आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा तृतीय पंथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणारा तृतीयपंथी समाज. आपल्या लैंगिक ओळखीव्यतिरिक्त आता शिकायला मिळावं, स्वत:च्या पायावर उभं राहातं यावं यासाठीही समाजाशी लढा देत आहे. तृतीयपंथीयांनी शिक्षण घेणं ही त्यांची स्वत:ची, शिक्षणव्यवस्थेची आणि समाजाचीही परीक्षा आहे...


समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथीयांचा. आपल्या लैंगिक ओळखीसाठी या व्यक्ती कायमच स्वतःशी आणि समाजाशी झगडत असतात. त्या आपल्या भिन्न लैंगिक ओळखीनं शिक्षण घेऊ पाहतात तेव्हा त्यांना सर्वच स्तरांवरून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विरोधाला सामोरं जावं लागतं. हा विरोध इतका टोकाचा असतो की, बहुतेक जण शिकायचंच सोडून देतात. पण शिकण्याची उर्मी कायम असेलेले काही त्यावरही मात करून आपल्या नव्या ओळखीसह शिकण्याचं धाडस करतात तेव्हा ती त्यांच्यापेक्षा, शिक्षण व्यवस्थेची व समाजाची परीक्षा जास्त असते. दुर्दैवानं या परीक्षेत हे दोन्ही घटक अनुत्तीर्ण होतानाच दिसत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रात शिकणारी पहिली तृतीयपंथी विद्यार्थिनी सारंग याचं एक ठळक उदाहरण आहे.


“अगं, माझं हातावरचं पोट. मला बाजार मागायला जावं लागतं. गेले नाही तर खाणार काय? मी काय जास्त वेळ थांबू शकत नाही गप्पा मारत,” सारंग असं बोलून रोज वर्ग सुटल्यावर घाईगडबडीत लगेच निघून जाते. विद्यापीठात शिकणाऱ्या सारंगला बाजार मागायला जावं लागतं. कारण विद्यार्थिनीपेक्षा तिची ओळख तृतीयपंथी आहे. तिला कोणी नोकरी देत नाही. कारण पुन्हा तेच. तरीही तिला खात्री वाटते की, ही परिस्थिती बदलेल. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला सन्मानाने नोकरी करून जगता येईल. पुरुषाच्या रूपात जन्म झालेल्या सारंगचा स्त्री होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पण हे सर्व दिव्य पार पाडायची ताकद तिला शिक्षणामुळे मिळाली असं तिला वाटतं.


असा प्रवास तिच्याआधी तिच्या सोबतीतल्या अनेकींनी केला आहे, करत आहेत. “मला सात-आठ हजार रुपये महिना मिळाले तरी चालेल पण कामाच्या ठिकाणी कुणी त्रास द्यायला नको फक्त, इतकीच अपेक्षा आहे. सगळं काम अगदी व्यवस्थित करेन,” सारंगची गुरूबहीण मयुरी सांगते. मयुरी बीई (कॉम्प्युटर इंजीनिअर) आहे. तिलाही सारंगप्रमाणेच पोटाची भूक भागवण्यासाठी बाजार मागवा लागतो. एका हातात उच्च शिक्षणाची पदवी घेऊन दुसऱ्या हाताने भीक मागण्यापर्यंतचा मानसिक प्रवास काय असेल याची कल्पना कदाचित आपण करू शकतो. पण व्यक्ती म्हणून तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात, असा प्रश्न अशा वेळी विचारात घेतला जात नाही. सारंग, मयुरी यांच्या बाबतीत तो घेतला जातो आणि त्यांना त्यांच्या मानसिक ओळखीपेक्षा समाजानं त्यांच्यावर लादलेल्या तृतीयपंथीय ओळखीमुळे मानहानी सोसावी लागते, त्या अवहेलनेची कल्पना कदाचित आपण करू शकणार नाही. रोज पोट भरण्यासाठी बाजारात मागताना सामान्य माणसांकडून येणारे अनुभव आणि एका नामवंत कंपनीमध्ये काम करत असताना सहकाऱ्यांकडून होणारा मयुरीचा लैगिक छळ तिच्यासारख्या इतरांसाठी सामान्य गोष्ट आहे; आणि तसं असूनही त्याविरोधात त्यांना न्याय मागता येत नाही. पण या छळातही त्यांचा कणा मोडला नाही. उलट हा जो संघर्ष करावा लागतो तो सहन करून पुढं जाण्याची ताकद शिक्षणामुळे मिळाली आहे. त्यामुळे ही परिस्थितीदेखील बदलेल आणि समाज एक दिवस आमचा कोणतेही पूर्वग्रह न बाळगता स्वीकार करेल, असा विश्वास मयुरीला आहे.


