आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mrinmayee Ranade Write About First Shruti Shrikhande In Combined Defense Services Examination

'लष्‍कर'च्‍या भाक-या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रुती श्रीखंडे - Divya Marathi
श्रुती श्रीखंडे

पुण्यातली श्रुती श्रीखंडे combined defence services या महत्त्वाच्या परीक्षेत पहिली आल्याची बातमी आपण नुकतीच वाचली. चेन्नईतल्या आॅफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत तिचं प्रशिक्षण एप्रिलमध्ये सुरू होईल आणि ते पूर्ण केल्यानंतर ती लष्करात रुजू होईल. मुलींनी लष्करात, लष्कराच्या कोणत्याही शाखेत, नोकरी करणं ही काही दुर्मीळ गोष्ट उरलेली नाही. पण ती इतकीही सामान्य झालेली नाही की, त्याची बातमीच होणार नाही. मुली आता भारतीय लष्करात विविध पदांवर काम करतायत त्यालाही अनेक वर्षं झाली. आता त्या लढाऊ विमानही चालवतात. तरीही मुलींना शिकूच न देण्याकडे अजूनही अनेक पालकांचा कल असतो. अनेक घरांमधनं मुलींना विज्ञान शाखेत जाण्यास मनाई होते. शिक्षिकेचं कामच अजूनही मुलींसाठी  सर्वार्थाने योग्य समजलं जातं, त्यामुळे बीएड वा डीएड करणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. ते ‘सेफ’ आहे, तिथे सुट्या खूप मिळतात (हा मोठाच गैरसमज आहे खरं तर), घरचं सगळं सांभाळून ही नोकरी करता येते, असा समज आहे. परंतु, शिकवणं हीदेखील एक कला आहे, ते एक कौशल्य आहे, ते सगळ्यांनाच नाही जमू शकत, याची जाणीव किती जणांना असते? प्रत्येक जण चांगलं चित्र काढू शकणार नाही, सुरेल गाऊ शकणार नाही, क्रिकेट खेळू शकणार नाही हे आपल्याला माहीत असतं. परंतु, शिक्षक मात्र कोणीही होऊ शकतं, असं वाटत असतं अनेकांना. असे लोक लष्करातली नोकरी म्हणजे लष्करच्या भाकऱ्या या म्हणीचा शब्दश: अर्थ घेत असतात. पण मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला प्रोत्साहन देणं, त्या कामांची ओळख करून देणं, अशी वेगळी कामं करणाऱ्या महिलांना त्यांच्यासमोर आणणं अतिशय आवश्यक आहे. रिक्षा चालवणारी महिला पाहिली की, ड्रायव्हिंगची आत्यंतिक आवड असणाऱ्या कितीतरी महिलांच्या मनात येतच असेल ना, आपणही हे करावं का? सगळ्यांनी अगदी दुष्प्राप्य, कठीण, खूप कौशल्यं आवश्यक असलेली कामंच करायला हवीत, त्याचंच स्वप्न पाहायला हवं असं नाही. पण नेहमीच्या साच्याच्या बाहेरचं काहीतरी करायला काय हरकत आहे?


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...