आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्‍त रकत पावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणी काय वाचायचं, कोणी काय बघायचं आणि फॉरवर्ड करायचं याचे निर्णय राजकीय डावपेचांनुसार होऊ लागले असताना मुख्य विषयापासून न भरकटता जनतेच्या विशेषत: शहरी जनतेच्या सद््सद््विवेकबुद्धीला साद घालण्याचे काम किसान लाँग मार्चशी संबंधित पावलांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या छायाचित्रांनी केलं. सहवेदनेची छायाचित्रचौकट आणि त्यामागच्या विचार-भावनांचा वेध घेणारा हा लेख...


दानमध्ये भीषण दुष्काळ पडलाय. दररोज वीस याप्रमाणे लोक भूकबळीने मरताहेत. त्यातही जे कसेबसे तग धरून आहेत, ते अन्न-पाण्यावाचून तडफडताहेत. अस्थिपंजर झालेल्या देहासह सरपटत सरपटत जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत.  त्याच सुदाममधल्या एका गावातला हा क्षण. भुकेनं व्याकूळ झालेलं एक कुटुंब अन्नाची पाकिटं घेण्यासाठी युनोच्या कॅम्पपर्यंत कसंबसं पोहोचलंय. कॅम्पमध्ये शिरताना आई-बापानं आपल्या गलितगात्र पोरीला बाहेरच सोडलंय. पोरगी इतकी अशक्त की, बसल्याबसल्याच तिचं डोकं जमिनीला टेकलंय. तिचे काटकुळे पाय आणि मांस नसलेली पाठ तेवढी बघणाऱ्याच्या नजरेत पडतेय. तेवढ्यात तिच्यापासून ५० फुटांवर एक गिधाड येऊन टपकलंय. पोरीवर झडप घालण्याच्या इराद्याने. हा  क्षण त्याने आपल्या कॅमेरात टिपला. कालांतराने त्याने काढलेलं ते छायाचित्र "न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये छापून आलं आणि मानवी जिवनातलं टोकाचं कारुण्य अधोरेखित करणाऱ्या त्या छायाचित्राने जगभरातल्या सुबुद्ध लोकांच्या संवेदनांना हात घातला. आपल्यापलीकडच्या वेदनामयी जगण्याची तीव्रतेने जाणीव करून दिली....


....नाशिक ते मुंबई सतत सात दिवस उन्हातान्हातून निघालेला कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांचा हा तांडा. पण या तांड्याचे भव्य स्वरूप पहिल्या पाच दिवसात देशालाच नव्हे तर ज्या महाराष्ट्रात हा तांडा निघाला, त्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला समजले नव्हते. ते समजले शेवटच्या दोन दिवसात आणि मग सुरू झाली, मतं-मतांतरं. सामान्य माणूस  बोलू लागला. गल्ली, बोळ, शाळा, दवाखाने, चहाची टपरी, प्रत्येक ठिकाणी फक्त या तांड्याचीच चर्चा चालू झाली. 


याचे एक मोठे आणि सशक्त कारण म्हणजे, या १८० किलोमीटरचा रस्ता तुडवून आलेल्यांच्या रक्तबंबाळ-भेगाळलेल्या पायांची, जखमी अवस्थेतल्या, सालपटं निघालेल्या तळव्यांची नव्या पिढीच्या संवेदनशील पत्रकार अलका धुपकर यांनी टिपलेली छायाचित्रं. मोबाइल फोनमध्ये असलेल्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेल्या या छायाचित्रांमधले पाय सर्वार्थाने बोलत होते, तांड्यातील प्रत्येकाची व्यथा-वेदना सांगत होते. 


साधारण चार-पाच वर्षांपूर्वी  शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्‌टी यांच्या नेतृत्वाखाली  कोल्हापूरात शेतकऱ्यांचे मोर्चे आले होते. या आंदोलनासाठी जिल्ह्यातल्या गावागावांतून शेतकरी सामील झाले होते. त्या वेळी पहिल्यांदा इथल्या वर्तमानपत्रांत मोर्चेकऱ्यांच्या चालून-चालून रक्तबंबाळ झालेल्या, थकलेल्या पायांची छायाचित्रं  प्रसिद्ध झाली होती. आंदोलकांचे घोषणा देतानाचे चेहरे, नेत्यांची भाषणबाजी करतानाच्या मुद्रा यापेक्षा शेतकरी व्यथेचा थेट वेध घेण्याचा तो प्रयत्न वाचकांच्या स्मरणात राहिला होता. त्यानंतर मी स्वत: कष्टणाऱ्या हातांचा छायाचित्रांच्या (यातल्याच निवडक छायाचित्रांवर आधारलेला निबंध “जिथे राबती  हात’ या शीर्षकांतर्गत २०१७ च्या दिव्य मराठी दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.)  माध्यमातून जाणीवपूर्वक शोध घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही करतोय. त्या अर्थाने मीडिया-सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरलेल्या अलका धुपकर यांचे शेतकऱ्याच्या पायांच्या माध्यमातून आशय पोहोचवणे मला संवेदनशीलतेची पातळी एकसमान असल्याचे समाधान देणारे होते. 


