळी, स्वच्छता, आरोग्य यांविषयी अंधारच आहे. बारावीपासून नोकरी मिळवण्यापर्यंतच्या काळात तिने तिच्यासारखा विचार करणारे साथी जमवले अाणि क्षितिज फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेतर्फे आतापर्यंत १५ हजारांहून अधिक मुली व महिलांपर्यंत पाळीविषयक शास्त्रीय माहिती पोचवली आहे, असं स्नेहल सांगते. सध्या फाउंडेशनकडे जवळपास २०० जणांची टीम आहे, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एकतरी व्यक्ती आहेच. हे सगळे शाळा व महाविद्यालयांमधून जागृतीचं काम करतात. पाऊण तासाचं प्रेझेंटेशन आणि नंतर किमान तासभर तरी मुलींच्या प्रश्नांना उत्तरं असं सत्र स्नेहल आणि तिचे सहकारी घेतात.


चारपाच वर्षं स्नेहल हे काम करत असली तरी तिला जाणवत होतं की, मुली, महिला पाळीविषयी बोलायला तयार होत नाहीत, त्यांना शक्यतो जाहीरपणे व्यक्त व्हायचं नसतं. मग तिने गेल्या वर्षी फेसबुकवर Bleed the silence अशी एक मोहीम चालवली. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या व काही परदेशांतल्या व्यक्तींनीही त्यांचे अनुभव या वेळी जाहीरपणे सांगितले आणि हळुहळू तिच्या लक्षात आलं की, या निमित्ताने थोडी कोंडी फुटलीय. ज्या शाळा वा संस्था बोलवतील तिथे स्नेहल वा क्षितिजमधले तिचे सहकारी जातात, खेळीमेळीच्या वातावरणात पाळीविषयी माहिती देतात. कधी कोणाला त्या संस्थेत सॅनिटरी नॅपकिन द्यायचे असतील तर ते या वेळी दिले जातात, परंतु स्नेहल त्या व्यवहारात पडत नाही.


नुकतंच क्षितिजतर्फे, युनिसेफच्या मदतीने, सांगली जिल्हा परिषदेच्या प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांसाठी  या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आलं. हे अधिकारी आता आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील व पूर्ण जिल्ह्यात त्या पाळीविषयी शास्त्रीय माहिती पोचवतील.पॅडमॅन येतोय, त्यामुळे एरवी पुरुष पाळी, नॅपकिन, पॅड हे शब्द ऐकल्यावर कान बंद करून घेतात, तसं होणार नाही, अशी आशा स्नेहलला वाटतेय. पण तिचं स्पष्ट मत असंही आहे की, पाळी आलेली असताना पॅड वा सॅनिटरी नॅपकिन वापरलेच पाहिजेत, अशी सक्ती या निमित्ताने होऊ नये. नॅपकिन कितीही स्वस्त विकले तरी गावाकडच्या मजूर रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना ते परवडणारे नाहीत. त्यांना या काळात स्वच्छता कशी ठेवावी, कापड वापरलं तर ते कशा पद्धतीने वापरावं, याची माहिती द्यावी, असं तिने बोलून दाखवलं. 


- मधुरिमा टीम
foundationkshitij@gmail.com

बातम्या आणखी आहेत...