तृतीयपंथीयांना विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक छळाला कायमच सामोरे जावे लागते पण अशा घटनांची नोंद पोलीस ठाण्यात क्वचितच घेतली जाते. पण जेव्हा समाजही त्याची नोंद घ्यायला तयार होत नाही तेव्हा समाज म्हणून आपण खरंच प्रगत आहोत का, हा प्रश्न पडतो. “माझ्या मुलींना समुद्रकिनारी बसून वाळू विकता आली पाहिजे, इतकं सक्षम बनावं त्यांनी. त्यांची स्वप्नं त्यांनी स्वतः बघावी. समाजात जगताना प्रत्येक पावलावर संघर्ष आहे. त्यात तग धरून राहण्याची ताकद त्यांनाच निर्माण करावी लागेल. त्यासाठी त्यांना गवतासारखं चिवटपणे कोणत्याही परिस्थितीत जगता आलं पाहिजे,” सारंगच्या गुरू, मंदार नानी सांगत होत्या. त्यांनी एमबीए  (हॉटेल मॅनेजमेंट) केलेलं आहे. एका नामांकित विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. पण त्यांनाही नोकरी सोडावी लागली. आपल्या या कटू अनुभवांनंतरही त्या आपल्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकानं शिकावं यासाठी सतत सर्वांना प्रोत्साहन देत असतात.


सारंगची मानसआई साक्षी यांचेही अनुभव असेच आहेत. एफटीआयआयसारख्या  नामांकित संस्थेतून त्यांनी मेकअप आर्टिस्टचे प्रशिक्षण पूर्ण केले. तिथल्या शिक्षकांनी त्यांचा स्वीकार केला. तिच्या वर्गमित्र-मैत्रिणींनी नोकरीसाठी मदत केली. त्यामुळेच त्या आता स्वतंत्रपणे मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यातूनच मीनाक्षी रोडे या त्यांच्या मैत्रिणीच्या मदतीने साक्षीजींनी सारंगला पुणे विद्यापीठात पुढचं शिक्षण घेण्यासाठी मदत केली. सारंगने रीतसर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून प्रवेश मिळवला आणि आज ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली पहिली तृतीयपंथी विद्यार्थिनी आहे. 


खरं तर तिच्यासाठी ही अभिमानाची बाब असली तरी समाज म्हणून आपल्यासाठी नक्कीच चांगली बाब नाही की, इतक्या वर्षांनंतरही तृतीयपंथीयांना शिक्षणाचे दरवाजे आजही बंद आहेत. कायद्यानं त्यांना शिक्षणाची बंदी आहे म्हणून नाही तर समाज त्यांचा सहजतेने स्वीकार करायला, माणूस म्हणून त्यांना त्यांचा नैसर्गिक अधिकार मान्य करायला तयार नाही म्हणून. तृतीयपंथीयांसाठी शिक्षणाची दारं उघडू लागली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. पण त्यांना इतरांप्रमाणेच शिक्षणाच्या संधी देण्याबाबत समाज म्हणून आपण कमी पडतो. तृतीयपंथीयांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे, वास्तव्याचा पुरावा हे नियम शिथिल करणे, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्यांच्या बाबतीत संवेदनक्षम बनवणे, त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही फक्त सरकारचीच नाही तर समाज म्हणून आपलीदेखील जबाबदारी आहे.


