आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्‍तपदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सप्तपदी आम्ही रोज चालतो, तुम्हा सवे!

बरोबर सात वर्षांपूर्वी आपल्या वाचक-लेखक या नात्याचा शुभारंभ झाला. चुकतमाकत आम्ही शिकत गेलो, अजूनही शिकतोय. तुमच्या प्रतिक्रिया, कौतुकाची थाप, क्वचित केलेली टीका यांतून धडा घेत वेगळं, चांगलं, आणि वाचनीय असं लिखाण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्हालाही यातून काहीतरी हवंहवंसं, वाट   पाहायला लावणारं, मिळत असेल अशी खात्री वाटते. सात वर्षं ही एका वृत्तपत्राच्या दृष्टीने फार नाहीत, विशेषकरून आपल्या आजूबाजूला शेदीडशे वर्षं जुनी वृत्तपत्रं असतात तेव्हा. परंतु आमच्या दृष्टीने हा काळ खास आहे, तो तुमच्यामुळेच.
हा काळ साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मधुरिमाचा विशेषांक घेऊन आलोय. सात वर्षांचा अनुभव पाठीशी घेऊन पुढे काय होणार, याकडे लक्ष आहेच. त्यामुळेच या अंकात सध्याच्या एका ज्वलंत विषयाच्या काही बाजू मांडायचा प्रयत्न केलाय. मुली शिकल्या आणि संसार मोडायला लागले, हे वाक्य गेली काही दशकं कानावर पडतंय. संसार मोडायला लागले त्यामुळे भारतीय संस्कृतीचं एक प्रतीक असलेल्या कुटंुबव्यवस्थेला हादरे बसू लागले. लग्नसंस्थाही बदलू लागली आहेच. याचा विविध अंगांनी परामर्ष घेणारे लेख आजच्या अंकात आहेत. काही लेखक तिशीही न गाठलेले, काही साठी उलटलेले, बाकीचे अधलेमधले. प्रत्येक पिढीची लग्न आणि कुटुंब यांबाबत वेगवेगळी मतं असतात. अशी काही प्रातिनिधीक मतं यात वाचायला मिळतील. त्यातली बरीचशी स्वानुभवावर आधारित आहेत, म्हणजे स्वानुभव आणि भवताली काय घडतंय याच्या निरीक्षणातून ही मतं तयार झालेली आहेत. संसार मोडतायत आणि कुटुंबव्यवस्था बदलतेय, ही समस्या मानलीच तर (आम्ही ती तशी मानत नाही) त्यावरची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न नाही. परंतु बदल घडतोय, आणि समाजाचा एक मोठा घटक हा बदल स्वीकारायला तयार आहे का, याची चाचपणी करण्याचा हा प्रयत्न नक्कीच आहे.
अंक आवडला का, यात मांडलेली मतं पटली का, न पटल्यास का नाही पटली, तुम्हाला काय वाटतं, हे नेहमीप्रमाणेच आवर्जून कळवालच.
सात वर्षांचा हा प्रवास खूप काही शिकवणारा, आनंद देणारा केल्याबद्दल तुम्हा सर्व लेखकवाचकांच्या ऋणात राहायलाच मधुरिमा टीमला आवडेल.

 

mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...