आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसते घरी ती जेव्‍हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये दोन मित्र बोलत होते, आॅफिसातनं घरी निघाले होते. एकाची बायको माहेरी गेली होती आठ दिवसांसाठी वगैरे. तो म्हणत होता, ‘दोन दिवस मजा वाटली रे, बाहेरचं चमचमीत खायला मिळतं म्हणून. नंतर कंटाळा आला. पैसेही किती जातात!’ मग थोड्या वेळाने म्हणाला, ‘घरही खायला उठतं रिकामं. मी तर एकदा जो बिछाना घातलाय, तो ती यायच्या आधी काढणारेय थेट. कोण करत बसेल एकट्यासाठी साफसफाई वगैरे?’


ऐकून मी विचारात पडले. पहिली गोष्ट म्हणजे अजूनही बायको घरी नसली की, पुरुषांना जेवणाचा प्रश्न पडतो. आपलं पोट भरेल असा डाळभात, खिचडी, आॅम्लेट, भुर्जी असं काहीच बहुतांश पुरुषांना पकवता येत नाही. मग बायको आजारी पडली किंवा बाहेरगावी केली की, विकतच्या जेवणावर अवलंबून राहावं लागतं. पोळीभाकरी करणं तुलनेने कठीण आहे, ते सर्वांना नीट जमेलसं नाही. पण कुकर लावणं हे तर अगदी मूलभूत कौशल्य आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे, आणि तेही आपल्याकडच्या अनेक मुलाबाप्यांना येत नाही. यात थोडा दोष त्यांच्या आईवडलांचा आहे, ज्यांनी त्यांना लहानपणपासून स्वयंपाकघरात येऊ दिलं नाही, छोटे सोपे पदार्थ करायला उत्तेजन दिलं नाही. पण बाकीचा दोष या पुरुषांचाच नाही का? आईने शिकवलं नाही पण तुम्ही आता स्वत: शिकू शकता की. असं करण्यात अनेकदा आड येतो, पुरुषार्थ! पुरुष स्वयंपाक करत नाही, ते बायकांचंच काम, हे कानीकपाळी ठाकूनठोकून  सांगितलं जात असतं सर्वांच्याच. त्यातून स्वयंपाकाची आवड नसलेल्या बाया सुटत नाहीतच, पण पुरुषही असे अडचणीत येतात.


दुसरी गोष्ट साफसफाईची. घराचा केर काढणं, पसारा आवरणं, वस्तू जागच्या जागी ठेवणं ही कामंही अजूनही घरातल्या बाईचीच समजली जातात. पुरुषांनी पसारा करायचा आणि आई/बायको/बहीण/मुलगी यांनी तो आवरायचा, हे चुकीचं असल्याची जाणीव पुरुषांना स्वत:हून होणं कठीण, ती आपण करून द्यायला हवीच.


जाताजाता, असं कधीतरी घरातली कोणतीही कामं न करता, स्वयंपाक न करता, राहायला बायांनाही आवडतच असेल ना? तुम्हाला काय आवडतं, काय करावं/न करावं वाटतं, सांगाल आम्हाला? 


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...