आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांसाठी उपयुक्त अॅप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतलं शिक्षण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी सुकर व्हावं म्हणून अनेक अॅप्स मोबाइलवर उपलब्ध आहेत. यातल्या काही अॅप्सची ओळख करून घेऊ.

 

क्विवर अॅप
प्लेस्टोअरवरून सदर शैक्षणिक अॅप डाउनलोड करता येते. या अॅपमध्ये आपणांस प्राणी पेशी [animal cell], वनस्पती पेशी [plant cell], ज्वालामुखी, जगाचा नकाशा असे वेबवरून प्रिंट काढून घेता येते. या प्रिंटवर खालच्या बाजूला फुलपाखरावर क्लिक केल्यास कॅमेरा उघडतो. मग निळा रंग येईपर्यंत मोबाइल प्रिंट वरखाली करावी लागते. काही क्षणात निळा रंग येतो, तेव्हा मोबाइल स्थिर धरावा लागतो. लगेचच प्रिंटमधील पेशी जिवंत होतात. यात प्रिंटवर आधारित प्रश्नदेखील सोडवता येतात. सदरील अॅपचा व्हिडिओ Manjusha Swami या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.


चित्रावरून गोष्टी
सदर शैक्षणिक अॅप तंत्रस्नेही शिक्षक सुरेशगणपत भारती यांनी तयार केलेले आहे. या शैक्षणिक अॅपमध्ये बोधपर चित्रावर आधारित सुंदर गोष्टी आहेत. सर्व गोष्टी शिक्षकांनी तयार केलेल्या आहेत. प्लेस्टोरवरून हे शैक्षणिक अॅप डाऊनलोड करून घ्या. यात ३०० गोष्टी आहेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यामध्ये मराठी विषयात शब्द दिले जातात व मुलांना गोष्टी तयार करण्याविषयी प्रश्न असतो. तेव्हा या शैक्षणिक अॅपद्वारे मदत होते. पालकांना, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना चित्रावरून गोष्टी हे शैक्षणिक अॅप नक्कीच उपयुक्त ठरेल.


मराठी शाळा
माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शाळाशाळांतून अध्ययन-अध्यापन सुरू झालेले आपण पाहतो. असे असता सर्वच शाळांना बाजारातील महागड्या संगणक प्रणाली (Software) घेणे शक्य नाही. त्यामुळे शाळेत संगणक असूनही त्याचा फारसा वापर होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. अध्यापन पाठ शाळेत तयार करण्यासाठी आवश्यक असलेले संगणक ज्ञान सर्वच शिक्षकांकडे नाही आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे साहित्य कसे मिळवावे हे समजत नाही. अनेक प्रकारचे ब्लाॅग्ज असूनही शिक्षकांना इच्छित साहित्य त्यांतून उपलब्ध होत नाही. या आणि अशा शिक्षकांच्या अनंत समस्याचे एका छत्राखाली निराकरण होण्यासाठी शिक्षक मित्र सुरेश गणपत भारती यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठी शाळा www. marathishala. in नावाची समृद्ध अशी वेबसाईट तयार केली आहे.


दप्तर अॅप
सदर शैक्षणिक अॅप तंत्रस्नेही शिक्षक सुनील आलुरकर यांनी तयार केलेले आहे. या शैक्षणिक अॅपमध्ये राज्यातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक-शिक्षिका यांनी एकत्र येऊन यात काम केलेले आहे. यामध्ये वर्गानुसार व विषयानुसार त्या त्या वर्गाचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. वापरण्यास सुलभ असे हे शैक्षणिक अॅप आहे. हे प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा. यामध्ये Latest upload, Standard and Subject दिसतात. यात Standard and Subject यात वर्गानुसार व्हिडिओ आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्गाचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे. पालकांना, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयुक्त असलेले शैक्षणिक अॅप आहे. 


शिक्षक मदत शैक्षणिक अॅप
जि. प. शाळा चिखला म. जिल्हा भंडाराचे सहायक शिक्षक कैलास चव्हाण यांनी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना उपयोगी होईल असे ‘शिक्षक मदत' हे अँड्रॉइड अॅप विकसित केले आहे. ते प्लेस्टोरवर उपलब्ध आहे. शिक्षक मदत अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्व शासकीय योजनांचे लॉगिन एकाच ठिकाणी दिले आहे. तसेच शिक्षकांना अध्यापनात मदत व्हावी म्हणून पहिली ते दहावीच्या सर्व विषयांचे व्हिडिओ, क्रमिक पाठ्यपुस्तके, कविता, शाळेसाठी परिपाठ, शाळा अद्यावत ठेवण्यासाठी उपयुक्त फाइल, शिष्यवृत्ती सराव, शिक्षकांना तंत्रस्नेही करण्यासाठी मार्गदर्शिका, माध्यमिक शाळेसाठी विज्ञान विषयाचे प्रयोग इतर अनेक गोष्टी या अॅपच्या माध्यमातून शिक्षकांना पुरविल्या आहेत.

 

मंजूषा स्वामी, उस्मानाबाद 
manjushaswami1975@gmail. com