आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक लोकशाहीच्या वारीतील मनू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धाने अग्नि उपदेशात ज्वाळांनी जळणाऱ्या जगाचे वर्णन केले आहे. ते म्हणतात,‘साधुंनो सर्व काही जळते आहे. डोळा आणि डोळ्यांमधील विवेक जळतो आहे. तो कशाने जळतो आहे? तीव्र अनुरागाच्या, तिरस्काराच्या, भ्रमाच्या आगीत जळतो आहे.’ बृद्धाचे जगही दुःख आणि वेदनेने जळत होते आणि आजचे युद्धाचे जगही एकमेकांच्या तिरस्काराने आणि आर्थिक स्पर्धेने जळत आहे. या धगधगत्या जगाला सामोरे जाण्याचा एक सुंदर सांस्कृतिक उपाय म्हणजे, पंढरीची वारी आहे. मनाची दारे उघडी करुन सर्व मानवप्राण्यांवर प्रेम करणे, ही प्रत्येक श्रद्धावंत माणसासाठीची पूर्वअट आहे. धर्मनिष्ठ, जातीय अहंकार, राजकीय स्वार्थ या गोष्टींना या सांस्कृतिक सोहळ्यात स्थान नाही. म्हणूनच वारीत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला किंवा धारकऱ्याला विठ्ठलाकडे जाताना प्रेममय बनल्याशिवाय दुसरा मार्ग नाही...

 

महाराष्ट्रातील संतांची चळवळ वैदिक धार्मिक सामंतशाहीच्या विरोधी उभे राहिलेले विद्रोही बंड होते. आजचे जग धार्मिकदृष्ट्या असंतुष्ट बनले आहे, आणि ते एका नव्या अध्यात्मिक साधनेच्या शोधात आहे. या पर्यायी लोकशाही आध्यात्मिक साधनेची गरज बौद्ध धर्माने भागविली असली, तरी बुद्धालाच विष्णूच्या अवतारात बसविण्यात वैदिक हिंदू  परंपरेला कमालीचे यश आलेले आहे. वैदिक अध्यात्मिक विचारधारा आणि अस्पृश्य, बहुजनांची धार्मिक विचारधारा यांतील फरक लक्षात घेतला नाही, तर मोठा बुद्धभेद होण्याची शक्यता आहे.


हा फरक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित केला होता.  १९१९ मध्ये साऊथबरो कमिशनला दिलेल्या साक्षीमध्ये त्यांनी, भारतात हिंदूधर्म एक नसून दोन आहेत, असे सप्रमाण सांगितले आहे. वैदिक हिंदू परंपरेच्या चालीरिती, दैवते, रुढी, परंपरा आणि पूजाविधी अस्पृश्य व बहुजनांच्या परंपरेपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत, असे जे बाबासाहेबांनी सांगितले, याचे वेगवेगळे अर्थ लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु प्रत्येक परंपरेच्या विचारधारेत फरक आहे. वैदिक परंपरेतील हिंदुत्व अध्यात्मिक अधिकारशाहीकडे जाते, तर अस्पृश्य बहुजनांच्या परंपरेतील तत्व अध्यात्मिक लोकशाहीकडे जाणारे आहे. मध्ययुगापासून सुरु झालेल्या अध्यात्मिक लोकशाहीचा हा मार्ग महाराष्ट्रातल्या वारकरी चळवळीने अधिक व्याप केला आहे. ज्ञानोबा-तुकोबांपर्यंतच्या संतांनी तो बहुजन समाजात रुजवला आहे. म्हणूनच वारकरी चळवळीची विठोबाच्या दर्शनाला निघालेली पाऊले, ही अध्यात्मिक लोकशाहीकडे निघालेली पाऊले आहेत.


ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, नामदेव, सोपानदेव, मुक्ताबाई ही ज्ञानदेवकालीन वंशावळ हिंदुत्वाचा प्रचार करायचा म्हणून घराबाहेर पडली नव्हती, हेही इथे लक्षात घ्यायला हवे. एकनाथ, जनाबाई, चोखा, कर्ममेळा, नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, सेना न्हावी ही सारी वारकरी संतमंडळी बहुजन समाजातील वेगवेगळ्या जाती समुहांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. विविधतेतून एकतेकडे जाणारी अशी, ही संतांची  वारी आहे. संत तुकाराम या अध्यात्मिक समतेचे सर्वश्रेष्ठ आधुनिक शिरोमणी आहेत. म्हणून वारकरी चळवळीतील संतांना आजची राजकीय गरज म्हणून कुणी भगवे करण्याचा प्रयत्न करु नये. ते ज्या भक्तीच्या रंगात रंगून गेले होते, त्या रंगांचा वैचारिक मेळ घालणे, हे आजचे महत्त्वाचे काम आहे. हा मेळ घातला नाही, तर रोज नवे नवे सांस्कृतिक संघर्ष उभे राहतील. महाराष्ट्रात नव्यानं उभा राहिलेला वारकरी आणि धारकरी हा संघर्ष याचे अलीकडचे उदाहरण आहे. शस्त्रधारी भगवे धारकरी वारीत शिरुन काय साध्य करतात, हेही उभा महाराष्ट्र अनुभवतो आहे. पंढरीचा विठुराया सर्वांसाठी ममतेचा सागर आहे. त्याच्या भक्तीत सामील होताना, आपल्या वस्त्रांचा रंग कोणता हे महत्त्वाचे नाही, तर बुद्धीची करुणा मनात साठवून माणूस म्हणून निरपेक्ष बुद्धीने त्याच्याकडे जाणे अधिक महत्वाचे आहे.

 

वारकरी चळवळ ही क्रांतिकारी चळवळ आहे. भारतात वारकरी परंपरेच्या अगोदर सुरु झालेली अलवार संतांची चळवळ, महाराष्ट्रात संतकवी निर्माण होण्याअगोदर साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरु झालेली तामिळी संतांची लेखन परंपरा आणि इस्लामी जगतातले सुफी संतांचे आंदोलन, ही सारी पार्श्वभूमी इथे नजरेआड करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्टातील मराठी संतांच्या आंदोलनाकडे पाहिले, तर ही चळवळ वैदिक अध्यात्मिक परंपरेला नाकारत अधिकाधिक प्रागतिक विचारांकडे निघाल्याची दिसते. संतांचे हे प्रागतिक असणे, त्याकाळातल्या सामाजिक मर्यादा लक्षात घेऊन समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व धर्मांचा आदर, समतेचे तत्व, स्त्रियांचा सन्मान, कर्मठ अध्यात्मिक आचरणाला नकार, भक्तीचं सार्वत्रिकीकरण या सगळ्याच गोष्टी वारकरी संत परंपरेचं पुरोगामित्व सांगणाऱ्या आहेत. म्हणून संतांचा हा क्रांतिकारी प्रवास अध्यात्माच्या नावाखाली मागे नेण्यात अर्थ नाही. तो अधिकाधिक पुढे नेला पाहिजे. संतश्रेष्ठ तुकाराम हे संतचळवळीला पुरोगामी आशय देणारे उर्जाकेंद्र आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सुरु केलेली ही मोहीम तुकारामांनी फत्ते केली, या म्हणण्यालाही काही एक अर्थ आहे. मराठी संतपरंपरेत ज्ञानेश्वरांचे महत्त्व आहेच; परंतु  बहुजन समाजासाठी तुकरामांचेही योगदान अधिक आहे, हेही गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. तुकारामांच्या अभंगातला विद्रोहाचा प्रखर अविष्कार अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या नाठाळांच्या माथी कसा सोटा मारतो हे लक्षाणार्थाने समजून घेतले नाही, तर ज्ञानदेवांच्या गुणगौरवात अडकलेल्या समाजाला वैदिक हिदुत्ववादी पंरपरेकडे नेणे मतांचे राजकारण करणाऱ्यांसाठी अधिक सोपे होऊन जाईल, हेही बहुजनांनी समजून घ्यायला हवे. 

 

