आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी पुस्तकं आणि आपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या आठवड्यात दोन दिवस साजरे होताहेत. जागतिक मुद्रण दिन आणि मराठी भाषा दिन. या दोन्हींच्या निमित्ताने मराठी छापील पुस्तकांविषयी काही बोलणं अस्थानी ठरू नये. पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहेत, म्हणजेच छापली जात आहेत. प्रकाशन संस्थांची संख्या वाढते आहे, लेखक/कवींची संख्या वाढते आहे. छापील शब्दाचा अपवाद केला तर आॅनलाइन प्रचंड साहित्य निर्माण होतंय. तेही खूप वाचलं जातंय. सोशल मीडियामुळे, विशेषकरून फेसबुक, ब्लाॅग, ट्विटर, व्हाॅट्सअॅपवर सातत्याने लिहिणारे हजारो लोक आहेत, ही संख्याही वाढतेच आहे. म्हणजे वाचणारेही असावेत, असं गृहीत धरायला हरकत नाही. 


आपण पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजेत, असा एक प्रवाह आहे. दुसरा प्रवाह आहे, ग्रंथालय वा वाचनालयातून पुस्तकं आणून तरी वाचायला हवीत. तिसरा आहे, मोबाइल किंवा संगणकाच्या पडद्यावर का होईना, पण पांढऱ्यावर काळं केलेलं वाचा. चौथा प्रवाह आहे, एका इंग्रजी म्हणीत सांगितल्यासारखा. Beg, borrow, or steal. म्हणजे भीक मागा, उसनं घ्या, किंवा चोरा! काहीही करा, पण वाचा. पाचवा प्रवाह आहे, कशाला वाचायचं ते पुस्तक नि बिस्तक, काही ढिम्म फरक पडत नाही आयुष्यात त्याने.


ज्या पिढीला मिलेनियल पिढी म्हणून ओळखली जाते, म्हणजे इ.स. २००० वा त्यानंतर जन्मलेली, त्या पिढीतील बरेच लोक वर उल्लेख केलेल्या तिसऱ्या वर्गातले आहेत. वर्तमानपत्रं, अभ्यासाची पुस्तकं, टिपणं, आणि मनोरंजनासाठीचं वाचन सगळं ते पडद्यावर करतात. पहिल्या वर्गातले हळूहळू कमी होत चालले आहेत, पुस्तकं ठेवायला जागा नाही हे त्यामागचं एकमेव नसलं तरी मोठं कारण आहे. दुसऱ्या वर्गातही बरेच लोक आहेत. 


गावोगावी बरीच वाचनालयं आहेत, त्यांचे बरेच सदस्यही आहेत. चौथा प्रवाह फार जुना. मिळेल तो छापील शब्द वाचणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात. अनेकांकडे वेगवेगळ्या मार्गांनी मिळवलेली पुस्तकं असतात, ती त्यांनी चक्क वाचलेलीही असतात. पाचवा वर्गही फारच मोठा आहे. पण तुम्ही त्यात मोडत नाही. याचाच अतिशय आनंद आहे.
- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...