आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य कलांचे पोशिंदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीने पहिल्या वर्षी सुमारे पंधरा हजार पृष्ठांच्या २५ खंडांची तयारी केली असून पहिल्या टप्यातील साडेसहा हजार पृष्ठांच्या बारा खंडांचे  प्रकाशन १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात होत आहे. त्यानिमित्त ‘राजाची सिंहासने बुडतात, पण मूर्ती व कला जिवंत राहतात’ असे मानणाऱ्या सयाजीरावांचा गुणग्राहक पैलू उलगडणारा हा लेख... 


राजा हा देवाचा अवतार असतो व चैन करणे हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो, असे मानण्याच्या काळात सयाजीराव ठसठशीत अपवाद होते. राज्यकोश माझा नसून जनतेचा आहे, मी त्याचा विश्वस्त आहे, असे ते मानत होते. कुटुंबातील खर्चात काटकसर करणारे महाराज गरजूंना, राज दरबारातील कलावंत, साहित्यिक व नाट्यकर्मींना मात्र,सढळ हाताने मदत करत. महाराजांना माणसाची पारख होती, योग्य माणसाला योग्य कामासाठी निवडण्याची कला होती. हिंदुस्थानातूनच नाही, तर विदेशातूनही तज्ज्ञांची ( उदा.अमेरिकेतील येल विद्यापीठातील डॉ. डब्ल्यू. ए. बोर्डेन यांना त्यांनी ग्रंथालय संचालक म्हणून नेमले. स्कॉटिश अभयंता अँडरसन यांच्या मदतीने रेल्वेलाइन उभारली. हार्वर्ड पदवीधर आर. सी. विटनेक एक्साइज कमिशनर बनले. केंब्रिजचे स्कॉलर बडोद्याचे शिक्षण मंत्री व कॉलेजचे प्राचार्य होते.) निवड करून त्यांना बडोद्यात आदराने बोलवून त्यांच्या कौशल्याचा उपयोग राज्यासाठी, रयतेसाठी ते करून घेत. ज्या होतकरू मुलां-मुलींना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात, त्याची परतफेड म्हणून आयुष्याची काही वर्षे राज्याच्या सेवेसाठी देण्याची अट घालत.  


जी राष्ट्रे जगावर अधिपत्य गाजवतात, त्याचे मूळ बलस्थान शिक्षण आहे, हे जाणून त्यांनी मुलां-मुलींसाठी प्राथमिक सक्तीच्या व मोफत शिक्षणाची प्रायोगिक तत्वावर अमरेली तालुक्यात १८९२ मध्ये सुरुवात  केली. नंतर १९०६ मध्ये संपूर्ण बडोद्यात त्याची अंमलबजावणी झाली. हे करताना सर्व विषयाच्या न्यायाने व समानतेने विचार करण्याची पात्रता, तीच खरी विद्या असे सयाजीराव मानत. साहित्य, संगीत व चित्रकला या जीवनाच्या विविध अंगांचे संवर्धन करणे हे राजप्रमुखाचे कर्तव्य आहे, असे ते समजत. इटलीतील प्रसिद्ध शिल्पकार फेलीचीला बोलवून त्यांच्याकडून अनेक सुंदर शिल्प व चित्रकलेच्या कलाकृती त्यांनी बनवून घेतल्या. सध्याच्या न्यायमंदिरमधील महाराणी चिमणाबाई प्रथम यांची इटालियन संगमरवरातून बनवलेली मूर्ती हा मूर्तिकलेचा एक अप्रतिम सुंदर नमुना आहे. फणींद्रनाथ बोससारख्या प्रसिद्ध शिल्पकाराला तसेच म्हात्रे, फडके, गोखले, कोल्हटकर या देशी मूर्तिकारांना बोलवून त्यांनी उदारमनाने राजाश्रय दिला. चित्रकार राजा रवी वर्मांना बडोद्यात बोलवून भारतीय चित्रपरंपरेचा अमोल ठेवा बनवून घेतला. रवी वर्मंाना त्यांच्या कलेचा योग्य मोबदला दिल्यावरही त्यांना ५० हजार रुपयांची थैली देऊन त्यांचा सन्मान करायला महाराज विसरले नाहीत. याबरोबरच छायाचित्रणालाही आश्रय देऊन कलाभवनमध्ये या सर्वांचे प्रशिक्षण देणाऱ्या शाखा उघडल्या. 