तुकारामांची परंपरा क्रांतीची परंपरा आहे. या सामाजिक क्रांतीचा अर्थ आजची सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेऊन लावला पाहिजे. क्रांती म्हणजे, समाजाची सत्ता प्रतिगामी वर्गाकडून पुरोगामी वर्गाकडे जाणे आहे. ऐतिहासिक पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व मानवतावादाच्या कसोटीवर पारखले जात नाही, तर जो वर्ग समाजातल्या उत्पादनांचा विकास करणाऱ्या साधनांचा पुरस्कार करतो. तो पुरोगामी आणि जो त्याला विरोध करतो, तो प्रतिगामी ठरतो. या अर्थाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात उभ्या असलेल्या समाजाला ‘कुणी आंबे खाऊन मुले होतील’ असा सल्ला देत असेल तर तो मनुष्य प्रतिगामीच ठरतो. अंधश्रद्धा हे प्रतिगामित्व पसरविण्याचे मोठे हत्यार आहे. खरे तर अंधश्रद्धा हे दुबळ्या मनांचे विश्रामगृहच असते. अंधश्रद्धा केवळ धर्मातच असतात असे नाही, तर धर्म आणि देव डोक्यात घेऊन निघालेली माणसे जिथे जिथे जातात तिथे अंज्ञश्रद्धा जात असतात. अशा दुबळ्या माणसांकडे विज्ञानाला भिडण्याचे सामर्थ्य नसते. धर्माला सत्यनिष्ठतेवर तपासून चिकित्सा करण्याचे धाडसही नसते. त्यामुळे अशी माणसे समाजात केवळ तणाव निर्माण करु शकतात. समाजप्रबोधनाच्या चळवळीत सामील झालेल्या संतांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढे होता, असे सांगण्याचे प्रतिगामी धाडस अशीच माणसं करु शकतात. ज्ञानेश्वरांचे नाव घेत संतांच्या प्रबोधन चळवळीला तुकारामांच्या अध्यत्मिक समतेपासून तोडायचे आणि थेट मनुस्मृतीशी जोडायचे, या कुटील प्रयत्नात रममाण झालेल्या अशा माणसांना सुज्ञ माणसांनी फार महत्त्व देण्याचे कारण नाही. 

 

बहुजन समाजाला स्थितीशील ठेवण्याचा हा कावा नीटपणे ओळखायचा असेल, तर महाराष्ट्रातल्या भोळ्या-भाबड्या बहुजन हिंदू समाजाला त्याचे समाजिक हित ज्या परंपरेत आहे, ती अध्यात्मिक लोकशाहीची परंपरा संतसाहित्याच्या अभ्यासकांनी थेटपणे सांगायला हवी. वेद, भगवतगीता आणि मनुस्मृति यातील अनिष्ट गोष्टींची उकल करुन संतांनी याविरुद्ध केलेला प्रागतिक उठाव अधिक स्पष्टपणे मांडायला हवा. परंतु या विषयाचे अभ्यासक आपल्या निष्ठा स्पष्टपणे मांडताना दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचे स्वराज्य उभे केले, महात्मा फुले यांनी वर्णव्यवस्थेवर प्रहार केले, छत्रपती शाहू महाराजांनी समतेचे आचरण रुजविले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातवर्णदास्याचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतिचे दहन केले, हा महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचा इतिहास आहे. वारकरी संतांची चळवळ या प्रबोधन परंपरेचे उर्जाकेंद्र आहे. म्हणून हे उर्जाकेंद्र आज अधिकाधिक पुरोगामी होण्यासाठी प्रयत्न होणे फार महत्त्वाचे आहे.

 

संत तुकारामांचे आणि बुद्धांचे वैचारिक नाते सर्वसंमत आहे. बुद्ध, कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम, महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी जी विचारपंरपरा आहे, त्या विचारपरंपरेला छेद देणाऱ्या अनेक गोष्टी सध्या महाराष्ट्रात होत आहेत. या संस्कृतिसंघर्षाकडे महाराष्ट्रातील संत साहित्याच्या अभ्यासकांनी नेहमीच सावध तर कधी सोयीचे पाहिले. काही अपवाद वगळता तुकारामांचे प्रागतिक दर्शन घडविण्यात काही विचारवंत यशस्वी झाले. काहींनी तुकारामांतील विद्रोह मांडला, तर काहींनी नव्या संदर्भाने, पुन्हा तुकारामांकडे पाहिले. पण हे चर्चाविश्व मर्यादित संशोधकीय स्वरूपात अडकले. सर्वसामान्य माणसापर्यंत तुकारामांचा सम्यक समाधीकडे जाणारा हा विचार पोहचविण्यासाठी एक नवी सांस्कृतिक घुसळण व्हायला पाहिजे. जागतिकीकरणाच्या जमान्यात उभ्या राहिलेल्या आर्थिक आणि सांस्कृतिक साम्राज्यवादाला तोंड द्यायचे असेल, तर आज मनुष्यजातीकडे दुसरी शक्ती नाही. अशा काळात बहुजन समाजातून उभी राहिलेली समतेकडे जाणारी ही सांस्कृतिक घुसळण एक सशक्त पर्याय म्हणून उभी राहणे, अत्यंत आवश्यक ठरले आहे.

 

m.kasbe1971@gmail.com

(लेखकाचा संपर्क - ८८३०३३५७२७)

 

बातम्या आणखी आहेत...