आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समंजस स्वीकार व्हावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागच्या अंकातल्या कव्हर स्टोरीत आपण सारंगचा संघर्षमय प्रवास पाहिला. या भागात पाहू तिच्या प्रवासात तिला व तिच्यासारख्या अनेकांना कोणाची साथ मिळतेय.


फक्त स्त्री-पुरुष या नातेसंबंधांना मान्यता असलेल्या पारंपरिक समाजात या लैंगिक अल्पसंख्याकांची अशी भावनिक, शारीरिक घुसमट होणं हे नवलाईचं नाही जी त्यांना निमूटपणे सहन करावी लागते. प्रश्न हा की आणखी किती काळ त्यांना ही घुसमट सहन करावी लागणार आहे? त्यांना ती घुसमट कुणाला सांगावीशी वाटली तरी ती ऐकून घेणारं, त्यांना समजून घेणारं कुणी नसतं. उलट त्यावरून त्यांची टिंगलटवाळी करण्याकडेच लोकांचा कल असतो. प्रस्थापित पुरुषप्रधान व्यवस्थेने पुरुषांना प्रथम, स्त्रियांना दुय्यम आणि लैंगिक अल्पसंख्याकांना तृतीय दर्जा दिला. पण सारंग, मयूरी आणि इतरांना हा दर्जा अमान्य आहे. पुरुषाचं शरीर असलं तरी मनानं आपण स्त्री आहोत आणि स्त्री म्हणूनच आपल्याला ओळखलं जायला हवं हा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे ‘अदर/इतर’ हा गट त्यांना नको आहे. परिस्थिती विपरीत असली तरीही सारंग, मयूरी हताश झालेल्या नाहीत. कारण काही सकारात्मक घटनाही घडताना नक्कीच दिसून येत आहेत. सरकारने उशिरा का होईना तृतीयपंथीयांची दखल घेतली आहे. केरळ शासनाच्या सामाजिक न्याय विभागात गेल्या वर्षी तृतीयपंथीयांसाठी राज्यात स्वतंत्र धोरण तयार केलं गेलं. असं धोरण तयार करणारं केरळ हे देशातील पहिलं राज्य आहे. आंध्र प्रदेशात तृतीयपंथीयांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशी धोरणं संपूर्ण देशात राबविणं गरजेचं आहे. देशात तृतीयपंथी लोकांची संख्या किती आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध होणे गरजेचे आहे. २०१६ साली ‘प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑफ ट्रान्सजेंडर पर्सन्स बिल’ लोकसभेत मंजूर झालंय, त्यात तृतीयपंथीयांना स्वतंत्र ओळख देण्यासह त्यांच्यासोबत होणारा लैंगिक छळ भेदभाव थांबवणं हाही हेतू आहे. अशा पद्धतीचे कायदे तर स्वागतार्हच आहेत, पण समाज म्हणून आपणही एक पाऊल पुढं टाकण्याची गरज आहे.


सारंग आज पुण्यातील धनकवडीजवळ असलेल्या दलित वस्तीमध्ये राहते. त्या भागातील लोकांनी तिला आपलंसं केलं आहे. ती विद्यापीठात शिकते याचं त्यांना खूप कौतुक आहे. अनेक चांगले-वाईट अनुभव घेत सावित्रीबाई फुले विद्यापीठात सारंगचा शिक्षणाचा प्रवास सुरू आहे. सारंगला विश्वास आहे विद्यापीठ तिला व तिच्या कम्युनिटीतील अनेक जणांना मोठा अवकाश प्राप्त करून देईल. शिक्षण पूर्ण झाल्यावर सन्मानाने नोकरी करून जगता येईल. तिचा हा विश्वास अनाठायी ठरणार नाही, हे बघण्याची जबाबदारी आपली असणार आहे. सारंगसारख्या अनेकांच्या शरीराचा नव्हे तर त्यांच्या मनाचा स्वीकार करण्याची गरज आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्या भावनांचा सन्मान करण्याची गरज आहे. इतर कोणाहीप्रमाणेच त्यांच्या स्वप्नांनाही प्रत्यक्षात येण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. एका व्यक्तीचा कोणत्याही भेदभावाविना सहज स्वीकार करण्याची आपली मानसिकता निर्माण होणं व ती कृतीत दिसून येणं हे आपल्या सामाजिक, वैचारिक प्रगतीचं लक्षण मानता येईल. असा एक समंजस स्वीकार समाजाचं मन आणि मत परिवर्तित करू शकतो.


सारंगची गुरूनानी मंदार म्हणतात, आज कम्युनिटीत दाखल होणारी पिढी ही शिक्षण आणि तंत्रज्ञान सोबत घेऊन येते. आपल्या संवैधानिक अधिकारांबाबत ते जागृत असतात. माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण यांना समाजाने पुढं येऊन स्वीकारणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानामुळे ही पिढी सामान्य लोकांशी संपर्क साधू शकते, व्यक्त होण्यासाठी आपल्या अडचणी सांगण्यासाठी त्यांना सामाजिक माध्यमं उपलब्ध झाली आहेत. त्याला लोकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, पण त्यात अधिक सक्रिय वाढ होण्याची गरज आहे. कम्युनिटीतील शिकलेल्या लोकांना काम मिळण्याच्या शक्यता भविष्यात निर्माण होतील आणि ही परिस्थिती बदलेल व समाजात सामान्य पद्धतीने सन्मानानं जगता येईल, असा मला विश्वास वाटतो.

