आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्षात उमर खालिद, शहेला रशिद, कन्हैयाकुमार यासारख्या विद्यार्थी नेत्यांचे उपद्रवमूल्य बेरजेच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत नगण्य आहे. ही मंडळी जे तत्वज्ञान मांडू पाहतात, ते अशा लोकांसाठी योग्य असते, जे विद्यापीठीय अभ्यासक आहेत. त्यांच्या भूमिकांचे सूक्ष्म कंगोरे ते समजून घेण्याची कुवत बाळगतात. इथल्या सामान्य जनतेत ती कुवत नाही.याचाच फायदा घेऊन या जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांना विरोधकांनी फुटीरतावादी राष्ट्रविरोधी म्हणून लोकांच्या मनावर बिंबवण्यात काही प्रमाणात यश मिळवलेले आहे. सध्याच्या काळात त्यांच्याबरोबर वावरण्याची जिग्नेश मेवानीची खेळी प्रगल्भ राजकारणाचे लक्षण मानता येईल, असे वाटत नाही. त्यांचा हा मार्ग राजकीयदृष्ट्या विघातक ठरणारा आहे...
राजकारणात जितकी समीकरणं महत्त्वाची, तितकाच संयमही महत्त्वाचा असतो. त्याच सोबत असावी लागते मुत्सेद््गिरी. तगडा जनसंपर्क अन् उपद्रवमूल्य कायम राखण्याच्या भानाची. यातील काही गोष्टी राजकारणात सरावाने आत्मसात करता येतील मात्र संयम आणि मुत्सेद््गिरी अंगभूत असणे गरजेचे असते.
अलीकडेच झालेल्या गुजरात निवडणुकीत बलाढ्य मोदी-शहा जोडीला कडवं आव्हान देत राज्यातल्या दलित समुहाचा चेहरा आणि आवाज बनू पाहणाऱ्या आमदार जिग्नेश मेवाणींच्या संदर्भात विचार करताना, त्यांच्याबाबतीत समिकरणं तर चांगलीच जुळून आलीय, परंतु त्यांच्याकडे संयम नाहीये का, असा प्रश्न अलीकडच्या आक्रमक राजकारणामुळे पडू लागलेला आहे.
ते अल्पावधीतच स्वत:चं ‘पॅन इंडियन’ नेतृत्व प्रस्थापित करू पाहत असल्याचंही जाणवत आहे. महाराष्ट्रात भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवरची त्यांची सभा, दिल्लीतली मोदी सरकार विरोधातली ‘हुंकार रॅली’ ही त्यांच्यातली अधीरता स्पष्ट करणारी आहेत असे निरीक्षण नोंदवावे लागेल.दीर्घकालीन राजकारण करायचे असेल तर प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्यापेक्षा आपला मतदार संघ अधिकाधिक मजूबत करणे, त्यासोबत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे गरजेचे आहे.
जिग्नेश मेवानी यांची राजकीय पार्श्वभूमी विचारात घेता, अगोदर ते आम आदमी पार्टीत होते. उना येथे हिंदू-गोरक्षकांकडून हिंदू-दलित तरुणांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्ह मेवानी यांनी संघर्ष सुरू केला. तेव्हा भाजमधील काही लोकांनी आम आदमी पार्टीला टार्गेट करत, या प्रकरणाला राजकीय वळण देत मेवाणींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाला कोणत्याही प्रकारे हानी पोहचू नये म्हणून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्रपणे राज्यव्यापी आंदोलन उभारले, जे देशभरात चर्चेचा विषय ठरले.
गुजरात इलेक्शनमध्ये जिग्नेश यांची पक्ष सोडल्यानंतरही ‘आप’ने मदत केली. कारण दोघांचा मुख्य विरोधक हा भाजप पक्ष असल्यामुळे, आम आदमी पार्टीने तिथे उमेदवार उभा केला नाही. पक्षाचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरून जिग्नेश यांना शुभेच्छा दिल्या. गुजरातमधील वडगाममध्ये झालेल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या सहमतीमुळे जिग्नेश तिथे निवडून जाऊ शकले. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर त्यांची पहिली जाहीर सभा महाराष्ट्रातील पुण्यात झाली.
भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांच्यावर प्रक्षोभक भाषणांचे आरोप होत आहेत, ते बालीश अन् निराधार आहेत, ही वस्तुस्थिती असली तरीही महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील आयोजकांनी एक काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे, प्रत्येक राज्याची एक श्रवण संस्कृती आहे. शाब्दिक चकमकी झेलण्याची ताकद आहे. भारताचा विचार करू जाता, इथे भडक स्वरूपाची भाषणे देणारे जवळपास सर्वपक्षीय नेते आहेत, हे ही खरे आहे. परंतु ते आपापल्या राज्यात भाषणे देत असतात. महाराष्ट्राला जहाल भाषणांची परंपरा आहे. धर्मांची आणि व्यक्तिविशेष नावे घेऊन इथे अगदी पातळीसोडून शाब्दिक हल्ले भाषणांमधून झालेले महाराष्ट्र पहात ऐकत आलेला आहे. परंतु अशा चकमकी करणारा परराज्यातील असेल, तर लोकांची मानसिकता ही अगोदरच टोकदार अन् विरोधात उभी ठाकलेली असते. अशावेळी आपला तो ‘बाबू’ दुसऱ्याच ते ‘कार्ट’ अशी मानसिकता नेत्यांच्या बाबतही खरी ठरते, ती जिग्नेश मेवाणींच्या बाबतही तशी ठरली आहे. पुण्यातील भाषणात त्यांनी नरेंद्र मोदींवर थेट हल्ले केले आहेत.
