आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारतीय भाषांचं संवर्धन मोलाचं’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक, प्रकाशक, आणि साहित्य उत्सवांच्या आयोजक अशी त्रिपेडी भूमिका बजावणाऱ्या नमिता गोखले यांच्याशी मारलेल्या या गप्पा. त्या स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून घेत नसल्या तरी त्यांची स्त्रीपात्रं अतिशय सशक्त व सक्षम आहेत. स्त्रिया जात्याच प्रचंड बळकट असतात, असं त्यांचं ठाम मत आहे. मूळच्या कुमाउँनी असलेल्या नमिता यांना मराठी भाषा, महाराष्ट्र व त्याचा इतिहास, आणि मराठी पदार्थांबद्दल अतिशय प्रेम आहे.


ज यपूर लिटरेचर फेस्टिवलचा आनंद चार वर्षं घेतल्याने या फेस्टिवलच्या आयोजकांबद्दल अतिशय कुतूहल मनात होतं. दरवर्षी पाच दिवस नुसतेच भरगच्च नव्हे तर उत्तम साहित्यिक कार्यक्रम देणं कसं काय जमतं, त्यामागची ऊर्जा, उद्देश काय असतील, हेही प्रश्न होते. फेस्टिवलच्या एक आयोजक नमिता गोखले गेल्या आठवड्यात मुंबईत आल्या होत्या तेव्हा त्यांची भेट घेण्याची संधी मिळाली.


त्यांचं Lost in Time: Ghatotkacha and the Game of Illusions हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय, त्यापासून सुरुवात केली. हे त्यांचं लहान मुलांसाठीचं दुसरं पुस्तक. त्यात महाभारत आहेच, खेरीज फुटबाॅलही आहे, त्यामुळे ते मुलांना आवडतंय. ‘घटोत्कचाची आई हिडिंबा अथवा हिडिंबी, भीमाची पहिली पत्नी, ती राक्षसी होती. त्या दृष्टीने घटोत्कच हा ज्येष्ठ पांडवपुत्र, परंतु त्याला तो मान कधीच दिला गेला नाही. तो कायम बाहेरचाच राहिला. पुराणांमधल्या वा मिथककथांमधल्या अशा व्यक्तिरेखांचं फार आकर्षण आहे मला. या उतरंडीच्या तळाशी असलेल्यांना त्यातून वर येण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. आपल्या देशात ही उतरंड फार पूर्वीपासून दिसते, ती अजूनही आहे,’ नमिता सांगत असतात. हिडिंबा ही त्यांची आवडीची व्यक्तिरेखा, कारण सौंदर्याच्या प्रस्थापित ठोकताळ्यांपेक्षा ती वेगळी होती. ‘अशा ठरावीक सौंदर्याच्या व्याख्या, जातिधर्माच्या चौकटींमुळे माझी चिडचिड होते. शूर्पणखाही त्यातलीच. तिने आणि हिडिंबेने वेगळं रूप धारण केलं पुरुषांना आकर्षून घेण्यासाठी, कारण त्या तत्कालीन समजुतींनुसार सुंदर नव्हत्या. हा फेअर अँड लव्हली फेनाॅमेनन आहे, शतकानुशतकं चालत आलेला.’ In Search of Sita या पुस्तकातली त्यांनी रंगवलेली सीता ही राम आणि रावण यांच्या शत्रुत्वात अडकलेली स्त्री म्हणून समोर येत नाही. ‘दुसऱ्या अग्निपरीक्षेनंतर ती म्हणते, अच्छा, झालं ते फार झालं. (असं म्हणून ती रामापासून दूर निघून जाते.) परंतु आपल्या मालिका वा चित्रपटांमधून अशी खंबीर सीता दाखवलीच जात नाही,’ त्या काहीशा तक्रारीच्या सुरात म्हणतात.


नमिता गोखले या मूळच्या नमिता पंत, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कुमाऊँ प्रांतातल्या. ‘कुमाऊँनी स्त्रिया अतिशय समर्थ आणि सशक्त असतात. आयुष्याचा बराच काळ त्यांनी पुरुषांशिवाय काढलेला असताे, त्यामुळे असेल कदाचित. मला स्त्रिया दुबळ्या असतात, हा समज कधी कळलाच नाही. 


भारतीय स्त्रिया व्यक्तिश: सशक्तच असतात, सामाजिक परिप्रेक्ष्यात त्या दुबळ्या होऊन जातात,’ त्यांच्या पुस्तकांमधनं सहज लक्षात येणारी ही गोष्ट त्या सांगून जातात.