 

समपथिक ट्रस्ट
११ सप्टेंबर २००१ रोजी (एलजीबीटीक्यू) लैंगिक अल्पसंख्याक गटाला सन्मानानं जगता यावं यासाठी बिंदुमाधव खरे यांनी ‘समपथिक ट्रस्ट’ची स्थापना केली. ट्रस्टमार्फत या समूहांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. समाजाच्या, कुटुंबाच्या नाकारण्याने अशा व्यक्तींचे मानसिक आरोग्य खूप खचलेले असते. त्यांना अपराधीपणा वाटू नये यासाठी त्यांच्या समुपदेशनाचं काम इथं केलं जातं. अशा व्यक्तींच्या घरच्यांना धक्का बसलेला असतो. समाजाच्या भीतीने ते त्यांच्या मुलांना सरळ नाकारून टाकतात, घरातून बाहेर काढतात. अशा पालकांना योग्य पद्धतीने लैंगिकतेची माहिती देऊन त्यांचेही समुपदेशन केले जाते. तसेच या भिन्न लैंगिकतेची शास्त्रोक्त माहिती समाजापुढे ठेवण्यासाठी पत्रकारिता विभाग, राज्यशात्र विभाग अशा अनेक विद्यापीठांच्या विभागांत, शाळा, कॉलेजमध्ये व्याख्याने, सेमिनार यांचे आयोजन केले जाते व यातून समलैंगिक किंवा तृतीयपंथी असणे हा आजार किंवा विकृती नाही, तर ते नैसर्गिक आहे याबाबत माहिती दिली जाते. तसेच ‘क्विअर फिल्म फेस्टिव्हल’, ‘प्राइड वॉक’चे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. यात लैंगिक अल्पसंख्याक, भिन्नलिंगी समाजातील सर्व व्यक्तींचा सहभाग असतो. तृतीयपंथी व्यक्तींना बँक खाती, आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ट्रस्टमार्फत काम केले जाते. ‘समपथिक ट्रस्ट’सोबत पुण्यातले १०० ते १५० तृतीयपंथी जोडलेले आहेत.

 

विद्यापीठांनी तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी खालील प्रयन्त करणे गरजेचे आहे :
१. तृतीयपंथीयांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना भेटून त्यांच्यासोबत शैक्षणिक पातळीवर काय करता येईल याची चर्चा करणं.
२. शहरात जिथे या कम्युनिटीज आहेत तिथं जाऊन त्यांची शैक्षणिक पाहणी करणं, आकडेवारी गोळा करणं, ज्यांतून त्यांची शैक्षणिक माहिती जमा होईल आणि प्रत्यक्ष परिस्थिती कळेल.
३. त्यानंतर त्यांच्यापैकी ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती त्यांना देणं. ज्यांनी आधीच ठरवलं आहे त्यांना त्या अभ्यासक्रमासाठी मदत करणं.
४. विद्यापीठात, महाविद्यालयांत त्यांना प्रवेश घेताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न करणं.
५. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांना शिष्यवृत्ती देणं, त्यासाठी समाजाला आवाहन करणं, विद्यापीठातील शिका व कमवा योजनेत त्यांना सहभागी करून घेणं इत्यादी गोष्टी करता येतील.
६. त्यांच्याबाबत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असेल यासाठी विशेष प्रयत्न करणं.
७. त्यांना सन्मानाची, माणुसकीची वागणूक मिळेल याविषयी प्रयत्न करणं. त्यासाठी जास्तीत शैक्षणिक कार्यक्रमांत त्यांना आवर्जून सहभागी करून घेणं.
८. प्रौढ साक्षरता वर्ग सुरू करणं.
९. विद्यापीठाच्या प्रत्येक विभागात एलजीबीटीक्यू या लैंगिक अल्पसंख्याकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करणं.   


माझं जगणं
काय समाजाने मज दिले
मी काय समाजाचे फेडले
जरी साधली समाजाने प्रगती
शेवटी म्हणावे एकच लागते
लारे भैया देरे भैया।।
जरी दिली माझी ओळख मला
ओळखीने झाले काय भला
ओळखीच्या आशयाने 
काम कुठे लागते
शेवटी म्हणावे एकच लागते
लारे भैया देरे भैया।।
शिक्षण जरी मज मिळाले
माझ्यातील गुण जरी मज कळाले
या गुणांची वाहवा कुठं मिळते
शेवटी म्हणावे एकच लागते
लारे भैया देरे भैया।।
जगण्यातूनही मरण हाती
श्वासांची ना होते पूर्ती
फक्त दोन घासांची भरण्या खळगी
शेवटी म्हणावे लागते एकच
लारे भैया काय देरे भैया।।
समाजाकडून एकच अपेक्षा
माणूस म्हणून त्यांनी द्यावी साक्ष!
म्हणजे मला गरज 
पडू नये म्हणण्याची
लारे भैया देरे भैया।।
काय समाजाने मज दिले
मी काय समाजाचे फेडले
जरी साधली समाजाने प्रगती
शेवटी म्हणावे एकच लागते
लारे भैया देरे भैया।।

- सारंग

 

पहिला भाग वाचाण्यासाठी येथे क्लिक करा : शिक्षणाचा तृतीय पंथ

 

- मिनाज लाटकर, पुणे 
minalatkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...