  
गायनकलेला उत्तेजन देताना उस्ताद फय्याज खान, मौलाबक्षसारख्या मान्यवर कलाकारांना सयाजीरावांनी राजाश्रय दिला. मौलाबक्ष १८८६ मध्ये स्थापन झालेल्या बडोद्याचा गायन शाळेचे प्रथम प्राचार्य होते. त्यांचे चिरंजीव अल्लाउद्दीन यांना शिष्यवृत्ती देऊन पाश्चिमात्य संगीत शास्त्र शिकवण्यास विलायतेस पाठवले. संगीतज्ञ भातखंडे यांच्याकडून गायन शास्त्राची पुस्तके लिहून घेतली. तंजावुरच्या नृत्यांगनेला, गंधर्व नाटक मंडळींना त्यांनी राजाश्रय दिला आणि बडोदे साहित्य आणि कलांचे माहेरघर म्हणून नावास आले. पाश्चिमात्य औद्योगिक चळवळीचे तंत्र आत्मसात केल्यानेच आर्थिक स्वातंत्र्य मिळेल हे जाणून त्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच सौंदर्याची रुची विकसित होईल, असा शिक्षणक्रम तयार करण्यावर भर देऊन ‘कला भवनांची’ निर्मिती केली. त्या वेळी सयाजीराव महाराज हे समकालीन राजांमधले एकमेव प्रज्ञावान राजा होते. इतिहास व राजकारण त्यांचे आवडीचे विषय होते. प्रसिद्ध इतिहासकार एडवर्ड गिबन यांच्या The History of the Decline and Fall of the Roman Empireया ग्रंथावर टीका असलेला महाराजा सयाजीराव यांचा From Caesar to Sultan; Being Notes from Gibbon’s Decline and Fall of The Romen Empireहा ग्रंथ १८९६मध्ये मध्ये  लंडनहून प्रकाशित झाला होता. १९३३ च्या दुसऱ्या जागतिक सर्व धर्म परिषदेला महाराजांना अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आले. अमेरिकन सरकारने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन महाराजांचे स्वागत केले. सर्वार्थाने समृद्ध, सुशिक्षित, समानता मानणारे, औद्योगिकदृष्ट्या प्रगतीने शिस्तबद्ध असे बडोदे महाराजांनी वारशात दिले. शेवटी १८९५ मध्ये शिवराम बापूजी तळपदे यांनी महाराजांच्याच मदतीने व उपस्थितीत विमान उड्डाणाचा प्रथम प्रयत्न केला. आता किमान, बडोदा विमानतळाला त्यांचे नाव देऊन साहित्य-कलांचा पोशिंदा असलेल्या एका प्रगतिशील राज्यकर्त्याचा मान राखणे का अवघड ठरावे? 


बारा खंडांचे प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीने पहिल्या वर्षी सुमारे पंधरा हजार पृष्ठांच्या २५ खंडांची तयारी केली असून पहिल्या टप्प्यातील साडेसहा हजार पृष्ठांच्या बारा खंडांचे (सयाजीराव गायकवाड ‘भाषणसंग्रह’ : दोन खंड : संपादक : डॉ. रमेश वरखेडे, सयाजीराव गायकवाड ‘पत्रसंग्रह’ : तीन खंड : संपादक : डॉ. एकनाथ पगार, सयाजीराव गायकवाड ‘इंग्रजी भाषणे’ : दोन खंड :  संपादक : प्रा. अविनाश सप्रे,  सयाजीराव गायकवाड ‘इंग्रजी पत्रव्यवहार’ : चार खंड : संपादक : डॉ. एकनाथ पगार,  गौरवगाथा युगपुरुषाची : गौरवग्रंथ : एक खंड : संपादक : बाबा भांड ) प्रकाशन १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथील साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद  तावडे यांच्या उपस्थितीत होत आहे. हे खंड शासकीय ग्रंथागार मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर येथे उपलब्ध असून प्रत्येक खंडाची किंमत केवळ एकशे वीस रुपये आहे. प्रकाशन समितीच्या औरंगाबाद कार्यालयातही वाचकांना ते उपलब्ध होऊ शकतील. 


- मंदा हिंगुराव
mandahingurao@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

 

बातम्या आणखी आहेत...