“आमच्या कम्युनिटीतले बरेचजण रेल्वेत, बाजारात भीक मागतात. कधी जबरदस्ती करतात. शरीरविक्रीचा व्यवसाय करतात. लोक म्हणतात, ‘यांना आयतं खायला पाहिजे म्हणून भीक मागतात.’ पण आमच्याकडे आवश्यक ते शिक्षण आणि कष्ट घेण्याची तयारी असूनही आम्हाला नोकऱ्या दिल्या जात नाही या वस्तुस्थितीकडे मात्र सारेच दुर्लक्ष करतात. तरीही मी सातत्याने लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आमच्याबद्दल लोकांना किळस वाटतेच पण एक विकृत कुतूहलही असतं अनेकांना. ‘तुम्ही स्वयंपाक करता का? तुम्ही लेडीज टॉयलेट वापरता की जेन्ट्स? तुम्ही कोणत्या पार्लरमध्ये जाता किंवा सगळे तृतीयपंथी देहविक्री व्यवसाय करतात का?’ असे अनेक प्रश्न अनेकजण विचारतात. मी त्यांना सगळं नीट समजावून सांगते. त्यांचे गैरसमज दूर केले की आमच्या कम्युनिटीबद्दल असलेली त्यांच्या डोक्यातली अनास्थेची जळमटंही दूर होतात,” सारंग सांगते.


“विद्यापीठात आल्यापासून अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. एरवी जी मुलंमुली कधीच बोलले नसते ते माझ्यासोबत माझ्या घरी आले. आम्ही सोबत फिरतो, खातो, पितो. मी थोडे तास का होईना सामान्य आयुष्य एंजाॅय करते. इथं नवीन नाती बनवण्याचा प्रयत्न करतीय पण अजूनही बऱ्याच नजरा माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. समाजातल्या वाईट वृत्तीचा सातत्याने अनुभव येतोच पण चांगले लोकही भेटतात. पण मी आता या सगळ्या अनुभवांना खंबीरपणे सामोरं जायचं ठरवलं आहे. आपण योग्य ती गुणवत्ता मिळवली तर समोरच्यांना ती स्वीकारावीच लागते,” हा विश्वास सारंगला आहे. पण त्याच वेळी इतरांची जी परिस्थिती आहे त्यांच्या वेदनांशी तिची नाळ तुटलेली नाही. अनेक तृतीयपंथी लोक कमी शिकलेले असतात. शिकायची खूप इच्छा असते पण समाजाच्या व कुटुंबाच्या नाकारण्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. 


लैगिकतेची नवी ओळख स्वीकारतानाचा त्यांचा स्वतःशी, कुटुंबाशी आणि समाजाशी सातत्यानं संघर्ष सुरू असतो ज्यात कोणाची सोबत नसते. त्यामुळे कित्येकजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. शिक्षण मिळालं तर समाजाच्या मुख्य प्रवाहात येता येईल आणि हा संघर्ष कमी होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षणात सामावून घेण्यासाठी जसे प्रयत्न केले जातात तसेच प्रयत्न तृतीयपंथीयांसाठीही करण्याची गरज आहे.  प्राथमिक स्तरापासूनच तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिकताना अडचणी येत असतात. कारण आजही आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात लैंगिक अंधश्रद्धा आहेत, ज्या दूर करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात बदल करणं आवश्यक आहे. कायद्यानं तृतियपंथीयांना शिक्षण अथवा नोकरीचा हक्क नाकारण्यात आला नसला तरी सामाजिक दबावापुढे त्यांना कायम आपली योग्यता सिद्ध करूनही माघारच घ्यावी लागते. भारतातील पहिल्या तृतीयपंथी प्राचार्य मानोबी बंडोपाध्यय यांना त्यामुळेच राजीनामा द्यावा लागला. कोची मेट्रोतल्या अकरा तृतीयपंथी लोकांनी याच निराशेतून नोकरी सोडली. तर नौदलातील मनीष कुमार गिरी यांना लिंगबदल शस्त्रक्रिया करून त्या स्त्री बनल्या म्हणून सैन्यातून काढून टाकण्यात आलं. ही उदाहरणं समोर असल्यामुळे “पढाई कर के क्या करेंगा? ताली मारके भीक ही मांगेगा,” असं म्हणत वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारा मोठा गट या कम्युनिटीत आहे.(पूर्वार्ध)


-  मिनाज लाटकर, पुणे
minalatkar@gmail.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...