आमदारकीच्या पहिल्याच प्रयत्नात लहान तोंडी मोठा घास घेण्याचा त्यांचा अट्टाहास अंगलट येण्याची शक्यता आहे का? एक उभारता राजकीय नेता म्हणून हा प्रश्न गांभीर्याने पाहणे अगत्याचे ठरते. मोदी बॅशिंग किंवा मोदी विरोध’ या व्यक्तीकेंद्री कार्यक्रमावर त्यांना यशस्वी राजकारण करणे शक्य आहे का? की भाजपचे एकूण बहुजनविरोधी राजकारण शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगार युवकांचे प्रश्न उद्योगधंद्यातील मंदी महागाईने होरपळलेली जनता शिक्षणक्षेत्र आंबेडकरी व इतर मागास समूहांचे शोषण इत्यादी ठळक फेल्यूर झालेले मुद्दे घेऊन भाजपला घेरता येईल? याचा विचार झाला पाहिजे.
कारण अलीकडील त्यांच्या भाषणात ते कायम मोदींना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.वरील ढोबळ राजकीय मुद्दे विचारात घेत असताना, आंबेडकरी समूहात जी एक उत्साहाची लाट आली आहे, ती मागे सारून डोळसपणे विचार व्हावयास हवा. कारण, आंबेडकरी समूह जिग्नेश मेवानीमध्ये नेतृत्व शोधत असेल, तर त्याअगोदर त्यांनी थोडे थांबले पाहिजे. जिग्नेश यांना इथला सोशलफॅब्रिक समजून घ्यायला वेळ लागणार आहे. धर्मांतराने प्रश्न सुटणार नाहीत, असे मेवानी यांनी एका मुलाखतीत म्हटलेले आहे. हे अतिशय बाळबोध अन् अपेक्षाभंग करणारे वक्तव्य आहे. आजचा आंबेडकरी समूह ज्याप्रमाणे समाजाच्या मुख्यप्रवाहात धडका देत मुसंडी मारतो आहे. तुलनेत ज्यांनी धर्मांतर केलेलं नाही, ते मागास समूह आजही चाचपडताना दिसत आहेत.
एकाच वेळी मार्क्स लेनिन अन् आंबेडकरी तत्वज्ञान त्यासोबत भगतसिंग यांचे विचार, अशा वैचारिक चक्रव्यूहात जिग्नेश सापडल्याची शक्यता आहे. यासाठी विचारांची बैठक पक्की असणे गरजेचे आहे. त्यानुसार भविष्यात समविचारी म्हणून काही विचारी प्रवाह आपणास सोबत घेता येतीलही.
परंतु त्यांचे कोलॅबरेशन करत नवीनच काहीतरी उभे करताना त्रेधा उडणार आहे, याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे आहे.
आजच्या भारतीय राजकारणाच्या परिप्रेक्षात उमर खालिद, शहेला रशिद, कन्हैयाकुमार यासारख्या विद्यार्थी नेत्यांचे उपद्रवमूल्य बेरजेच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत नगण्य आहे. ते काहीही करिष्मा करू शकत नाहीत, हे वास्तव सर्वानीच स्वीकारले पाहिजे.
वरील मंडळी जे तत्वज्ञान मांडू पाहतात, ते अशा लोकांसाठी योग्य असते, जे विद्यापीठीय अभ्यासक आहेत. त्यांच्या भूमिकांचे सूक्ष्म कंगोरे ते समजून घेण्याची कुवत बाळगतात.इथल्या सामान्य जनतेत ती कुवत नाही. याचाच फायदा घेऊन या जेएनयूच्या विद्यार्थी नेत्यांना विरोधकांनी फुटीरतावादी राष्ट्रविरोधी म्हणून लोकांच्या मनावर बिंबवण्यात काही प्रमाणात यश मिळवलेले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे योगदान त्याच परिघात सीमित ठेवणे योग्य राहील. सध्याच्या काळात त्यांच्याबरोबर वावरण्याची मेवानीची खेळी प्रगल्भ राजकारणाचे लक्षण मानता येईल, असे वाटत नाही. त्यांचा हा मार्ग राजकीयदृष्ट्या विघातक ठरू शकतो. नवतरुण मतदारांना अपेक्षित विधायक राजकारणाची चाहुल त्यांच्या कृतीत वा वक्तव्यांत मिळत नाही. तर या तिघांप्रमाणे त्याच विद्यापीठीय राजकारणाचा ते नकळतपणे एक भाग होऊ लागले आहेत काय? अशी चिंतायुक्त भीतीही वाटते. स्वत:चे नेतृत्व उभारायचे असेल तर त्यांनी संयमाने दीर्घकालीन राजकारण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली पाहिजेत. मुत्सेद््गिरी दाखवली पाहिजे. वरील मुद्यांच्या विचार करता ‘जिग्नेश मेवाणी स्वत:हून राजकीयदृष्ट्या अपघातप्रवण क्षेत्रात प्रवेश करताहेत का? हा प्रश्न इथे म्हणूनच कळीचा ठरतो आहे.
- मिलिंद धुमाळे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.