नमिता यांची पंधराहून अधिक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यात त्यांनी अनेक प्रयोगही केलेले आहेत. उदाहरणार्थ, शकुंतला या पुस्तकाला दोन शेवट आहेत, वाचकांनी जाे आवडेल तो स्वीकारावा. लहान मुलांसाठी दोन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. सध्या तीन पुस्तकांवर त्या काम करत आहेत. त्यातलं एक कादंबरी असेल, एक नाॅन फिक्शन आणि एक संकलन आहे. त्यांनी नुकतीच वयाची साठी ओलांडलीय, परंतु त्यांच्यातली ऊर्जा कौतुकास्पद आहे. त्यांना तंत्रज्ञानाचंही मोठं आकर्षण आहे, ‘जरी मी तंत्रज्ञान वापरू शकत नसले तरी.’ त्यामुळे त्यांना मल्टिमीडिया पुस्तकाबद्दल कुतूहल वाटतं, आणि ते त्यांना करून पाहायचं आहे.


मुलांसाठी लिहिणं कठीण वाटतं का, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘मला आवडतं मुलांसाठी लिहायला. पण मी त्यांच्यासाठी मुद्दाम सोपं करून लिहीत नाही ती खूप बुद्धिमान असतात, त्यांच्या डोक्यात बरेच प्रश्न असतात. मी त्या प्रश्नांमधनंही शिकत असते. मी त्यांच्यासाठी लिहितानाही मृत्यू, दु:ख, यांबद्दलही लिहिते, ती वाचतील म्हणून मी सगळं छानछान नाही लिहीत.’


नमिता यांचे पूर्वज महाराष्ट्रातून उत्तराखंडात गेलेले. त्यामुळे त्यांच्यात मराठी अंश आहेच. खेरीज वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी राजीव गोखले या पुणेकराशी विवाह केला. एकवीस वर्षांच्या संसारानंतर राजीव यांचं अकाली निधन झालं. गोखले कुटुंबाशी नमिता यांचा अजूनही जवळचा संबंध आहे, त्यांनी मराठी बोलता येत नसलं तरी समजतं. त्या दिल्लीत राहात असल्या तरी पुण्यात अधूनमधून येत असतात. दिल्लीतल्या गारठवणाऱ्या थंडीत, या मोसमात मिळणाऱ्या हिरव्यागार मेथीचं खास महाराष्ट्रीय पिठलं हा त्यांचा अतिशय आवडता पदार्थ. मराठी जेवण आवडत असलं तरी, ‘आमच्या हिमालयातले बटाटेच चांगले, पुणेरी बटाट्यात ती मजा नाही,’ असं त्या म्हणतात. हिमालयात जे जाऊन आलेत, त्यांना हे शंभर टक्के पटावं.


मराठीपणाविषयी त्यांची ठाम मतं आहेत. कुमाऊँनी लोक अगदी साधे, आत एक बाहेर दुसरं, असं त्यांचं नसतं. पण मराठी माणूस फार डावपेच लढवणारा असतो. तो कोणतीही गोष्ट उगीच किंवा विनाकारण करत नाही, त्यामागे काहीतरी हेतू असतो. पहाडी लोक मात्र साधे, त्यांच्या प्रतिक्रियाही फार विचार न करता केलेल्या असतात. मराठी लोक सूक्ष्मात जाऊन विचार करणारे, मार्मिक असतात, असं त्या कौतुकाने म्हणतात.


नमिता गोखले यांचं नाव ज्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलशी जोडलं गेलंय, तो पुढच्या महिन्यात होताेय. त्यात रणजीत देसाईंच्या श्रीमान योगी या महाराष्ट्रच्या अतिशय लाडक्या एेतिहासिक कादंबरीच्या इंग्रजी अनुवादावर एक चर्चासत्र होणार आहे. हा अनुवाद विक्रम पांडे यांनी केला आहे. तसंच ज्येष्ठ लेखक किरण नगरकर फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. काही वर्षांपूर्वी भालचंद्र नेमाडे तेथे होते, त्यांनी ‘कोसला’च्या इंग्रजी अनुवादाचा काही भाग तिथे वाचून दाखवला होता. 


तसंच ‘आयदान’कार उर्मिला पवार एका वर्षी तिथे वक्त्या होत्या. भारतीय भाषा आणि त्यांतलं साहित्य नमिता यांना मोलाचं वाटतं. त्यामुळे त्या दरवर्षी या भाषांमधील साहित्यिकही या फेस्टिवलमध्ये सहभागी होतील, या प्रयत्नात असतात. ज्या २४ भाषा भारतीय भाषा म्हणून नोंदवल्या आहेत, त्यातील एक बोडो वगळता सर्व भाषांचे साहित्यिक फेस्टिवलमध्ये आजवर येऊन गेले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना नुकताच आसाम साहित्य परिषदेच्या शताब्दी वर्षातला राष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार देण्यात आला आहे.


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...