आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्‍हीवरच्‍या फडतूसपणाची कमाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाज प्रकर्षाने टीव्हीवरच्या मालिकांबद्दल लिहावेसे वाटले. आम्ही गृहिणी, त्यातून उतरवयात जरा विरंगुळा, मनोरंजन, आणि मनाचे रितेपण घालवण्यासाठी दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरच्या मालिका पाहात असतो. पण त्या मालिका पाहात असताना असं लक्षात आलं की, मनावरचं दडपण वाढतं आहे. नको त्या विचारांचा धुमाकूळ सुरू होतो आहे. मराठी मालिका सगळी संवेदनशीलता हरवून भरकटत चालल्या आहेत. नावं गोंडस द्यायची आणि वर्षानुवर्षं लांबवत त्याचा मूळ गाभाच हरवून टाकायचा. प्रत्येक मालिकेत एक लग्नाची बायको, एक प्रेयसी, एक कटकारस्थान करणारी असा मालमसाला भरायचा. तेच ते रटाळ संवाद. विशेष म्हणजे कपटी स्त्रियाच एका स्त्रीविरुद्ध गुंड काय आणतात, एवढ्या बंदुका, हत्यारं एका मध्यमवर्गीय कुटुंबात येतातच कशी? हे समाजाचं वास्तव आहे का?


स्त्रीचे अस्तित्व चिरंजीव करणारी एकही व्यक्तिरेखा नसावी, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. काही मालिका कुठे संपवायच्या याचा दिग्दर्शकालाच गोंधळ पडलाय की काय, असं वाटतं. पत्नीचा मानसिक छळ करणारा तो आणि सहन करणारी ती, यातून तरुण पिढीला काय आदर्श आहे. काहीतरी मनाची नांगरट होऊन उत्तम बीज पेरण्याचा ध्यास नसेल तर भारतीय संस्कृतीचा डांगोरा कशाला पिटायचा.


हिंदी मालिकाविश्वातही उडान, सीआयडी, करोडपतीसारखा अपवाद सोडला तर आनंदच आहे. हायफाय संस्कृती, भडक मेकअप पाहून घृणा येते. थोड्याफार ऐतिहासिक, पौराणिक मालिका अपवाद आहेत, नाही असं नाही. पुरस्कारांच्या कार्यक्रमांत तर ८० टक्के धिंगाणाच पाहावा लागतो. पुरस्कार देण्याचे क्षण अधिक वेळ दाखवायला हवे, असं वाटतं. जाहिरातींचा उबग आलाय. पूर्वी फक्त दूरदर्शन आणि नंतर सह्याद्री छान वाहिन्या होत्या. जाहिरातींची डोकेदुखी नव्हती. बातम्यांच्या वाहिन्यांवर पहावेत तर इतके गढूळ राजकारण पाहिले नव्हते. एकमेकांना टोलेबाजी, अर्वाच्य भाषा, कमालीचा स्वार्थ, यांनी भरलेला तमाशा सामान्य जनता निमूटपण पाहात राहाते.


आयुष्याच्या प्रवासात ही रसायनं जीव कासावीस करतात. जगण्याचा कणा देणारा, आत्मविश्वासाचे बळ देणारा एकही कार्यक्रम नसावा, हे सगळ्याच पिढीचं दुर्दैव म्हणावं लागेल. वैचारिक खजिना रिताच झालाय की काय?


आवडत नाही तर मालिका पाहू नका, हे यावर उत्तर नाही. आमचा सकारात्मक दृष्टिकोन नाहीन, असा आरोपही चुकीचा आहे. जे उत्कृष्ट आहे, ते हृदयापर्यंत पाेचतेच, हा अातून आलेला प्रतिसाद आहे. व.पु. काळे यांच्या एका वाक्यात जरा बदल करून म्हणावंसं वाटतं, फडतूस मालिकांमधून फडतूस कोणती? त्यामुळे कोणतीच मालिका नको असं वाटायला लागतं. विनोदी मालिकांमध्ये हसण्यासारखं काय असतं, तेच कळत नाही. वेडेवाकडे अंगविक्षेप आणि पुरुषांची बीभत्स स्त्रीरूपं पाहून पुलंची आठवण येते, त्यांनी यावरच एक झकास विनोद केला असता. रिअॅलिटी शोमध्येही तोचतोचपणा. ते एक मृगजळ आहे, असं हृदयनाथ मंगेशकर म्हणतात, ते अगदी खरं आहे. जुनं ते सोनं, असंच आम्ही ठासून म्हणणार.


- मीना कुलकर्णी, नाशिक

बातम्या आणखी आहेत...