 संवेदना हरवत चाललेल्या  काळात धुपकर यांच्या  कॅमेऱ्याची प्रत्येक फ्रेम माणसावरील प्रेम व्यक्त करताना दिसत होती. भावना व्यक्त करायला शिकवत होती. न रडता लढायला शिकवत होती. मानवी जीवनाच्या प्रवासात मूर्त-अमूर्त विचारांचा ठेवा सततचाच आहे. सभोवतालात घडणारी घटना जशी दिसते तशी पहायची, घडल तशी स्वीकारायची, त्यावर विचार करावयाचा आणि मग त्यातील आपल्या मनाला भावलेला भाग, जसा भावला तसा मांडायचा. या प्रक्रियेत स्वीकारलं ते मूर्त असतं,तर भावलेलं जसं वाटलं तसं मांडलं हे बऱ्याच वेळेला अमूर्त असतं.  धुपकरांचे फोटो मला या शैलीतील वाटतात. ते त्या तांड्याचं सरधोपटपणे विराट दर्शन घडवित नाहीत. पण धुपकरांना भावलेल्या आकारांमुळे तांड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दाहकता बघणाऱ्याला प्रकर्षानंजाणवली, कारण अगोदर ती तशी धुपकरांना जाणवलेली असते.
 
 
कोणताही संवेदनशील माणूस आपल्याला उपलब्ध असलेलं कोणतंही साधन अभिव्यक्तीसाठी वापरतो. तेव्हा जे अभिव्यक्त करावयाचे आहे ते आणि साधन यांच्यात एक संबंध प्रस्थापित करित असतो. रापलेले-रक्ताळलेले पाय अाणि कॅमेरा यांच्यात असा जवळकीच संबंध प्रस्थापित करायला धुपकर नक्कीच यशस्वी झाल्यात.


गेल्या चार वर्षांपासून कष्टकऱ्यांचे हात असा विषय डोक्यात घेवून फोटोग्राफी करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. यात जशी आपली आई आहे तसेच उन्हापावसाची तमा न बाळगता डोंगराएवढे कष्ट उपसणारे शेतमजूर-लोहार-चर्मकारही आहेत. तेव्हा लक्षात असं येत गेलं, की संवेदना न हरवलेलं मन, फक्त सुंदर निसर्ग दिसला म्हणून वा लाखोंचा जमाव दिसला म्हणून कॅमेऱ्याला हात घालत नाही. त्याचमुळे  चार वर्षात फक्त वीस एक फोटोतच हात मनासारखे दृकपटलावर उमटले. याचा अर्थ माझं मन हातात कॅमेरा आहे म्हणून चित्र काढत नाही, तर समोरच्या  फ्रेमममध्ये जेव्हा मानवी जीवनाचं सार एकवटून येतं आणि आपल्या मनावर प्रतिबिंबित होतं, तेव्हाच ते कॅमेऱ्याला बाहेर येवून डोळा उघडायला परवानगी देतं. 

 
कलाकार आणि कलावंतांचं मन असलेला पत्रकार हळवा हा असतो. तो एखादी हादरवून टाकणारी घटना तो मनातून काढून टाकू शकत नाही. पुलित्झर हा जगातील फोटोग्राफीमधील मानाचा पुरस्कार. प्रारंभी ज्या घटनेचा उल्लेख केलाय. त्या घटनेचा या पुरस्काराशी संबंध आहे. पोटभर अन्नसुद्धा नशिबी नसणाऱ्या भूकबळीचे केंद्र बनलेल्या सुदानमधल्या एका गावात जावून केव्हिन कार्टर या दक्षिण आफ्रिकी फोटोग्राफरने फोटो काढले. फोटो काढून झाल्यानंतर त्याने ताबडतोब त्या गिधाडाला तिथून पिटाळून लावलं.  कार्टरच्या फोटोत दिसलेली ती मुलगी पुढे १४ वर्षांनी संसर्गजन्य आजाराने मरण पावली. पण त्या  वसाहतीमधून परतल्यावर कार्टर मात्र कमालीचा दु:खी बनला. मानवी जगण्याची ती अवस्था पाहून त्याला नैराश्य आलं. नेमकं त्याच फोटोला  पुलित्झर मिळाले. मात्र वेदनेच्या चित्रचौकटीला लाभलेला पुरस्कार त्याच्या संवेदनशील मनाला सहन झाला नाही. “आय एम हॉण्टेड बाय दी बिविड मेमरीज ऑफ किलिंग्ज अँड कॉर्पस अँड अँगर अँड पेन’ अशा भावना शब्दबद्ध करून या हळव्या माणसाने  पुरस्काराचा स्वीकार करण्याऐवजी आत्महत्येचा मार्ग पत्करला.  मनावरचा ताण सहन न होऊन कार्टर गेला, खरा पण जाताना सहवेदना जागवणारी एक छायाचित्रचौकट जगाला देऊन गेला. 


कार्टर गेल्यानंतरचं जग खूप बदललेलं आहे. कोणी काय वाचायचं, कोणी काय बघायचं याचे निर्णय आता भांडवलशाही व्यवस्था आक्रमकपणे घेऊ लागलीय. मात्र, व्यवस्थेचा दबाब झुगारून, सत्ताधाऱ्यांचे डावपेच ओळखून शहरी जनतेच्या सद््सद््विवेकबुद्धीला साद घालण्याचं मोलाचं काम किसान लाँग मार्चशी संबधित छायाचित्रांनी केलंय. पत्रकार-छायाचित्रकार म्हणून धुपकरांनी दाखवलेली ही संवेदनशीलता समाजाच्या सर्व स्तरांत झिरपली तरच उपेक्षित-वंचितांचं जगणं उजळून निघणार आहे.


- मिलिंद यादव
Milindyadav09@gmail.com

(लेखक कोल्हापूरस्थित कलाशिक्षक, समाज अभ्यासक आहेत.)
लेखकाचा संपर्क : ९८५०८४७३८४

बातम्या आणखी आहेत...